Leading International Marathi News Daily

मंगळवार, २८ जुलै २००९

गेटवे, झवेरी बाजार बॉम्बस्फोट खटला
‘लष्कर’चे तिन्ही आरोपी दोषी
मुंबई, २७ जुलै/प्रतिनिधी
२५ ऑगस्ट २००३ रोजी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार येथे ‘आरडीएक्स’च्या साह्याने भीषण बॉम्बस्फोट घडवून ५४ निरपराध नागरिकांचे बळी घेतल्याबद्दल आणि इतर २६० जणांना जखमी केल्याबद्दल येथील विशेष न्यायालयाने आज पाकिस्तान समर्थित ‘लष्करे तोयबा’ या अतिरेकी संघटनेच्या तीन हस्तकांना दहशतवादी कारवाया करून नरसंहार केल्याबद्दल भारतीय दंड विधान तसेच दहशतवादी कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या (पोटा कायदा) विविध कलमान्वये दोषी ठरविले.

राष्ट्रवादीशी युतीचा निर्णय विचाराधीन- अशोक चव्हाण
नवी दिल्ली, २७ जुलै/खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याचा मुद्दा विचाराधीन असल्याचे जाहीर करून आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे एका पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीपुढे प्रश्नचिन्ह लावले. राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी काँग्रेसश्रेष्ठींशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. काँग्रेसच्या या पवित्र्यामुळे युती होणारच असे गृहित धरणाऱ्या राष्ट्रवादीवर दडपण आले आहे. रविवार दुपारपासून दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी ए. के. अँटनी आणि सोनियांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली.

किडनीदानातून डॉक्टरने दिला मैत्रीचा अनोखा नजराणा
राखी चव्हाण, नागपूर, २७ जुलै

रक्ताची नाती जेथे उणी पडतात.. अशावेळी जात, धर्म, पंथ यांची सीमा ओलांडून मैत्रीचे नाते धावून येते. एवढेच नव्हे तर, मागचा पुढचा विचार न करता त्याच्या शरिरातला एक हिस्सा देऊन मित्राचा जीवही वाचवते. अलीकडच्या काळात अशी घटना दुर्मीळच पण, नागपुरातील जीवनज्योती ब्लड बँकेचे संचालक डॉ. रवी वानखेडे आणि सलीम चिमथानवाला यांच्या बाबतीत घडलेल्या या घटनेने गेल्या ४० वर्षांचे मैत्र अधिकच दृढ झाले आहे. हिंदू-मुस्लीम असा भेद दूर सारून आणि मैत्रीच्या नात्याला जागून डॉ. रवी वानखेडे यांनी मृत्यूशय्येवर असलेल्या त्यांचा बालमित्र सलीम चिमथानवाला यांना अलीकडेच किडनी दान केली. दोन महिन्यांपूर्वी शहरातील शुअरटेक रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली तेव्हा जातीधर्माचे सारे बंध गळून पडले.

गृहनिर्माण विभागातच सर्वाधिक ‘बेघर’ अधिकारी
निशांत सरवणकर, मुंबई, २७ जुलै

मुंबईतला कुठलाही भूखंड विनियम १६ अंतर्गत वितरीत करण्याचा शासनाला अधिकार आहे. हे भूखंड अर्थातच राजकीय वरदहस्त असल्याशिवाय मिळत नाहीत, हे याबाबतची यादी पाहिली की लगेच लक्षात येते. या भूखंडांवर जी घरे उभी राहतील त्यापैकी दहा टक्के घरे ‘बेघर’ सरकारी अधिकाऱ्यांना देण्याबाबत निर्णय झाला. मात्र आता पर्यंत ही घरे कोणाकोणास मिळाली याची तपासणी केली तर अनेक धक्कादायक बाबी बाहेर येतील. यापैकी अनेक घरे गृहनिर्माण विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वाधिक लाटल्याचे याबाबतच्या यादीवरून दिसून येते.

आता प्रवेशापेक्षा तक्रारीसाठीच रांगा
मुंबई, २७ जुलै / प्रतिनिधी

शालेय शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या प्रवेशयादीतही गोंधळाची परंपरा कायम राहिल्याने अन्यायग्रस्त विद्यार्थी-पालक कमालीचे हवालदिल झाले असून प्रवेशापेक्षा शिक्षणविभागाने निश्चित केलल्या तक्रार केंद्रांवरच विद्यार्थी-पालकांच्या रांगा लागल्याचे चित्र आज दिसत होते. आपापल्या तक्रारी मांडण्यासाठी रुइया महाविद्यालय, छबिलदास कनिष्ठ महाविद्यालय, ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. मुंबई शहर, उपनगर, ठाणे जिल्हा, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या सर्वच परिसरातील विद्यार्थ्यांकडून या प्रवेशयादीबाबत प्रचंड प्रमाणात तक्रारी येत आहेत.

कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संचालक अनिरुद्ध कलकर्णी यांचे निधन
पुणे, २७ जुलै / खास प्रतिनिधी

कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संचालक आणि युरोपीय साहित्याचे अभ्यासक अनिरुद्ध कुलकर्णी (वय ६५) यांचे येथे झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. कुलकर्णी कॉन्टिनेन्टल प्रकाशनच्या कार्यालयात अनेकदा झोपण्यासाठी जायचे. त्याचप्रमाणेकाल रात्री ते कार्यालयात गेले. आज सकाळी कर्मचारी कार्यालयात गेले तेव्हा आतमध्ये कुलकर्णी यांचे झोपेतच निधन झाल्याचे समजले. सायंकाळी वैकुंठ स्मशीनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे अंतिम दर्शन चिं.स. लाटकर, दिलीप माजगावकर, अरुण जाखडे, शरद गोगटे, ह. ल. निपुणगे, सुनील मेहता, राजा फडणीस, अनिल किणीकर, विश्वास दास्ताने यांच्यासह अनेकांनी घेतले. कुलकर्णी यांनी तत्त्वज्ञान व इंग्रजी या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. तसेच, फ्रेंच व जर्मन भाषांचाही अभ्यास केला होता. वयाच्या बाविसाव्या वर्षांपासूनच ते वडील अनंतराव कुलकर्णी यांच्यासोबत कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संचालक व भागीदार म्हणून काम पाहू लागले. त्यांचा युरोपीय साहित्याचा अभ्यास होता. त्यांनी ‘डिसेंबर’ व इतर कवितांचे मराठीत भाषांतर केले. तसेच, डोस्कोवस्कीच्या साहित्याची चिकित्सा, इब्सेनच्या साहित्याची चिकित्सा, इब्सेनच्या नोर्वेमध्ये हे प्रवासवर्णन ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. डोस्कोवस्कीवरील पुस्तकासाठी १९८६ मध्ये सोव्हिएट लॅन्ड नेहरू अ‍ॅवॉर्ड, १९८७ मध्ये महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार त्यांना मिळाला.

नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या पाच तरुणांची सुटका
गोंदिया, २७ जुलै / वार्ताहर
देवरी तालुक्यातील धमडीटोला-गांगाटोला येथून नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या पाच तरुणांची दोन दिवसानंतर सुटका करण्यात आली. या घटनेने जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धमडीटोला येथील तीन मधुकर कुळसावंत, अनिल धोंडू डुग्गा, राजभान झलामे व गांगाटोला येथील कोमल कुमेठी व माणिक कुंभरे हे पाच तरुण गोंदिया येथे २० जुलै ते २३ जुलैपर्यंत झालेल्या पोलीस निवडीसाठी आले होते. अर्ज भरून तरुण गावी परत गेले. या तरुणांची माहिती काढून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. चिचगडचे ठाणेदार गायगोले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. २६ जुलैच्या रात्री नक्षलवाद्यांनी पाचही तरुणांना गडचिरोली जिल्ह्य़ातील म्हसोलीच्या जंगलात सोडून दिले. हे नक्षलवादी कोरची दलम वा जोब दलमचे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस निवडीसाठी नोंदणी केलेल्या तरुणांमध्ये दहशतीचे वातावरण पसरविण्याकरिता नक्षलवाद्यांनी अपहरण करून सुटका केल्याचे गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी सांगितले.

दिल्लीमध्ये आगीत तीन बालकांचा मृत्यू
नवी दिल्ली, २७ जुलै/पीटीआय

येथील शहाबाद भागामध्ये एका झोपडीला आग लागून त्यामध्ये तीन बालके भाजून मरण पावली. मृतांमध्ये अवघ्या दीड महिन्याच्या अर्भकाचाही समावेश आहे. सुरेश या व्यक्तीच्या झोपडीला रविवारी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी आग लागली व ही भीषण दुर्घटना घडली. त्यामध्ये आणखी तीन जण जखमी झाले आहेत. अवघे दीड महिन्याचे असलेले अर्भक दाबी, राजराणी (वय वर्षे २), शिवानी (१० वर्षे) ही तीन बालके मरण पावली. तर त्यांची भावंडे देवी (५ वर्षे), दीपक (३ वर्षे) व आई कमलेश हे जखमी झाले आहेत. कमलेश व देवी हे १०० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

 

प्रत्येक शुक्रवारी