Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सत्तर टक्के डाळ मिलना टाळे
लातूर, २९ जुलै/ वार्ताहर

 

डाळवर्गीय धान्याच्या उत्पादनाने नीचांक गाठल्यामुळे डाळ मिल उद्योग संकटात सापडला आहे. शहरातील ७० टक्के डाळ मिलना टाळे ठोकण्याची पाळी आली असून उर्वरित ३० टक्के गिरण्यांमध्ये ७५ टक्के उत्पादन बंद आहे. अवर्षणामुळे गेल्या चार वर्षापासून शेतीउद्योग अडचणीत सापडला आहे. आजूबाजूच्या जिल्ह्य़ांमध्ये उत्पादन झाले, तर तो माल लातूरच्या बाजारपेठेत येतो. गेल्या वर्षी विदर्भातून लातूरच्या बाजारपेठेत कडधान्ये आली. त्यामुळे येथील डाळ मिल कशाबशा चालल्या. गेल्या वर्षी उडदाचे व मुगाचे उत्पादन झाले नाही; तुरीचे उत्पादन अत्यल्प राहिले. देश-विदेशातील तुरीचे उत्पादनच या वर्षी कमी होते. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. कच्चा माल उपलब्ध नसल्यामुळे प्रक्रिया कशावर करणार, असा यक्षप्रश्न निर्माण झाल्यामुळे बऱ्याच वर्षानंतर थेट उद्योगाला टाळे लावण्याचा दुर्धर प्रसंग डाळ मिल उद्योजकांवर ओढवला आहे.
डाळमिल उद्योगावर सुमारे साडेतीन हजार कामगार अवलंबून आहेत. शिवाय बिहार येथून बिगारी काम करणाऱ्या लोकांचे प्रमाणही तितकेच आहे. डाळ मिल बंद झाल्यामुळे परप्रश्नंतीयांना तर आपल्या प्रश्नंतात परत जावेच लागतेच आहे. शिवाय येथील कामगारांनाही डिसेंबरपर्यंत करायचे काय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुमारे चार महिने नवीन माल येण्याची सुतराम शक्यता नाही. उडीद-मुगाच्या पेरण्याच झालेल्या नसल्यामुळे हे पीक बाजारात येणार नाही. पावसाने ओढ दिली असल्याने आगामी वर्षात तरी तुरीचे उत्पादन कसे होईल, यावरही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे डाळ मिलला आज परिस्थितीमुळे टाळे ठोकावे लागत असले तर ते टाळे उघडण्याची स्थिती परमेश्वर कधी निर्माण करील, हे सांगणे अवघड असल्याची प्रतिक्रिया डाळ मिल असोसिएशनचे अध्यक्ष हुकुमचंद कलंत्री यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. डाळ मिल बंद असल्यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेली औद्योगिक वसाहत आचके देत आहे.