Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

नवनीत

लाहोरला ‘करोडिया खत्री’ हा सुलतानाचा एक हुशार आणि निष्ठावान अधिकारी होता. त्याला वायव्य भारतातील समाजाची चांगली जाणकारी होती. नानकदेवांचा वाढता प्रभाव त्याला काळजी करण्यासारखा वाटला. त्याच्या मनात आले, नानकदेव सर्वत्र प्रवास करताहेत. समाजातील साधू,

 

संन्यासी, फकीर, पीर तर त्यांना वश झालेच आहेत. शेतकरी, जमीनदार, धनीमानी लोकही त्यांच्या प्रवचनांनी प्रभावित होत आहेत. डाकू, लुटारू, दरोडेखोर त्यांना शरण जाऊन आपला पेशा सोडत आहेत. दुर्गुणी आणि दहशतवादी जर असे नीतिअध्यात्माकडे झुकले तर आपले राज्य कसे चालणार? लोकांत परस्पर हेवेदावे, संघर्ष नसेल आणि ते एकवटतील तर सुलतानी राज्याला धोका आहे. म्हणून आपण या नानकदेवाचे प्रस्थ वेळीच कमी करायला हवे. करोडिया हा अत्यंत तत्पर अधिकारी होता. लाहोर परिसरात आलेल्या नानकदेवांना हुसकावून लावण्याकरिता त्याने बरोबर एक शिपायांची तुकडी घेतली आणि तो स्वत: निघाला. लोकांना करोडियाचे हे वागणे मुळीच आवडले नाही. काहींनी त्याला समजावले, पण त्याने कुणाचेच ऐकले नाही. त्याला आपल्या सैन्यशक्तीचा गर्व तर होताच, पण कैफही होता. शिवाय, आपण आपले कर्तव्यच करतो आहोत, ही त्याला खात्री होती. करोडिया घोडय़ावर स्वार झाला. शिपायांची पलटण त्याच्या पाठोपाठ चालली होती. मंडळी नानकदेवांच्या राहुटीपर्यंत काही पोहोचेनात. करोडियाचे डोके गरगरू लागले. त्याचा घोडा अडखळू लागला. शिपाई आणि त्यांचे घोडेही नीट पावले टाकू शकेनात. ही फजिती होऊनही करोडिया जाण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा सहकारी म्हणाले, ‘‘आपली जर आताच ही स्थिती झाली आहे तर पुढे काय होईल? तुम्ही गुरुजींना शरण जावे. तरच आपली सुटका होईल, नाहीतर सगळेच अडचणीत येऊ.’’ करोडियाचा आता इलाजच नव्हता. तो गुरुजींकडे आला. त्यांना प्रणाम करून म्हणाला, ‘‘मी तुमचे सामथ्र्य समजू शकलो नव्हतो. मला क्षमा करावी. मला सन्मार्ग दाखवावा.’’गुरुजींनी त्याची सारी स्थिती समजून घेतली आणि ते म्हणाले, ‘‘तू तुझे कर्तव्य करण्याचा चांगला प्रयत्न केलास. पण मुळात तुझे राज्ययंत्रच बिघडले आहे. त्यामुळे तू ते कसे नीट होईल, प्रजाहितकारी कसे करता येईल, याकडे अधिक लक्ष द्यायला हवे आहेस. त्याऐवजी तू साधुसंतांच्या मागे का? साधुसंत स्वार्थी नसतात. ते समाजासाठी सत्कार्य करण्याचा प्रयत्न करतात. याउलट राजकारणी सारे काही स्वत:च्या स्वार्थासाठी आणि प्रतिष्ठा-मानमरातबासाठी करीत असतात. तू एक कर्तबगार माणूस आहेस. विचार कर, ज्यायोगे तुझा लौकिक कायम राहील असे तुझे वागणे असावे.’’ करोडिया पूर्ण बदलून गेला. त्याने गुरुजींचे शिष्यत्व स्वीकारले आणि निश्चय केला, गुरुजींनी जिथे आपल्याला सहवास दिला, सन्मार्ग सुचविला ती जागा विकसित करावी. मग त्याने रावीकिनारी एक नवे गावच उभारावे म्हणून प्रयत्न केले. गुरुजींनी त्याचे नामकरण केले, ‘कर्तारपूर’ अर्थात परमात्म्याची नगरी. मग करोडिया आपल्या सहकाऱ्यांसह तिथे काही दिवस राहिला. पुढे गुरुजींचे गाव म्हणून कर्तारपूर हे शीख समाजाचे एक श्रेष्ठ तीर्थक्षेत्र बनले.
अशोक कामत

उपग्रहांची जडणघडण ही मूळ ग्रहापेक्षा वेगळी असते का?
आपल्या ग्रहमालेतले वैशिष्टय़पूर्ण उपग्रह कोणते आहेत?

एखाद्या ग्रहाला उपग्रह निर्माण होतो, त्यात दोन पद्धती असू शकतात. एखादी मोठी खगोलीय वस्तू त्या ग्रहावर आदळते आणि त्या ग्रहाचा एखादा भलामोठा तुकडा वेगळा होतो. परंतु मूळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो त्या ग्रहाभोवती फिरू लागतो. या प्रकारात उपग्रह आणि ग्रह यांच्या जडणघडणीत साम्य आढळून येणे स्वाभाविक आहे. काही वेळा अंतराळात फिरणारी एखादी वस्तू मोठय़ा ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावात येते आणि त्याच्याभोवती फिरू लागते. अशा उपग्रहाचे त्या ग्रहाशी साम्य असण्याची शक्यता जवळजवळ नसतेच. आपल्या सौरमालेतला सर्वात वैशिष्टय़पूर्ण उपग्रह म्हणजे टायटन. शनिच्या या उपग्रहाचे वर्णन ‘अर्थ फ्रोजन इन टाइम’ असे करण्यात येते. म्हणजे लक्षावधी वर्षांपूर्वी पृथ्वी कशी होती हे बघायचे असेल तर टायटनचा अभ्यास करायला हवा. कॅसिनी-हायगेन प्रकल्पात नेमका हाच अभ्यास चालू आहे. गुरूभोवती फिरणाऱ्या ‘आयो’वर जागृत ज्वालामुखी आहेत. ट्रिटॉन हा नेपच्यूनचा उपग्रह असून तेथेही ज्वालामुखीच्या खुणा मिळाल्या आहेत. युरोपा (गुरू)वर बर्फाचे प्रचंड साठे आहेत. त्यामुळे तेथे जीवसृष्टी आहे का याचा वेध घेण्यात येत आहे. कॅलिस्टो (गुरू)चे वैशिष्टय़ म्हणजे विवरांनी पूर्णपणे भरलेला त्याचा पृष्ठभाग. या पृष्ठभागापैकी साधारण निम्मा खडकांनी तर उरलेला बर्फाने व्यापलेला आहे. शेरॉन (प्लुटो) उपग्रहसुद्धा बर्फाने व्यापलेला असून त्याचा व्यास प्लुटोच्या निम्मा आहे. गुरूभोवती फिरणारा गॅनिमीड हा आपल्या सौरमालेतला सर्वात मोठा उपग्रह. त्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या ४१ टक्के एवढी आहे. त्याला चुंबकीय क्षेत्र असल्याचेही आढळले आहे. तो खडक आणि बर्फाने बनलेला आहे.
गिरीश पिंपळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

तांगशान हे चीनमधील एक अत्यंत महत्त्वाचे शहर. औद्योगिक केंद्रासाठी साऱ्या जगात प्रसिद्ध. लोकसंख्या १० लक्षाच्या आसपास. २७ जुलै १९७६ची रात्र तांगशानमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी काळरात्र ठरली. रात्र वैऱ्याची आहे, याची जाणीव नसलेले तांगशानी दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने, कडाडणाऱ्या विजांनी गाढ झोपी गेले होते. आणि..आणि..फक्त १० सेकंदांत खेळ खल्लास! अचानक जमीन जोरात हादरू लागली. रिश्टर प्रमाणानुसार भूकंपाची प्रत ७.४ होती. अवघ्या १० सेकंदांत जवळ जवळ ८ लक्ष लोक ठार झाले. शहरातील १६ टक्के लोक एका क्षणात ठार झाले.३० ते ४० टक्के लोक ढिगाऱ्याखाली गुदमरून मेले. त्यांच्या आर्त किंकाळय़ा चिनी सरकापर्यंत पोहाचायला तब्बल १२ तास लागले. कारण भूकंपामुळे विद्युत केंद्र, रेल्वे व वाहतूक यंत्रणा, तार, दूरध्वनी केंद्र मोडून गेले होते. सव्वा लाख सैन्य, २० हजार डॉक्टर, ३० हजार तंत्रज्ञ तांगशानाकडे रवाना झाले. मदतयंत्रणा सुरळीत चालू असताना २८ तारखेला आणखी एक भूकंपाचा धक्का बसला. तांगशान शहर या भूकंपामुळे भुईसपाट झाले. १००च्या वर पूल कोलमडून पडले. हे सर्व घडूनही चिनी कम्युनिस्टांच्या पोलादी पडद्याआड भूकंपाची वस्तुस्थिती मात्र चिनी सरकारने दडपली. अधिकृतरीत्या अडीच लाख लोक ठार झाले. १९९५पर्यंत या भूकंपाच्या पुनर्वसनाचे काम चालू होते. यावरून या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता लक्षात लक्षात येते.
संजय शा. वझरेकर

मुंग्या एकमेकींशी न बोलता काम करत होत्या. खूप वेळ एकाग्रपणे त्यांचे काम चालू होते. थंडी वाढत चालली होती. शेतात धान्य पिकणार नव्हते. बाहेर हिंडूनही थंडीत अन्नाचा कण मिळण्याची मारामारच होती. त्यांनी उन्हाळय़ात तासन्तास काम करून एक एक धान्यकण गोळा करून साठवून ठेवला होता. पण त्यांनी साठवलेल्या धान्याचा साठा पावसाळय़ात भिजून दमट, ओलसर झाला होता. मुंग्यांना काम करण्याची सवय आणि कष्ट करण्याची आवड. त्यामुळे जवळ धान्याचा खूप साठा आहे. म्हणून निवांत न बसता तो साठा हिवाळय़ात खराब होऊ नये म्हणून त्याला हवा लावून सुकण्याचे काम त्या करत होत्या. राब राब राबणाऱ्या त्या मुंग्यांना नाकतोडा नेहमी हसायचा, नाक मुरडायचा. म्हणायचा, ‘‘यंत्रासारखं काम करत कसं बरं जगतात या मूर्ख मुंग्या. प्रत्येकानं कसं अगदी मजेत जगावं. माझंच पाहा ना! दिवसभर मी आपला आनंदात गात असतो.’’
हिवाळा आला, तसे नाकतोडय़ाला आठवले की मुंग्यांनी उन्हाळय़ात सगळा वेळ धान्याचा साठा करण्यातच घालवला आहे. त्यांच्याकडे नक्कीच खूप धान्य असणार. ‘बरे झाले. आपला प्रश्न सुटला’ असे म्हणून आनंदात गाणे म्हणत म्हणत तो मुंग्यांकडे गेला. मुंग्यांचे धान्य सुकवण्याचे काम चालले होते. सगळय़ा न थांबता घाईघाईने धान्यकण वाहून नेत होत्या. ‘‘अगं मुग्यांनो, मी तुमचा मित्र नाकतोडा. मी भुकेने कळवळलोय. माझ्याकडे या थंडीत काहीच अन्न नाही. तुम्ही मला तुमच्या धान्यातले काही धान्य द्या.’’ मुंग्यांनी काम थांबवले. खरंतर असे काम थांबवणे त्यांच्या स्वभावात नव्हते. पण त्यांना नाकतोडय़ाचे वाईट वाटले. त्यांनी विचारले, ‘‘अरे मित्रा, तू उन्हाळाभर काय केलेस? हिवाळय़ासाठी तरतूद का केली नाहीस?’’
‘‘खरं सांगू का, मी किनई उन्हाळा गाणी गाण्यात घालवला’’ नाकतोडा म्हणाला. मुंग्यांना फार राग आला त्याच्या आळशीपणाचा. त्या म्हणाल्या, ‘‘मग आता हिवाळा नाच करण्यात घालव. सुट्टी असेल तेव्हा खेळणं, परीक्षा आली की अभ्यास करणं, योग्य वेळी योग्य गोष्ट करणं आवश्यक असतं.’’
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com