Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

बीड जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण जगताप अपघातात ठार
बीड, २९ जुलै/वार्ताहर

 

तुळजापूर-बीड रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण जगताप ठार झाले. त्यांच्या समवेत असलेले तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. आर. भारती गंभीर जखमी झाले. हा अपघात मध्यरात्री झाला. जगताप यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
जगताप व भारती तुळजापूरमार्गे बीडकडे येत होते. रस्त्यावरील गतिरोधकावर त्यांची मोटर आदळून समोरून येणाऱ्या मालमोटारीला धडकली.
बीड जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अरुण जगताप आणि तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. आर. भारती काही कामानिमित्त काल सायंकाळी मोटारीने (क्रमांक एमएच २३-७२७३) उस्मानाबाद येथे गेले होते. काम आटोपून ते तुळजापूरमार्गे बीडकडे येत होते. मोटर जगतापच चालवित होते.े मध्यरात्री एकच्या सुमारास ढोकी फाटय़ापासून एक किलोमीटरवर रेल्वे फाटकाजवळील गतिरोधक न दिसल्याने वेगातील मोटार उडाली. नियंत्रण सुटून ती समोरून येणाऱ्या मालमोटारीला धडकली. या अपघातात जगताप यांचा जागीच मृत्यू झाला, तर मागच्या सीटवर झोपलेले भारती गंभीर जखमी झाले. त्यांच्या हात, पाय, छाती, बरगडय़ांना गंभीर जखमा झाल्या आहेत.
रस्त्यावर गस्त घालत असलेल्या पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गावकऱ्यांच्या मदतीने दोघांना बाहेर काढण्यात आले. या अपघाताचे वृत्त समजताच रात्रीच नातेवाईक व मित्र रवाना झाले. भारती यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जगताप यांच्यावर सकाळी त्यांचे मूळ गाव बीड तालुक्यातील केतुरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जगताप यांच्या मागे पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे.