Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

शाळकरी मुलीची हत्या करणाऱ्या युवकाचा पोलिसांसमक्ष दगडांनी ठेचून खून
जत, २९ जुलै / वार्ताहर

मामाची मुलगी असल्याचे समजून अकरा वर्षांच्या चिमुरडय़ा शाळकरी मुलीची हत्या करणाऱ्या राम बसाप्पा वळसंग या नराधमाला जत तालुक्यातील संख येथील ग्रामस्थांनी दगडाने ठेचून पोलिसांसमक्ष ठार केल्याची घटना बुधवारी घडली. रेश्मा सत्याप्पा बजंत्री (वय ११) असे दुर्दैवी शाळकरी मुलीचे नाव आहे. ग्रामस्थांनी केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस निरीक्षक रविशंकर

 

घोडके व पोलीस सचिन कुंभार हे जखमी झाले आहेत.
रेश्मा ही संख येथील राजारामबापू प्रशालेत इयत्ता पाचवीत शिकत होती. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ती आपल्या दोघी मैत्रिणींसह शाळेला निघाली होती. त्याचवेळी हातात कुऱ्हाड घेऊन आलेल्या राम वळसंग याने तिला वाटेतच अडविले व चिडून तिला तू कोण आहेस, असे विचारू लागला. हातात कुऱ्हाड घेऊन अचानक समोर आलेल्या अनोळखी व्यक्तीला पाहून घाबरलेली रेश्मा काहीच बोलू शकली नाही. तोच राम याने तिच्या पोटावर कुऱ्हाडीचे दोन घाव घातले. घाव वर्मी लागल्याने रेश्मा ही जागीच मृत्युमुखी पडली. रस्त्यावर आरडाओरडा सुरू झाला. लोकांची गर्दी होऊ लागली. तेवढय़ात राम वळसंग याने दुसऱ्या मुलीला मारण्यासाठी तिचा पाठलाग सुरू केला. समोरचे दृश्य पाहून शाळेतील शिपाई, शिक्षक व ग्रामस्थांनी रामचा पाठलाग सुरू केला. आपल्या पाठीमागे लोक येत असल्याचे बघून त्याने आपल्या हातातील कुऱ्हाड खाली टाकली व पाठलाग थांबवून दुसऱ्या बाजूने पळून जायला लागला. त्याचवेळी शाळेतील शिपायांनी त्याला पकडले. त्याचे हातपाय बांधून राजारामबापू प्रशालेच्या वसतिगृहातील एका खोलीत डांबून ठेवले. थोडय़ा वेळानंतर संख औट पोस्टचे हवालदार व पोलीस वसतिगृहाच्या ठिकाणी आले. पोलिसांनी राम वळसंग याची चौकशी केली असता मामाच्या मुलीला मारण्यासाठी आलो असल्याचे त्याने सांगितले. मात्र खून केलेली मुलगी ही त्याच्या नात्यातील नसल्याचे समजले. पोलिसांची चौकशी सुरू असतानाच ग्रामस्थांनी वसतिगृहाच्या आवारात मोठी गर्दी केली. ग्रामस्थांची वाढती गर्दी पाहून संख पोलिसांनी उमदी पोलिसांची मदत मागितली. उमदीहून सहाय्यक पोलीस निरीक्षक आपल्या वाहनासह संखमध्ये आले. आरोपीला उमदीला नेण्यासाठी पोलीस गाडी खोलीजवळ नेत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी पोलीस गाडीतील चारही चाकातील हवा सोडली. ग्रामस्थांनी पोलीस गाडी व वसतिगृहावर प्रचंड दगडफेक सुरू केली. ज्या खोलीत आरोपीला ठेवले होते. त्या खोलीचा दरवाजा मोडून ग्रामस्थांनी अक्षरश: त्याला दगडाने ठेचले. जमावाचा जबरदस्त मार बसल्याने तो जागीच ठार झाला.