Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

‘दहशतवाद आणि पाक संबंधांवर सरकारला विरोधकांकडून धडे नकोत’
पंतप्रधानांच्या युक्तिवादापुढे विरोधकनिरुत्तर!
नवी दिल्ली, २९ जुलै/खास प्रतिनिधी

भारत-पाकिस्तानदरम्यानच्या संयुक्त निवेदनातील ‘घोडचुकां’वर बोट ठेवून परराष्ट्र धोरणावर युपीए सरकारची कोंडी करण्यासाठी सिद्ध झालेल्या भाजप-रालोआसह विरोधकांना आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पार निरुत्तर केले. पाकिस्तानविषयक धोरणासाठी आम्हाला भाजप-रालोआकडून धडा घेण्याची गरज नाही, असे सडेतोड उत्तर देत मनमोहन सिंग यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व शंकाकुशंका आणि आक्षेप निराधार ठरवित दहशतवादाला भारत-पाक समग्र संवादातून वगळण्याच्या निर्णयाचे ठामपणे समर्थन केले. तसेच बलुचिस्तानमधील कथित हस्तक्षेपाच्या मुद्यावर भारताला काहीही लपवायचे नसल्याचे स्पष्ट केले. ईजिप्तच्या शर्म अल् शेख येथे १६ जुलै रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांच्यासोबत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या चर्चेनंतर उभय देशांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात समग्र संवादातून दहशतवादाचा मुद्दा वगळण्याच्या तसेच बलुचिस्तानमध्ये भारताच्या हस्तक्षेपाच्या मुद्याचा द्विपक्षीय चर्चेत समावेश करण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी विशेषत भाजपने जबरदस्त आक्षेप घेतला होता.

राज्य लॉटरीची निवडणूक सोडत
आता २००० सालापर्यंतच्या अनधिकृत झोपडय़ांना संरक्षण
मुंबई, २९ जुलै/खास प्रतिनिधी

मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये रोजच्या रोज अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहत असतांना या झोपडय़ांवर कठोर कारवाई करण्याऐवजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एक जानेवारी २००० सालापर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण व नागरी सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच घटकांना खूश करताना आता झोपडीवासीयांची मते मिळविण्यासाठी झोपडय़ांना संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात युती शासन असताना एक जानेवारी १९९५ पर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयामुळे अनधिकृत झोपडय़ा बांधा, भविष्यात शासन आपल्याला संरक्षण देईल, अशी धारणा वाढून लोंढेच्या लोंढे मुंबईवर आदळू लागले यातूनच अनधिकृत झोपडय़ा मोठय़ा प्रमाणात वाढल्या. या अनधिकृत झोपडय़ांमधील मतांवर डोळा ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी जाहीरनाम्यात २००० सालपर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.

टॉवरचे साम्राज्य उभारणाऱ्या ‘मूषक‘राज’ने शिवसेनेला शहाणपण शिकवू नये’
मुंबई, २९ जुलै/प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांना आधार देणारे शिवसेना भवन उभे केले. त्याच्यासमोर मूषक‘राज’ ठाकरे यांचे बिल्डरी साम्राज्य दाखविणारे टॉवर उभे केले आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेना व मराठी माणसांना शहाणपणा शिकविण्याच्या भानगडीत पडू नये, असा टोला राज ठाकरे यांच्या पूर्वाश्रमीच्या सहकारी व शिवसेनेच्या विद्यमान कार्यकर्त्यां श्वेता परूळकर यांनी लगावला आहे. श्वेता परूळकर म्हणाल्या की, बऱ्याच दिवसांनी हे मूषक‘राज’ प्रकट झाले व शिवसेनेच्या विरोधात बरळले. हे महाशय स्वतच एक बडे बिल्डर म्हणजेच मूषक असल्याने त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? शिवसेनेने अलीकडेच म्हाडावर काढलेला मोर्चा मराठी माणसांच्या हितासाठी नव्हे तर मतांसाठी होता, असे बरळून त्यांनी स्वतचे दात स्वतच्या घशात घालून घेतले.

‘मर्द’ म्हणविणाऱ्यांना बिनशेपटाच्या घुशींची गरज का लागते’
मुंबई, २९ जुलै/खास प्रतिनिधी

‘मर्द’ म्हणविणाऱ्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी बिनशेपटांच्या घुशींची गरज का लागते, असा सवाल करत बिल्डरांच्या शेपटय़ा खेचण्याचे आवाहन करायचे आणि आपल्याच ‘सामना’ दैनिकात त्याच बिल्डररुपी उंदरांच्या जाहिराती घ्यायच्या असली दुटप्पी भूमिका राज ठाकरे यांनी कधी घेतली नाही, असा टोला मनसेने लगावला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘मुषकराज’ म्हणणाऱ्या श्वेता परुळकर या बिनशेपटाची घुस असून नव्याने गळ्यात पट्टा बांधल्यामुळे भुंकणे हे त्यांना व प्रकाश महाजन यांना क्रमप्राप्त असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस शिरीष पारकर यांनी केली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हाडावर काढलेला मोर्चा हा मराठी माणसांसाठी नव्हता तर मराठी मतांसाठी होता अशी टीका राज यांनी केली होती. बिल्डररुपी उंदीर व घुशींचे कान खेचण्याचे उद्धव ठाकरे यांचे आवाहन पोकळ असल्याचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त बिल्डरांच्या जाहिराती जमवल्याने स्पष्ट झाल्याचे राज ठाकरे म्हणाले होते.

शाळकरी मुलीची हत्या करणाऱ्या युवकाचा पोलिसांसमक्ष दगडांनी ठेचून खून
जत, २९ जुलै / वार्ताहर

मामाची मुलगी असल्याचे समजून अकरा वर्षांच्या चिमुरडय़ा शाळकरी मुलीची हत्या करणाऱ्या राम बसाप्पा वळसंग या नराधमाला जत तालुक्यातील संख येथील ग्रामस्थांनी दगडाने ठेचून पोलिसांसमक्ष ठार केल्याची घटना बुधवारी घडली. रेश्मा सत्याप्पा बजंत्री (वय ११) असे दुर्दैवी शाळकरी मुलीचे नाव आहे. ग्रामस्थांनी केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस निरीक्षक रविशंकर घोडके व पोलीस सचिन कुंभार हे जखमी झाले आहेत. रेश्मा ही संख येथील राजारामबापू प्रशालेत इयत्ता पाचवीत शिकत होती. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ती आपल्या दोघी मैत्रिणींसह शाळेला निघाली होती. त्याचवेळी हातात कुऱ्हाड घेऊन आलेल्या राम वळसंग याने तिला वाटेतच अडविले व चिडून तिला तू कोण आहेस, असे विचारू लागला. हातात कुऱ्हाड घेऊन अचानक समोर आलेल्या अनोळखी व्यक्तीला पाहून घाबरलेली रेश्मा काहीच बोलू शकली नाही.

मुंबईत गॅंगवॉर!
दोन ठार, मुंबई, २९ जुलै / प्रतिनिधी

नागपाडा भागात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका बुकीसह दोनजण ठार झाले. अन्य एकजण जखमी झाला असून, त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात मरण पावलेल्या दोघांची नावे जाहिद शेख उर्फ छोटेमियाँ आणि पप्पू अशी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यापैकी जाहिद शेख हा बुकी असून, पप्पू हा त्याचा खास साथीदार होता. जाहिदच्या जखमी झालेल्या दुसऱ्या साथीदाराचे नाव मात्र कळू शकले नाही. नागपाडा येथील परब गल्लीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंधाधुद गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर टॅक्सीमधून पळून गेले. आजच्या गोळीबारामुळे मुंबईत गँगवॉरने पुन्हा डोके वर काढल्याचीही चर्चा सुरू आहे.

सरकार ५५ रुपयांमध्ये देणार सामान्यांना तूरडाळ
मुंबई, २९ जुलै/प्रतिनिधी

गगनाला भाव भिडलेल्या तूरडाळीने अखेर राज्यातील सरकारला जाग आणली आणि आता केंद्र सरकारच्या दोन प्रमुख संस्थांकडून तूरडाळ खरेदी करून ती राज्यातील जनतेला ५५ रुपये किलो दराने पुरविण्याचा निर्णय अखेरीस घेण्यात आला आहे. तूरडाळीचे भाव घाऊक बाजारामध्ये किलोमागे ८० ते ८५ रुपये झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात तुरडाळीचे भाव ९० ते ९५ रुपये किलोपर्यंत वाढले होते. देशात तुरडाळीचे सर्वाधिक उत्पन्न महाराष्ट्रात आणि तेही मुख्यत्वे मराठवाडय़ातील लातूर, उदगीर तसेच जळगाव आदी ठिकाणी होते. गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र या पट्टय़ामध्ये आहारामध्ये तूरडाळीचा सर्वाधिक वापर केला जातो. भारतामध्ये प्रथिनांचा प्रमुख स्रोत म्हणून डाळी वापरल्या जातात. भारतात एकंदर १४.५ दशलक्ष कडधान्याचे उत्पादन होते. तसेच भारतात दरवर्षी पाच दशलक्ष कडधान्य आयात केले जाते. मांसाहार भारतात बहुतांश भागात फार कमी प्रमाणात केला जात असल्याने कडधान्यांची कमतरता झाल्यास त्यामुळे गरिबांच्या आहारातील प्रथिनांमध्ये घट होते व कुपोषणाचे प्रमाण वाढते.

दूध एक रुपयाने महागले
मुंबई, २९ जुलै / प्रतिनिधी

गाय आणि म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात ३० सप्टेंबर २००९ पर्यंत प्रतिलिटर दोन रुपये आणि विक्रीच्या दरात प्रतिलिटर एक रुपया वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्याचा बोजा गोरगरीब ग्राहकांवर पडणार आहे. दूध संघांच्या कमिशनमध्ये ४० पैसे आणि संस्थांच्या कमिशनमध्ये १० पैसे वाढ करण्यात येणार आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी प्रथिने तपासणीवर आधारित गायीच्या दुधात २.९ टक्के आणि म्हशीच्या दुधात दूध ३.१ टक्के प्रथिने असणे अनिवार्य करण्यात आले आहे. २००७ पूर्वीच्या धोरणानुसार त्याचप्रमाणे बसाक समितीने शिफारस केल्याप्रमाणे कृष आणि पुष्ट काळासाठी दुधाच्या खरेदी दरात फरक ठेवण्यात येणार आहे.

 

प्रत्येक शुक्रवारी