Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘मर्द’ म्हणविणाऱ्यांना बिनशेपटाच्या घुशींची गरज का लागते’
मुंबई, २९ जुलै/खास प्रतिनिधी

‘मर्द’ म्हणविणाऱ्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी बिनशेपटांच्या घुशींची गरज का लागते, असा सवाल करत बिल्डरांच्या शेपटय़ा खेचण्याचे आवाहन करायचे आणि आपल्याच ‘सामना’ दैनिकात त्याच बिल्डररुपी उंदरांच्या जाहिराती घ्यायच्या असली दुटप्पी भूमिका राज

 

ठाकरे यांनी कधी घेतली नाही, असा टोला मनसेने लगावला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘मुषकराज’ म्हणणाऱ्या श्वेता परुळकर या बिनशेपटाची घुस असून नव्याने गळ्यात पट्टा बांधल्यामुळे भुंकणे हे त्यांना व प्रकाश महाजन यांना क्रमप्राप्त असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस शिरीष पारकर यांनी केली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हाडावर काढलेला मोर्चा हा मराठी माणसांसाठी नव्हता तर मराठी मतांसाठी होता अशी टीका राज यांनी केली होती. बिल्डररुपी उंदीर व घुशींचे कान खेचण्याचे उद्धव ठाकरे यांचे आवाहन पोकळ असल्याचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त बिल्डरांच्या जाहिराती जमवल्याने स्पष्ट झाल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. शिवसेनेत अनेक प्रवक्ते असताना मनसेतून अलीकडेच सेनेत गेलेल्या श्वेता परुळकर यांनी राज हे ‘मूषकराज’ असून त्यांनी शिवसेनेला शहाणपणा शिकवू नये, असा इशारा एका पत्रकाद्वारे दिला आहे. याचा समाचार घेताना पारकर म्हणाले की, राज यांनी कष्टाने व्यवसाय उभा केला आहे. त्यातही त्यांनी बांधलेल्या इमारतींमध्ये जाणीवपूर्वक मराठी माणसांनाच घरे दिली आहेत. आता नव्याने गळ्यात पट्टा घातल्याने श्वेता परुळकर यांना भुंकणे क्रमप्राप्त आहे.