Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २ ० ० ९

कुपोषण आणि उच्चभ्रू संस्कृतीचा विषवृक्ष
ब्रिक: आंतरराष्ट्रीय आर्थिक नभांगणांतील देदीप्यमान तारा
।। मार्केट मंत्र ।।
३०-३१ जुलैला मोठे झटके येतील!
सरकारी देण्यापोटी बँकेकडील तारण मालमत्तेची जप्ती करता येणार नाही
वाटा स्वयंरोजगाराच्या
निर्देशांकाची हिरवळ टवटवीत
१ जानेवारी २०१०
सेन्सेक्स २०,०००+
यू टर्न
अर्थसंकल्पात कॉस्ट अकाउंटन्ट सापत्न वागणूक


पुन्हा एकदा शेकडो कुपोषित तान्ह्य़ा बाळांनी या जगाचा अकाली निरोप घेतला.. तीच ती महाराष्ट्रातील विख्यात (?) आदिवासी गावं.. मेळघाट, चिखलदरा, धारणी.. दरवर्षी नेमाने येणारा तोच तो कालखंड.. उन्हाळा संपताना आणि पावसाळा तोंडावर असताना वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर झळकणारा तोच तो मजकूर.. ‘मेळघाटात कुपोषणाने.. बालके दगावली..’ एकवेळ पाऊस वेळेवर पडणार नाही पण ती बातमी येणार नाही, असं घडणार नाही.
भूक, दारिद्रय़ व मागासलेपणाने पिडलेल्या व त्यातच पिचणाऱ्या आदिवासींचे आता तेच भागध्येय बनले आहे. ‘पावसाळ्याचा प्रश्नरंभ’ आणि ‘बालकांच्या मृत्यूचे तांडव’ हे येथे समानार्थी शब्द बनले आहेत. गेल्या दोन महिन्यांच्या काळात चिखलदरा आणि धारणीमध्ये सत्त्याण्णव तान्हुल्यांनी आपले प्रश्नण गमावले. एप्रिल २००८ पासून ३१ मार्च २००९ पर्यंत याच परिसरातील ७५८ बालकांवर मृत्यूची कुऱ्हाड कोसळली आहे.
किती विलक्षण आहे पहा! ज्यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी आरोग्यसेवेच्या ‘नवसंजीवन’ योजनेच्या बैठकीत आढावा घेत

 

बसले होते त्याच वेळी शेकडो कुपोषित आदिवासी बाळं अखेरचा श्वास घेत होती. त्याखेरीज सहाशेहून अधिक मुलं मरणाच्या दारात उभी आहेत. मान्सूनपूर्व आरोग्य सर्वेक्षणात म्हटल्याप्रमाणे कुपोषणग्रस्त मुलांना वेळेवर औषधोपचार व पौष्टिक आहार उपलब्ध न झाल्यास त्यांचे जीवनचक्र खंडित होणार ही काळ्या दगडावरची रेघ!
एकीकडे शासनव्यवस्था ही अशी मुर्दाडपणे वागते आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या आदिवासी पट्टय़ांमध्ये बिगरशासकीय संघटनांचे नुसते पेव फुटले आहे. त्या संघटनांकडे देशविदेशातून पैशाचा अमाप ओघ चालू आहे. आपापल्या सामाजिक सेवाकार्याचे वार्षिक ताळेबंद रंगवून पुढील वर्षाचे संकल्पचित्र चितारावे व पुन्हा नव्या वर्षाच्या बेगमीचे मार्ग खुले करावेत हा यांचा उद्योग. अशा या तथाकथित सेवाभावी स्वयंअर्थसहायित (self funding) संस्था दिवसेंदिवस धष्टपुष्ट होत असताना ज्या दुर्दैवी जिवांच्या जिवावर त्यांचा हा धंदा सुखेनैव चालतो त्यांच्या कपाळीचे मरण काही टळत नाही.
झगमगत्या भारत देशाचा हा विद्रूप चेहरा ‘या’ घटनेने जगासमोर आणला आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत भारताला पहिल्या पाचांमध्ये स्थान मिळते. पहिल्या वीस लक्ष्मीपतींमध्ये सहा भारतीय असतात. देशातील प्रमुख पंचवीस उद्योगपतींची संपत्ती दोन लाख कोटींहून अधिक असते. आर्थिक भांडवलाचे घनदाट जाळे चहुबाजूंना वेढून बसलेले दिसत असताना याच देशात दारिद्रय़ आणि मृत्यूने तांडव मांडले आहे. मेळघाटातील बालकांपाशी ते थांबत नाही तर भुकेकंगाल, कर्जबाजारी अशा लाखो शेतकऱ्यांना ते आत्महत्येच्या वाटेने घेऊन जात आहे.
२००५ साली महाराष्ट्राच्या यवतमाळ, पुसद, अचलपूर, वाडा, मोखाडा, अमरावती आदी भागांत कुपोषणाच्या फेऱ्यात चारशेहून अधिक बालकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी समस्येचं गांभीर्य ध्यानात घेऊन राज्य सरकारने डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. समितीनेच आपल्या अहवालात कुपोषणाच्या गंभीर समस्येच्या संदर्भात राज्य सरकारला जबाबदार धरून त्याच्या निष्क्रियतेवर तसेच कुचकामीपणावर ताशेरे ओढले होते. प्रश्नथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लागणारी साधनसामुग्री व औषधे मात्र गायब आहेत. कित्येक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. मुलांसाठी आलेला शिधा सेविकाच हडप करतात. अंगणवाडीतील मुलांसाठी खिचडीभात शिजविण्याबाबत आणि त्याच्या वितरणाबाबतची माहिती मंत्रालयापाशीदेखील नाही. कमालीचे दारिद्रय़ आणि अभावात जगणाऱ्या आया त्यांच्या गरोदरपणात सुदृढ नसतात. अशा कुटुंबांमध्ये जन्मास येणारी बालकं मुळातच अशक्त असतात. आई आणि बाळ दोघांची प्रकृती वारंवार बिघडत राहते. अशा स्थितीत दरवर्षी केवळ कुपोषणापायी हजारो मुलं मृत्युमुखी पडतात.
डॉ. अभय बंग यांनी सखोल अभ्यासान्ती ‘कुपोषणाची समस्या व उपाय’ याची माहिती राज्य सरकारला तीन वर्षापूर्वीच दिली होती. परंतु समस्येचे निराकरण करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आणि प्रश्नमाणिकपणाचा या सरकारकडे अभाव आहे. इतकेच नव्हे तर आपल्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासाठी आपले सारे बुद्धिकौशल्य पणाला लावण्यात ते गढून गेले आहेत शेतकरी आत्महत्या करून मरतायत? मरेनात का!.. कुपोषणाने मुलं आयुष्याला मुकतायत? मुकेनात का!.. या व अशा बाबतीत प्रभावी उपाय योजण्यासाठी वेळ आहे कोणाकडे? तोंड फाटेस्तोवर घोषणा करणे आणि जाडेजुडे अजगरछाप हार छातीवर धरीत छायाचित्राला उभे राहणे, या कसरती मग कोण करणार? आपल्या जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवलेले हे नादान सरकार दुसरे करणार तरी काय?
कुपोषण, भूकबळी, दारिद्रय़, भीषण मागासलेपण हा हा देशाचा खरा चेहरा दोन-चार महानगरांच्या गगनचुंबी झगमगाटाच्या ‘मेक ओव्हर’खाली दडपणे किती सोपे असते पाहा! ‘बीएसई’ आणि ‘एनएसई’च्या कोष्टकांकडे डोळे लावून बसलेल्या, कोटय़ाधीशांच्या प्रगतीची काळजी वाहणाऱ्या, जागतिकीकरणाला प्रेमाने कवटाळून विश्वात्मकतेचे पसायदान मागणाऱ्या इथल्या शासनयंत्रणांनी अगदी इमाने-इतबारे ज्या उच्चभ्रू संस्कृतीच्या विषवृक्षाला पाणी घातले व पोसले त्या वृक्षाला अमृताची फळे कशी लागणार? भांडवलदारी समाजव्यवस्थेतच आर्थिक विषमतेच्या बाभळी फोफावतात आणि अशा समाजातील अगदी तळाचा स्तर नरकयातनांचाच धनी होतो. विषमतेची दरी दिवसेंदिवस अधिकच रुंदावते आहे. भांडवलशाहीच्या विकासाच्या संकल्पनेत उत्पादनव्यवस्था ही समाजाच्या गरजांनुसार नसते तर ती व्यापाराच्या नफ्यानुषंगाने ठरते. स्वातंत्र्याला साठ वर्षे झाली परंतु दारिद्रय़रेषा पुसून टाकण्यात आपण अपयशी ठरलो. २८ टक्के जनता दारिद्रय़रेषेखालील भीषण आयुष्याचे ओझे ओढतेच आहे.. कोटय़वधी हात रोजगार मिळविण्यासाठी ठेचकाळत भटकत आहेत.
या विषारी उच्चभ्रू संस्कृतीने आता ‘सामूहिक- उद्योगाचे’ कॉर्पोरेटस् संस्कृतीचे रूप धारण केले आहे आणि ज्या मोठय़ा विवंचनेने त्यांना घेरले आहे ती आहे भांडवलाच्या मुक्त संचाराची चिंता! कुपोषण, दीनदुबळ्यांची विपन्नावस्था इ. बाबींशी त्यांना काय देणेघेणे! आणि सरकार, राजकीय पुढारी, नोकरशहा हे तरी काय वेगळे आहेत? ते त्यांचेच जातभाई, स्नेही, हितचिंतक वगैरे, वगैरे. मुन्शी प्रेमचंद यांनी या उच्चभ्रू संस्कृतीच्या परिणामांचा नेमका वेध घेतला होता. त्या संस्कृतीवर टीका करताना ते म्हणतात, ‘‘ही हवा नुसती दूषितच नव्हे तर
इतकी विषारी बनली आहे की जिवंत राहणेच दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. त्यांच्या ‘गोदान’ या अक्षर कादंबरीत ते म्हणाले, ‘‘आज जगाची सारी सूत्रे बँकर्सच्या हातात आहेत. भांडवलाची ताकद अदृश्य असल्यामुळे त्याच्याशी थेट लढणे अवघड असते. जमीनदार व त्यांचे गुंड शेतकऱ्याला आमनेसामने तरी भिडतात पण उच्चभ्रूंची पुंडशाही अप्रकटच राहते.’’
जागतिकीकरणाच्या या वावटळीत भांडवलाचे महत्त्व अमाप वाढले. किंवा असे म्हणू या की, भांडवलाचेच जागतिकीकरण झाले. भांडवलाच्या मुक्त संचारावरील र्निबध झपाटय़ाने शिथिल केले जात आहेत आणि इकडे कष्टकऱ्याचे जगणे- मरणे खडतर होत आहे. प्रगतिशील लेखक संघाच्या संमेलनातील आपल्या भाषणात प्रेमचंद यांनी स्पष्टपणे म्हटले की, सौंदर्यशास्त्राच्या फुटपट्टय़ा आता बदलायला हव्यात. बदलत्या परिस्थितीनुसार सौंदर्यशास्त्राची परिभाषा बदलली तरच माणसाला त्याचे मोठेपण मिळेल. ती नवी परिभाषाच त्या सामान्य माणसाच्या ‘असण्याला’ व ‘जगण्याला’ मान व प्रतिष्ठा बहाल करील!
प्रा. रामसागर पांडे
अनुवाद : प्रा. हिरा भुजबळ.