Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

प्रादेशिक

अतिक्रमणाच्या ‘मिठी’ची तीच कहाणी!
अभिजित घोरपडे, मुंबई, २६ जुलै

मिठी नदीला पडलेल्या अतिक्रमणांची व भरावांची ‘मिठी’ २६ जुलैच्या पुरानंतर तरी सुटेल अशी अपेक्षा होती, पण आता चार वर्षांनंतरही मिठी पूर्णपणे मुक्त झालेली नाही. ती अजूनही आक्रसलेली असून, ठिकठिकाणी अंग चोरूनच वाहत आहे. तिचे वाट्टेल तसे बदललेले पात्र तसेच असल्याचे या नदीची परीक्रमा केल्यावर लक्षात येते. शिवाय पात्रातून पाणी वाहते ठेवण्याची सूचना विचारात न घेतल्याने तिचे रूप नाल्याहूनही भयंकर बनले आहे.

‘वाद्यवेदा’चा उद्गाता
मराठी, हिंदी, मल्याळी अशा सात ते आठ भाषांत मिळून पं. चंदावरकर यांनी ७० ते ८० चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यामध्ये श्वास, सामना, गारंबीचा बापू, सरीवर सरी, एक डाव भुताचा, आक्रित अशा चित्रपटांचा समावेश आहे. यापैकी ‘श्वास’ या चित्रपटाच्या संगीताला राष्ट्रीय पुरस्कार तर ‘एक डाव भुताचा’च्या संगीताला राज्य पुरस्कार मिळाला होता. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटय़कृतीप्रमाणे सुमारे पंधरा हिंदी, मराठी, जर्मन नाटकांना त्यांनी संगीत दिले आहे. ‘सामना’मधील ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ आणि ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ ही त्यांनी स्वरबद्ध केलेली गाणी प्रचंड गाजली. व्यक्तिमत्त्व विकासासाठी संगीताची जाण आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते.

‘बेस्ट’मध्ये सहा हजार कायम पदांवर रोजंदार वाहक-चालक
मुंबई, २६ जुलै/प्रतिनिधी

‘बेस्ट’ उपक्रमास बसचा ताफा चालविण्यासाठी एकूण २५,२५९ वाहक-चालकांची गरज असून त्यापैकी सुमारे २५ टक्के पदांवर रोजंदार वाहक-चालक नेमून काम भागविले जात आहे, अशी माहिती श्रम आयुक्तांकडे झालेल्या एका सुनावणीत अलीकडेच देण्यात आली. ‘बेस्ट’ प्रशासन रोजंदारीवर नेमलेल्या वाहक-चालकांना ‘मोटार ट्रान्सपोर्ट वर्कर्स अ‍ॅक्ट’ व त्याखालील नियमांनुसार सोयी-सवलती देत नसल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जावी यासाठी ‘बेस्ट’मधूनच सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून निवृत्त झालेले सुहास नलावडे यांनी सहाय्यक श्रम आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

संगीताचा कान देणारा गुरू..
रवींद्र साठे

भास्करजी गेले ही घटना अत्यंत वेदनादायी असली तरी एक अटळ सत्य म्हणून ती आता स्वीकारली पाहिजे. माझ्या दृष्टीने माझे गुरूच आज काळाच्या पडद्याआड गेले. पाश्र्वगायक व नाटय़अभिनेता म्हणून मी जी काही कामगिरी आजवर करू शकलो, त्यामागे पं. चंदावरकर यांच्या मार्गदर्शनाचा फार मोठा वाटा आहे. सुरुवातीच्या काळात मी ज्यामध्ये गायलो, त्या ‘गारंबीचा बापू’, ‘सामना’ आणि ‘भक्त पुंडलिक’ या तीनही चित्रपटांना चंदावरकर यांनी संगीत दिले होते.

पब्लिक ट्रस्ट फंडाचा एक पैसाही वक्फ मंडळास देणार नाही;
सरकारचे हायकोर्टास आश्वासन
मुंबई, २६ जुलै/प्रतिनिधी

राज्यातील ५० हजाराहून अधिक नोंदणीकृत सार्वजनिक विश्वस्त निधींकडून व्यवस्थापन निधीच्या वर्गणीपोटी गोळा झालेल्या रकमेतून धर्मादाय आयुक्तांकडे जमा असलेल्या सुमारे २०० कोटी रुपयांच्या निधीचा वापर कायद्यानुसार ज्या कामांसाठी केला जाऊ शकतो फक्त अशाच कामांसाठी केला जाईल आणि या निधीतून एक पैसाही अन्य कोणत्याही कामासाठी अजिबात वापरला जाणार नाही, असे आश्वासन धर्मादाय आयुक्तांनी व राज्य सरकारने उच्च न्यायालयास दिले आहे.

मनोहर जोशी, राणे यांनी केला ‘स्टेज मॅनेज्ड फार्स!’
एस्सेल वर्ल्ड जमीनप्रकरणी उच्च न्यायालयाचे ताशेरे
मुंबई, २६ जुलै/प्रतिनिधी

१९४४ पासून सातत्याने ५० वर्षांहून अधिक काळ महसुली दफ्तरात सरकारच्या नावावर असलेली गोराई येथील ७०० एकर खाजण जमीन ‘एस्सेल वर्ल्ड’च्या नावे करण्यासाठी शिवसेना-भाजपा युती सरकारचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि महसूलमंत्री नारायण राणे यांनी महसुली अपिलावर निर्णय घेण्याचा एक ‘स्टेज मॅनेज्ड’ फार्स रचला आणि ही जमीन सरकारचीच असल्याविषयी आधी न्यायालयात घेतलेली ठाम भूमिका वाऱ्यावर सोडून दिली, असे कडक ताशेरे ओढत मुंबई उच्च न्यायालयाने ही जमीन ‘एस्सेल वर्ल्ड’च्या नावावर करण्याचा निर्णय बेकायदा ठरवून रद्द केला आहे.

प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी चोरी करणारा रिक्षाचालक प्रेमिक गजाआड
मुंबई, २६ जुलै / प्रतिनिधी

श्रीमंत घरातील प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी चोरी करणाऱ्या रिक्षाचालक प्रेमिकाला आरसीएफ पोलिसांनी अखेर आज अटक केली. सर्वेश नंदलाल यादव ऊर्फ मोटू (२५) असे रिक्षाचालक प्रेमिकाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशच्या आजमगढचा राहणारा आहे. मुंबईत तो मानखुर्द येथील साठेनगर परिसरात चाळीत राहतो आणि रिक्षा चालवून पोटापाण्याचा खर्च भागवतो.

विक्रम बोके यांचा मनसेला रामराम; शिवसेनेत प्रवेश
मुंबई, २६ जुलै/प्रतिनिधी
माजी पोलीस अधिकारी विक्रम बोके यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम करीत आज शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुण्यातील चांडाळ चौकडीने घेरले असून काम करणाऱ्यांना नामोहरम करण्याकरिता राज यांचे कान भरण्याचे काम ही चौकडी करीत असल्याने शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचे बोके यांनी सांगितले.

गौरी-गणपतीसाठी एसटीच्या १४५० गाडय़ा
मुंबई, २६ जुलै / प्रतिनिधी

गौरी-गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी यंदा मुंबई-ठाणे विभागातून नियमित गाडय़ांखेरीज १४५० जादा गाडय़ांची सोडण्यात येणार आहेत. १८ ते २३ ऑगस्ट या काळात विविध ठिकाणांहून या गाडय़ा सुटतील. सांवतवाडी, मालवण, देवगड, विजयदुर्ग, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, दापोली, श्रीवर्धन, पेण, अलिबाग व आजूबाजूच्या परिसरात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी या जादा गाडय़ा उपलब्ध असतील. राज्यातील एसटीच्या सर्व आरक्षण केंद्रांवर तसेच ११५ खासगी एजंटांकडे या गाडय़ांचे आरक्षण सुरू झाले आहे. याखेरीज ग्रुप आरक्षणाच्या सुविधेचाही लाभ गणेशभक्तांना घेता येईल. विशेष म्हणजे या वर्षीपासून प्रवाशांना परतीच्या प्रवासाचेही एक महिना आधी आरक्षण करता येणार आहे. साईबाबा पथ, लालबाग, काळाचौकी, केनेडी ब्रिज, काळबादेवी, महालक्ष्मी रेसकोर्स, सेनापती बापट मार्ग, दादर (प.), नाडकर्णी मार्ग-वडाळा, बर्वे नगर, सवरेदय हॉस्पिटल, विक्रोळी, घाटला, चेंबूर, वाशी, डी.एन.नगर, गुंदवली, आनंद नगर, सांताक्रूझ, विलेपार्ले, वांद्रे या ठिकाणांहून या गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

सांताक्रूझ विमानतळावर पुन्हा टॅक्सीसंप
मुंबई, २६ जुलै / प्रतिनिधी

सांताक्रूझ विमानतळावरील आंतरदेशीय टर्मिनलहून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुमारे ७५० टॅक्सींनी पुन्हा बेमुदत संप पुकारला आहे. मात्र फ्लीट टॅक्सी सेवा व रिक्षा सुरू असल्याने प्रवाशांची फारशी गैरसोय झाली नाही. आंतरदेशीय विमानतळावरील कूल कॅब गेल्या आठवडय़ापासून संपावर आहेत. शनिवारी मध्यरात्रीपासून त्यामध्ये सुमारे ५५० काळ्या-पिवळ्या टॅक्सींची भर पडली आहे. शनिवारी रात्री दोन टॅक्सी फोडल्याने पोलीस संरक्षणाच्या मागणीस्तव हा संप आहे. आंतरदेशीय टर्मिनलवर नुकतीच प्री-पेड टॅक्सीसेवा सुरू झाली. तेव्हापासून टॅक्सीवाल्यांत असंतोष आहे. आधी आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय टर्मिनल येथील प्री-पेड टॅक्सींच्या भाडय़ात तफावत असल्याच्या कारणास्तव टॅक्सींनी संप केला होता.

कुलाब्यात रेव्ह पार्टीवर छापा
मुंबई, २६ जुलै / प्रतिनिधी

कुलाबा येथील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने आज पहाटे छापा टाकून चार तरुणींसह ११ जणांना अटक केली. त्यांच्याकडून दोन ग्रॅम कोकेन आणि सहा ग्रॅम हशीश जप्त करण्यात आले. या सर्वांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रत्येक पाच हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका झाली.