Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

व्यक्तिवेध

पहिल्या महायुद्धाचे दोघेही साक्षीदार. दोघेही आयुष्याचे शतक झळकवून आपल्या स्मृतींना जागवणारे योद्धे. दोघेही ब्रिटिश नागरिक. योगायोगाचा भाग म्हणजे हे दोघेही केवळ एका आठवडय़ाच्या अंतराने निवर्तले. दोघांपैकी हॅरी पॅच यांचे निधन वेल्समध्ये २५ जुलै रोजी झाले. दुसरे हेन्री अ‍ॅलिंग्हॅम. ते इंग्लंडच्या रॉयल एअरफोर्स आणि रॉयल नेव्हीचे सैनिक. हॅरी पॅच यांचा जन्म १७ जून १८९८चा. ते १११ वर्षे जगले. हेन्री अ‍ॅलिंग्हॅम ११३ वर्षे जगले. हॅरी पॅच हे इंग्लंडचे शेवटचे योद्धे. पहिल्या महायुद्धातल्या पॅच आणि अ‍ॅलिंग्हॅम

 

यांच्या बरोबरीच्या आणखी एका योद्धय़ाचाही उल्लेख करणे गरजेचे आहे. ते १०८ वर्षांचे असून ते जरी ब्रिटिश नागरिक असले तरी सध्या ते ऑस्ट्रेलियात राहात आहेत. त्यांचे नाव क्लॉड चॉलेस असे आहे. हेन्री जॉन (हॅरी) पॅच हे पहिल्या महायुद्धाचे खरोखरचे साक्षीदार. त्या युद्धात त्यांनी भाग तर घेतलाच, पण त्यात त्यांना मृत्यूशी थेट दोन हात करावे लागले. सुरुवातीला तुकडीचा प्लंबर म्हणून काम करणारे पॅच प्रत्यक्ष युद्धकाळात डय़ूक ऑफ कॉर्नवेलच्या तोफखान्यात भरती झाले. बॅटल ऑफ पॅशन्डेल म्हणून इतिहासात नोंद असणाऱ्या युद्धात फ्रान्समध्ये त्यांनी भाग घेतला. त्याच युद्धात त्यांच्या अगदी डोक्याच्या वरच्या भागात बॉम्ब फुटला, पण ते वाचले. त्यांचे दोन सहकारी मृत्युमुखी पडले. ही घटना २२ सप्टेंबर १९१७ची असल्याने ते २२ सप्टेंबर हा स्वत:चा ‘स्मृतिदिन’ मानायचे. पहिल्या युद्धातल्या सहभागानंतर पॅच परतले आणि प्लंबर म्हणून काम करू लागले. ब्रिस्टलमध्ये उभारण्यात आलेल्या विल्स स्मारकाच्या कामावरही त्यांनी काही काळ देखरेख केली. दुसऱ्या महायुद्धात ते अर्धवेळ सैनिक बनले. १९१८ मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी अ‍ॅडा बिलिंग्टनशी विवाह केला. १९७६ मध्ये अ‍ॅडाचे निधन झाले. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी जीन हिच्याशी विवाह केला. तिचे १९८४ मध्ये निधन झाले. डोरिस ही त्यांची तिसरी पत्नी. ती दोन वर्षांपूर्वी गेली. २००५ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलने त्यांना मानद पदवी बहाल केली. १८ जुलै रोजी हेन्री अ‍ॅलिंग्ॅहम यांचे निधन झाल्यानंतर, आता पहिल्या महायुद्धाचे आपणच एकमेव हयात ज्येष्ठ साक्षीदार आहोत या जाणिवेने ते अधिकच गंभीर बनले. पॅशन्डेलच्या युद्धात ७० हजार ब्रिटिश सैनिक ठार झाले होते. उत्तर फ्रान्समध्ये जिथे पहिल्या-दुसऱ्या महायुद्धातल्या सैनिकांचे दफन करण्यात आले आहे, त्या जागेवरून रस्ता बांधायच्या फ्रेंच सरकारच्या कल्पनेला त्यांनी अलीकडेच विरोध केला होता. हेन्री अ‍ॅलिंग्हॅम हे रॉयल नेव्हीत होते. ऑगस्ट १९१५ ते १६ एप्रिल १९१९ या काळात ते ब्रिटिश नौदलात होते. त्यांचा जन्म ६ जून १८९६चा. १८ जुलैला त्यांचे निधन झाले. १९१४ मध्येच त्यांना ब्रिटिश लष्करात संदेशवाहक म्हणून दाखल व्हायचे होते, पण आजारी असलेल्या आईने त्यांना परावृत्त केले. ते १४ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे क्षयरोगाने निधन झाले. १९०३ ते १९०५ या काळात डब्ल्यू. जी. ग्रेस यांना क्रिकेट खेळताना पाहिल्याची त्यांची आठवण होती. वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या कंपनीत लागलेली नोकरी त्यांना फार आकर्षक वाटली नाही आणि मग त्यांनी रॉयल नेव्हीत दाखल व्हायचे ठरविले. त्यातच ते तंत्रज्ञ बनले. याच काळात त्यांनी शिक्षणही पूर्ण केले. ग्रेट यारमाऊथमध्ये त्यांची बदली होऊन नौदलाच्या विमानांच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. विमानांच्या देखभालीचे दुसऱ्या दर्जाचे काम करता करता ते पहिल्या दर्जावर जाऊन पोहोचले. पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही महायुद्धांत काम करायची संधी त्यांना मिळाली. रॉयल नेव्हीचे ते पहिल्या महायुद्धाचे शेवटचे साक्षीदार होत. पॅच यांच्याप्रमाणेच अ‍ॅलिंग्हॅम हेही अनेक पदकांचे मानकरी ठरले आहेत. त्यांनी आपला ११२वा वाढदिवस आपल्या सर्व कुटुंबीयांसमवेत साजरा केला होता. गेल्या वर्षी अ‍ॅलिंग्हॅम यांनी विनंती केल्यावरून त्यांना इंग्लंडच्या हवाई दलाने आपल्या ‘टायफून’ या लढाऊ विमानातून नेऊन आणले. अलीकडेच त्यांना साऊदॅम्पटन युनिव्हर्सिटीने इंजिनिअरिंगमधली मानद डॉक्टरेट बहाल केली. अ‍ॅलिंग्हॅम यांनी आपला देह वैद्यकीय संशोधनासाठी द्यायचे ठरवले होते, पण त्यांचे मतपरिवर्तन करण्यात आले होते.