Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

खतासाठी उद्रेक
* कळंब येथे शेतकऱ्यांचे आंदोलन; व्यापाऱ्यांना अडवून धरले*

कळंब, २९ जुलै/वार्ताहर

खतासाठी शेतकऱ्यांनी उग्र रूप धारण करताच ३५ टन खताचे आज तातडीने वाटप करण्यात आले. त्यासाठी शेतकऱ्यांनी दिवसभर खत व्यापाऱ्यास अडवून धरले. दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलनही करण्यात आले. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे व्यापाऱ्यांची मात्र भंबेरी उडाली. शहरातील खतव्यापाऱ्यांनी साठेबाजी करीत खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली होती. खताच्या बाजारपेठेत सकाळपासूनच शेतकरी मोठय़ा संख्येने जमले होते.

राज्य वक्फ मंडळाच्या पाच सदस्यांची निवडणूक घेण्याचा आदेश
निवड रद्द!
औरंगाबाद, २९ जुलै/खास प्रतिनिधी
राज्य वक्फ मंडळाच्या नवीन पाच सदस्यांची निवड मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती एन. व्ही. देशपांडे यांनी आज रद्दबातल ठरविली. या पाच सदस्यांच्या निवडीचा ४ सप्टेंबर २००८ रोजीचा अध्यादेश न्यायालयाने अवैध ठरविला. मालेगावचे आमदार शेख रशीद हाजी शेख शफी, माजी खासदार हुसेन दलवाई, पाथरीचे आमदार बाबाजानी दुर्रानी, मुबीन हारुण सोलकर आणि हाजी अली दर्गाचे व्यवस्थापकीय विश्वस्त अब्दुल सत्तार हाजी महम्मद र्मचट यांचा नवीन सदस्यांमध्ये समावेश होता.

कंत्राटी प्रश्नध्यापकांना पोलिसांची धक्काबुक्की?
उच्चशिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर उपोषणास बसण्याचा प्रयत्न
जालना, २९ जुलै/वार्ताहर
आपल्या मागण्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या येथील निवासस्थानासमोर आज सकाळी बेमुदत उपोषणास बसण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रश्नध्यापकांना पोलिसांनी आज हुसकावून लावले. काही कंत्राटी प्रश्नध्यापकांना या वेळी धक्काबुक्की झाल्याचेही वृत्त आहे. त्यानंतर कंत्राटी प्रश्नध्यापकांनी दुपारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. हे सर्व प्रश्नध्यापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कंत्राटी अधिव्याख्याता कृतिसमितीचे सदस्य आहेत.

रस्त्याच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून ग्रामविस्तार अधिकारी निलंबित
अण्णा हजारे यांच्या तक्रारीनंतर कारवाई
नांदेड, २९ जुलै/वार्ताहर
मुखेड तालुक्यातल्या तग्याळ येथील रस्त्याच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून ग्रामविस्तार अधिकारी एस. बी. देवकते यांना निलंबित करण्यात आले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतर ही कारवाई झाली.बाऱ्हाळीचे ग्रामविस्तार अधिकारी एस. बी. देवकते यांच्याकडे तग्याळ येथील ग्रामसेवकपदाचा पदभार होता. सन २००५ मध्ये झालेल्या रस्त्याच्या कामात मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. ग्रामस्थांनी तशा तक्रारीही केल्या होत्या. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. गेल्या महिन्यात अण्णा हजारे नांदेड दौऱ्यावर आले असताना ग्रामस्थांनी त्यांच्याकडे तक्रार केली. याच तक्रारीवरून त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांना पत्र लिहिले.
चौकशी समितीला असहकार्य
श्री. हर्डीकर यांनी यासाठी तात्काळ चौकशी समिती नेमली. परंतु चौकशी समितीला सहकार्य करण्याऐवजी देवकते यांनी अभिलेखे उपलब्ध करून दिली नाही. गटविकास अधिकारी जी. एल. रामोड यांनी देवकते यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

दोन चिमुरडय़ांसह आईची आत्महत्या
जालना, २९ जुलै/वार्ताहर

बदनापूरजवळ असलेल्या सायगावात आज सकाळी हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. एका तरुण आईने दोन चिमुरडय़ांसह स्वत:ला जाळून घेतले.देऊकाबाई संतोष जाधव (वय २६), तिची मुले विशाल (११ महिने) व उमेश (तीन वर्षे) मृत्युमुखी पडली. देऊकाबाईने मुलांसह जाळून घेतल्याची शक्यता आहे. मात्र त्या वेळी तिचा पती कुठे होता व तो रात्री घरी आलाच नव्हता, असे प्रश्न अनुपस्थित आहेत. सकाळी हा प्रकार लक्षात येताच तिघांना जळालेल्या अवस्थेत जालन्याच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तोपर्यंत एकाने प्रश्नण सोडला होता. त्यानंतर आईचा मृत्यू झाला. अधिक उपचाराची गरज लक्षात घेता एका मुलाला औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी त्याचेही निधन झाले. देऊकाबाईच्या पतीला पोलिसांनी सायंकाळी ताब्यात घेतले.

ज्योतीनगरमधील पाच दुकाने फोडली
औरंगाबाद, २९ जुलै/प्रतिनिधी
शहानूरमियां दर्गा रोडवर ज्योतीनगर भागात एकाच रात्री रंगेतील पाच दुकाने फोडून चोरटय़ांनी धुमाकूळ घातला. या चोरीतून चोरटय़ांच्या पदरी फार मोठी रक्कम पडली नाही, तरीही या भागात दहशतीचे वातावरण आहे. ज्योतीनगर, दशमेशनगर हा भाग शहरातील अतिशय प्रतिष्ठितभाग म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या भागात भुरटय़ा व मोठय़ा चोऱ्या सुरू आहेत. लहान मुलांच्या सायकली, वाहनांचे आरसे, कपडे तसेच बाहेर राहिलेल्या वस्तू गायब करण्याचे प्रकार या भागात बरेच वाढले आहेत. मध्यंतरी अडीच लाखांची घरफोडी या भागात घडली होती. त्यानंतर दहशतीत वावरणाऱ्या रहिवाशांना मंगळवारी रात्री घडलेल्या प्रकाराने हादरवून टाकले.शहानूरमियां दर्गा रोडवर गोठी हॉस्पिटल, गोठी मेडिकल, संकेत इलेक्ट्रिकल्स, पूनम जेन्टस पार्लर, गणेश कॅटर्स अशी रांगेतील पाच दुकाने चोरटय़ांनी मध्यरात्रीनंतर फोडली. शटर उचकटून आत प्रवेश मिळवित चोरांनी रक्कम लांबविण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र पूनम जेन्टस् पार्लरमधूनच केवळ दोन हजार रुपये चोरांच्या हाती लागले. महापौर विजया रहाटकर यांच्या या वार्डात वाढत्या चोऱ्या लक्षात घेऊन पोलिसांनी आपली गस्त वाढवावी, अशी मागणी या भागांतून होत आहे.

सहप्रवाशास भामटय़ाने ६८ हजारांना लुटले
औरंगाबाद, २९ जुलै/प्रतिनिधी

प्रवासादरम्यान सहप्रवासी, अनोळखी व्यक्तीने दिलेल्या अन्नपदार्थाचे सेवन करू नये, त्यातून गुंगी देऊन लुटीच्या घटना होऊ शकतात हे माहित असताना एका परप्रश्नंतीयाला गप्पांमध्ये गुंतवून भामटय़ाने ६८ हजार रुपयांचा ऐवज लुटला.सूरत ते औरंगाबाद या प्रवासात विक्रम अमरनाथ कपूर (राहणार मनाली, हिमाचल प्रदेश) यांची सहप्रवाशाशी मैत्री झाली. औरंगाबादला बस पोहोचल्यावर त्या मित्राने रंग दाखविला. रात्रभराच्या प्रवासात भामटय़ाने कपूर यांच्याकडे रोख रक्कम बरीच असल्याचे हेरले. शिवाय औरंगाबाद बस स्थानकावर उतरल्यानंतर भाबडेपणाचे सोंग घेत त्याने त्यांची बॅग सांभाळण्याची तयारी दाखविली. संधी मिळताच त्या प्रवासी मित्राने कपूर यांची बॅग गायब केली. त्या बॅगमध्ये ५८ हजार रुपये रोख, कपडे व इतर सामग्री असा एकूण ६८ हजारांचा ऐवज होता. तो लंपास झाल्याचे लक्षात येताच विक्रम कपूर यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

वीज कंपन्यांमध्ये १४ हजार कर्मचाऱ्यांचा अनुशेष
औरंगाबाद, २९ जुलै/खास प्रतिनिधी

राज्यातील विविध वीज कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबर २००२ अखेर १४ हजार ६४७ पदांचा अनुसूचित जातीसाठीचा अनुशेष असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेने अनुसूचित जाती व जमाती आयोगाला दिले आहेत.अनुसूचित जातीचे विधिमंडळ सदस्य सध्या औरंगाबाद जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आहेत. मागसवर्गीय वीज कर्मचारी संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष संजय घोडके यांनी या अनुशेषाची माहिती सदस्यांना दिली. सर्वोच्च पदापर्यंत आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करा, मागसवर्गीय कक्षांचा कंपनीत वापर प्रभावीपणे करा अशा विविध मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.या शिष्टमंडळात विवेक स्वामी, शीलरत्न साळवे, एन. आर. गांधले, पी. पी. दांडगे, आर. पी. चव्हाण यांचा समावेश होता.

महागाईच्या विरोधात शिवसेनेची आज निदर्शने
औरंगाबाद, २९ जुलै/खास प्रतिनिधी
वाढत्या महागाईच्या विरोधात केंद्र आणि राज्य शासनाचा विरोध दर्शविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. या निदर्शनाचे नेतृत्व महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुनीता आऊलवार, माजी उपमहापौर लता दलाल या करणार आहेत. या आंदोलनात सर्व संघटक, आजी-माजी नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहर संघटक मीरा देशपांडे (पूर्व), सविता कुलकर्णी (पश्चिम), सुनीता पाटील (मध्य) आणि नीलिमा पाटील (पश्चिम ग्रामीण) यांनी केले आहे.

बनावट घडय़ाळांची विक्री करणाऱ्यास अटक
औरंगाबाद, २९ जुलै/प्रतिनिधी
नामांकित कंपनीच्या बनावट घडय़ाळांची विक्री केल्यास वाईट वेळ येऊ शकते. समीर शेख या गुन्हेगाराला त्याची चांगली प्रचिती आली.‘इन फोर्सेस ऑफ इन्टॅलॅक्च्युअल प्रश्नॅपर्टी राइट्स’ने (इआयपीआर) केलेल्या पाहणीत शहरातील काही भागात ‘टायटन’ या नामांकित कंपनीच्या बनावट घडय़ाळांची सर्रास विक्री होताना आढळून आली. त्यानुसार ‘इआयपीआर’च्या स्थानिक प्रतिनिधीने सिटी चौक पोलिसांना त्याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ जिल्हा परिषदेसमोरील अंबा-अप्सरा चित्रपटगृहासमोर खुलेआम ‘टायटन’च्या सोनाटाच्या स्टील व लेदर पट्टय़ांच्या बनावट घडय़ाळांचा साठा जप्त केला.सोनाटाच्या स्टील पट्टय़ांची १४२ व लेदरच्या पट्टय़ांची ४७ घडय़ाळ समीर बशीर शेख (वय २३) याच्याकडून जप्त करण्यात आली. त्याला अटक करून गुन्हा नोंदविण्यात आला.

शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे कौसडीत गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप
बोरी, २९ जुलै/वार्ताहर
कौसडी (ता. जिंतूर) येथील माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकासह शिक्षकांच्या रिक्त जागा न भरल्याने गावकऱ्यांनी अखेर आज शाळेला कुलूप ठोकले. बोरी केंद्रात या शाळेचा दहावीचा निकाल सर्वात जास्त लागला; परंतु या शाळेत गेल्या अनेक वर्षापासून मुख्याध्यापकासह शिक्षकांच्या आठ जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे. गावकऱ्यांनी शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले होते. परंतु या अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्याने आज सकाळी सरपंच शेख सलिम, उपसरपंच चंद्रकांत कुलकर्णी, तातेराव बारवकर, लिंबाजी इरवे, पाशाखान पठाण यांच्यासह शंभरावर गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले. ज्या शाळांचे निकाल चांगले आहेत किमान त्या शाळेत तरी शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी गावकऱ्यांनी केलीआहे.

खोबे यांच्याविरुद्धच्या याचिकेची सुनावणी आता १७ ऑगस्टला
परभणी, २९ जुलै/वार्ताहर
नगराध्यक्ष जयश्री खोबे यांच्यासह काँग्रेसच्या आठ नगरसेवकांचे सदस्यत्व पक्षांतविरोधी कायद्यानुसार रद्द करण्यात यावे, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या अर्जावर आता दि. १७ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.आपले म्हणणे मांडण्यासाठी आज सकाळी ११ वाजता हजर राहावे अशा नोटिसा जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्वाना बजावल्या होत्या. परंतु आज यावर सुनावणी झाली नाही. माजी नगराध्यक्ष सय्यद महेबूब अली पाशा यांच्या वतीने १७ जुलैला नगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करण्यात आली होती.नगराध्यक्षपदाच्या निवडीवरून काँग्रेस पक्षात वाद धुमसत असून श्रीमती खोबे यांच्या निवडीच्या पाश्र्वभूमीवर पक्षात फूट पडली आहे. गटनेते संजय देशमुख यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शफीसा बेगम जलालोद्दीन यांना मतदान करण्याचा व्हीप बजावला होता. श्रीमती खोबे यांना मतदान करण्यासंबंधीचे काँग्रेसच्या नेतृत्वाचे पत्र येथे प्रश्नप्त झाले होते. श्रीमती खोबे यांच्यासह आठ सदस्य एका बाजूला तर अन्य चौदा नगरसेवकांचा गट एका बाजूला असे चित्र निर्माण झाले. काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळावर खोबे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या.

मादळमोही आरोग्यकेंद्राला गावकऱ्यांनी कुलूप ठोकले
गेवराई, २९ जुलै/वार्ताहर
मादळमोही येथील प्रश्नथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने परिसरातील रुग्णांची हेळसांड होत आहे. वारंवार तोंडी सूचना देऊनही वैद्यकीय अधिकारी जुमानत नाहीत, हे पाहून मादळमोही येथील गावकऱ्यांनी रिकाम्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. कुलूप ठोकल्याची माहिती मिळाल्यावर धावतपळत आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या हातपाया पडून आंदोलन मागे घेण्यास राजी केले.मादळमोही (ता. गेवराई) येथील प्रश्नथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील रुग्णांची नेहमी वर्दळ असते. या ठिकाणी नियुक्तीस असलेले डॉ. प्रवीण देशमुख व डॉ. क्रांती राऊत हे दोघेही दिवसेंदिवस कुठलीही रजा न घेता रुग्णालयात अनुपस्थित राहतात. परिणामी येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना खासगी दवाखान्यात जाऊन आर्थिक भरूदड सोसावा लागतो.परिसरातील नागरिकांनी या विषयी वारंवार तक्रार करूनही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या सूचनेकडे कानाडोळा केला. यामुळे चिडलेल्या गावकऱ्यांनी सोमवारी (२८ जुलै) सकाळी ११ वाजता आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. या विषयीची माहिती कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवरून वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविल्यावर वरील दोघा डॉक्टरांनी मादळमोही येथे येऊन गयावया करून कूलप काढायला लावले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय राऊत यांनी वरील प्रकरणी गंभीर दखल घेतली. ३० रोजी ग्रामस्थ व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे.

भूसंपादनास न्यायालयाची स्थगिती
गंगाखेड, २९ जुलै/वार्ताहर
पालम तालुक्यातील पुयनी येथील १ हेक्टर २१ आर जमीन भूसंपादन करणाऱ्या प्रशासनास गंगाखेड येथील वरिष्ठ स्तर न्यायालयाने स्थगिती देऊन ती परिस्थिती कायम ठेवण्याचा आदेश न्यायाधीश आर. एम. खान यांनी दिला. प्रतीक प्रकाशचंद करनावट यांना पुयनी (ता. पालम) येथील सव्‍‌र्हे क्र. ५४-ब मधील १ हेक्टर २१ आर जमीन आजोबा मदनलाल छाजेड यांनी बक्षीस दिली होती. मात्र बक्षीसपत्राधारे या जमिनीचा फेर व ताब्याची नोंद घेण्याबाबत जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) व तहसीलदार पालम यांना प्रतीक करनावटच्या वतीने अनेक वेळा लेखी मागणी केली होती. त्याची दखल न घेता प्रशासनाने जमीन संपादनाची एकतर्फी कारवाई केली होती.या निर्णयाविरुद्ध करनावट यांच्या वतीने पालनकर्त्यां आई लीला करनावट यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने ही जमीन प्रतीक करनावट यांच्या मालकीची मान्य करून भूसंपादनाची कार्यवाही रद्द केली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या निकालास न जुमानता जिल्हा व तालुका प्रशासनाने आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत होते. याप्रकरणी गंगाखेड वरिष्ठ स्तर न्यायालयाचे न्यायाधीश खान यांनी परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा प्रशासनाला आदेश दिला आहे.

बलात्कार करून तरुणीचा खून
वसमत, २९ जुलै/वार्ताहर
वसमत-कौठा रस्त्याच्या बाजूस एका झुडपात एका अनोळखी २५ वर्षाच्या तरुणीचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. बलात्कार करून नंतर तिचा खून केला असावा, असा प्रश्नथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला. वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.कौठा शिवारातील विठ्ठलराव पांडे यांच्या शेताजवळ आज सकाळी साडेआठ वाजता झाडाच्या झुडपात एका अनोळखी तरुणीचा मृतदेह दिसला. कौठय़ाचे पोलीस पाटील बाबुराव खराटे यांनी वसमत पोलीस ठाण्याला माहिती दिली. ही माहिती मिळताच वसमतचे पोलीस उपनिरीक्षक माणिकराव पेरके घटनास्थळी गेले. श्री. पेरके म्हणाले की, अज्ञात व्यक्तींनी या तरुणीस पळवून आणून तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला असावा व पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह झुडपात आणून टाकला असावा. या तरुणीच्या अंगावर पांढरा टी-शर्ट व जीन पँट आहे. अज्ञात व्यक्तींविरुद्ध बलात्काराचा व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हजाराच्या दोन बनावट नोटा देगलूरच्या बँकेत आढळल्या
नांदेड, २९ जुलै/वार्ताहर
जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात बनावट नोटा मोठय़ा प्रमाणावर चलनात आल्याची चर्चा सुरू असताना देगलूर येथे स्टेट बँक ऑफ हैदराबाद येथे एक हजार रुपयाच्या दोन बनावट नोटा काल आढळल्या. बनावट नोटांच्या या सत्रामुळे खळबळ उडाली आहे.शहरात गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी बनावट नोटा आढळल्या आहेत. सुमारे दोन महिन्यांपूर्वी देगलूर येथे बनावट नोटा आढळल्यानंतर पोलिसांनी आंध्र प्रदेशातून दोघांना ताब्यात घेतले होते. हे दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत असताना दोन आठवडय़ांपूर्वी नांदेड येथे स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये पाचशे व हजार रुपयाच्या बनावट नोटा आढळल्या होत्या. जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागात मोठय़ा प्रमाणात बनावट नोटा चलनात आल्याची भीती व्यक्त होत आहे.देगलूर येथे काल एक हजाराच्या दोन बनावट नोटा आढळल्या. या नोटा २७ जुलैला बँकेत जमा झाल्या होत्या, असे आतापर्यंत तपासात निष्पन्न झाले आहे. बँकेचे व्यवस्थापक अभय देशमुख यांनी देगलूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नांदेडमध्ये २१ जुलैला सापडलेल्या नोटांचा तपासही जैसे थे अवस्थेत आहे. नांदेड जिल्हा आंध्र प्रदेश- कर्नाटक सीमेवर आहे. सुमारे दोन वर्षापूर्वी उमरी येथे बनावट नोटा चलनात आणणारी एक टोळी पोलिसांनी पकडली होती. या टोळीतील सहा जणांना न्यायालयाने शिक्षाही दिली.

खून व खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपांवरून दोघांविरुद्ध गुन्हा
नांदेड, २९ जुलै/वार्ताहर
क्षुल्लक कारणावरून एका महिलेचा खून करून आणखी एकावर प्रश्नणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून मारोती इंगळे व अशोक इंगळे यांच्याविरुद्ध मुखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुखेड तालुक्यातील चांडोळा येथील एका विवाहित महिलेचे गावात एकाशी अनैतिक संबंध होते. याच कारणावरून मारोती इंगळे याने रेखा गायकवाड व रमेश चव्हाण यांच्यावर काल रात्री घरात घुसून प्रश्नणघातक हल्ला केला. या हल्ल्यात रेखा ठार झाली. रमेश चव्हाण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नांदेडच्या गुरुगोविंदसिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोदावरी गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

निलंबित पोलिसाचा खून
नांदेड, २९ जुलै/वार्ताहर
निलंबित पोलीस शिपाई बालाजी संभाजी कागणे यांचा खून झाल्याचे आज उघडकीस आले. नायगाव तालुक्यातल्या राहेर येथील गोदावरी नदीच्या पात्रात २५ जुलैला एक मृतदेह आढळला होता. प्रश्नरंभी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु उत्तरीय तपासणीच्या अहवालात खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. आज मृताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. मृत बालाजी कागणे नांदेड पोलीस दलात कार्यरत होता. त्याला काही दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. शिवाय त्याच्या पत्नीनेही त्याच्याविरुद्ध गेल्या महिन्यात फिर्याद दिली होती. बालाजीची ओळख पटवण्यात पोलिासंना यश आले असले तरी त्याचा खून कोणी व कशासाठी केली याचा उलगडा झाला नाही.

मारहाण करून ऐवज लांबवला
नांदेड, २९ जुलै/वार्ताहर
हदगावलगत असलेल्या वसंत गादेवार यांच्या शेतात काम करणाऱ्या गाडे कुटुंबीयास बेदम मारहाण करून दरोडेखोरांनी सुमारे ४० हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. मध्यरात्री ही घटना घडली. हदगाव येथील वसंत गादेवार यांच्या शेतात उकंडराव गाडे कुटुंबीयांसह राहत होते. मध्यरात्री दहा ते पंधरा दरोडेखोर तेथे आले. त्यांनी उकंडराव, त्यांचा मुलगा अविनाश व पत्नी जिजाबाई यांना मारहाण करून त्यांच्याजवळील दागिने व रोख रक्कम असा ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चड्डी-बनियनवर आलेले दरोडेखोर मराठी भाषा बोलत होते. हल्ल्यात उकंडराव जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री आज नांदेड दौऱ्यावर
नांदेड, २९ जुलै/वार्ताहर
मुख्यमंत्री अशोक चव्हाण उद्या (गुरुवारी) जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ते अर्धापूर, भोकर, मुदखेड येथील वेगवेगळ्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ७ वाजता वीज वितरण कंपनीच्या नवनिर्मित मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल.श्री. चव्हाण रात्री नऊ वाजता महापौर प्रकाश मुथा यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. शुक्रवारी (दि. ३१) औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. साडेअकरा वाजता तरोडा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री बारामतीला रवाना होतील.

महिलेचा खून
नांदेड, २९ जुलै/वार्ताहर
सोयाबीन निंदण्यासाठी शेतात गेलेल्या लक्ष्मीबाई हासबे यांच्याजवळील सोन्याचे दागिने हिसकावून त्यांचा निर्घृण खून झाला. रामतीर्थ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. नायगाव तालुक्यातल्या नरसी येथे लक्ष्मीबाई हासबे (वय ५५) काल नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेल्या. सायंकाळी शेतातून घरी निघण्याच्या तयारीत असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या जवळील सोन्या-चांदीचे ६० हजार रुपयांचे दागिने हिसकावून घेतले. नंतर त्यांचा गळा दाबून खून केला. लक्ष्मीबाई घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा हा प्रकार लक्षात आला.

नेत्ररुग्णांची तपासणी
बीड, २९ जुलै/वार्ताहर

शारदा प्रतिष्ठान आणि जे. जे. हॉस्पिटलने मुंबई येथे नेत्रशस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांची जे. जे. हॉस्पिटलच्या नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. तात्यासाहेब लहाने, डॉ. रागिणी पारखी यांनी गेवराई येथे येऊन तपासणी केली. शारदा प्रतिष्ठान आणि जे. जे. हॉस्पिटलतर्फे प्रत्येक महिन्याला मुंबई येथे गेवराई तालुक्यातील नेत्र रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येते. या महिन्यात तालुक्यातील शंभर रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शंभर आणि तालुक्यातील इतर साठ नेत्ररुग्णांची तपासणी डॉ. लहाने, डॉ. पारीख यांनी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात येऊन केली. नगराध्यक्ष लक्ष्मणराव पवार यांनी डॉक्टरांचा सत्कार केला.

बी.सी.ए.चा निकाल जाहीर
औरंगाबाद, २९ जुलै/प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या बी.एस्सी. कॉम्प्यूटर सायन्स, बी.एस्सी. आय.टी. आणि बी.सी.ए. या अभ्यासक्रमाचा निकाल घोषित करण्यात आला आहे. हा निकाल डॉ. बामूच्या संकेत स्थळावरही उपलब्ध असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मुद्रण तंत्रज्ञानाची प्रवेशपूर्व परीक्षा ६ ऑगस्टला
औरंगाबाद, २९ जुलै/प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात यावर्षी नव्याने मुद्रण तंत्रज्ञान पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. या दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा, गटचर्चा व वैयक्तिक मुलाखत ६ ऑगस्टला होणार आहे.

परळी तालुक्यातील नदी-नाले पावसाअभावी कोरडेच
परळी वैजनाथ, २९ जुलै/वार्ताहर
अर्धा पावसाळा संपत आला तरी तालुक्यातील नदी-नाले कोरडेच आहेत. आवश्यक तेवढा पाऊस न झाल्याने पाणीपातळीत काहीच वाढ झालेली नाही. जनावरांसाठी चाराही उपलब्ध झालेला नाही. तालुक्यातील सर्वच लहान मोठे धरण-बंधारे अद्यापि कोरडेच आहेत. नद्या कोरडय़ाच आहेत. माळराने, शेते हिरवीगार दिसत असली तरी जनावरांना चरण्यासाठी चारा मात्र उपलब्ध नसल्याने कडब्याचे भाव वाढतच आहेत. नागापूर-वाण धरणाच्या पातळीत केवळ दीड फूट वाढ झाली आहे. गुट्टेवाडी तलाव, मिरवट तलाव, खोडवा सावरगाव येथील धरण, कन्हेरवाडी येथील धरण आदी धरणांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही.

पीक विम्यासाठी चार कोटी रुपये मंजूर
परतूर, २९ जुलै/ वार्ताहर
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यापोटी ४ कोटी १९ लाख रुपये मंजूर झाले आहोत. लवकरच पीक विम्याचे पैसे संबंधित बँकामार्फत शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विजय वाघ यांनी दिली.तालुक्यातील एकूण १२ हजार ८५६ शेतकऱ्यांनी २००८-०९ या वर्षी तूर, कापूस, मूग, उडीद, बाजरी इतर पिकांसाठी सरकारने केलेल्या आवाहनानुसार पीक विमा काढला होता. विमा मंजूर झाला आहे. विम्यापोटी एकूण ४ कोटी १९ लाख रुपये मिळणार आहेत. विम्याची रक्कम शेतकऱ्यांना संबंधित बँकांकडून लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती श्री. वाघ यांनी दिली. पीक विमा काढण्यात जालना जिल्ह्य़ात परतूर तालुक्याचा पहिला क्रमांक आहे.

सोयाबीनचे अनुदान मिळाले, विमा मात्र गायब!
गंगाखेड, २९ जुलै/ वार्ताहर
तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी सरकारकडे सोयाबीन पीक विम्यापोटी रक्कम भरलेली असतानाही अद्यापि २००८ या वर्षाचा पीक विमा मिळालेला नाही. ही रक्कम त्वरित मिळावी, अशी मागणी पंचायत समितीच्या तीन सदस्यांनी आज तहसीलदारांकडे केली.पंचायत समितीचे सदस्य पुष्पा नेमाने, केशव निळे, भास्कर काळे व बाळासाहेब नेमाने यांनी प्रभारी तहसीलदार किशोर देशमुख यांना या संदर्भात निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, ऑगस्ट २००८ मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद व साळ या पिकांसाठी रक्कम सरकारकडे भरली आहे. मात्र सरकारने केवळ सोयाबीनचे अनुदान व मूग, उडीद या पिकांचाच विमा दिला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी पीक विमा भरला त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार झाला आहे.

गंगाखेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी
गंगाखेड, २९ जुलै/वार्ताहर
पावसाअभावी तालुक्यात कुठेच पेरण्या न झाल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी माजी आमदार सीताराम घनदाट मित्रमंडळाच्या शाखेच्या वतीने तहसीलदारांना करण्यात आली. तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, पिण्याच्या पाण्याची सोय करावी, जनावरांसाठी छावण्या उभ्या कराव्यात, मजुरांसाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभधारकांना तात्काळ अनुदान वाटप करावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

घमलाबाई राठोड यांचे निधन
गेवराई, २९ जुलै/वार्ताहर
तालुक्यातील केकत पांगरी येथील घमलाबाई दगडू राठोड यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी निधन झाले. त्या ८० वर्षाच्या होत्या. ऊसतोड मुकादम संघटनेचे उपाध्यक्ष व तालुका सामाजिक अर्थसहाय्य समितीचे सदस्य रघुनाथ राठोड त्यांचे चिरंजीव होत.

महागाईच्या विरोधात शिवसेनेचे शुक्रवारी ‘जोडे मारो’ आंदोलन
परभणी, २९ जुलै/वार्ताहर
जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाई रोखण्यास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. महागाईच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी (दि.३१) जिंतूर व सेलू वगळता इतर सात तालुक्यात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख डॉ. शिवाजी दळणर यांनी दिली.आवश्यक वस्तूंचे भाव आकाशाला टेकले आहेत.केंद्रातील सरकार महागाईला रोखण्यासाठी संपूर्णत: अपयशी ठरले आहे. विविध डाळी, तेल, अन्नधान्य, भाजीपाला महागाईमुळे घेणे परवडत नाही. तसेच परभणी जिल्ह्य़ात पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्यामुळे पाणी, चारा याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.महागाईचविरोधात शिवसेतर्फे शुक्रवारी (३१ जुलै) पूर्णा, पालम, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत, परभणी येथे आघाडी सरकारला ‘जोडे मारो’ आंदोलन केले जाणार आहे.

मेडिक्लोरच्या विक्रीत वाढ
गंगाखेड, २९ जुलै/ वार्ताहर
शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसह घशाच्या आजारात वाढ झाली आहे. परिणामी पाणी निर्जंतुक करण्यासाठी मेडिक्लोरच्या विक्रीत वाढ झाली आहे. पाणीटंचाई व त्यातच पावसाची दडी तसेच प्रशासनची अकार्यक्षमता यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहे. उपलब्ध पाणी दूषित असल्याने गॅस्ट्रो व घशाच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. परिणामी पाणी निर्जंतुकीकरणाच्या औषधांच्या विक्रीत वाढ झाली आहे.

अशोक पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस साजरा
निलंगा, २९ जुलै/ वार्ताहर
अंबुलगा साखर कारखान्याचे अध्यक्ष नेते अशोक पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस शहरासह निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यात विविध सामाजिक व विधायक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. श्री. निलंगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नीळकंठेश्वरास महाभिषेक करण्यात आला. पीरपाशा दर्गा व दादापीर दग्र्यास चादर चढविण्यात आली. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळेवाटप करण्यात आले. महाराष्ट्र महाविद्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ४५ जणांनी रक्तदान केले.

लातूरमध्ये आज डाळिंब परिसंवाद
लातूर, २९ जुलै/वार्ताहर
पुण्याचे राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ व नाबार्ड यांनी शहरात उद्या (गुरुवारी) सकाळी ११ वाजता डाळिंब परिसंवादाचे आयोजन केले आहे. टाऊन हॉलजवळील टाटा गोल्डच्या गिल्डाज मार्केटिंग हॉलमध्ये हा परिसंवाद होईल. या परिसंवादास जिल्ह्य़ातील डाळिंब उत्पादकांनी व नव्याने लागवड करू इच्छिणाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक डी. एल. जाधव यांनी केले आहे.

पंचायत समितीला अखेर मिळाले वाहन
परतूर, २९ जुलै/वार्ताहर
मोठय़ा प्रतीक्षेनंतर तालुका पंचायत समितीला जीप मिळाली. मागील दीड-दोन वर्षापासून वाहन नसल्याने अधिकारी-पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या विभागाच्या गाडीने आवश्यक दौरे करावे लागत. जालना जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या जीपचे पूजन सभापती सूर्यभान मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. उपसभापती सुरेश सोळंके, गटविकास अधिकारी वळवी, पंचायत समिती सदस्य मुकुंद तनपुरे या वेळी उपस्थित होते.

धरणे आंदोलनाचा इशारा
गेवराई, २९ जुलै/वार्ताहर
वीज वितरण कंपनीविषयीच्या रामपुरी परिसरातील विविध मागण्यांची पूर्तता न केल्यास भारतीय किसान संघातर्फे बीड येथील अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयासमोर धरणे धरण्याचा इशारा संघाचे कार्यवाह अशोक तौर यांनी दिला. रामपुरी, ढालेगाव, मनुबाईजवळा, तपेनिमगाव, चोपडपल्लीवाडी, श्रीपतअंतरवाला गावांतील विजेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. रामपुरीचे ३३ केव्ही केंद्राचे काम अनेक दिवसांपासून पूर्ण होत नाही, असे म्हटले आहे.

गायरानधारकांसाठी प्रशिक्षण शिबिर
वसमत, २९ जुलै/वार्ताहर
गायरानधारकांसाठी अलीकडेच एक दिवसाचे प्रशिक्षण शिबिर झाले. मानवी हक्क अभियान व जमीन अधिकारी आंदोलन यांनी संपूर्ण हिंगोली जिल्ह्य़ामध्ये अशा शिबिरांचे आयोजन केले आहे. शिबिरामध्ये पंचनामा, पीक पेऱ्याची नोंद, जमीन अधिकार आंदोलनाचे स्वप्न, गायरान जमिनीचा इतिहास, कायदा या विषयावर माहिती देण्यात आली. मुख्य प्रशिक्षक म्हणून जिल्हा समन्वयक चंद्रकांत अवचार वरुडकर, केशव अवचार, राधिका चिंचोलीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सुभाष साबळे, भारत बळवंत यांनी केले.

मलशेट्टी पाटील यांना पुरस्कार
उदगीर, २९ जुलै/वार्ताहर
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक नेते मलशेट्टीअप्पा पाटील नागराळकर यांना नवी दिल्ली येथील ‘नॅशनल इंटिग्रेशन अँड इकॉनॉमिक कौन्सिल’चा राजीव गांधी शिरोमणी पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘कौन्सिल’चे अध्यक्ष माजी राज्यपाल भीष्मनारायणसिंह आहेत. नवी दिल्लीतील साईबाबा सभागृहात २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमातत्यांना हा पुरस्कार दिला जाईल. या पुरस्काराने पाटील यांच्या शिक्षण, राजकारण व समाजसेवा क्षेत्रातील कार्याचा गौरव झाला आहे.

डॉ पोहरे यांनी पदभार स्वीकारला
लोहा, २९ जुलै/वार्ताहर
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. एम. पी. पोहरे यांनी प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. संजय केंद्रे यांच्याकडून पदभार स्वीकारला. लोहारा (उस्मानाबाद) येथून बदली होऊन आलेले डॉ. पोहरे १९९२मध्ये राज्य आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. ते वैद्यकीय पदवीधर आहेत. पारदर्शी, लोकाभिमुख, गतिमान व स्वच्छ प्रशासन देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.

‘सच्चर समितीची अंमलबजावणी करावी’
औसा, २९ जुलै/वार्ताहर
सच्चर समितीची पूर्णपणे अंमलबजावणी करावी, मुस्लिम विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती द्यावी, मौलाना आझाद महामंडळात दाखल केलेली सर्व कर्जप्रकरणे मंजूर करावीत आदी मागण्या तालुका मुस्लिम विकास परिषदेने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. परिषदेच्या शिष्टमंडळाने श्री. चव्हाण यांची अलीकडेच भेट घेतली. तालुकाध्यक्ष मन्सूर रुईकर, वाजीद पटेल या वेळी उपस्थित होते.

‘संस्कारक्षम संतती असणे आवश्यक’
धारूर, २९ जुलै/वार्ताहर
आजच्या काळात संपत्तीपेक्षा संस्कारक्षम संतती असणे आवश्यक आहे. आपल्या पाल्यांवर चांगले संस्कार करण्यासाठी पालकांनी प्रयत्नशील असले पाहिजे, असे प्रतिपादन गांजपूरचे मुख्याध्यापक शांतीनाथ मुंडे यांनी केले. ज्ञानदीप प्रश्नथमिक विद्यालयात आयोजित पालक मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मदन धोत्रे, चंद्रकांत देशपांडे, सय्यद शाकेर आदी उपस्थित होते.

तालुकाध्यक्षपदी माधव जाधव
भोकर, २९ जुलै/वार्ताहर

छावा संघटनेतून अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेल्या माधव जाधव वडगावकर यांची पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष पांडुरंग देशमुख गोरठेकर यांनी ही नियुक्ती केली. उपाध्यक्षपदी शंकर सोळंके व भाऊराव कांबळे यांची निवड झाली. विद्यार्थी आघाडीच्या तालुकाप्रमुखपदी प्रेमजित देशमुख यांची निवड करण्यात आली.