Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

राज्य

ठाणे जिल्ह्याला मिळणार दहशतवादीविरोधी पथक
ठाणे, २६ जुलै/प्रतिनिधी

मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील संभाव्य अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी दहशतवादी विरोधी पथक आणि दंगल शमविण्यासाठी सहा प्लॅटून तयार केले जात आहेत. त्याचबरोबर संपूर्ण परिसराचे डिजिटल नकाशे आणि गुन्हेगारांच्या शोधासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर खरेदी केले जाणार असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त अनिल ढेरे यांनी दिली.
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ढेरे यांनी पोलीस सक्षमीकरण आणि पोलिसिंगबाबत खुली चर्चा केली. त्यावेळी सहआयुक्त विनोद लोखंडे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे हे उपस्थित होते.

५३ गावांच्या वतीने वसईत उग्र मोर्चा
ठाणे, २६ जुलै/प्रतिनिधी

वसई-विरार महापालिकेत ५३ गावांचा समावेश करू नये, या मागणीसाठी ‘गाव वाचवा आंदोलन समिती’ च्या वतीने वसई तहसीलदार कार्यालयावर आज प्रचंड मोर्चा काढण्यात आला. या महानगरपालिकेतून ५३ गावे न वगळल्यास लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीपासून साखळी उपोषण तर, ४ ऑगस्टपासून नेते विवेक पंडित हे आंदोलकांच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.ही महानगरपालिका स्थापन करताना ग्रामपंचायतींच्या विरोधाची दखल घेण्यात आली नाही, तसेच व्यक्तिगत हरकतींचीही सुनावणीही झाली नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. महापालिका झाल्यास प्रत्येकवर्षी पावसाळ्यात प्रलय घडेल, मीठ, मत्स्योत्पादन आदी स्थानिक रोजगारांवर विपरीत परिणाम होऊन सामान्य माणसांना त्याचा त्रास भोगावा लागेल.

बार्शीजवळ उत्खननात सापडले ५०० वर्षांपूर्वीचे मंदिर
सोलापूर, २६ जुलै/प्रतिनिधी

बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला येथे जमिनीपासून तीन मीटरखाली पाताळलिंग मंदिराचा शोध लागला असून ते सुमारे ५५० वर्षांपूर्वीचा असावे, असा तर्क आहे. सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलामधील पुरातत्व विभागाच्या प्रा. डॉ. माया पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मंदिराचा शोध लावला आहे. बार्शी तालुक्यात वैरागपासून साधारणपणे १५ किलोमीटर अंतरावरील या गावात प्राचीन मंदिरांचे पाच अवशेष विखुरलेले आहेत. प्राचीन भारतीय वास्तुकलेचे वैविध्य आणि सौंदर्याविष्कार त्यात जाणवतो.

दरीचे सौंदर्य पहाताना जीप हजार फूट खोल कोसळून नऊजणांचा मृत्यू
शाहूवाडी, २६ जुलै/वार्ताहर

विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरजवळील दरीचे रौद्ररूप बोलेरो जीपमध्ये बसून पाहात असतानाच शेवाळलेल्या जमिनीवरून ही जीप सुमारे एक हजार फूट खोल दरीत कोसळली. आज सकाळी झालेल्या या भीषण अपघातात जीपमधील नऊजण जागीच ठार झाले, तर एकजण सुदैवाने बचावला असून अजून एक तरुण बेपत्ता आहे.

स्वाइन फ्लूचा फैलाव पुण्यात सुरूच
पुणे, २६ जुलै / प्रतिनिधी

भुसारी कॉलनीतील न्यू इंडिया स्कूलमधील नववी, दहावीतील तीन आणि सिम्बायोसिसमधील दोन अशा पाच विद्यार्थ्यांंना ‘स्वाइन फ्लू’ झाला आहे. न्यू इंडियातील स्वाइनफ्लूग्रस्त विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने नववीचे दोन आणि दहावीचा एक वर्ग बंद करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी इंग्लंडहून परतलेल्या एका जोडप्याला ‘स्वाइन फ्लू’ झाल्याचे आज स्पष्ट झाल्याने त्यांना औंध रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. हे जोडपे ४० ते ४५ वयोगटातले आहे. एकूण सहा रुग्णांची आज नोंद करण्यात आली आहे.
शहरातील रुग्णांची संख्या ४९ पर्यंत गेली आहे. आजपर्यंत सिम्बायोसिसमध्ये आठ, अभिनवमध्ये वीस, न्यू इंडियात चार आणि सेवासदनात एक अशा ३२ विद्यार्थ्यांना लागण झाली, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

अपहृत गवतेंचा मृतदेह सापडला
ठाणे, २६ जुलै /प्रतिनिधी

डोंबिवलीतील यश शहा प्रकरणानंतर तीन लाखांच्या खंडणीसाठी विटाव्यातील गणेश नामदेव गवते यांची अपहरणकर्त्यांनी गळा आवळून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांचा मृतदेह आज सायंकाळी भिवंडीतील बाळशिंद टेपाचापाडा येथील एका गोणीत कुजलेल्या अवस्थेत सापडला.
कोटय़वधी रुपये किंमतीच्या जमिनीचे मालक असलेले गणेश गवते (४०) यांचे शुक्रवारी अपहरण झाले. या प्रकरणी त्याचा लहान भाऊ रमेश गवते यांनी ठाणे नगर पोलिसात तक्रार दाखल केली. अपहरणकर्त्यांनी दोनदा फोन करून तीन लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला असता रविवारी सायंकाळी भिवंडीत कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. भिवंडी तालुक्यातील बाळशिंद टेपाचापाडा येथून जात असताना जनाबाई उराडे या महिलेला झाडा-झुडपातून दरुगधी आली. जवळ गेल्यानंतर एका गोणीमधून व्यक्तीचे डोके बाहेर दिसले. भेदरलेल्या महिलेने तात्काळ तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्या खिशात सापडलेल्या बिलावरून गवते यांची ओळख पटली आणि मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गवते कुटुंब हे मोठे असून त्यांच्याकडे विटावा, ऐरोलीमध्ये करोडो रूपयांची जमिन आहे. या संपत्तीवरूनच त्यांची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.