Leading International Marathi News Daily

बुधवार, २९ जुलै २००९

श्रीमंत पालकांच्या अरेरावीने मुंबईकर वेठीस
मुंबई, २८ जुलै / प्रतिनिधी
पेडर रोड येथील ‘न्यू एरा हायस्कूल’ ही शाळा व्यवस्थापनाने बंद करून ती फोर्ट येथे हलविण्याच्या प्रश्नावरून या शाळेतील पालक, विद्यार्थी व त्यांना सामील झालेल्या राजकीय संघटनांनी आज सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक ‘रास्ता रोको’ करून मुंबईकरांना विनाकारण वेठीस धरले. या श्रीमंत पालकांनी विद्यार्थ्यांना पुढे करून केलेल्या आंदोलनामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजलेच. पण रात्री उशिरापर्यंत मुंबईकरांना त्यांची कुठलीही चूक नसताना शिक्षा भोगावी लागली. अक्षरश: अरेरावी करीत सुमारे अकरा तास चाललेला हा रास्ता रोको पोलीसही थोपवू शकले नाहीत.

सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असल्याचा आरोप
ओमर अब्दुल्ला यांचे राजीनामानाटय़ राज्यपालांनी फेटाळला
श्रीनगर, २८ जुलै/पीटीआय

२००६ साली घडलेल्या सेक्स स्कँडलमध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला सहभागी असल्याच्या पीडीपीचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री मुझफ्फर हुसैन बेग यांनी विधानसभेत केलेल्या आरोपामुळे आज दिवसभर नाटय़मय घटना घडल्या. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राज्यपाल एन. एन. व्होरा यांना भेटून आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाची चौकशी करावी व आपण दोषी आढळल्यास मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा स्वीकारण्यात यावा असेही ओमर अब्दुल्ला यांनी राज्यपालांना सांगितले.

राजकीय मूषकांनी फस्त केली शासकीय महामंडळे !
संतोष प्रधान , मुंबई, २८ जुलै
सहज पैसा (इझी मनी) मिळविण्यासाठी राजकीय पुढारी, छोटेमोठे कार्यकर्ते व नोकरशहा यांनी मिळेल त्या मार्गाचा अवलंब करीत कोटय़वधी रुपये अक्षरक्ष: ओरबडले. स्थावर मालमत्ता किंवा बांधकाम क्षेत्रात सहजपणे पैसा मिळत गेल्याने राजकारणातील ‘मूषकां’ना या क्षेत्राचे अर्थातच जास्त आकर्षण आहे. त्याच वेळी सत्ताधारी आघाडीतील काही ‘पॉवरफूल’ मूषकांनी राज्य शासनाच्या विविध महामंडळांवर डल्ला मारून ही मंडळेच फस्त केली.

आपणच नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालास निवडणूक आयोगाने दाखविली केराची टोपली!
संदीप प्रधान , मुंबई, २८ जुलै

देशभरात मतदानाकरिता वापरण्यात येणारी नऊ लाख ३० हजार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ‘जाम’ अथवा ‘हॅक’ करता येऊ शकतील, अशी भीती निवडणूक आयोगाने नेमलेल्या इंदर जैन समितीने आपल्या अहवालात व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही ही यंत्रे मतदानाकरिता वापरात असून महाराष्ट्रात याच यंत्रांचा वापर केला गेला, अशी माहिती आता उघड झाली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामधील त्रूटींचा अभ्यास करण्याकरिता निवडणूक आयोगाने २००५ साली इंदर जैन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. २००६ साली या समितीने आपला अहवाल सादर केला. निवडणूक आयोगाने २००५ पूर्वी खरेदी केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये ‘इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटीक इंटरफिअरन्स’ शक्य असल्याचे जैन समितीने नमूद केले आहे. ही यंत्रे जाम करता येऊ शकतात किंवा हॅक करता येऊ शकतात, असेही समितीने म्हटले आहे. २००५ पूर्वी निवडणूक आयोगाने खरेदी केलेली यंत्रे नऊ लाख ३० हजार आहे. जैन समितीच्या अहवालानंतर आयोगाने चार लाख ३७ हजार यंत्रे खरेदी केली आहेत. ही यंत्रे अगोदर खरेदी केलेल्या यंत्रांपेक्षा अद्ययावत आहेत. अर्थात त्यामध्ये मतदाराने केलेल्या मतदानाची प्रत त्याला देण्याची सोय नाही. महाराष्ट्रात ६४ हजार २३४ मतदान केंद्रे असून त्यामध्ये लोकसभा निवडणुकीकरिता २००५ पूर्वीची मतदान केंद्रे वापरली होती. ही जुनी मतदान यंत्रे वापरली तर पोटनिवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा जयललिता यांनी दिल्यानंतर आता नवीन यंत्रे वापरण्याचे आश्वासन आयोगाने दिले आहे. महाराष्ट्रात पेपर बॅकअप असलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरावी, अशी मागणी करण्याकरिता शिवसेना-भाजप युतीच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी सांगितले की, ६ ऑगस्ट रोजी या विषयातील आयोगाचे आणि भाजपचे तज्ज्ञ यांची बैठक होणार आहे.

ऑगस्टमध्ये ‘सीएसटी’ घेणार दोन दिवसांची ‘सीएल’
मुंबई, २८ जुलै / प्रतिनिधी

मस्जिद रेल्वे स्थानकाला लागून असलेला जुना पूल येत्या १५ व १६ ऑगस्ट रोजी तोडण्याची योजना मध्य रेल्वेकडून आखण्यात येत असून या कामासाठी १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून भायखळा ते सीएसटी आणि वडाळा ते सीएसटीदरम्यानची लोकल वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचा तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ा दादरहून सोडण्याचा रेल्वे अधिकाऱ्यांचा विचार आहे. वीकेण्डचा मुहूर्त साधून हा तब्बल दोन दिवसांचा मेगा ब्लॉक करण्यात येणार असला तरी या कामामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे. मस्जिद स्थानकालगतचा जुना ब्रिटिशकालीन पूल तोडणे अत्यावश्यक बनले असून त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र १५ व १६ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि रविवार अशी दोन दिवसांची सुट्टी लक्षात घेऊन त्या दिवशी हे काम करण्याचा विचार केला जात आहे. या तारखा निश्चित झाल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात पत्रकार परिषद घेऊन, या कामाविषयी मुंबईकरांना इत्यंभूत माहिती दिली जाईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीनिवास मुडगेरीकर यांनी सांगितले. या दोन दिवसांच्या काळात एकही लोकल सीएसटीहून सुटणार नाही अथवा सीएसटीला पोहोचणार नाही. मेन मार्गावरील सर्व लोकल भायखळा आणि दादरहून सोडण्यात येणार आहेत, तर हार्बर मार्गावरील लोकल वडाळा स्थानकातूनच माघारी फिरवण्यात येतील. लांब पल्ल्याच्या सर्व गाडय़ासुद्धा सीएसटीऐवजी दादरहून सोडण्यात येतील. त्यादृष्टीने मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून योजना आखण्यात येत आहे. या ब्लॉकच्या काळात दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागेल. ही शक्यता लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना तिन्ही मार्गानी प्रवासाची मुभा देण्याखेरीज बेस्टच्या बसेस चालविण्याची योजना रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून आखण्यात येत आहे.

परळ येथे दोन बहिणींच्या हत्येने खळबळ;अवघ्या तासाभरात आरोपी गजाआड
मुंबई, २८ जुलै / प्रतिनिधी
परळ येथील पालिका विभाग कार्यालयाच्या मागे असलेल्या मित्रधाम को. ऑप. सोसायटीच्या सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या प्रमिला (५८) आणि कृष्णा गावडे (५२) या दोन बहिणींची आज सायंकाळी चौघांनी क्रूरपणे हत्या केली. भरदिवसा झालेल्या या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ माजली. विशेष म्हणजे पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवित अवघ्या एक तासात आरोपींना अटक करून खुनाची उकल केली. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. प्रमिला आणि कृष्णा या दोघी घरात एकटय़ाच होत्या. लूट करण्याच्या हेतूने चौघा आरोपींनी सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांच्या घरात घुसून त्यांची चाकूचे वार करून हत्या केली. त्यानंतर तेथून पळ काढला. घटनेबाबत कळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू करीत चार आरोपींना अटक केली. या आरोपींची नावे सांगण्यास तसेच अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

अकरावी प्रवेशाचा गोंधळ कायम
मुंबई, २९ जुलै / प्रतिनिधी
अकरावी प्रवेशातील गोंधळामुळे अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. आजही चिंतातूर झालेले हजारो विद्यार्थी विविध तक्रार केंद्रांवर हताशपणे उभे असल्याचे चित्र दिसत होते. चर्नी रोड येथील शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयातही अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी आज तुडुंब गर्दी केली होती. शिक्षण विभागाने काही महाविद्यालयांच्या जागांमध्ये २० टक्के वाढ केली आहे. या निर्णयामुळे दुसऱ्या यादीत अनेक महाविद्यालयांमध्ये नियमित प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी भरण्यात आले आहेत. एसआयईएस, हिंदूजा, रॉयल या महाविद्यालयांच्या दुसऱ्या यादीत प्रवेश क्षमतेपेक्षाही १०० ते ३०० अधिक विद्यार्थ्यांची नावे आहेत. परंतु, या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याइतपत वर्गखोल्यांची क्षमता नसून त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे शक्य नसल्याचे कारण देत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. दुसऱ्या यादीत आपले नाव आल्याने आनंद व्यक्त करीत अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्या यादीतील प्रवेश रद्द केले आहेत. परंतु, दुसऱ्या यादीनुसार (वाढीव २० टक्क्यांवरील जागांवर) प्रवेश दिले जात नसल्याने या विद्यार्थ्यांची अवस्था ‘ना घर का; ना घाट का’ अशी झाली आहे.

 

प्रत्येक शुक्रवारी