Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

क्रीडा

भारतीय हॉकीने भूतकाळात रमणे सोडावे - ब्रासा
मुंबई, २६ जुलै / क्री. प्र.

बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यास असमर्थ ठरल्यापासून दुर्दशेच्या गर्तेत गेलेला भारतीय संघ स्पेनचे प्रशिक्षक जोस ब्रासा यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा भरारी घेण्यास उत्सुक आहे, पण भारतीय संघाला हे आव्हान पेलेल की नाही, हे मात्र सांगता येणे कठीण आहे.
ब्रासा यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या भारतीय संघ युरोप दौऱ्यावर असून तेथे हा संघ आपले कौशल्य आजमावून पाहणार आहे. चार देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी कशी होते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘कॅप्टन्स डायरी’मुळे स्मिथ अडचणीत?
जोहान्सबर्ग, २६ जुलै/वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष नॉर्मन अ‍ॅरेन्से यांच्याविरुद्ध आपल्या पुस्तकात केलेल्या टिप्पणीमुळे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्मिथ याचे ‘अ कॅप्टन्स डायरी - २००७-२००९’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकात स्मिथ याने नॉर्मन अ‍ॅरेन्से यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील काही निर्णयांविरोधात प्रतिकूल शेरेबाजी केली आहे.गेल्या वर्षी भारताविरुद्धच्या दौऱ्यासाठी संघ निवडताना आंद्रे नेल याच्याऐवजी चार्ल लँगव्हेल्ट याची निवड करण्यात आली.

दुखापतीला आयपीएल जबाबदार नाही - पीटरसन
लंडन, २६ जुलै / वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळताना आपल्याला दुखापत झाल्याचे वृत्त निराधार आणि खोडसाळ आहे, असा दावा इंग्लंडचा शैलीदार फलंदाज केविन पीटरसन याने केला आहे. सध्या चालू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेत पीटरसन फक्त पहिल्या कसोटीत खेळू शकला. दुखापतीमुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही. आता तो उर्वरित तीन सामन्यांतही खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पीटरसनला पहिल्या कसोटीत खेळताना दुखापत झाली नव्हती तर आयपीएल स्पर्धेदरम्यानच त्याला दुखापत झाल्याच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत आहेत. या संदर्भात द न्यूज ऑफ द वर्ल्ड या वृत्तपत्रातील स्तंभात पीटरसन याने म्हटले आहे की, मला दुखापत कशामुळे झाली याची माहिती जाणून न घेताच बातम्या प्रसिद्ध होत आहेत.

तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटीसाठी इंग्लंड संघात इयन बेल
लंडन, २६ जुलै / पीटीआय

ऑस्ट्रेलियाविरुद्ध येत्या गुरुवारपासून एजबॅस्टन येथे सुरू होत असलेल्या तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यासाठी दुखापतग्रस्त केव्हिन पीटरसनऐवजी इयन बेल याला इंग्लंड संघात संधी देण्यात आली आहे. इंग्लंडच्या निवड समितीने या सामन्यासाठी १३ खेळाडूंच्या संघाची आज घोषणा केली. इंग्लंडच्या निवड समितीने या सामन्यासाठी फ्लिन्टॉफ तंदुरुस्त असेल, अशी आशाही व्यक्त केली आहे. सध्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे फ्लिन्टॉफ त्रस्त असून दुसऱ्या सामन्यात त्याच्या कामगिरीमुळेच इंग्लंडने लॉर्ड्सवरील ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती.

आशियाई शरीरसौष्ठव
अमित चौधरी, राजेंद्रन आणि किशनसिंग अंतिम फेरीत दाखल
औरंगाबाद, २६ जुलै/क्री. प्र.

भारतीय शरीरसौष्ठव संघटनेतर्फे आयोजित ४३ व्या आशियायी शरीरसौष्ठव स्पर्धेत एन. के. किशनसिंग (६५ किलो), अमित चौधरी (८० किलो) आणि एम. राजेंद्रन (८५ किलो) या तीन प्रमुख भारतीय शरीरसौष्ठवपटूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ही तिघेही मिस्टर आशिया या किताबाच्या शर्यतीत आहेत. येथील सिडको नाटय़गृहात या स्पर्धेचा रविवारी मोठय़ा थाटात प्रारंभ झाला. कोरिया, जपान, श्रीलंका, कतार, उझबेकिस्तान, बहारीन, कझाकीस्तान आदींसह २२ देशांचे शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले आहेत.

..तर आयपीएललाच प्रथम प्राधान्य
व्हेटोरीचा इशारा
ख्राईस्टचर्च, २६ जुलै / वृत्तसंस्था

यापुढील काळात न्यूझीलंड संघाचे दौरे आणि इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा यांच्या तारखा एकाच वेळी आल्या तर न्यूझीलंडचे खेळाडू इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळण्यास प्राधान्य देतील, असा इशारा न्यूझीलंडचा कर्णधार डॅनिअल व्हेटोरी याने दिला आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत खेळण्यास परवानगी देण्याच्या मुद्दय़ावरून न्यूझीलंड क्रिकेट मंडळ आणि खेळाडूंत मतभेद झाले होते.

कुटुंबासाठी निवृत्तीचा निर्णय - फ्लिन्टॉफ
लंडन, २६ जुलै / पीटीआय

इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, पण दुखापतींनी बेजार असलेल्या फ्लिन्टॉफने आपल्या कुटुंबियांसाठी निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागल्याचे म्हटले आहे.
फ्लिन्टॉफ म्हणाला की, मी कुटुंबासाठी मी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकून एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहे. अनेक वेगवान गोलंदाजांना आपल्या कारकीर्दीत ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्याच समस्यांना मीदेखील सामोरा गेलो. गोलंदाजी करताना तुमच्या शरीराचे वजन पायावर पडते आणि हे सातत्याने सहन करणे कठीण असते.

लढवय्या
श्रीलंकेचा डावखुरा जलदगती गोलंदाज चमिंडा वासने कसोटीतील निवृत्ती स्वीकारली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर तो कसोटी क्रिकेटला रामराम ठोकणार आहे. एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मात्र तो दिसणार आहे. २०११ची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळण्याची त्याची मनीषा आहे. चमिंडा वासचे पूर्ण नाव काय, हे अनेक क्रिकेटरसिकांना तर सोडाच, पण क्रिकेटपंडितांनाही सांगता येणार नाही. त्याचे पूर्ण नाव ‘वर्णाकुलासुरिया पटाबेंडिंगे उशान्ता जोसेफ चमिंडा वास’ असे आहे. त्याला सर्वजण चमिंडा वास या नावानेच ओळखतात. श्रीलंकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून त्याची प्रतिमा आहे.

एका सुवर्णपदकासह भारताच्या अ‍ॅथलिट्सना ब्रिटनमध्ये तीन पदके
नवी दिल्ली, २६ जुलै / पीटीआय

पुरुषांच्या लांब उडी क्रीडा प्रकारात भारताच्या महानसिंगने सुवर्णपदक पटकाविल्यामुळे बर्मिगहॅम, ब्रिटन येथे सुरू असलेल्या थ्रो अँड जम्प फेस्टिव्हलमध्ये भारताने पहिल्याच दिवशी तीन पदकांची कमाई केली. महानने पाचव्या प्रयत्नात ७.५५ मीटर इतकी उडी मारली. त्याने ब्रिटनचा आघाडीचा लांब उडीपटू आंद्रे फर्नाडेझ याला मागे टाकले. फर्नाडेझने ७.५४ मीटर उडी मारून आघाडी घेतली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या शिवशंकर यादव आणि अंकित शर्मा यांना मात्र या प्रकारात अनुक्रमे सहाव्या आणि आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. दोघांनी अनुक्रमे ७.२० मीटर व ७.१५ मीटर उडी मारली. राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या उंचउडीपटू हरी शंकर रॉय याने आपल्या गेल्या आठवडय़ातील कामगिरीत सुधारणा करीत २.१४ मीटर उडी मारून रौप्यपदक जिंकले. पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात सत्येंद्र सिंगने तिसरा क्रमांक पटकाविला. त्याने १७.६१ मीटर फेक केली. सौरभ विज या आणखी एका भारतीय खेळाडूला १७.५१ मीटर गोळाफेकीसह चौथे स्थान मिळाले. भारतीय खेळाडू या स्पर्धेत प्रशिक्षण आणि स्पर्धा अशा दुहेरी उद्देशाने सहभागी झाले आहेत. यानंतर भारतीय खेळाडू लाफबोरो येथे २९ जुलैला युरोपियन स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

रहाणे ९२; भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हार
उदयोन्मुख क्रिकेटपटूंची स्पर्धा

ब्रिस्बेन - सलामीवीर अजिंक्य रहाणेच्या ९२ धावांच्या सर्वांगसुंदर खेळीनंतरही भारतीय संघाला उदयोन्मुख खेळाडूंच्या येथे सुरू असलेल्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेकडून चार विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५०षटकांत ६ बाद २७१ धावा केल्या. त्यात रहाणेने १२० चेंडूंत ९२ धावांची खेळी केली. त्याशिवाय, नमन ओझा (४८), कर्णधार एस. बद्रिनाथ (४४), अभिषेक नायर (४२) यांनीही चमक दाखविली. पण त्याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने ४८.३ षटकांत २७४ धावा करीत विजय साजरा केला. दक्षिण आफ्रिकेच्या स्टेन व्ॉन झिल (६०), वॉन व्ॉन जार्सवेल्ड (५) आणि फरहान बहारदिन (५०) यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांनी ३९ धावांत ३ बळी घेतले तर प्रदीप सांगवान, बद्रिनाथ, विराट कोहली यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने दक्षिण आफ्रिकेची २ बाद ५६ अशी अवस्था केली होती, पण झिल आणि जार्सवेल्ड यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी करून भारताच्या विजयाच्या अपेक्षा धुळीस मिळविल्या.

सानिया अंतिम फेरीत
नवी दिल्ली -
भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने अमेरिकेतील लेक्झिंगटन येथे सुरू असलेल्या आयटीएफ स्पर्धेत मेंग युआनला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला. चीनच्या युआनला सानियाने ६-१, ४-६, ६-४ असे पराभूत केले. हार्डकोर्टवरील या स्पर्धेत द्वितिय मानांकित सानियाची गाठ आता अव्वल मानांकित ज्युली कॉइन या फ्रान्सच्या खेळाडूशी पडेल.

वझे प्रतिष्ठानतर्फे मेडिको बुद्धिबळ स्पर्धा
मुंबई -
डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने बाबुलाल सोमाणी अखिल महाराष्ट्र मेडिको नियमित बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील कोणत्याही शाखेचे डॉक्टर सहभागी होऊ शकतील. अधिक माहितीसाठी डॉ. प्रकाश वझे यांच्याशी ९८२१०३१००६ किंवा २१६३५०४४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

पिकलबॉल प्रशिक्षण वर्ग
मुंबई -
पिकलबॉल या टेनिसशी साधम्र्य असलेल्या तरीही त्यापेक्षा वेगळ्या असलेल्या खेळाचा प्रशिक्षण वर्ग १ ऑगस्टपासून महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रात आयोजित करण्यात आला आहे.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील सर्व रविवार तसेच दुसऱ्या व चौथ्या शनिवारी हा वर्ग आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी ३० जुलैपर्यंत कामगार कल्याण केंद्र, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन येथे संपर्क साधावा, असे आवाहन ऑल इंडिया पिकलबॉल संघटनेचे सचिव सुनील वालावलकर यांनी केले आहे. संपर्क : २४३०६७१७ किंवा ९८२०५३१७३३.