Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कैद्याचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न
औरंगाबाद, २६ जुलै/प्रतिनिधी

बलात्काराच्या गुन्ह्य़ाखाली हर्सूल कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने फाशी घेऊन

 

आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पिंटू उर्फ पांडुरंग चंदर सोनवणे असे या कैद्याचे नाव आहे. त्याला बॅरेक क्रमांक दोनमध्ये ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याने चादरीचा एक दोर स्वच्छता गृहाच्या एक्सॉस्ट फॅनच्या खिडकीला बांधून फासी घेण्याचा प्रयत्न केला. सोनवणे हा नाशिक जिल्ह्य़ातील रहिवासी आहे. बलात्काराच्या गुन्ह्य़ात त्याला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तुरुंगाधिकारी देवराव सूर्यभान आडे यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.
तलवार घेऊन फिरणाऱ्यास अटक
हातात तलवार घेऊन दहशत माजविणारा संतोष रतनलाल रमंडवाल (वय २१, रा. मोची गल्ली, पद्मपुरा) यास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शनिवारी रात्री संतोष हा पद्मपुरा भागात तलवार घेऊन फिरत असून लोकांना धमकावीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रमाकांत पडवळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला सापळा लावून अटक केली. त्याच्याकडून एक तलवार आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मारहाण
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तिघांनी मनोजकुमार रामेश्वर मोहोती (वय ३६, रा. राजेंद्रनगर, नारेगाव) यांना बेदम मारहाण करून त्यांच्या खिश्यातील चार हजार रुपये काढून घेतले. ही घटना शुक्रवारी रात्री नारेगाव येथील देशी दारूच्या दुकानासमोर घडली. शिवा लांडगे (रा. ब्रिजवाडी) आणि त्याच्या दोन साथीदारांनी मोहोती यांना रस्त्यावर अडवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मोहोती यांनी नकार देताच तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्या खिश्यातील चार हजार रुपये काढून घेतले. अशाच प्रकारच्या आणखी एका घटनेत अमित प्रकाश जटाळे (वय २८, रा. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काल रात्री जालना मार्गावरून घराकडे पायी जात असताना प्रवीण सुरेश पाटील (वय १९, रा. खिवंसरा पार्क) आणि ॠषीकेश प्रमोत तवार (वय २३, रा. विशालनगर) या दोघांनी त्यांना अडवून त्यांच्या गळ्यातील १२ हजार रुपये किमतीची सोनसाखळी पळवून नेली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
विमानतळावरून लोखंड चोरीचा प्रयत्न
औरंगाबाद विमानतळावरून लोखंड चोरीच्या प्रयत्नात असलेल्या एकास केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केली. गजानन शिवाजी तांगडे (रा. कामगार कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तांगडे हा लोखंडाच्या पट्टय़ा आणि अँगल घेऊन जात असताना कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले.
५० हजारांसाठी दुसरे लग्न केले
व्यवसाय सुरू करण्यासाठी पत्नी माहेराहून ५० हजार रुपये आणत नसल्यामुळे पतीने दुसरे लग्न केले. संजयनगर बायजीपुरा येथे ही घटना घडली. रिजवाल बी शेख रहिम (वय ३५, हल्ली मुक्काम पाचोरा, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गेल्या काही दिवसांपासून पती शेख रहीम शेख गब्बू हा आणि सासरचे अन्य आठ नातेवाईक तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते.
व्यवसाय सुरू करण्यासाठी ही रक्कम न आणल्यास जिवे मारण्याचीही धमकी देण्यात येत होती. मात्र रिजवाल बी ही मागणी पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यामुळे रहीम याने त्यांच्या परवानगीशिवाय दुसरे लग्न केले म्हणून ९ जणांविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.