Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

आता झोक्यााविना नागपंचमी!
कळंब, २६ जुलै/वार्ताहर

नागपंचमी हा महिलांचा आवडता सण. हा सण उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला झोका

 

पंचमी असेही संबोधले जाते. पूर्वीच्या काळी झोके खेळण्याचीही स्पर्धा असायची; परंतु झोके बांधण्यासाठी गावात मोठमोठी झाडे असायची. गाव देवळाजवळच्या मोठय़ा झाडाला सार्वजनिक झोका बांधला जायचा. तिथे पूजा झाल्यानंतर महिला पाच तरी झोके खेळून जायची. परंतु काळ बदलत चालला. प्रत्येक गावात बेकायदेशीर वृक्षतोड होऊ लागल्याने झोक्याविना पंचमी साजरी करण्याची वेळ महिलावर्गावर आली आहे.
नागपंचमी हा सण ग्रामीण भागात मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो.य गावातील महिला एकत्र जमून भुलई खेळली जाते. फुगडय़ा खेळल्या जातात. पारावर बसून उखाणे घेतले जातात. मनोभावे वारुळाची, नागदेवतेची पूजा केली जाते.
या सणाला सगळ्या माहेरवाशीण जमा होतात. सासरच्या गप्पांनाही रंग येतो. जुन्या मैत्रिणीचीही भेट होते. या सणाला महिलावर्ग मोठय़ा प्रमाणात खरेदी करतात. नागपंचमीला झोका पंचमी असेही नाव आहे. या सणाच्या दोन दिवस आधी झोका बांधण्याची तयारी होत असते. प्रत्येक जण दारासमोरच्या झाडाला झोका बांधतो, तर कुणी चौकटीला, तर काही सार्वजनिक मंडळे गाव देवळाजवळच्या वडाच्या झाडाला झोका बांधून उंच झोका नेणाऱ्या महिलेला बक्षीसही ठेवले जात होते. परंतु आता हे हळूहळू बंद होऊ लागले आहे. प्रत्येकजण घरातच झोपाळ्याची सोय करू लागल्याने बाहेरचे झोके बंद झाले. भुलई धरल्यानंतर ग्रामीण भागातल्या महिला गाणे म्हणायच्या ते गाणेही आता बंद झाले आहे.
हळूहळू सणांचे महत्त्व कमी होऊन ते चौकटीत बंद होऊ लागले आहे. जिवंत नाग मिळत नाही म्हणून वारूळाची पुजा केली जाते. पण आता वारूळेही दिसत नाहीत. मग एका देवळाजवळ नागदेवतेची प्रतिमा ठेवून त्याची पूजा करून पंचमी साजरी केली जाते.
यंदा पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे बाजारपेठेतही शांतता आहे. या सणाला बाजारपेठेत महिलांची गर्दी झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.