Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

खतासाठी उद्रेक
*कळंब येथे शेतकऱ्यांचे आंदोलन; व्यापाऱ्यांना अडवून धरले*
कळंब, २९ जुलै/वार्ताहर

 

खतासाठी शेतकऱ्यांनी उग्र रूप धारण करताच ३५ टन खताचे आज तातडीने वाटप करण्यात आले. त्यासाठी शेतकऱ्यांनी दिवसभर खत व्यापाऱ्यास अडवून धरले. दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलनही करण्यात आले. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे व्यापाऱ्यांची मात्र भंबेरी उडाली. शहरातील खतव्यापाऱ्यांनी साठेबाजी करीत खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली होती. खताच्या बाजारपेठेत सकाळपासूनच शेतकरी मोठय़ा संख्येने जमले होते. या संतप्त शेतकऱ्यांचे नेतृत्व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरसिंग जाधव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी केले. संतप्त शेतकऱ्यांनी खत गोदामाला घेराव घालून व्यापारी-अधिकाऱ्यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून खत व्यापाऱ्यांनी दुकाने सोडून पळ काढला.
कृत्रिम टंचाईचा आरोप
गोदामात मोठय़ा प्रमाणात खत असताना शेतकऱ्यांना वेठीस धरून, खत व्यापारी कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याचा आरोप नरसिंग जाधव यांनी केला. खत मिळाल्याशिवाय हलणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती, तर काही तरुणांनी गोदामाचे कुलूप तोडून खत बाहेर काढण्याचीही तयारी सुरू केली होती. खतासाठी बाजारपेठेत दिवसभर संतप्त व तणावाचे वातावरण होते. जिल्हा कृषी विकास अधिकारी नागटिळक, कृषी अधिकारी बी. आर. राऊत यांनी डी. ए. पी.चे पंचवीस टन खताचे वाटप करण्यात आले. खतासाठी दररोज शेतकरी सकाळपासूनच दुकानासमोर गर्दी करतात. दिवसभर ताटकळत बसूनही दुकानदार लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांनी दिवसभर आंदोलन केले.
तामसा येथे खतासाठी गोंधळ
नांदेड/वार्ताहर - एक महिन्यापासून खताची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आज फुटला आणि तामशात खतासाठी त्यांनी गोंधळ घातला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. तामसा व परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या एक महिन्यापासून खताचा तुटवडा जाणवत आहे. पेरणीच्या सुरुवातीपासूनच डी. ए. पी., युरिया व अन्य खते जादा दराने विक्री करण्याचा सपाटा व्यापाऱ्यांनी लावला होता. गरज म्हणून शेतकऱ्यांनी त्योवेळी खते मिळवून पेरण्या पूर्ण केल्या. परंतु आता ऐन मोसमात युरियाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. युरियाची २५० रुपये किमतीची पिशवी ३५० रुपयांना विकली जात आहे.
तामसा येथील दोन कृषिकेंद्रांवर आज युरिया येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सकाळी सातपासूनच शेतकऱ्यांनी रांगा लावल्या होत्या. सायंकाळी चार वाजेपर्यंत खत न आल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी व्यापारपेठ बंद केली. या वेळी व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. एका व्यापाऱ्यास काही शेतकऱ्यांनी मारहाणही केली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर तामसा पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर पुढील अनर्थ टळला.
पोलीस बंदोबस्तात खत वाटप
लोहा/वार्ताहर - युरिया खताचा तुटवडा आणि शेतकऱ्यांची वाढती मागणी यामुळे आज कृषिसेवा केंद्रावर पोलीस बंदोबस्तात खताचे वाटप करण्यात आले. अपुऱ्या खतामुळे बहुतांश शेतकऱ्यांना परत जावे लागले. वाट पाहून रिकाम्या हातीच जावे लागल्याने शेतकरी संतप्त झाले.
पावसाच्या उघडीपमुळे हैराण असलेला शेतकरी आता पिकांच्या वाढीसाठी पोषक असलेल्या युरियाच्या टंचाईने त्रस्त झाला आहे. युरियाचा पुरवठा आवश्यक तेवढा नव्हता. मागणी जास्त पुरवठा कमी त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषिसेवा केंद्रांसमोर रांगा लागल्या होत्या. युरियाचा पुरवठा कमी असल्याने शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. पोलिसांनी रांगा लावून खत वाटप केले. केवळ १८० युरियाची पोते होती. त्यामुळे ९० शेतकऱ्यांनाच दोन पोत्यांप्रमाणे वाटप करण्यात आले. गेल्या वर्षी डी. ए. पी.चा मोठा तुटवडा होता. पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकरयांनी बंदोबस्तात खत वाटप केला. यंदा परिस्थिती तशी येणार नाही, असे वाटत असताना युरिया टंचाईमुळे पुन्हा एकदा शेतकरी त्रस्त झाला आहे.