Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘दहशतवाद आणि पाक संबंधांवर सरकारला विरोधकांकडून धडे नकोत’
पंतप्रधानांच्या युक्तिवादापुढे विरोधकनिरुत्तर!
नवी दिल्ली, २९ जुलै/खास प्रतिनिधी

भारत-पाकिस्तानदरम्यानच्या संयुक्त निवेदनातील ‘घोडचुकां’वर बोट ठेवून परराष्ट्र धोरणावर युपीए सरकारची कोंडी करण्यासाठी सिद्ध झालेल्या भाजप-रालोआसह विरोधकांना आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पार निरुत्तर केले. पाकिस्तानविषयक धोरणासाठी आम्हाला भाजप-

 

रालोआकडून धडा घेण्याची गरज नाही, असे सडेतोड उत्तर देत मनमोहन सिंग यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व शंकाकुशंका आणि आक्षेप निराधार ठरवित दहशतवादाला भारत-पाक समग्र संवादातून वगळण्याच्या निर्णयाचे ठामपणे समर्थन केले. तसेच बलुचिस्तानमधील कथित हस्तक्षेपाच्या मुद्यावर भारताला काहीही लपवायचे नसल्याचे स्पष्ट केले.
ईजिप्तच्या शर्म अल् शेख येथे १६ जुलै रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांच्यासोबत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या चर्चेनंतर उभय देशांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात समग्र संवादातून दहशतवादाचा मुद्दा वगळण्याच्या तसेच बलुचिस्तानमध्ये भारताच्या हस्तक्षेपाच्या मुद्याचा द्विपक्षीय चर्चेत समावेश करण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी विशेषत भाजपने जबरदस्त आक्षेप घेतला होता. आज लोकसभेत विरोधकांच्या वतीने भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी चर्चेची सुरुवात करताना मनमोहन सिंग सरकारच्या ‘कचखाऊ’ परराष्ट्र धोरणावर आक्रमकपणे हल्ला चढविला. पृथ्वीवरील सातही समुद्राचे पाणी एकत्र केले तरी भारत-पाक संयुक्त निवेदनामुळे जी ‘शरम’ भारताच्या वाटय़ाला आली आहे ती धुतली जाणार नाही, अशी बोचरी टीका सिन्हा यांनी केली. भारताच्या इतिहासात परराष्ट्र धोरणात एवढा भयंकर संभ्रम यापूर्वी कधी बघायला मिळाला नाही, असेही ते म्हणाले. या चर्चेला उत्तर देताना विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व शंकांचे मनमोहन सिंग यांनी निराकरण केले. भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी एक दशकापूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतलेल्या पुढाकाराची मुक्तकंठाने प्रशंसा करीत त्यांनी संयुक्त निवेदनाविषयी आपली भूमिका स्पष्ट केले. १९९९ साली लाहोरला भेट देऊन वाजपेयींनी राजकीय धाडस दाखविले होते. पण त्यानंतर कारगिल आणि पाठोपाठ कंदाहार विमान अपहरण प्रकरण घडले. तरीही त्यांनी आग्रा शिखर परिषदेसाठी जनरल मुशर्रफ यांना निमंत्रित केले. २००१ साली देशाने संसदेवरील दहशतवादी हल्ला अनुभवला. त्यानंतर भारत-पाक संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला. उभय देशांचे सशस्त्र सैन्य सीमेवर सज्ज होते. पण द्रष्टय़ा नेत्याप्रमाणे वाजपेयीही विचलित झाले नाहीत. वाजपेयींची दूरदृष्टी आपल्याला मान्य आहे आणि पाकिस्तानला हाताळताना त्यांना किती वैफल्य आले असेल याचीही आपल्याला जाणीव आहे, असे म्हणत मनमोहन सिंग यांनी भाजपच्या आक्रमणातील हवाच काढून टाकली. सीमापार दहशतवादाच्या बाबतीत जे भाजप-रालोआ सरकारला साध्य झाले नाही, ते युपीए सरकारने पाकिस्तानला कबूल करायला भाग पाडले आहे. परराष्ट्र व्यवहार किंवा दहशतवादापासून देशाला सुरक्षित ठेवण्याविषयी त्यामुळेच आम्हाला विरोधकांकडून धडा घेण्याची आवश्यकता नाही, असा टोला मनमोहन सिंग यांनी लगावला. दहशतवादाच्या मुद्यावर भारताने आपली भूमिका मुळीच सोडलेली नाही.युद्ध करायचे नसेल तर दोन शेजाऱ्यांना परस्परांवर विश्वास ठेवण्यावाचून पर्याय नसतो. दक्षिण आशियात शांतता, भरभराट, सौख्य, प्रगती आणि विकास हवा असेल तर पुढे जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. त्यातच भारत आणि पाकचे भले आहे. डोळे मिटून विश्वास न ठेवता पडताळणी करून विश्वास ठेवा, अशी भारताने पाकिस्तानविषयी भूमिका घेतली आहे. बलुचिस्तानमध्ये भारताने कधीही हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे भारताला जगापासून काहीही लपवायचे नाही, असे मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले. मनमोहन सिंग यांच्या उत्तरानंतर विरोधकांपाशी भारत-पाक संबंधांवर आक्षेप घेण्यालायक कोणताही प्रश्न उरला नव्हता.