Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

टॉवरचे साम्राज्य उभारणाऱ्या ‘मूषक‘राज’ने शिवसेनेला शहाणपण शिकवू नये’
मुंबई, २९ जुलै/प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांना आधार देणारे शिवसेना भवन उभे केले. त्याच्यासमोर मूषक‘राज’ ठाकरे यांचे बिल्डरी साम्राज्य दाखविणारे टॉवर उभे केले आहेत. त्यामुळे

 

त्यांनी शिवसेना व मराठी माणसांना शहाणपणा शिकविण्याच्या भानगडीत पडू नये, असा टोला राज ठाकरे यांच्या पूर्वाश्रमीच्या सहकारी व शिवसेनेच्या विद्यमान कार्यकर्त्यां श्वेता परूळकर यांनी लगावला आहे. श्वेता परूळकर म्हणाल्या की, बऱ्याच दिवसांनी हे मूषक‘राज’ प्रकट झाले व शिवसेनेच्या विरोधात बरळले. हे महाशय स्वतच एक बडे बिल्डर म्हणजेच मूषक असल्याने त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? शिवसेनेने अलीकडेच म्हाडावर काढलेला मोर्चा मराठी माणसांच्या हितासाठी नव्हे तर मतांसाठी होता, असे बरळून त्यांनी स्वतचे दात स्वतच्या घशात घालून घेतले. शिवसेनेची स्थापना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हितासाठी केली. म्हाडावरील मोर्चा हा शिवसेनेच्या भगव्या झेंडय़ाखाली एकवटलेल्या मराठी माणसाचा बुलंद आवाज होता. ही भक्कम एकजूट पाहून मूषक‘राज’ ठाकरे यांचे डोळे पांढरे झाले व त्याच निराशेतून ते आपली शेपटी आपटत आहेत. शिवसेनेत अलीकडेच प्रवेश केलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्तीची संभावना त्यांनी ‘फेरीवाले’ अशी केली, असा उल्लेख करून श्वेता परुळकर म्हणाल्या की, सध्या मूषक‘राज’ यांच्या आजूबाजूला बसणारे हे फेरीवालेच आहेत. शिवसेनेत सर्व पद भोगून हे फेरीवाले मूषक‘राज’च्या चरणी गेले ते काय मराठी माणसांचे हित सांभाळण्यासाठी? मराठी माणसांत फूट पाडून उपऱ्यांची धन करणाऱ्या ‘कृष्णकुंज’च्या (राज ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव) कृष्णकृत्यांचा पर्दाफाश करण्यासाठी माझ्यासारखे फेरीवाले शिवसेनेच्या सावलीत परतत आहेत. शिवसेना हीच मराठी माणसाची आई असून आईच्या मनात मुलांविषयी कायम ममता असते. सध्या ज्या पुतना मावशींना मराठी प्रेमाचा पान्हा फुटला आहे त्या ढोंगास मराठी माणसे यापुढे फसणार नाहीत.