Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

अग्रलेख

मेहबूबाचा आतंक

जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेत गेल्या दोन-तीन दिवसांपासून जे घडते आहे, ते लोकशाहीच्या प्रथा आणि संकेत यांना काळिमा फासणारे आहे. इतर राज्यांच्या विधानसभांमध्येही असे अर्वाच्य प्रकार घडले आहेत, पण तिथे मुख्यमंत्र्यांच्या दिशेनेच असा अश्लाघ्य आरोपांचा शेणसडा कधी फेकण्यात आलेला नाही. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला तरुण आहेत आणि

 

जानेवारीत सत्ता हाती घेतल्यापासूनच्या सात महिन्यांमध्ये त्यांनी काश्मिरी जनतेला आणि विशेषत: तरुणवर्गाला विश्वासात घेऊन महत्त्वाची पावले उचलली आहेत. दहशतवाद्यांचे आणि दहशतवाद्यांच्या पाठीशी असणाऱ्यांचेही त्यामुळे खच्चीकरण झाले. कदाचित त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या आघाडीच्या विरोधात असणाऱ्या ‘पीपल्स डेमॉकट्रिक पार्टी’ची अधिकच चडफड झाली असायची शक्यता आहे. परवा त्या पक्षाच्या विधानसभा सदस्यांनी त्याचा अतिरेक केला. ‘पीपल्स डेमॉकट्रिक पार्टी’चे एक ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस तसेच ‘पीपल्स डेमॉकट्रिक पार्टी’ यांच्या यापूर्वीच्या संयुक्त मंत्रिमंडळातले उपमुख्यमंत्री मुझफ्फर हुसेन बेग यांनी उमर अब्दुल्ला हे ‘सेक्स स्कँडल’मध्ये असल्याचा आरोप केला. बेग यांच्या मंत्रिपदाच्या काळातच काही नोकरशहा, एकदोघे मंत्री यांच्यावर असभ्य वर्तनाचा आरोप करण्यात आला. एका दलाल महिलेला पकडल्यावर त्या भानगडीत आणखीही काहीजणांची नावे उघडकीस आली. काही काळ मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले मुफ्ती महमद सईद यांचे राजकीय सल्लागार हेही या गलिच्छ प्रकारात अडकले होते. ‘पीपल्स डेमॉकट्रिक पार्टी’चेच इतरही काहीजण त्यात होते. आता त्याच पक्षाचे नेते मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यावर आरोप करत आहेत. २००६ मध्ये घडलेला, अल्पवयीन मुलींबरोबरच्या गैरव्यवहाराचा हा प्रकार गंभीर आहे, पण त्यात सापडलेले वेगळेच आहेत. उमर अब्दुल्ला सत्तेवर आल्यानंतर पाचच महिन्यांनी शोपियाँमध्ये दोन तरुण मुलींवर अत्याचार करण्यात येऊन त्यांना मारून टाकल्याची घटना घडली. या प्रकरणी काश्मीरमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. सलग काही दिवस बंद पुकारण्यात आला. या मुली बुडून मृत्युमुखी पडल्याचे विधान उमर अब्दुल्लांनी केले आणि त्यानंतर त्यांनी ते मागेही घेतले. सोमवारी अधिवेशनात सुरुवातीला निधन पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करायच्या वेळी ‘पीपल्स डेमॉकट्रिक पार्टी’च्या नेत्या मेहबूबा मुफ्ती विधानसभेच्या अध्यक्षांच्या आसनापाशी गेल्या आणि त्यांनी त्यांच्या समोरचा माईक उचलून तो त्यांच्या दिशेने फेकायचा प्रयत्न केला. अध्यक्ष मुहम्मद अकबर लोन हे सुरक्षारक्षकाच्या सावधगिरीमुळे बचावले. त्या दिवशी जे काही घडले, त्याबद्दल मेहबूबा मुफ्तींनी दिलगिरी मागायला नकार दिला. लोकशाहीच्या चौकटीत आपल्याला न्याय दिला जाणार नसेल तर आपल्याला असे करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही, असेही त्यांनी म्हटले. असेच जर आहे, तर मग त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवायची तरी काय आवश्यकता होती? काल त्यांनी कागदाचे तुकडे करून अध्यक्षांच्या दिशेने ते फेकले. कदाचित या अधिवेशनात आपल्या पक्षाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी कोणत्याही टोकाला जायचे त्यांनी पक्षाच्या बैठकीत स्पष्ट केले असायची शक्यता आहे. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी मुझफ्फर हुसेन बेग यांनी उमर अब्दुल्ला यांचे नाव गलिच्छ प्रकारात असल्याचे विधानसभेत जाहीर केले. याप्रकरणी जम्मू आणि काश्मीरच्या उच्च न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला असल्याचे त्यांचे म्हणणे होते. बेग हे उपमुख्यमंत्रिपदी असताना त्यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना या प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुप्तचर खात्यामार्फत करायचा सल्ला दिला. त्या वेळी ‘सीबीआय’वर त्यांचा विश्वास होता आणि आता त्याच ‘सीबीआय’ने या प्रकरणात उमर अब्दुल्ला नसल्याचे जाहीर केले तर मात्र ‘सीबीआय’वर त्यांचा विश्वास नाही. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही उमर अब्दुल्ला यांचे नाव ‘सीबीआय’च्या यादीत नाही, असे स्पष्ट केले. उमर अब्दुल्ला यांनी आपल्यावर विधानसभेत हा कलंक लावण्यात आल्याने आपण तातडीने राज्यपालांकडे जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर करत आहोत, असे सांगितले. ‘पीपल्स डेमॉकट्रिक पार्टी’ला मात्र हा धक्का होता. उमर अब्दुल्ला राजीनामा देऊन आणखी मोठे होतील, हे लक्षात आल्याने बेग यांनी आपण अब्दुल्लांच्या राजीनाम्याची मागणी केलीच नव्हती, असे सांगितले. ‘सीबीआय’च्या म्हणण्यानुसार या अनैतिक व्यवहारात अडकलेल्या १७ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, त्यात उमर अब्दुल्ला वा त्यांचे वडील डॉ. फारूख अब्दुल्ला यांचे नाव नाही. बेग यांनी संशयित म्हणून उमर यांचे नाव एकशेदोनावे, तर फारूख यांचे नाव अडतिसावे असल्याचे म्हटले. प्रत्यक्षात ज्यांची नावे त्या आरोपपत्रात घेण्यात आली, त्यात ‘पीपल्स डेमॉकट्रिक पार्टी’ आणि काँग्रेस यांच्या संयुक्त मंत्रिमंडळातले दोन मंत्री होते, त्यापैकी एकाला आपल्या पक्षातून हाकलून दिल्याचेही बेग यांनी मान्य केले आहे. ‘चोर तो चोर, वर शिरजोर’ अशी बेग यांची ही कृती असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेग हे सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात, त्यांना पोलिसांमध्ये नेमकी तक्रार काय होती आणि त्यातले खरे दोषी कोण हेच जर कळत नसेल तर त्यांची वकिली व्यर्थ आहे, असेच म्हणायला हवे. विधिमंडळ आणि संसद यांची प्रतिमा दिवसेंदिवस ढासळते आहे, त्यात जम्मू आणि काश्मीरच्या सभागृहाची भर पडली आहे. आपण किती खालच्या थराला जाऊ शकतो, तेच या सदस्यांनी दाखवून दिले आहे. विचित्र भाग असा, की उमर अब्दुल्लांनी राजीनामा द्यायचे घोषित केल्यावर श्रीनगरच्या राजकीय वर्तुळात आता उमर यांच्याऐवजी त्यांचे वडील डॉ. फारूख अब्दुल्ला हेच मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतील, अशी चर्चा सुरू झाली. प्रसंग काय आहे आणि आपण त्याचे भांडवल काय करतो आहोत, याचेही भान या अशा प्रसंगात ठेवले गेलेले नाही. आपल्या मुलावर अशा पद्धतीने हिणकस आरोप होत असताना कोणते वडील त्या जागेवर जाऊन बसतील? डॉ. फारूख अब्दुल्लांच्या कारकीर्दीत त्यांना यासारख्या काही आरोपांना सामोरे जावे लागले होते. ‘काश्मीरचे गुलछबू मुख्यमंत्री’ ही त्यांच्याबद्दलची तेव्हाची ओळख होती, पण त्यांच्यापेक्षाही गलिच्छ आरोपांना उमर यांना सामोरे जावे लागले. त्यांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करून राजीनामा दिला. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी तो फेटाळला असला तरी या साऱ्या गलिच्छ आरोपाने ते दुखावले असतील, यात शंका नाही. त्यांच्या वयाची जमेची बाजू लक्षात घेऊन हा गंभीर आरोप करायला धजावलेल्यांनी विधानसभेच्याही प्रतिमेला डांबर फासले आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये हेतुत: गोंधळ माजवण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी त्यांना कोणतेही कारण चालते. या अशा शक्तींच्या मागे कोण आहेत, ते सर्वाना माहीत आहे. मेहबूबा मुफ्ती याच मोच्र्याच्या अग्रभागी असतात. काश्मीरमध्ये शांतता नांदताच कामा नये, हा त्यांचा अंतस्थ हेतू आहे. ज्यांनी आधी ‘सीबीआय’च्या चौकशीची मागणी केली, तेच आता ‘सीबीआय’च्या चौकशीत अर्थ नसल्याचे सांगतात, हा प्रकार अजब आहे. याप्रकरणी ‘सीबीआय’ने दिल्ली, जम्मू आणि श्रीनगर या शहरांमध्ये अनेक राजकारण्यांच्या, नोकरशहांच्या आणि सीमासुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापे घातले होते, अनेकांची ओळख परेडही घेतली होती. त्यांच्यापैकी कुणाचा बचाव करायच्या उद्देशाने तर बेग यांनी उमर अब्दुल्ला यांच्यावर हा गंभीर आरोप केला नसेल ना? शंका असंख्य आहेत, पण त्यापैकी एकाचेही समाधानकारक उत्तर मिळणे तूर्त शक्य नाही.