Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

श्रीयाळशेठ उत्सव उत्साहात साजरा
पुणे, २६ जुलै / प्रतिनिधी
रास्ता पेठेतील औट घटकेचा राजा समजल्या जाणाऱ्या श्रीयाळशेठ यांचा उत्सव उत्साहात रविवारी साजरा करण्यात आला. सकाळी साडेदहाच्या सुमारास नटराज शास्त्री यांच्या हस्ते मूर्तीची प्रश्नणप्रतिष्ठापणा करण्यात आली. रास्ता पेठेतील श्रीयाळशेठ चौकात या उत्सवामुळे जत्रेचे स्वरूप प्रश्नप्त झाले होते. दरवर्षी हा उत्सव नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.

पत्नीवर हातोडय़ाने वार करून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची आत्महत्या
पुणे, २६ जुलै/ प्रतिनिधी

बावन्न वर्षे वयाच्या पत्नीशी झालेल्या भांडणानंतर वायुसेनेतील त्या ५८ वर्षे वयाच्या निवृत्त ग्रुप कॅप्टनने तिच्या डोक्यावर हातोडीने जोरदार प्रहार केला.. रक्तबंबाळ अवस्थेत ती घाबरून बंगल्याबाहेर पळत सुटली व चक्कर येऊन खाली पडली. बायको मृत झाल्याचे समजून निवृत्त ग्रुप कॅप्टन बंगल्याच्या गच्चीवर पोहोचले अन् तेथून थेट खाली उडी घेऊन त्यांनी जीवनयात्राच संपविली. लोहगावमधील जयप्रकाशनगर भागात आज सकाळी अकरा वाजता ही घटना घडली.

‘संशोधनासाठी मूलभूत मार्गदर्शनाचीही गरज’
पुणे, २६ जुलै/प्रतिनिधी

कोणत्याही क्षेत्रात संशोधन करण्यासाठी ध्येयवेडं असण्याबरोबरच संशोधनासाठी मूलभूत मार्गदर्शनाचीही गरज असते. असेच मार्गदर्शन जे. सी. डॅनियल सरांनी केले. त्यामुळेच मी निसर्ग संवर्धन क्षेत्रात संशोधन करू शकलो, अशी कृतज्ञता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमधील निसर्ग अभ्यासक वरद गिरी यांनी व्यक्त केली. भारतीय सर्पविज्ञान संस्थेतर्फे देण्यात येणारा सर्पमित्र पुरस्कार गिरी यांना प्रसिद्ध लेखक व संशोधक जे. सी. डॅनियल यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे महापालिकेचे आयुक्त महेश झगडे होते. महापौर राजलक्ष्मी भोसले, भारतीय सर्पविज्ञान संस्थेचे अनिल खैरे, ज्येष्ठ सर्पतज्ज्ञ नीलमकुमार खैरे, महापालिकेचे उद्यान अधीक्षक भानुदास माने हेही उपस्थित होते.

अमोल कोल्हेंना शिवसेना व मनसेकडून ऑफर
रमेश जाधव , मंचर, २६ जुलै

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर जुन्नर विधानसभेच्या उमेदवारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही राजकीय पक्षश्रेष्ठींकडून ऑफर आली आहे. राजकारणातील प्रवेश हा निश्चित असून कोणत्या पक्षात केव्हा आणि कशा प्रकारे प्रवेश करायचा याबाबत विचार करत आहोत. येत्या काही दिवसांतच आपल्या राजकीय पक्षप्रवेशाबाबत भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती ‘छत्रपती शिवराय’ या दूरचित्रवाणीवर शिवरायांची भूमिका साकारलेल्या अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

मुंडेसमर्थक अमर साबळे यांच्या नावावर भाजपतच धुसफूस; भाजपची आज विशेष बैठक ; पिंपरीसाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच
अविनाश चिलेकर, पिंपरी, २६ जुलै

शिवसेना-भाजपचे जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचे प्रदेश पातळीवर नेते सांगत असले तरी िपपरी राखीव मतदारसंघासाठी युतीमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू आहे. भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक व प्रदेश सचिव अमर साबळे यांच्यासाठी स्वत: मुंडे आग्रही असल्याचे आज समजले. दरम्यान, खास या मतदारसंघाविषयी चर्चा करण्यासाठी उद्या (२७ जुलै) पिंपरी येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक निमंत्रित करण्यात आली आहे.

‘न्यू इंडिया’ सह सिम्बायोसिसमध्ये पाच, औंधमध्ये दोन रुग्ण
कोथरूडमधील न्यू इंडिया स्कूलमधील नववी, दहावीचे वर्ग बंद
पुणे, २६ जुलै / प्रतिनिधी
भुसारी कॉलनीतील न्यू इंडिया स्कूलमधील नववी, दहावीतील तीन आणि सिम्बायोसिसमधील दोन अशा पाच विद्यार्थ्यांंना ‘स्वाइन फ्लू’ झाला आहे. न्यू इंडियातील विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने नववीचे दोन आणि दहावीचा एक वर्ग बंद करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी इंग्लंडहून परतलेल्या एका जोडप्याला ‘स्वाइन फ्लू’ झाल्याचे आज स्पष्ट झाल्याने त्यांना औंध रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. एकूण सहा रुग्णांची आज नोंद करण्यात आली आहे.

विनोद, किस्से, आठवणीतून रंगली मायलेकींच्या गप्पांची मैफल
पुणे, २६ जुलै/प्रतिनिधी

विनोदांची धमाल, मजेदार किस्से; त्यात अधूनमधून मधुर सुरांचा आविष्कार आणि करिअरमधील बऱ्या-वाईट आठवणींना उजाळा देत कोथरूड सांस्कृतिक महोत्सवात मायलेकींच्या गप्पांची मैफिल आज चांगलीच रंगली. सुधीर गाडगीळ यांनी खुमासदार शैलीत फेकलेल्या प्रश्नांच्या फैरीमुळे व्यासपीठावरील कलावंतांसह अवघे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

‘बळीराजाचं राज्य आलं खरं, पण..!’
शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकणारे काही मराठी चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाले. टिंग्या, गाबडीचा पाऊस ही त्याची काही प्रमुख उदाहरणे. निर्माते अरुण कचरे व दिग्दर्शक सतीश रणदिवे यांच्या ‘बळीराजाचं राज्य येऊ दे’ या नव्या चित्रपटातही शेतकऱ्यांच्याच समस्यांवर भर देण्यात आला आहे. फरक एवढाच की, त्यांनी या चित्रपटात केवळ शेतकऱ्यांच्या समस्या दाखविलेल्या नाहीत, तर त्या समस्यांवर मात करून शेतकरी राजाचं म्हणजेच बळीराजाचं राज्यही आलेले दाखविले आहे.

बॅड ‘लक’
तुमचे नशीब चांगले असेल तर त्या दिवशी भरपूर पाऊस पडेल आणि तुम्ही चित्रपटगृहात जाण्याऐवजी घरीच आराम कराल किंवा दहा मिनिटांत चित्रपटगृहात पोहोचू म्हणून रिक्षाने निघाल, पण कमी रुंदीच्या रस्त्यावरून कंटेनर वळण घेत असल्याने तेच अंतर कापायला तुम्हाला पाऊण तास लागेल आणि तो चित्रपट चुकेल. नशीबाने दगा दिला तर मात्र तुम्ही मित्राला भेटायला मल्टिप्लेक्स असलेल्या मॉलमध्ये जाल, मित्र वाहतुकीच्या खोळंब्यात अडकलेला असेल आणि तुमच्या हाती दोन तासांचा वेळ असेल आणि नेमकी तीच ‘लकी’ची वेळ असेल!

झी मराठीवरील नवी मालिका ‘कुंकू’
विदर्भातल्या एका छोटय़ा गावातल्या शेतकरी कुटुंबातील जानकीची ही कथा. वडिलोपार्जित जमिनीचा आपल्या वाटय़ाला आलेला तुकडा कसून त्यावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सुभानरावाची मुलगी जानकी ही केवळ सुभानरावाचीच नव्हे अख्ख्या गावाची लाडकी होती. आई मालती, वडील सुभानराव आणि धाकटा भाऊ गणेश यांच्याबरोबर गरिबीत वाढणारी जानकी सुभानरावाच्या घराची जान तर होतीच, पण तिच्या लाघवी, मृदू स्वभावामुळे ती अवघ्या गावकऱ्यांच्या गळ्यातला ताईत होती.

तिचं चुकलं तरी काय? प्रदर्शनास सज्ज
रिप्लेक्शन फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माते प्रकाश पांचाळ, सुरेंद्र कुकेकर, बाबा राठोड, मुन्नाभाई बी. के. निर्मित व प्रकाश पांचाळ दिग्दर्शित ‘तिचं चुकलं तरी काय? हा आगळा पारिवारिक मराठी चित्रपट पूर्ण झाला असून, लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रकाश पांचाळ यांनी याअगोदर ‘लाभले सौभाग्याचं लेणं, नटले मी तुमच्यासाठी आणि लगीन माझ्या खंडोबाचं’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते व सयाजी शिंदे निर्मित माझी माणसं या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते होते.

जुळे अर्भक नाल्यात मृतावस्थेत सापडले
पिंपरी, २६ जुलै/प्रतिनिधी

आकुर्डी येथील जय गणेश व्हिजन पाठीमागील नाल्यात आज दुपारी जुळे मृत अर्भक सापडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी अनोळखी मात्या-पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुळे नवजात अर्भक आज दुपारी नाल्यामध्ये मृतावस्थेत पडले असल्याची माहिती नियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आली. पोलिसांनी हे अर्भक महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत नाल्यातून बाहेर काढले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

तरुणाच्या मृत्यूप्रकरणी दोघा सावकारांना अटक
पिंपरी, २६ जुलै / प्रतिनिधी

पिंपरीतील तरुण संजय पारखे याच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली आज नेहरुनगर येथील दोघा सावकारांना अटक करण्यात आली. त्यांना २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पिंपरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे निरीक्षक नंदकुमार िपजण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन प्रल्हाद वडमारे (वय ४५) व गिरिधर श्रीरंग जावळे (वय ३९) असे अटक करण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे. या गुन्ह्य़ातील आणखी दोन सावकार अद्याप फरार आहेत. याप्रकरणी संजयच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. मोहन वडमारे याच्याकडून पन्नास हजार रुपये, गिरिधर याच्याकडून पंचवीस हजार रुपये कर्ज संजयने घेतले होते. याची परतफेड करुन देखील आरोपींनी त्याचे घर बळकविण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींना न्यायालयात हजर केले असता २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अधिक तपास निरीक्षक िपजण करीत आहेत.

धिवार यांना पुरस्कार
पुणे, २६ जुलै/प्रतिनिधी
फुले-शाहू- आंबेडकर विचार मंचच्या वतीने मुकेश धिवार यांना ‘सामाजिक एकता पुरस्कार’ राजा धनराज गिरजी हायस्कूलचे प्रश्नचार्य रवींद्र साळुंखे यांच्या हस्ते गौरवचिन्ह, व पुस्तके भेट देऊन सन्मानित करण्यात आले. मुकेश धिवार यांनी रिक्षा बंद काळात मोफत लिफ्ट रिक्षा सेवा, गरिबांना वैद्यकीय व आर्थिक मदत, भूगावच्या मानव्य संस्थेस मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे उपक्रम राबविले आहेत. या कार्यक्रमास मंचचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड रवींद्र माळवदकर, दत्ता कोहिनकर पाटील, मोतलिंग गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईतील सराफाला ३२ लाखांचा गंडा
पुणे, २६ जुलै / प्रतिनिधी

मुंबईतील एका सराफाकडे व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्यानेच ३२ लाख ४५ हजार रुपयांस या सराफाला गंडा घातला आहे. याबाबत पोलिसांनी पुण्यातील व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. धीरज देवराज पुनमिया (वय ४०, रा. सोमवार पेठ, पवित्र सेसिडेन्सी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी भावेश ललित शहा (वय २५, रा. राजमा बिल्डिंग, एल. जे. रोड, माटुंगा (पश्चिम) मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा यांचा सोन्याचे दागिने विकण्याचा होलसेल व्यवसाय आहे. त्यांच्या या व्यवसायात पुनमिया हा १२ वर्षापासून व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. १३ जुलैला तो मुंबईला शहा यांच्या वडिलांकडे गेला होता. आपल्याकडून ६७ हजार रोख व दोन किलो सोनसाखळ्यांचे नुकसान झाल्याचे त्याने सांगितले होते व ते भरून देण्याचेही कबूल केले होते. ही बाब शहा यांना कळाली. संशय आल्याने शहा यांनी पुनामिया याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद असल्याचे लक्षात आले.

मोफत वह्य़ा वाटप
पुणे, २६ जुलै/प्रतिनिधी

अखिल लोहियानगर काँग्रेस आय पक्षाच्या वतीने पहिली ते बारावीच्या गरीब, गरजू, होतकरू सुमारे दोन हजार विद्यार्थी- विद्यार्थिनींना मोफत वह्य़ा वाटप कार्यक्रम आमदार रमेश बागवे व सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित धुर्ये यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. लोहियानगर येथे अंजुमन चौकात या वेळी १० वी ते १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार रमेश बागवे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक जुबेरभाई दिल्लीवाला, सादिक इनामदार, रहेमान कुरेशी आदी उपस्थित होते.

विवाहितेच्या छळाबद्दल पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे, २६ जुलै / प्रतिनिधी
महाराष्ट्रीय असल्याचे खोटे सांगून विवाह केल्यानंतर सदनिका व मोटार घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी पती व सासूकडून छळ होत असल्याची फिर्याद एका महिलेने दिली त्यानुसार पोलिसांनी हडपसर पोलिसांनी पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रूपाली दीपक सिंग (वय ३३, रा. पूर्वा हाईट्स, सूस रोड, पाषाण) या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती दीपक रामनगिरा सिंग (वय ३६) व सासू सत्यवती सिंग (वय ५०, दोघे रा. बी. ई. बिल्ली, मोरया कंस्ट्रक्शन, मगरपट्टा, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रूपाली व दीपक यांचा सात वर्षापूर्वी विवाह झाला आहे. फिार्यादीनुसार दीपक या उत्तर प्रदेशमधील आहे. महाराष्ट्रीय असल्याचे खोटे सांगून त्याने रूपाली यांच्याशी विवाह केला होता. त्यानंतर मागील दोन वर्षापासून दीपक पैशासाठी रूपालीचा छळ करीत होता. सदनिका खरेदीसाठी दोन ते तीन लाख, तर मोटारीसाठी दीड लाख रुपये माहेराहून आणण्याची मागणी करीत होता. त्याचप्रमाणे रूपालीची आई व भावाला जिवे मारण्याची धमकीही देत होता.

राजगुरुनगरमध्ये तरुणीचा गूढ मृत्यू
राजगुरुनगर, २६ जुलै / वार्ताहर
येथील सिद्धेश्वर मंदिराच्या मागील झाडीमध्ये असलेल्या विहिरीत एका महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह राजगुरुनगर पोलिसांना २५ जुलै रोजी रात्री मिळाला. पोलीस तपास सुरू असून, अद्याप गूढ उकलेले नाही. येथील महाविद्यालयामध्ये एस.वाय.बी.कॉम या वर्गात शिक्षण घेणारी वाफगावची तरुणी अश्विनी लक्ष्मण पवार (वय २०) ही घरातून २३ जुलै रोजी सकाळी आठ वाजता बाहेर पडली. त्यानंतर ती घरी न परतल्याने तिच्या घरच्यांनी ती हरविल्याची तक्रार पोलिसांकडे २५ जुलै रोजी दाखल केली. सावळ्या रंगाची, पाच फूट उंचीची, गोल चेहऱ्याची अश्विनी पिवळा टॉप व निळी जीन पॅन्ट घालून घराबाहेर पडली होती. दुर्दैवाने त्याच दिवशी संध्याकाळी तिचा मृतदेह सिद्धेश्वर मंदिराच्या मागील विहिरीत अर्धनग्न अवस्थेत तरंगताना पोलिसांना मिळाला. तिच्या अंगावर फक्त पिवळा टॉप होता. तिच्या मामाच्या साहाय्याने पोलिसांनी तिची ओळख पटवली आणि रात्री साडेआठ वाजता डायरीला मृतदेह मिळाल्याची नोंद केली.

निगडीत दोघा चोरटय़ांकडून गुन्हे उघड
पिंपरी, २६ जुलै / प्रतिनिधी

आकुर्डी खंडोबा माळ येथे चोरीची रिक्षा घेऊन जाणाऱ्या दोघा चोरटय़ांकडून घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव साहेबराव साठे (वय २२, रा. विजयनगर झोपडपट्टी, चिंचवड) व विलास भोजू लष्करे (वय २१, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक शरद उगले, राजेंद्र कुंटे, हवालदार निवृत्ती रेंगडे, दत्तात्रय मुरकुटे, गणपत लोंढे, बिभीषण कन्हेरकर, विवेकानंद सपकाळे, अगस्टीन डिमेलो, राजू बोरसे, मंगेश वालकोळी, संदीप बाबर, बबन गागरे यांनी त्याना खंडोबा माळ परिसरात सापळा रचून १८ जुलैला अटक केली. पिंपरी न्यायालयाने त्यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. जीवन नारायण डोळस (वय २८, रा. ओटास्कीम, निगडी) यांची ११ जुलैला घरासमोरून चोरलेली ४५ हजार रुपयांची रिक्षा या दोघा आरोपींकडून मिळून आली.

बहिणीच्या घरी आलेल्या नवविवाहितेची आत्महत्या
जेजुरी, २६ जुलै/वार्ताहर

पुरंदर तालुक्यातील पोंढे येथील नवविवाहिता जेजुरीजवळील घाटेवाडी येथे बहिणीकडे आली होती. यावेळी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगीता भिवाजी वाघले (वय १९) असे या नवविवाहितेचे नाव आहे. मावडी पिंपरी (ता. पुरंदर) हे तिचे माहेर असून १८ जून २००९ रोजी तिचे लग्न भिवाजी वाघेले (रा. पोंढे, ता. पुरंदर) याच्याबरोबर झाले होते. लग्नानंतर काही दिवसातच ती सासरी आली होती. त्यानंतर ती बहिणीकडे राहायला आली होती, तेथेच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजले नसून जेजुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक के. सी. पटेल अधिक तपास करीत आहेत.

दिवेकर महाविद्यालयातील सर्व प्रश्नध्यापकांचे काम बंद आंदोलन
पाटस, २६ जुलै/वार्ताहर
वरवंड (ता. दौंड) येथील वरवंड ग्रामशिक्षण संस्थेच्या एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयातील सर्व प्रश्नध्यापक महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन (एम. फुक्टो) शिक्षक संघटनेच्या आदेशावरून बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.
शासनाने प्रश्नध्यापकांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी प्रश्नध्यापकांची मागणी आहे. वरवंड महाविद्यालयातील सर्व प्रश्नध्यापकांनी आंदोलनात भाग घेतल्याने अध्यापनाचे कोणतेही काम होऊ शकले नाही. या वेळी महाविद्यालयात शुकशुकाट होता. काम बंद आंदोलनाचे नेतृत्व स्थानिक शाखा अध्यक्ष प्रश्न. डी. जे. दुर्गाडे, सचिव प्रश्न. शरद गाडेकर करत आहेत.

पिंपळे निलखच्या नांदगुडे फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दिल्ली सहल
पिंपरी २६ जुलै / प्रतिनिधी
पिंपळे निलख येथील नांदगुडे फाउंडेशनच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या सर्व शाळांमधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी देशाची राजधानी असलेल्या ‘दिल्ली सहली’चे आयोजन करण्यात आले आहे.
या सहलीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ५ ऑगस्टपर्यंत सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत फाउंडेशनच्या कार्यालयात (पत्ता-नांदगुडे पाटील फाउंडेशन,छत्रपती अर्बन बँकेच्यावर, विशालनगर.जगताप डेअरी,पुणे २७)नाव नोंदणी करावी,असे आवाहन अध्यक्ष विलास नांदगुडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. ही सहल केवळ चिंचवड मतदारसंघातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठीच आहे.गुणवंत विद्यार्थी आपापल्या परीने शहराच्या नावलौकिकात भर घालत असतात.त्यांचा सार्थ अभिमान म्हणून हा उपक्रम आयोजित केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कुलस्वामी खंडेराया वडज देवस्थानातील चोरीवरून विश्वस्त व ग्रामस्थांचा वाद
जुन्नर, २६ जुलै / वार्ताहर

तीर्थक्षेत्र कुलस्वामी खंडेराया वडज येथील म्हाळसादेवीच्या मंगळसूत्राची चोरी होऊनही चार दिवस उलटले तरी या प्रकरणी विश्वस्तांनी ग्रामस्थांना अंधारात ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे, तर चोरी झालेलीच नाही, असा दावा विश्वस्तांच्या वतीने अध्यक्षांनी केला असल्याने ग्रामस्थ आणि विश्वस्त यांच्यातील हेवेदावे ऐरणीवर आले आहेत. मात्र यातून देवस्थानला वेठीला ठेवले जात असल्याची भाविकांची भावना झाली आहे. याबाबतचे परस्परविरोधी दावे पोलिसांकडे करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणी लेखी तक्रार दिल्यास या प्रकरणी चौकशी करता येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. २१ जुलै रोजी रात्री म्हाळसादेवीच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी झाली. तरी विश्वस्त मंडळाने हा प्रकार पोलिसांना कळविलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी २३ जुलैला पोलीस ठाण्यास हा प्रकार कळवला.

सावता माळी पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम
आळंदी, २६ जुलै/वार्ताहर

आळंदी शहर माळी समाज बांधवांचे वतीने संत सावतामाळी पुण्यतिथी विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. संत सावतामाळी प्रतिमा मिरवणुकीस मोठा प्रतिसाद मिळाला. तत्पूर्वी ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधीस अभिषेक झाला. ह.भ.प. मारुती महाराज कुरेकर यांचे कीर्तन, विष्णू मंदिरात महाप्रसाद, जागृती अंध कन्या शाळेत फळवाटप आदी कार्यक्रम मोठय़ा उत्साहात झाले. आळंदी शहर माळी समाज मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आळंदी यंत्रणेत बिघाड; कमी दाबाने पाणीपुरवठा
आळंदी, २६ जुलै/वार्ताहर

आळंदी नगरपरिषद पाणीपुरवठा उपसा यंत्रणेत बिघाड झाल्याने केंद्रास कमी पाणीपुरवठा होत आहे. यामुळे शहरातील नळजोडधारकांना कमी दाबाने पाणी येईल. या बदलीची नोंद घेऊन नागरिकांनी पाणीपुरवठा यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन विभागप्रमुख दत्तात्रय सोनटक्के यांनी केले आहे. आळंदी नगर परिषद पाणीपुरवठा केंद्रास ज्या बंधाऱ्यापासून पाणीपुरवठा होतो, त्यातील विहिरीत उपसा यंत्रणेत गाळ साचल्यामुळे पाणीउपसा कमी झाला आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा केंद्रात पाणी येत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या पाणीपुरवठय़ावर झाला आहे. यात भारनियमनाचा फटका केंद्रास पाणी घेण्यावर होत आहे. फुटबॉल मोकळा करण्यास नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने विलंब होत आहे. यामुळे आळंदी परिसरातील नागरिकांनी पाणी वापर काटकसरीने करावा, तसेच तांत्रिक बिघाड दूर होईपर्यंत नगर परिषद पाणीपुरवठा यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.