Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

साधारणपणे ३५ वर्षापूर्वी पवईचा परिसर हा केवळ तलावासाठी प्रसिद्ध होता. पवई तलावाच्या परिसरात निसर्गरम्य वातावरणामुळे चित्रपटांचे शूटिंग होत असे. किंबहुना त्यामुळे तो मुंबईकरांचे फेव्हरिट पिकनिक स्पॉटही होता. मात्र १९९३च्या बॉम्बस्फोटांनंतर त्याला ग्रहण लागले. मात्र त्याच वेळेस पवईचा चेहरामोहराही बदलू लागला. पूर्वी आजूबाजूला दिसणारी टेकडय़ांची रांग गगनचुंबी हिरानंदानी संकुलामागे गेली. आणि पवईला तिचा नवा चेहरा मिळाला. हिरानंदानी संकुल हा आता पवईचा नवा परिचय झाला आहे. या संकुलाची चर्चा मुंबईकरांमध्ये झाली ती केवळ उच्चभ्रूची वस्ती म्हणून नव्हे. तिथल्या दोन बाबींनी सामान्य मुंबईकरांनाही वेड लावले आणि आजही सामान्य मुंबईकर या दोन बाबींनी आकर्षित होत पवईचा रस्ता पक़डतात. इथले सर्व रस्ते हे हिरानंदानींमार्फतच स्वच्छ केले जातात. संकुलातली स्वच्छता केवळ अप्रतिम आहे. एवढय़ा चांगल्या स्वच्छतेची मुंबईकरांना सवय नाही. क्षणभर आपण विदेशातच असल्याचा भास होतो. पण या सर्वावर कडी केली आहे ती येथील हिरवाईने. येथील हिरवाई जाणीवपूर्वक जपण्यात आली आहे आणि केवळ छान दिसावे म्हणून नव्हे तर पर्य़ावरणाच्या अंगाने विचार करून त्यात चांगली वैविध्यताही आणण्याचा प्रयत्न हिरानंदानींच्या गार्डन आणि हॉर्टिकल्चर विभागाने केला आहे. सर्वसाधारणपणे एखादे संकुल उभारले की, त्यानंतर बिल्डर तिथून निघून जातात आणि तिथली हिरवाई संपुष्टात येते, असा अनुभव आहे. या पाशर्भूमीवर हिरानंदानींनी मात्र एक वेगळा आदर्शच घालून दिला आहे. हिरवाईचा आदर्शतर केवळ अनुकरणीय आहे. हिरानंदानी संकुलामध्ये चार मोठी उद्याने आहेत. प्रत्येक उद्यान दुसऱ्यापेक्षा वेगळे असून प्रत्येकाचे खास वैशिष्टय़ जपण्यात आले आहे.
आपण सुरुवात करतो अगदी संकुलाच्या आतमधील टोकाला टेकडीला लागून असलेल्या हिलसाईड गार्डनपासून.. या उद्यानाच्या मार्गावर जातानाच आपल्याला रस्ताच्या दुतर्फा खूप छान हिरवेगार वृक्ष पाहायला मिळतात, चौकशी करता गार्डन विभागाचे प्रमुख आर. एस. कारुळकर आपल्याला सांगतात, की हा खास ‘खाया अ‍ॅव्हेन्यू’ आहे. आणि हा मुंबईतला वर्षानुवर्षे सर्वोत्तम रस्त्याचा मान पटकावणारा अ‍ॅव्हेन्यू आहे. दुतर्फा असलेली ही खायाची झाडे सदाहरीत या प्रकारात मोडणारी आहेत, अशाप्रकारचा मुंबईतील हा पहिलाच खाया अ‍ॅव्हेन्यू आहे. हा वृक्ष वेगात वाढतो. हिरानंदानी हे त्याचे पहिले उदाहरण आहे. सुरेंद्र हिरानंदानी यांनी स्वतध् या अ‍ॅव्हेन्यूच्या रचनेत लक्ष घातले आहे. उद्यानाकडे जातानाच आजूबाजूच्या इमारतींच्या आवारात तर कुठे कडेला असलेले विविध प्रकारचे पाम्स आपले लक्ष वेधून घेत असतात. कधी लटानिया तर कधी बिस्मार्किया.. आणि मग लक्षात येते की, आपण पाम्सच्या पंढरीतच प्रवेश केला आहे. पाम्सप्रमाणे बांबूचेही विविध प्रकार आपले लक्ष वेधत असतात. आपल्या दृष्टीने प्रत्येक बांबूचे बेट म्हणजे कळकीचे बनच. पण तसे नसते. बांबूच्या विविध प्रकारांमध्ये कळकीचा समावेश होतो. खऱ्या कळकीचे बन आपल्याला इथे हिलसाईड गार्डनमध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या सोसायटय़ांमध्ये दिसते. बांबूचा वेल कधी पाहिलाय. आजवर कधीच न दिसलेला असा हा आश्चर्यकारक बांबू वेलही इथे एका छोटेखानी उद्यानाच्या कमानीवर दिसतो. हे सारे पाहात आपण हिलसाईड गार्डनमध्ये प्रवेश करतो.. इथे टेकडीच्या बाजूला सह्याद्रीच्या कुशीत मिळणारी जंगली झाडे लावण्यात आली आहेत. त्यास शिवण, कदंब, जांभूळ, वरस, िदंडोशी आदींचा समावेश आहे.. उजवीकडे पाहिले की, पुन्हा एकदा पाम्सचे विविध प्रकार आपल्याला सामोरे येतात. अध्र्या सुपारीचेही कॅरिओटा मटीस, नो आणि युरेन्स असे तीन प्रकार इथे पाहायला मिळतात. तर बुंध्याच्या मध्यभागी बाटलीसारखा आकार, बुंध्यापासून वर बाटलीसारखा आकार आणि वरच्या बाजूस पुन्हा सरळसोट असे आणखी काही वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसतात. मग सोबत असलेले यशेस मिरगळ माहिती देतात. लेगिनोकालीस हायप्रो.. शास्त्रीय नावांसह बाकीचीही माहिती मिळत जाते. मध्येच लाल रंगाची पक्व फळे झालेला लिविंगस्टोनिया पाहायला मिळतो. एका झाडाची मात्र आपल्याला खास ओळख करून दिली जाते. हे आहे, गायकम ऑफिसिनॅलीस किंवा लिग्नी. आताशा हे झाड फारसे पाहायला मिळत नाही. राणीच्या बागेत याचा एक अ‍ॅव्हेन्यू तयार केला आहे. मात्र आता बाकीच्या ठिकाणाहून त्याची गच्छंतीच झाली आहे. पूर्वी बंगळुरूला ते मोठय़ा प्रमाणावर दिसायचे. पण आता तिथेही त्याच्यावर गंडांतर आले आहे. आता नर्सरीमध्येही ते मिळेनासे झाले आहे. त्याची इथे या गार्डनमध्ये खास जपणूक केली जाते आहे. त्याचा प्रसारही व्हायला हवा, यासाठी कारुळकर प्रयत्नशील आहेत. उद्यानाला फेरी मारताना आपण एका इमारतीच्या कोपऱ्याजवळ थांबतो आणि आपल्याला तिथेच रुद्राक्षाचे झाडा पाहायला मिळते. मुंबईमध्ये रुद्राक्षाची तीन-चारच झाडे आहेत, त्यातील हे एक. त्यानंतर सिसाल्पिनिआ आल्पीन नावाचे आणखी एक तसे दुर्मिळ झाड तिथेच शेजारी पाहायला मिळते. उद्यनातील मार्गिकेवरून पुढे सरकताना एका मोठय़ा झुडुपाजवळ येऊन आपण थांबतो. त्या झुडुपाच्या आकाराने लहान दिसणाऱ्या पण स्पर्शाला मऊसुत असणाऱ्या पानांना हात लावण्याचा मोह आवरत नाही. त्याला उन्हाळ्यात छान जांभळी फुले आलेली पाहायला मिळतात. उन्हाळ्यात ते छान डवरलेले असते. त्याचे नाव लुकेसिफायलम फ्रुटीकोसा. जरा पुढे गेले की, उजव्या हाताला विविध प्रकारच्या हेलिकोनियाचे छान बन पाहायला मिळते. याची फुले नेहमीपेक्षा मोठय़ा आकाराची आहे. तर डावीकडे ओखाना किर्की पाहायला मिळतात. सध्या ही झाडे छोटेखानीच असून लाल फुलांनी सजलेली आहेत. खास करून गोव्यात पणजीमध्ये ही झाडे मोठय़ा प्रमाणावर दिसतात. इथून बाहेर पडताना आणखी दोन वेलींचा परिचय होतो. इथे अनेक इमारतींवर या वेली चढविण्यात आल्या आहेत. फायकस प्युमेला त्यापैकीच एक. पंपहाऊसमुळे आजूबाजूचे वातावरण काहीसे उष्ण होते. तापमानात वाढ होते. मात्र ही वेल त्यावर चढवल्यास तापमान दोन अंशांनी खाली येते, असा अनुभव आहे. हिरानंदानीमध्ये त्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर करण्यात आला आहे. जगभरातही आता त्याच्यावर विविध ठिकाणी संशोधन सुरू आहे. अमेरिकेत मिसुरी येथे सर्वात मोठे संशोधन या वेलीवर होते आहे.
फक्त खायाच नव्हे तर हिरानंदानीमध्ये फिरताना कदम्बाचाही एक अ‍ॅव्हेन्यू पाहायला मिळतो. त्यानंतर आपण पोहोचतो ते लेकसाईड गार्डनमध्ये. पवई तलावाचा व्ह्यू इथून मिळत असल्याने त्याला लेकसाईड गार्डन असे नाव देण्यात आले आहे. मोठय़ा प्रमाणावर हिरवळ येथे नजरेस पडते. सध्या पांढऱ्या रंगाची थंडर लिली इथे प्रवेशद्वारापासून सोबत असते. इथेही वेगवेगळे पाम्स पाहायला मिळतात. सिल्वेस्ट्रीस नावाचा एक वेगळा खजूरदेखील इथे आहे. प्रवेश केल्यानंतर आतमध्ये डाव्याबाजूस विविध प्रकारची चाफ्याची झाडे आहेत. हिरवा चाफा, सोनचाफा. त्यातही सोनचाफ्याचे तीन प्रकार पाहायला मिळतात. पांढरा चाफा हा तर अगदी खास म्हणावा असा आहे. मोहाची ओळख नेहमी त्याच्या मोठय़ा आकाराच्या पानांवरून होते. पण इथे असलेला मोह मात्र लाँजिफोलिआ म्हणजे लांबट आकाराच्या पानांचा आहे. त्याच्याच बरोबर समोरच्या बाजूस आफ्रिकन रेन ट्री पाहायला मिळतो. त्याच्या खोडाचा आकार आणि रूप अतिशय कलात्मक आहे. त्यामुळे त्याची ओळख चटकन पटते. त्या कलात्मक आकारामुळेच त्याचा वापर अनेकदा बोन्सायसाठी केला जातो. स्टार अ‍ॅपलपासून काही अंतरावर स्टक्र्युलिआचे तीन वेगळे प्रकार पाहायला मिळतात युरेन्स, वेलोसा आणि फोटीन. या तिन्ही झाडांना लागूनच आणखी एक छान झाड आहे. म्हटले तर ते तसे दुर्मिळही आहे. त्याचे नाव कॉल्वोलिया रेसिमोसा.. बहराच्या काळात हे झाड उलटय़ा लटकणाऱ्या केशरी फुलांच्या झुपक्यांनी पूर्ण भरून जाते. त्याचा बहर पाहणे हा एक आनंद सोहळाच असतो.. आपला या गार्डनचा फेरफटका आपण पूर्ण करतो त्यावेळेस हिमालयाच्या कुशीत सापडणारा आणखी एक दुर्मिळ वृक्ष आपल्याला दिसतो. क्युपनॉक्सिस अ‍ॅनाकॉर्डी. इथेच बाजूची इमारत तयार होत असताना पाण्यासाठी केलेला एक तलाव होता. त्याचे रुपांतर छोटय़ा तळ्यात करण्यात आले आहे. त्याच कमळे आणि पाणवनस्पती पाहायला मिळतात.
निर्वाणा.. हे खरे हिरानंदानी गार्डन. म्हणजे रिक्षावाल्याला सांगितले तर हिरानंदानी गार्डन म्हणून तो आपल्याला याच निर्वाणा पार्कजवळ आणून सोडतो. २४ हजार चौरस मीटर्स एवढय़ा मोठय़ा जागेवर हे पार्क वसलेले आहे. त्यात असलेले तळे हेच मुळी एक एकराचे आहे. त्यात बोटिंगची सोयही करण्यात आली आहे. प्रवेशद्वारापासून त्याचे वेगळेपण स्पष्ट होते. बांबूचा छान वापर प्रवेशद्वारासाठी करण्यात आला आहे. आतमध्ये प्रवेश करताच प्रथम हिरवा चाफा दिसतो. त्याशिवाय तळ्याच्या काठावर फायकसचे वेगवेगळे प्रकार लावण्यात आले आहेत. फायकसचा आपल्याकडचा लोकप्रिय प्रकार म्हणजे वडाचे झाड. मात्र ते लावल्यानंतर त्याच्या मोठय़ा आकाराच्या पानांमुळे त्याच्या पलीकडच्या बाजूस काहीच दृष्टीस पडत नाही. मात्र इथे लावण्यात आलेल्या फायकसच्या वेगळ्या प्रकारामुळे एक वेगळाच लूक तयार झाला आहे. लहान पानांचे फायकस आणि त्यातून येणाऱ्या पारंब्या असे चांगले दृश्य इथे पाहायला मिळते. हे बहुतांश जपानी पद्धतीचे पार्क आहे. त्यात बांबूचा वापर खूप मोठय़ा प्रमाणावर करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी बांबूचे पूल आहेत. धबधबे आहेत, लहान मुलांसाठी गुफांची वेगळी रचना खेळण्यासाठी करण्यात आली आहे. एका उद्यानात जेवढे काही करणे शक्य आहे, ते ते सारे इथे साकारण्यात आले आहे. मध्यभागी असलेल्या मचाणावर जावून परिसर न्याहाळणे म्हणजे ताणतणावाला सुटी देऊन आनंदाच्या राज्यात प्रवेश करण्यासारखेच आहे. याच उद्यानाला लागून पालिकेचा एक भूखंड होता. तिथे अनावश्यक कचरा टाकला जाई. तो भागदेखील आता उद्यानाला जोडण्यात आला असून पार्कचाच एक अविभाज्य भाग झाला आहे. मात्र जोपर्यंत याची माहिती आपल्याला कुणी देत नाही तोपर्यंत हे समजणे कठीणच आहे. संपूर्ण पार्कचा फेरफटका मारून आपण पूर्ण करतो तोपर्यंत तब्बल ५२ प्रकारचे पाम्स आपण पाहिलेले असतात. हिरानंदानी गार्डन्स म्हणजे खरेतर पाम्सची पंढरीच आहे.
या संदर्भात विचारता कारुळकर म्हणाले की, स्वत सुरेन्द्र हिरानंदानी यांना या पाम्समध्ये खूप स्वारस्य आहे. अनेक जाती त्यांनी खास सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियामधून आणल्या आहेत. बोगनवेलीचीही एक खास जात त्यांनी अलीकडेच सिंगापूरहून आणली आहे. सुरेंद्र हिरानंदानी यांची भेट घेतली असता ते म्हणाले की, एरवी इमारतींच्या आजूबाजूला छान दिसावे म्हणून बिल्डरकडून झाडे लावली जातात. मात्र हिरानंदानीमध्ये झाडे हा संकुलाचाच एक अविभाज्य भाग म्हणून येतात. म्हणून तर त्यासाठी खास एवढे मोठे हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट ठेवण्यात आले आहे. हा दृष्टिकोनातील फरक आहे. पाम्सच्या या पंढरीबाबत हिरानंदानींनाही तेवढाच अभिमान आहे. ..कधीही सहज वाट वाकडी करून या पाम्सच्या पंढरीत फेरफटका मारायला हरकत नाही!
vinayakparab@gmail.com

रमेश देसाई यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
राष्ट्रीय पुरस्कारविजेते छायाचित्रकार रमेश देसाई यांच्या गाजलेल्या काही निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन आझाद मैदानातील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात भरविण्यात आले आहे. यात एकूण १७ निवडक छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या अॅसेसमेंट व कलेक्शन खात्यामध्ये काम करत असतानाच रमेश देसाई यांनी छायाचित्रणाचा छंद चिकाटीने जोपासला. या प्रदर्शनात ठाण्यातील सुप्रसिद्ध कौपिनेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला झालेल्या पूजेच, तसेच शेगावच्या आनंदसागर येथील ध्यानमंदिराचे छायाचित्र आहे. हिमालयातील भटकंतीत काढलेल्या विलोभनीय छायाचित्रांबरोबरच इगतपुरीजवळील एका गावात गाई-बैलांवर नजर ठेवणाऱ्या भावंडांचे छायाचित्रही आहे. गिरगाव चौपाटीवर आलेल्या स्थलांतरित पक्षी विहरत असतानाचे छायाचित्रही पाहण्यासारखे आहे. हे प्रदर्शन १८ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत पाहता येईल.
प्रतिनिधी