Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अल्पसंख्यांक समाजाने प्रेमाचे कर्ज वाढवावे - विलासराव
लातूर, २६ जुलै/वार्ताहर

अल्पसंख्याक समाजाने आपल्यावर सातत्याने प्रेम केले. तुमच्या प्रेमाचे कर्ज असेच ठेवा. आम्ही

 

तुमच्या डोक्यावरील कर्ज कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी दिली.
येथील टाऊन हॉलच्या मैदानावर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची स्थापना आपण करून अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी भरीव मदत केली. त्याची जाणीव ठेवून या मंडळातील पदाधिकाऱ्यांनी आपल्याला कार्यक्रमाला बोलाविले, ही चांगली बाब आहे. राजकारणात केलेल्या कामाची जाणीव ठेवून त्याचे कौतुक करण्याचे प्रसंग कमी घडतात. आपण मात्र नशीबवान आहोत. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे मला संकोचल्यासारखे झाले, असे ते म्हणाले. मी माझ्या कारकिर्दीत जास्त काही केले नाही. जे हक्काचे होते ते दिले. मराठवाडय़ातील हाज यात्रेकरूंसाठी औरंगाबाद येथून खास विमानाची सोय केली. आता आगामी काळात लातूरच्या विमानतळावरून थेट हाज यात्रेसाठी व्यवस्था केली जाईल. तो दिवस फार दूर नसल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष अमिन पटेल यांनी, केवळ विलासरावांमुळेच अल्पसंख्याकांना आर्थिक आधार मिळाल्याचे ते म्हणाले. केवळ लातूर तालुक्यातील तीन कोटी ४४ लाख रुपयांचे कर्जवाटप अमित देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे होऊ शकल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्याचे संयोजक अमित देशमुख यांनी, मुस्लिम समाजासाठी सामुदायिक नमाज अदा करण्यासाठी सध्याची जागा अपुरी पडते आहे. शादीखान्यांच्या सोयी अपुऱ्या आहेत. विधवांच्या मुलीच्या लग्नासाठी महामंडळाच्या वतीने आर्थिक सहाय्य मिळण्याची गरज असल्याचे सांगितले.
अ‍ॅड्. त्र्यंबकदास झंवर, आमदार चरणसिंग सप्रश्न, गृहराज्यमंत्री नसीम खान, आमदार जयप्रकाश छाजेड आणि संपर्कमंत्री दिलीप देशमुख यांची भाषणे झाली. कार्यक्रमाची सुरुवात रोहित राऊत यांच्या ‘पिया हाजीअली’ गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामानुज रांदड यांनी केले.
विलासरावांचे लाभार्थी!
समोर उपस्थित असलेले श्रोते मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे लाभार्थी आहेत. मात्र व्यासपीठावरील सर्व मंडळी विलासराव देशमुखांचे लाभार्थी आहेत. राजकारणात प्रतिष्ठा देण्याचे काम देशमुख यांनी केल्याचा उल्लेख आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केला.