Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

दोन पाटलांच्या भांडणात भोसले यांचा घोडा
लातूर, २९ जुलै/वार्ताहर

विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अहमदपूर मतदारसंघात ‘दोघांचे भांडण व तिसऱ्याचा लाभ’ या म्हणीची प्रचिती येण्याची शक्यता आहे.
विधानसभेसाठी अहमदपूरची जागा काँग्रेसकडे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत मागच्या निवडणुकीत ही जागा काँग्रेसच्या वाटय़ाला होती. या जागेवर माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील व जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब

 

पाटील या दोघांनीही दावा केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून दोघेही मतदारसंघात ‘आपणच कसे उमेदवार राहू,’ हे सांगण्याची धडपड करीत आहेत. पक्षीय पातळीवर जेव्हा केव्हा कार्यक्रम होतात, तेव्हा हे दोन्ही नेते आवर्जून स्वत:चा फोटो विविध वाहनांच्या समोर लावून अशा वाहनांची संख्या सर्वाधिक राहील याची काळजी घेतात. लातूरच्या राजकारणावर सध्या केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे वर्चस्व आहे. त्यांच्यासमोर हे शक्तिप्रदर्शन तर होतेच; शिवाय माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडेही जाऊन न विसरता ही मंडळी भेट घेतात. अर्थात पाटील यांच्या स्वभावानुसार ते दोन्ही नेत्यांबरोबर गोड बोलतात.
दोन्ही पाटलांचा विधानसभेसाठीचा हट्ट लक्षात घेऊन कोणाला निवडायचे, हा मोठा पेच काँग्रेस नेतृत्वासमोर आहे. एकाला निवडले तर दुसरा त्याला पाडण्याचा प्रयत्न करील. त्याऐवजी ही जागाच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली तर कायमची कटकट मिटेल या चर्चेने जोर धरला आहे. ही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व उदगीरचे आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या मात्र पथ्यावर पडली आहे. अहमदपूरची जागा काँग्रेस सोडणार नाही व आपल्याला केवळ उदगीरची जागा निवडून आणण्यासाठी शक्ती खर्च घालावी लागेल असा त्यांचा होरा होता.
तथापि अहमदपूरमध्ये तयार होत असलेल्या वातावरणामुळे श्री. भोसले खूश होत असून आपण अहमदपूरमधून लढायला तयार असल्याचे ते सूचित करू लागले आहेत. यामुळेच ‘दोन माकडे, लोण्याचा गोळा व बोका’ ही बोधकथा आता अहमदपूरमध्ये आवर्जून सांगितली जात आहे. पण ‘सुंभ जळाला पण पीळ न गेला’ या वृत्तीने अहमदपूरमधील दोन्ही पाटील वागत आहेत. त्यांच्या वागण्याला काँग्रेसमधून जसे खतपाणी घातले जाते; तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही घातले जात आहे. या भांडणाकडे भारतीय जनता पक्षाच्या गोटातून त्रयस्थपणे पाहिले जात आहे. समोर रिंगणात कोण येणार, त्यावर आपले निवडणुकीतील आडाखे ठरवता येतील हे गृहीत धरून भा. ज. प.ची मंडळी उमेदवारी कोणाला जरी मिळाली तरी आम्ही मिळून लढू अशी भूमिका मांडत आहेत. ‘बाहेर बोलणे एक व घरात दुसरेच’ असा शाप सर्वच पक्षांना असल्यामुळे भा. ज. प. आपले ‘दाखवायचे दात’ समोर करतो आहे हे सहजपणे लक्षात येते.