Leading International Marathi News Daily

सोमवार, २७ जुलै २००९

विविध

अरिहंत.. आण्विक पाणबुडीचे स्वप्न अखेर पूर्ण!
जगभरातील कोणत्याही महासागरामध्ये विहरण्याची क्षमता प्राप्त केलेल्या, म्हणजेच ‘ब्लू वॉटर नेव्ही’ झालेल्या भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये आण्विक पाणबुडी तैनात करण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे! ऌ आण्विक पाणबुडी प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी १९६० पासून प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रारंभी भाभा अणुसंशोधन केंद्राकडून त्याचा आराखडा तयार करण्यात आला. १९७० च्या दशकामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुढाकाराने भाभा संशोधन केंद्र आणि संरक्षण संशोधन व विकास केंद्रादरम्यान (डीआरडीओ) संयुक्त प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला.

मोदी यांची नार्को टेस्ट करावी - वाघेला
राजकोट, २६ जुलै / पी.टी.आय.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे गोध्रा जळीतकांडानंतर २००२ मध्ये झालेल्या दंगलीशी संबंध होता का नाही याचे विश्लेषण करण्यासाठी, सत्य पडताळणीसाठी त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी माजी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी रविवारी येथे पत्रकरांशी बोलताना केली. ही दंगल नियंत्रणात आणण्याच्याकामी मुख्यमंत्री मोदी, अन्य मंत्री व राज्य शासनाचे अधिकारी हे अपयशी ठरले होते. राज्यातील भाजपा सरकारने दुहेरी मुखवटा धारण केला आहे.

डाव्या पक्षांनी क्युबाकडून प्रेरणा घ्यावी - करात
बंगळुरू, २६ जुलै/पी.टी.आय.

पराभवाने निराश झालेल्या डाव्या पक्षांनी क्युबासारख्या देशाकडून प्रेरणा घ्यावी. कमालीची प्रतिकूलता, खडतर काळ आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टींवर मात करून क्युबाने प्रगती केली, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी म्हटले आहे.क्युबातील क्रांतीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्युबा महोत्सवात ते म्हणाले, की अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला दारुण पराभव स्वीकारावा लागला.

शहिदांच्या स्मृतींना साऱ्या देशाने दिला उजळा
कारगिल विजयदिनाची दशकपूर्ती
नवी दिल्ली/द्रास, २६ जुलै /पीटीआय

दहा वर्षांपूर्वी पाकिस्तानविरूद्धच्या कारगिल युद्धात भारताला विजय मिळवून देणाऱ्या शहीद जवानांना द्रासपासून नवी दिल्लीपर्यंत आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांद्वारे साऱ्या भारताने आज आदरांजली अर्पण केली. लडाखमधील कारगिल युद्धाचे केंद्रबिंदू असलेल्या द्रासमध्ये शहीद जवानांची अनेक कुटुंबीय युद्धाच्या स्मृती जागविण्यासाठी व जवानांच्या अतुलनीय शौर्याचे स्मरण करण्यासाठी दहा वर्षांत प्रथमच एकत्र जमले होते. पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी देशाच्या जनतेच्यावतीने कारगिल शहिदांना आदरांजली अर्पण केली.

प्रस्थापितविरोधी वातावरणाचा फटका महाराष्ट्रातील अनेक विद्यमान आमदारांना बसण्याची शक्यता
नवी दिल्ली, २६ जुलै/पीटीआय

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांना प्रस्थापितविरोधी वातावरणाचा सामना करावा लागणार असून त्याचा फटका विधानसभेतील अनेक विद्यमान आमदारांनाही बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांच्या नेत्यांनी तसे संकेतही दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात अपेक्षेइतके यश मिळवू शकला नव्हता.

आणि झरदारी यांचे डोळे पाणावले..
इस्लामाबाद, २६ जुलै / पी.टी.आय.

पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या दिवंगत अध्यक्षा व माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे उर्दू उच्चार तसे सदोष मानले जात पण त्यांचे पुत्र बिलावल भुत्तो यांनीही गेल्या आठवडय़ात एका समारंभात आपल्या ‘उर्दू’ उच्चारांनी सर्वाना चकित करून सोडले. पण त्यांच्या भाषणाने त्यांचे पिता झरदारी यांचे मात्र डोळे पाणावले.

पोलीस भरतीसाठी गेलेल्या पाच तरुणांचे नक्षलवादी अतिरेक्यांकडून अपहरण
चंद्रपूर, २६ जुलै/ वार्ताहर

इंडिया रिझव्‍‌र्ह बटालियन या राखीव पोलीस दलात दाखल होण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचे सशस्त्र नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. यातील दोन तरुणांची सुटका तर एकाची हत्या झाल्याची चर्चा होती. मात्र याला दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान नक्षलवाद्यांच्या तावडीतून या तरुणांची सुटका करण्यासाठी चारशे पोलिसांचे पथक जंगलात रवाना झाले आहे.

अस्वलाच्या हल्ल्यात २० गावकरी जखमी
जाजपूर, २६ जुलै / पी.टी.आय.

ओरिसाच्या जाजपूर जिल्ह्यातील कुआखिया भागात एका जंगली अस्वलाने गावकऱ्यांवर केलेल्या हल्ल्यात एक महिला व एक बालिका यांच्यासह २० जण जखमी झाले. शेतकरी, मोटारसायकलस्वार यांच्यावरही अस्वलाने हल्ला केला. वनाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले व त्यांनी त्याला काबूत आणले. पहाटेनंतर वनात परतण्याचा रस्ता चुकल्याने अस्वल गावात शिरले असावे असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे इतके गावकरी जखमी होऊनही त्यांच्यापैकी कुणीही अस्वलाला जखमी करण्याचा प्रयत्न केला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

तैवानमध्ये भूकंपाचा धक्का
तैपेई, २६ जुलै / ए.एफ.पी.

तैवानमध्ये आज सकाळी ९ वाजता (भारतीय वेळेनुसार सका़ळी ५.३० वा.) भूकंपाचा धक्का बसला. ५.४ मॅग्निटय़ूड क्षमतेचा हा भूकंप होता. यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू तैवानच्या आग्नेय दिशेला १३ किलोमीटर अंतरावर असल्याचे भूगर्भशास्त्र केंद्राकडून सांगण्यात आले. दोन भूकंप प्रवणक्षेत्राजवळ (टेक्टोनिक प्लेट) तैवान येत असल्याने तेथे भूकंपाचे नियमित धक्के जाणवत असतात.

कोलंबियात १६ बंडखोर ठार
बोगोटा, २६ जुलै / ए.एफ.पी.

कोलंबियामध्ये लष्कराने मार्क्सवादी बंडखोरांच्या जंगलामधील तळावर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १६ बंडखोर ठार झाले असे लष्करी प्रवक्त्याने सांगितले. एफएआरसी या संघटनेचे ४३ जण या तळावर होते.