Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

‘पाचपुते व शेलारांनी विधानसभेसाठी माझी शिफारस करावी’
श्रीगोंदे, २६ जुलै/वार्ताहर

वनमंत्री बबनराव पाचपुते हेच माझे नेते आहेत; पण गावकऱ्यांचे मला आमदार करण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे पाचपुतेंसह घनश्याम शेलार यांनी विधानसभेच्या उमेदवारीसाठी माझ्या नावाची शिफारस शदर पवारांकडे करावी, असे आवाहन जि.प. सदस्य अप्पासाहेब शेलार यांनी केली. विधानसभा निवडणुकीसंदर्भात गावकऱ्यांची मते आजमावण्यासाठी शेलार यांनी आज बेलवंडी येथे मेळावा घेतला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच अमृत पितळे होते.

मतदारसंघ काँग्रेसचाच अन् तिकीटही आपल्यालाच - राजळे
पाथर्डी, २६ जुलै/वार्ताहर

‘गट-तट विसरा अन् कामाला लागा’, हा मतदारसंघ काँग्रेसचाच असून, घरचालत आपल्याला पंजाचे तिकीट मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत आज आमदार राजीव राजळे यांनी निवडणुकीचे रणसिंग फुंकले. तालुक्यातील चितळी येथे भारत निर्माण योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राजळेंच्या या भूमिकेमुळे ते नगरमधून लढणार की पाथर्डीमधून या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे मानले जाते. गेले काही दिवस राजळेंनी शांत राहणे पसंत केले होते. आज त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा, असा आदेश दिला.

शहरातील रस्त्यांची दूरवस्था
डांबरीकरणातील भ्रष्टाचाराला वरिष्ठांचा आशीर्वाद
नगर, २६ जुलै/प्रतिनिधी

निकृष्ट डांबरीकरणात महापालिकेचे कोटय़वधी रुपये पाण्यात चाललेत. मात्र प्रशासन गुणवत्ता नियंत्रणाच्या माध्यमातून या कामाची तपासणी करायला तयार नाही. ठेकेदार, अभियंते व स्थानिक नगरसेवक यांच्या युतीचे त्यामुळे फावले असून, या भ्रष्ट युतीला वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी डांबरीकरण केलेले प्रमुख रस्ते थोडय़ाशा पावसानेच उखडले असून, त्यावर खोल खड्डे पडले आहेत. या रस्त्यांची दोन वर्षाची हमी मनपाने घेतली होती, हे विशेष! गुणवत्ता नियंत्रण समितीप्रमाणेच ही हमीही कागदोपत्रीच राहिली असून, त्याच ठेकेदारांना पुन्हा नव्याने त्याच रस्त्याची कामे दिली जात आहेत.

नगरची मध्यम व घाटघर प्रकल्प कार्यालये बंद होणार
सीताराम चांडे, राहाता, २६ जुलै

मध्यम पाटबंधारे प्रकल्प नगर व घाटघर जलविद्युत प्रकल्प मंडल, नाशिक ही दोन कार्यालये बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. ती आता नागपूर येथे स्वतंत्र अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ स्थापून त्याला ही कार्यालये जोडण्यात येणार आहेत. येत्या १ ऑगस्टपासून विदर्भ प्रश्नदेशिक विभागांतर्गत अधीक्षक अभियंता गुण नियंत्रण मंडळ सुरू होणार आहे.

ब्राम्हणीत चोरटय़ांचा धुमाकूळ; मारहाणीत सहाजण जखमी
राहुरी, २६ जुलै/वार्ताहर
तालुक्यातील ब्राम्हणी येथील खळवाडीत तिघा चोरटय़ांनी मारहाण करीत धुमाकूळ घालून महिलांच्या अंगावरील २२ हजारांचे दागिने ओरबाडून नेले. मारहाणीत सहाजण जखमी झाले. आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

कोपरगावसाठी आणलेल्या २५० कोटींचा हिशेब आमदारांनी द्यावा - आव्हाड
कोपरगाव, २६ जुलै/वार्ताहर

‘ना घर का ना घाट का’ अशी संभ्रमावस्था असलेल्या मौनी आमदारांनी गेल्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या २५० कोटी रुपये खर्चाच्या कामाचा हिशोब द्यावा, अशी मागणी संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष आव्हाड यांनी केली आहे.

राष्ट्रपतिपदक विजेते निवृत्त पोलीस उपअधीक्षक आसाराम शिंदे यांचे निधन
नगर, २६ जुलै/प्रतिनिधी

राष्ट्रपतिपदक विजेते निवृत्त पोलीस उपअधीक्षक आसाराम शिंदे यांचे आज सकाळी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, जावई असा परिवार आहे. केंद्र सरकारचे वकील सुभाष भोर यांचे ते मेहुणे, तर नांदेड येथील स्वामी रामानंद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांचे ते साडू होत.सन १९९९ मध्ये शिंदे नगरचे उपअधीक्षक असताना निवृत्त झाले. तत्पूर्वी कोतवाली तसेच जिल्ह्य़ातील विविध ठाण्यांत त्यांची कारकीर्द गाजली. नाशिक येथेही त्यांनी चांगली कामगिरी बजावली. अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या शिंदे यांचा गुंडावर मोठा वचक होता. येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर कन्या डॉ. स्वाती पोकळे यांनी अंत्यसंस्कार केले. या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

आगरकरांना पाठिंब्यासाठी कर्जतच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
कर्जत, २६ जुलै/वार्ताहर

भाजपचे जिल्ह्य़ातील नेते अभय आगरकर यांनी आज राजीनामा दिल्याची माहिती समजताच येथील त्यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. तसेच आपल्या पदाचे राजीनामे तालुका युवा मोर्चाच्या अध्यक्षाकडे पाठविले. बैठकीस युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन सोनमाळी, शहराध्यक्ष विनोद दळवी, भाजप तालुका उपाध्यक्ष नाथा गोरे, युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस योगेश गोहेर, शहर सरचटिणीस शरीफभाई पठाण यांनी आगरकर यांच्या भूमिकेला समर्थन देत आपल्या पदाचे राजीनामे दिले. तसे पत्र त्यांनी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब रसाळ यांना पाठविले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांच्या या राजीनामा सत्रामुळे कार्यकर्ते धास्तावले आहेत.

बोरावके महाविद्यालयात आज सायन्स असो.चे उद्घाटन
श्रीरामपूर, २६ जुलै/प्रतिनिधी

बोरावके महाविद्यालयात सोमवारी (दि. २७) सकाळी १० वाजता सायन्स असोसिएशनचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी डॉ. पठाण यांच्या ‘टाकीचे घाव’ या पुस्तकाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

एमईएस एम्प्लॉईजचे वार्षिक अधिवेशन उत्साहात
नगर, २६ जुलै / प्रतिनिधी

एम.ई.एस. एम्प्लॉईज युनियनचे पुणे विभागीय ६१ वे वार्षिक अधिवेशन नुकतेच येथे उत्साहात झाले. अधिवेशनाचे उद्घाटन संजय शर्मा (सीडब्ल्यूई, देवळाली) यांच्या हस्ते करण्यात आले.
एस. के. जैन, आमदार अनिल राठोड, मेजर एम. एस. नेने, राजेश केशरवानी, राजेशकुमार, युनियनचे विभाग अध्यक्ष बी. यू. कुला हे या वेळी उपस्थित होते. बी. के. गर्ग, युनियनचे विभाग कार्याध्यक्ष राम जाधव यांनी मार्गदर्शन केले. विभाग सचिव विजय गायकवाड यांनी प्रश्नस्ताविक केले. शाखाध्यक्ष अभिषेक चिपाडे यांनी आभार मानले. अधिवेशनाला पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद, बेळगाव, सामरा, मुंबई येथील युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

एसटी महामंडळातर्फे वर्षासहलींसाठी गाडय़ा
नगर, २६ जुलै / प्रतिनिधी

एसटी महामंडळातर्फे पावसाळा व श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन निसर्गरम्य व धार्मिक स्थळी वर्षासहलींचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक जे. एम. उदमले यांनी दिली. त्र्यंबकेश्वर, जायकवाडी, पैठण, भीमाशंकर, भंडारदरा, भद्रामारुती, घृष्णेश्वर व वेरुळ येथे सहली निघणार आहेत. सर्व गाडय़ा माळीवाडा बसस्थानकावरून सकाळी ८ व ९ वाजता सुटतील. यासाठीचे आरक्षण तारकपूर व माळीवाडा बसस्थानकावरील आरक्षण विभाग सुरू आहे. सहलींसाठी कोणत्याही प्रकारच्या सवलतीचे, मोफत पास चालणार नाही. प्रवाशांना परतीचे आरक्षण करावे लागणार आहे, असे तारकपूर आगाराचे प्रभारी प्रमुख एस. व्ही. खोलम यांनी सांगितले. धार्मिक व निसर्गप्रेमींनी या वर्षासहलींचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ९८२२५४९७८९ (खोलम), ९२२६७८९२२० (किशोर पराते), ९४२२७३८८०३ (राम देशमुख) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकरकमी कर्जफेड योजनेला ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढ
नगर, २६ जुलै/प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या एकरकमी कर्जफेड योजनेला ३१ डिसेंबर २००९ पर्यंत नाबार्डने मुदतवाढ दिल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली.
या योजनेंतर्गत ७५ टक्के रक्कम भरण्याची मुदत ३० जून २००९ पर्यंत होती. या मुदतीत जिल्हा बँकेचे २५ हजार ६४ लाभार्थी होते. या शेतकऱ्यांना ५५ कोटी ४६ लाख ४५ हजार रुपयांचा लाभ अपेक्षित होता. १४ हजार ३७९ लाभार्थीना ३० जून २००९ पर्यंत २८ कोटी ८१ लाख २१ हजार रुपये लाभ मिळणार असून, ते नवीन पीककर्ज घेण्यास पात्र ठरले आहेत. या योजनेला ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढ मिळाली असून, त्याचा फायदा राहिलेल्या सभासद शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कर्डिले यांनी केले आहे.

कृषी विकास आराखडा; आज ‘सहकार’ मध्ये कार्यशाळा
नगर, २६ जुलै / प्रतिनिधी

जिल्हा कृषी विकास आराखडय़ाबाबत चर्चा करण्यासाठी दि. २७ ला सकाळी साडेनऊ वाजता राज्याचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात होणाऱ्या या कार्यशाळेस जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, शास्त्रज्ञ आदींना निमंत्रित करण्यात आले आहे.

‘मोक्ष मिळविण्यासाठी संतांचे विचार बळ देतात’
नगर, २६ जुलै/प्रतिनिधी

संत ज्ञानेश्वरमहाराज, संत तुकाराममहाराज यांसारख्या महान संतांचे विचार मोक्ष मिळविण्यासाठी बळ देतात. अशा संतांच्या धार्मिक चळवळीतून निर्माण झालेला वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस महासंचालक भीमराव राऊत यांनी केले. नगर जिल्हा वारकरी सेवा संघातर्फे आज राऊत यांचा सत्कार सेवा संघाने जिल्हाध्यक्ष विश्वनाथ राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी वसंत लोढा, सतीश राऊत, बी. बी. खाबिया, अरुण आहेर आदी उपस्थित होते. प्रश्नस्ताविक विठ्ठलदास बाफना यांनी केले. आभार सुभाष राऊत यांनी मानले.

कथाकथनाला चांगली दाद
नगर, २६ जुलै/प्रतिनिधी

सावेडी येथील ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात कथाकथनाचा कार्यक्रम पंडित दीनदयाळ सभागृहात चांगलाच रंगला. लेखिका ऊर्मिला पवार यांची प्रबोधन, विद्या पडवल यांची ‘शल्य’ कथा श्रोत्यांना भावली. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर करवंदे यांनी महोत्सवामागील भूमिका विशद केली. पाहुण्यांचा परिचय संस्थेचे उपाध्यक्ष शरद देशमुख यांनी करून दिला. प्रश्नस्ताविक सर्वोत्तम क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन माधवी कुलकर्णी यांनी केले. आभार उषा शेटे यांनी मानले.

विधान परिषदेची निवडणूक लढविणार- विनायक देशमुख
नगर, २६ जुलै / प्रतिनिधी
विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांनी आज जाहीर केले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी आपण याबाबत चर्चा केली असून, त्यांनी हिरवा कंदील दिला असल्याचे देशमुख म्हणाले. नगरसह नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार अशा ५ जिल्ह्य़ांच्या मतदारसंघातील ही निवडणूक देशमुख यांनी या पूर्वी काँग्रेसच्या वतीने लढवली होती. त्यात ते पराभूत झाले होते. देशमुख आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून, पूर्वी केलेल्या मतदारनोंदणीच्या बळावर आपण ही निवडणूक जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

क्रांती सेनेतर्फे १५ ऑगस्टला शिर्डी येथे उपोषण
नगर, २६ जुलै/प्रतिनिधी
जिल्हा क्रांती सेना आपल्या विविध मागण्यांसाठी १५ ऑगस्टला शिर्डी येथे उपोषण करणार आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे शहराध्यक्ष गणेश जाधव यांनी सांगितले. आरक्षण आर्थिक निकषांवर देण्यात यावे, आरक्षणाची मर्यादा ५० टक्के असावी, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, पशुवैद्यकांच्या प्रश्नावर सरकारने लवकर तोडगा काढावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या ओहत.