Leading International Marathi News Daily
बुधवार, २९ जुलै २००९

लॉजिस्टिक्स् मॅनेजमेंट आव्हानात्मक व्यवसाय
योग्य ग्राहकाला, योग्य माल किंवा माहिती योग्य वेळी मिळण्याची सोय आणि पैसा व वेळेची बचत आजकाल उद्योगधंद्यांसाठी आवश्यक ठरत आहे. हे उद्दिष्ट लॉजिस्टिक्स व्यवस्थापनातून गाठता येते. जागतिकीकरणाच्या आजच्या लाटेतून भारतात येत्या दोन वर्षांत या व्यवसायात आकर्षक वाढती उलाढाल (टर्नओव्हर) अपेक्षित असून त्याकरिता चार लाख व्यावसायिकांची गरज असेल.
जागतिक व्यावसायिक क्षेत्रात लॉजिस्टिक्स हे विकसित होत असलेले आधुनिक दळणवळण व्यवस्थापनशास्त्र आहे. यामध्ये पुरवठा (सप्लाय), उत्पादन, साठवणूक (वेअरहाऊस), वितरण (डिस्ट्रिब्युशन) व विक्री केंद्र (रिटेल आऊटलेट) या कार्याचा समावेश असतो. व्यावसायिकदृष्टय़ा, ग्राहकोपयोगी सेवा उपलब्ध करून देणारा हा व्यवसाय असून त्यात उत्पादन निर्मितीपासून ते विक्रीपर्यंत साधनपुरवठा, मालाची मोजदाद
 

(इन्व्हेंटरी), दूरप्रचार (कम्युनिकेशन), मनुष्यबळ, साठवण, मालवाहतूक (मटेरियल हँडलिंग), पॅकेजिंग, अगदी सुरक्षा व्यवस्थासुद्धा अशा विविध कार्याचे व्यवस्थापन करणे असते. या व्यवस्थापनाचा वापर उत्पादन निर्मिती, तसेच वेगवेगळ्या विषयांवरील प्रकल्प अहवाल (प्रोजेक्ट रिपोर्ट), मार्केटिंग वाहतूक व्यवस्था अशा क्षेत्रांमध्येसुद्धा होतो. लॉजिस्टिक्स व्यवस्थापनासंबंधी Cygnus Business Consulting and Research या हैदराबाद येथील संस्थेने सर्वेक्षण केले आहे. या व्यवसायाची अथपासून इतिपर्यंत माहिती देणाऱ्या या अहवालात संबंधित कंपन्या, सरकारी नियमावली, कस्टमसंबंधित कायदे, पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर), दुसरीकडून काम करून घेणे (थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स), तसेच हवाईतळ, जलवाहतूक बंदरे, राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख वेअरहाऊसेस, रस्ते व हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्या, आयात-निर्यात तरतुदी, रेल्वे फ्रेट दर यांची यादी आहे. (सं : e-mail: info@cygnusindia.com) (वेबसाइट : www.cygnusindia.com). लॉजिस्टिक्स क्षेत्राचा केंद्रबिंदू असलेल्या पुरवठा साखळी व्यवस्थापनामुळे (Supply Chain Management- SCM) पैसा व वेळेची बचत होते व योग्य ग्राहकाला, योग्य माल किंवा माहिती योग्य वेळी मिळण्याची सोय होते.
पुरवठा साखळी व्यवस्थापन
या व्यवस्थापनात कच्च्या मालाच्या उगमस्थानापासून ते ग्राहकाला उत्पादन किंवा प्रकल्प अहवाल मिळण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश असतो. तत्संबंधित सरकारी कायदे, कार्यालये, तज्ज्ञ, एजन्सी इ. माहिती, मालवाहतुकीकरिता संबंधित सरकारी/ खासगी कार्यालयांशी संपर्क, वेअरहाऊसिंग (माल साठवणे) याची माहिती अत्यावश्यक असते. याबरोबरच गोदामातील मालाची यादी (इन्व्हेंटरी), लॉजिस्टिक्सचे विश्लेषण (अ‍ॅनालिसिस), विक्री इ. गोष्टींचासुद्धा समावेश असतो. अर्थात SCM (Supply Chain Management) हा स्वतंत्र अभ्यासक्रम शैक्षणिक संस्थांनी सुरू केला आहे. लॉजिस्टिक्स कंपन्यासुद्धा यासंबंधी प्रशिक्षण देतात. योग्य नियोजन (प्लॅनिंग) व तंत्रशुद्ध अंमलबजावणी (इम्प्लिमेंटेशन) हे रउट चे वैशिष्टय़ समजले जाते.
शैक्षणिक अभ्यासक्रम
द चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ लॉजिस्टिक्स ट्रान्सपोर्ट (CILT) ही या क्षेत्रातील पहिली संस्था १९१९ मध्ये इंग्लंडमध्ये स्थापन झाली. या संस्थेने या व्यवसायासाठी विविध अभ्यासक्रम सुरू केले. भारतात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मटेरिअल्स मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ लॉजिस्टिक्स, चेन्नई, लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट असोसिएशन, आय.आय.एम. तसेच इतर काही मान्यताप्राप्त संस्थांचे अभ्यासक्रम आहेत. यामध्ये पदविका, पदवी तसेच एम.बी.ए. असे अभ्यासक्रम आहेत. कुठल्याही संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी तिची मान्यता लक्षात घ्यावी.
१. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मटेरिअल्स मॅनेजमेंट
* PG Diploma in Logistics Management (PGDLM) - 1 year
* Diploma in Retail Supply Management - (DRSM) - 1 year
पात्रता : बी.ई. उत्तीर्ण व दोन वर्षांचा कार्याचा अनुभव किंवा कुठलाही पदवीधारक अथवा इंजिनीअरिंग पदविका व तीन वर्षांचा अनुभव. संपर्क : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मटेरिअल्स मॅनेजमेंट (मुंबई शाखा), गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३ (दू.) (०२२) २६८६३३७६/ २६८६४५२८ (e-mail: iimmbom@gmail.com)
२. गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई
* PG Diploma in Logistics & Supply Chain Management (Part-time) संपर्क (दू.) (०२२) २६५२६८९९ (e-mail: giceuomom@vsnl.com)
३. XLRI, Jamshedpur
* PG Certificate in Logistics & Supply Chain Management (PGCL SCM). हा अभ्यासक्रम सॅटेलाइट दूरसंचार माध्यमातून शिकविला जातो. यामध्ये भारतातील ४० शहरांमध्ये फी Reliance World Virtual Classroom द्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिकविला जातो. शिक्षक व विद्यार्थी यांचा उपग्रहाद्वारे संवाद साधणाऱ्या या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी पदवीनंतर दोन वर्षांचा कार्यानुभव असणे आवश्यक आहे. (सं) e-mail: reliance_world@relianceada.com अथवा SMS 'XLRI' to 55454. (वेबसाइट : www.xlri.ac.in/satelite अथवा www.relianceworld.in)
४. नरसी मोनजी आय.एम.एस. विद्यापीठ, विलेपार्ले, मुंबई
* PG Diploma in Supply Chain Management (Distance Learning). सं. e-mail: admission.sdl@nmims.edu (वेबसाइट : www.nmims.edu) (दू.) (०२२) २६१३४५७७/ २६१४३१७७.
५. इन्स्टिटय़ूट ऑफ लॉजिस्टिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅव्हिएशन मॅनेजमेंट, नवी दिल्ली/ डेहराडून
* BBA in Logistics & Supply Chain Management - 3 years
(Full time, Residential programmes in conjuction with UGC - recognised University under Section 3 of UGC Act 1956.) पात्रता : १० + २ उत्तीर्ण. चाचणी परीक्षा, समूह चर्चा व मुलाखत असे प्रवेशाचे स्वरूप आहे.
* MBA in Logistics संपर्क : आय.आय.एल. अ‍ॅण्ड ए.एम., ११ वा मजला, चिरंजीव टॉवर, ४३, नेहरू प्लेस, नवी दिल्ली-११००१९ (मो) ०९२७८०२५३२३ (वेबसाइट : www.ilam.india.com)
परदेशी शिष्यवृत्ती
कुएन स्कूल ऑफ लॉजिस्टिक्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, हॅम्बर्ग विद्यापीठ, जर्मनी. चार सत्रांत चालणारा १२ महिन्यांचा पूर्ण वेळ एम.बी.ए. लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट अभ्यासक्रम. पात्रता : अर्थशास्त्र, इंजिनीअरिंग किंवा नॅचरल सायन्सेस पदवीधर व एक वर्षांचा कार्यानुभव. योग्य उमेदवारांना संपूर्ण किंवा अंशत: शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळते. (सं.) मार्टिना हाईनरिच (e-mail: heinrich@kuehne)
लॉजिस्टिक्स व पायाभूत सुविधा
हा व्यवसाय मूलत: नागरिक पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) उदा. उत्तम रस्ते/ महामार्ग, वाहतूक (जमिनीवरील, हवाई, जल), पाणी, वीज, दूरसंवाद (कम्युनिकेशन) इ. यावर अवलंबून आहे. अलीकडेच जाहीर झालेल्या २००९-२०१० राष्ट्रीय अंदाजपत्रकात भारतातील पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीची ‘स्पेशिअल पर्पज व्हेइकल’ स्थापना होत असून तिच्या माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारीतील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना एक लाख कोटीपर्यंत मदत करणे शक्य होणार आहे. याशिवाय ऊर्जासंबंधित वीजनिर्मितीसाठी रु. २०८० कोटी, बायो-डिझेल व नैसर्गिक वायूनिर्मितीमध्ये करसवलत, वेअरहाऊस (गोदाम) व शीतगृह (निर्मितीला) प्रोत्साहन देण्यासाठी तसेच दूरसंदेश तंत्रज्ञानासंबंधित मोबाईल हँडसेट फोनच्या सुटय़ा भागांवरील करामध्ये सवलत, राष्ट्रीय महामार्ग विकासनिधीत २३ टक्क्यांहून अधिक वाढ, वाहतूक संबंधित रेल्वेसाठी १५,८०० कोटींची तरतूद अशा पायाभूत सुविधांमधील तरतुदींमुळे लॉजिस्टिक्स व्यवसायाच्या विकासाला जोरदार चालना मिळाली. ILS Logistics तसेच या क्षेत्रातील इतर कंपन्यांनी या प्रोत्साहनाचे स्वागत केले. तसेच जागतिकीकरणाच्या लाटेत आंतरराष्ट्रीय व्यापार आशिया खंडाकडे वळू लागल्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले उत्पादन व विक्री (रिटेल) विभाग भारतात सुरू केले. भारतात येत्या दोन वर्षांत या व्यवसायात आकर्षक वाढती उलाढाल (टर्नओव्हर) अपेक्षित असून त्याकरिता चार लाख व्यावसायिकांची गरज असेल. विशेषत: वाहतूक व्यवस्था, वेअरहाऊसिंग, उत्पादन व रिटेल या व्यावसायिकांना तसेच दररोज खप असणारी उत्पादने (Fast Moving Consumable Goods), औषधनिर्मिती, हवाई क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान या व्यवसायांना वाढती मागणी असेल.
लॉजिस्टिक्स सेवा प्रकार
या व्यवसायाचे दोन भाग असतात. अंतर्गत लॉजिस्टिक्स (Inbound Logistics - IL) व बाह्य़ लॉजिस्टिक्स (Outbound Logistics - OL). अंतर्गत व्यवस्थापनात कच्चा माल मिळविण्यापासून ते उत्पादनासाठी योग्य पुरवठा करणे हे असते. बाह्य़ व्यवस्थापनात उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य असते. या दोन्हींसाठी प्रमुख बाबी म्हणजे साठवण व्यवस्था, माल चढवणे/ उतरवणे (लोडिंग/ अनलोडिंग), वितरण (डिस्ट्रिब्युशन), फ्रेट (रेल्वेचा मालवाहतूक दर), कार्गो हँडलिंग, दूरसंवाद (कम्युनिकेशन), वाहतूक, मालाची यादी (इन्व्हेंटरी), वेअरहाऊसिंग, मटेरिअल हँडलिंग, वेष्टन (पॅकेजिंग) तसेच उत्पादनाची (किंवा प्रकल्प अहवालाची) सुरक्षा या आहेत. लॉजिस्टिक्स तसेच सप्लाय चेन मॅनेजमेंट या अभ्यासक्रमात या सर्व कार्याचा समावेश असतो. शिवाय, नोकरीच्या काळात वरील गोष्टींचे प्रशिक्षणसुद्धा दिले जाते.
व्यावसायिकांची मानसिकता
या आव्हानात्मक व्यवसायात काम करण्यासाठी सकारात्मक विचारसरणी (पॉझिटिव्ह थिंकिंग) असणे आवश्यक आहे. त्याकरता तंत्रशुद्ध कामाचे नियोजन (प्लॅनिंग) व योग्य अंमलबजावणी करण्याचे ‘स्कील’ असणे जरुरीचे आहे. याबरोबरच ऑपरेशन मॅनेजमेंट, नेटवर्क, वाहतूक, जलवाहतूक, कार्गो हँडलिंग, मार्केटिंग व विक्री, आर्थिक व्यवस्थापन अशा कार्याचे प्रशिक्षण असल्यास ते फायदेशीर असते. सतत नवीन गोष्टी शिकण्याची अभ्यासूवृत्ती ही कुठल्याही व्यवसायात उपयुक्त असते.
उद्योगव्यवसायातील लॉजिस्टिकचे महत्त्व
ज्याप्रमाणे प्रत्येक व्यवसायांमध्ये तसेच संस्थांमध्ये मनुष्यबळ विकास, माहिती तंत्रज्ञान, अकाऊंटस् असे विभाग असतात, त्याचप्रमाणे त्याच दर्जाचा लॉजिस्टिक्स विभागसुद्धा पुष्कळ कंपन्यांमध्ये आहे. यावरून या व्यवस्थापनाची वाढती उपयुक्तता लक्षात येते. या व्यवस्थापनाचा खालील व्यवसायांमध्ये वापर करण्यात येत आहे.
बिझिनेस लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट : उत्पादन केंद्र, प्रकल्प अहवाल तयार करणे, मार्केटिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लॉजिस्टिक्स व्यवस्थापनाची जरुरी असते. व्यावसायिकदृष्टय़ा लॉजिस्टिक्सचा वापर १९५० पासून सुरू झाला. मात्र जागतिकीकरणामुळे त्याला जोरदार चालना मिळाली.
वाढत्या जागतिक स्पर्धेमुळे ग्राहकांना उत्पादन किंवा सेवा (Product or Service) उत्तम मिळावी याकरिता उत्पादनाच्या प्राथमिक अवस्थेपासून ते विक्रीपर्यंत लॉजिस्टिक्स व्यवस्थापनातील सप्लाय चेन सिस्टिमद्वारे योग्य ग्राहकाला,
योग्य माल, योग्य वेळी मिळणे अत्यंत जरुरीचे झाले. या व्यवस्थापनात यापूर्वी दर्शविलेले अंतर्गत व्यवस्थापन (Inbound Logistics) व बाह्य़ व्यवस्थापन (Outbound Logistics) या दोन्हींचा समावेश असतो. यासाठीच Supply Chain Management (किंवा System) हा अभ्यासक्रम फार महत्त्वाचा असतो.
प्रॉडक्शन लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट : कारखान्यातील प्रत्येक यंत्राला योग्य मालाचा, योग्य प्रमाणात (क्वॉन्टिटी) व दर्जात (क्वॉलिटी), योग्य वेळी पुरवठा होण्यासाठी लॉजिस्टिक्स व्यवस्थापनाची जरुरी असते. त्याकरता मालाची उत्तम वाहतूक व्यवस्था करणे तसेच पैशाचा अपव्यय व निर्थक गोष्टींचा वापर टाळणे आवश्यक असते. विशेष म्हणजे चालू तसेच नवीन सुरू होणाऱ्या उत्पादन केंद्रांमध्येसुद्धा या व्यवस्थापनाचा वापर होतो. या क्षेत्रात यंत्रसामुग्री व प्रक्रिया (प्रोसेस) यांचे सतत आधुनिकीकरण होत असल्याने लॉजिस्टिक्स व्यावसायिकांना सतत मागणी असते.
याव्यतिरिक्त संरक्षण (डिफेन्स) क्षेत्र, स्टील, वाहतूक (उदा. कन्टेनर सव्‍‌र्हिस), Marine and Inland Logistics, Stevedoring (e.g. dry bulk cargo) जलवाहतूक क्षेत्र, प्लास्टिक, पाइपिंग, पेट्रोकेमिकल्स, ऊर्जा (एनर्जी) अशा ‘ए टू झेड’ व्यवसायांमध्ये लॉजिस्टिक व्यवस्थापनाचा वापर होतो.
आऊटसोर्सिग लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट : WZX Third-party Logistics म्हणूनसुद्धा ओळखतात. खर्च कपातीच्या दृष्टीने लॉजिस्टिक्सच्या सर्व सेवा किंवा विशिष्ट सेवा ‘आऊटसोर्स’ करतात. ‘आऊटसोर्स’ सेवा देणाऱ्या अनेक लॉजिस्टिक्स कंपन्या आहेत. उदा. Supply Chain System द्वारे माल साठवणे व पुरवठा करणे याकरिता Warehouse Management System व Warehouse Control System अत्यंत महत्त्वाच्या असतात. या दोन्ही सिस्टिम्स एकमेकाला पूरक असल्याने त्यांचे योग्य समीकरण (कॉम्बिनेशन) असणे अत्यंत महत्त्वाचे असते. वेअरहाऊसिंग आऊटसोर्स सेवा देणाऱ्या कंपन्या ही सेवा देतात.
व्यावसायिक वेतनश्रेणी
या व्यवसायात आपली गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या प्रशिक्षित योग्य उमेदवारास सुरुवातीला महिन्याला अंदाजे रु. १५,००० ते ३०,०००, वरच्या श्रेणीत रु. ३०,००० ते ८०,००० व अतिउच्च श्रेणीत महिन्याला रु. एक लाख (कंपनीनुसार) वेतन मिळू शकते. आजचे धडाडीचे तरुण लॉजिस्टिक्स व्यवस्थापन या आव्हानात्मक व प्रगतीपथावरील उमलत्या व्यवसायाचा जरूर विचार करतील अशी अपेक्षा आहे.
प्रवीण प्रधान
संपर्क - २१७११०२०