Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कौठाची बससेवा ठरली औटघटकेची!
नांदेड, २६ जुलै/वार्ताहर

महानगरपालिकेच्या पहिल्या जनता दरबारातील निर्णयांची अंमलबजावणी करत मुख्यमंत्री अशोक

 

चव्हाण यांच्या आदेशानुसार कौठा (जुना) परिसरात शहर बससेवा सुरू झाली. परंतु सेवा सुरू झाल्याचा आनंद मिळतो न मिळतो तोच ही सेवा बंद करून जनतेच्या आनंदावर विरजण टाकण्याचे काम मनपाने केले आहे.
जुना कौठा येथे दहा हजारांवर लोकसंख्या आहे. येथील विद्यार्थी नांदेड येथील विविध शाळेत शिक्षणासाठी जातात. जवळपास सर्वाचा व्यवहार नांदेड शहरावर चालतो. प्लॉटिंग आणि इतर माध्यमातून नगरपालिकेस कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. परंतु शहरालगत असूनही मनपा कुठलीच सेवा देण्यास तयार नाही. ड्रेनेज, दिवाबत्ती, शाळा, रस्ते, साफसफाई आदी सुविधा देण्यास मनपाची कुचराई सुरूच आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पहिला जनता दरबार जुना कौठा येथे घेऊन जनतेला विविध सेवेची हमी दिली होती. शाळेत शिक्षण घेणाऱ्या बालकांना ये-जा करण्यासाठी शहर बससेवा सुरू करा, अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. ती पाठपुरावा करून मान्य झाली. शहर बससेवेची पहिल्या दिवशी फेरी झाली. परंतु दुसऱ्या दिवसानंतर या लालपरीने माहेर गाठले, ती परतलीच नाही!