Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

नाटकातून प्रबोधन करणारे शाहीर अण्णा शासन दरबारी उपेक्षितच!
लोहा, २६ जुलै/वार्ताहर

गेली चाळीस-पंचेचाळीस वर्ष मराठवाडय़ाच्या कानाकोपऱ्यासह राज्याच्या विविध भागात ज्याच्या

 

शाहिरीने सामाजिक प्रबोधन घडले. लोकशिक्षणाबरोबरच जातीभेद, अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा, दारूबंदी, एड्स जनजागरण अशा विविधांगी प्रबोधनात आपले आयुष्य खर्ची घातले, त्या शाहीर अण्णा चव्हाण यांची राज्य सरकारने दखलही घेतली नाही. दऱ्याखोऱ्यातून आपल्या कलेचा नाद दाखविणाऱ्या लोह्य़ाच्या भूमिपुत्राचे कार्य शासनदरबारी उपेक्षितच..
लोह्य़ाच्या रंगभूमी व नाटय़ चळवळीला जवळपास ऐंशी वर्षाचा इतिहास आहे. या रंगभूमीवर अनेकांनी आपली कला सादर केली. कै. वि. ग. पवार, कै. माणिकराव पाटील, कै. व्यंकटराव मुकदम यांनी येथील कलावंताला नेहमीच प्रेरणा दिली. १९६० च्या दशकात समाज प्रबोधनाचे नाटक, शाहिरी हे प्रमुख माध्यम. शाहीर अण्णा चव्हाण यांनी १९६५ मध्ये मराठवाडा कला विकास मंडळाची स्थापना केली, तर १९७९ मध्ये प्रेरणा नाटय़मंडळ काढले. शाहीर अण्णा यांचे नाटक म्हटले की, आजूबाजूच्या खेडय़ापाडय़ातील लोक नाटक पाहायला आवर्जून यायचे. दारूबंदी, प्रश्नैढ शिक्षण, अंधश्रद्धा, समाज प्रबोधन, कुटुंब कल्याण, व्यसनमुक्ती, ग्रामविकास अशा सामाजिक झळमटांना आपल्या नाटय़, शाहिरीतून झटकून टाकावयास अण्णांनी भाग पाडले.
नांदेड जिल्ह्य़ातल्या राजकीय नेतृत्वाने अण्णांची कधीच दखल घेतली नाही. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या कार्यक्रमात मात्र शाहीर अण्णांची हमखास हजेरी असायची. महाराष्ट्रगीत, स्वागतगीत व्हायचे. नाटय़ क्षेत्रातील उमेदीच्या काळात शाहीर अण्णा यांना डॉ. शंकरराव चव्हाण यांनी आशीर्वाद दिले. या आठवणी आजही ते नमूद करतात.
१९९१ मध्ये दिल्ली येथील प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय कला कार्यक्रमात लोककला सादर केली. केरळमध्ये कालिकत येथे भावनिक एकात्मता अभियानात राज्याचे नेतृत्व अण्णांनी केले. १९९३ मध्ये राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते अण्णांचा सत्कार करण्यात आला होता.
मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सांस्कृतिकमंत्री असताना त्यांच्या मंत्रालयाने शाहीर अण्णा चव्हाण यांच्या कार्याची माहिती घेतली होती पण उचित सन्मान झाला नाही.