Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सोपानकाका इसादकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
गंगाखेड, २६ जुलै/वार्ताहर

सुमारे ५० हजार वारक ऱ्यांच्या उपस्थितीत सोपानकाका इसादकर यांच्यावर आज गोदाकाठी

 

भक्तिभावाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोपानकाकांचे नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात आजाराने काल निधन झाले. आज सकाळी शहराच्या मुख्य मार्गावरून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघाली. यावेळी राज्याच्या विविध भागांतून भजन मंडळी व भक्त उपस्थित होते. पुणे, आळंदी व पंढरपूर येथील भक्त तसेच राज्याचे कृषी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, माजी नगराध्यक्ष डॉ. मधुसूदन केंद्रे, ह. भ. प. अच्युत महाराज दस्तापूरकर, सोपानकाकांचे गुरुघराणे ठाकूरबुवा महाराज, अण्णा महाराज दैठणकर हेही अंत्यसंस्काराला उपस्थित होते. गोदाकाठी विविध भजनी मंडळांच्या कीर्तनाने अंत्यसंस्कार पार पडले. शहरात १३ दिवस कीर्तनसोहळा होणार आहे. याप्रसंगी श्री. वरपूडकर म्हणाले, परभणी जिल्ह्य़ाच्या सांप्रदायिक परंपरेत संत मोतीराम महाराज, मारोतराव महाराज दस्तापूरकर यांची परंपरा चालविणारा नि:स्वार्थी संताच्या निधनाने वारकरी संप्रदाय पोरका झाला आहे. श्रावण महिन्यात मरण येण्याची त्यांची इच्छाही पूर्ण झाली.
डॉ. केंद्रे म्हणाले, तालुक्यास संतभूमी म्हणून ओळख असल्याने खऱ्या अर्थाने परंपरा जोपासणाऱ्या काकांच्या निधनाने तालुका दु:खात बुडाला आहे. ठाकुरबुवा महाराज म्हणाले, निष्ठा आणि निस्सीम भक्ती यांचे जिवंत उदाहरण म्हणजे सोपानकाका होय. त्यांच्या निधनाने राज्यभरातील सांप्रदायिक चळवळ पोरकी झाली आहे.