Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

माजी कुलगुरुंना खंडणी मागणारे आरोपी निर्दोष
औरंगाबाद, २९ जुलै/खास प्रतिनिधी

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. आर. पी. नाथ यांना पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती अ. श्री. नलगे यांनी दिले आहेत. आरोपींमध्ये महिला पत्रकाराचा समावेश होता.
डॉ. आर. पी. नाथ यांना पाच लाख रुपयांची खंडणी मागण्याच्या कारणावरून ‘सााप्ताहिक समालोचन’ची संपादक कोमल विटेकर, तिचा पती सुग्रीव यांच्यासह राजेंद्र पितृभक्त, नामदेव सावते या चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर. पी. नाथ हे २० मार्च २००५ रोजी एका महिलेबरोबर वेरूळ येथील राहुल लॉजवर गेले होते. कोमल, सुग्रीव विटेकर हे त्यांच्या दोन साथीदारांसह डॉ. नाथ यांच्यापाठोपाठ राहुल लॉजवर पोहोचले. डॉ. नाथ महिलेसोबत थांबलेल्या खोलीत हे सर्व शिरले. त्यांनी काही छायाचित्रे घेतली आणि चित्रीकरणही केले. छायाचित्रे घेतल्यानंतर कोमल हिने मी पत्रकार असल्याचे सांगितले. पैसे द्या नाही तर छायाचित्रे प्रसिद्ध करू अशी धमकी नाथ यांना दिली.
डॉ. नाथ यांनी औरंगाबादला गेल्यानंतर पैसे देतो म्हणून सांगितले. औरंगाबादला आल्यानंतर सुग्रीव विटेकरच्या नावाने १० हजार आणि २० हजार रुपयांचे दोन धनादेश दिले. १० हजारांचा धनादेश वटल्यानंतर डॉ. नाथ यांना छायाचित्र देण्यात आले मात्र निगेटिव्ह देण्यात आली नाहीत. पैशांसाठी विटेकर दाम्पत्य डॉ. नाथ यांना वेळोवेळी धमक्या देऊ लागले. शेवटी ११ मे २००५ ला डॉ. नाथ यांनी औरंगाबादच्या गुन्हे शाखेत तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार या चारही आरोपींना अटक करण्यात आली.
१९ मार्च २००५ रोजीचा धनादेश हा घटनेच्या पूर्वीचा आहे. त्याबाबत फिर्यादी पक्षातर्फे काहीही विवेचन करण्यात न आल्याने या संपूर्ण प्रकरणावर न्यायालयाने शंका व्यक्त केली. २१ जून २००४ रोजी डॉ. नाथ आणि आरोपी सुग्रीव विटेकर यांच्यात भूखंड खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे. या व्यवहारासंबंधी डॉ. नाथ यांनी आरोपीला दोन धनादेश दिलेले होते. या व्यवहाराची कबुली डॉ. नाथ यांनी न्यायालयासमोर दिली. या व्यवहाराला साक्षीदार श्रीमती मंदाकिनी धानुका यांनी दुजोरा दिला. न्यायालयासमोर साक्ष दिलेले साक्षीदार हे लाभार्थी असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला आहे. काही महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष फिर्यादी पक्षातर्फे नोंदविली गेली नाही त्यामुळे घटनेची सत्यता उघड झाली नाही. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपींच्या वतीने रामनाथ चोभे यांनी काम पाहिले. त्यांना सचिन चव्हाण, स्मिता पवार यांनी सहकार्य केले. सरकारची बाजू एम. ए. रहेमान यांनी मांडली.