Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अनुदानासाठी कायम विनाअनुदानित शाळांचे ४ ऑगस्टपासून आंदोलन
औरंगाबाद, २९ जुलै/खास प्रतिनिधी

 

राज्य सरकारने २० जूनला काढलेला अध्यादेश रद्दबातल करण्यात यावा आणि प्रचलित अनुदान सूत्रानुसार अनुदान द्यावे यासाठी राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे ४ ऑगस्टपासून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा समितीचे मराठवाडा अध्यक्ष वाल्मीक सुरासे यांनी दिला
समितीची बैठक मुंबई येथे एम. के. आळवेकर आणि मुंबईचे विभागीय अध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत सरकारने काढलेल्या अध्यादेशाबाबत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. राज्य सरकारने कायम हा शब्द वगळून प्रचलित धोरणानुसार राज्यातील प्रश्नथमिक व माध्यमिक शाळांना अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि विधिमंडळात याची घोषणाही केली. राज्यातील ६५ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय दूर केला. शाळा मान्यतेच्या वर्षापासून प्रचलित नियमानुसार पाचव्या वर्षी २० टक्क्य़ांप्रमाणे सर्व प्रश्नथमिक व माध्यमिक शाळांना त्वरित अनुदान देण्यात यावे तसेच उच्च माध्यमिक शाळांसाठीही याच प्रमाणे अनुदान देण्यात यावे, असा अध्यादेश २० जुलैला काढण्यात आला.
यात २०१२ - २०१३ या कालावधीपासून अनुदान देण्यात येईल असे त्यात म्हटले आहे; परंतु केव्हापासून आणि कोणत्या वर्षातील शाळांना अनुदान देण्यात येईल हे त्या आदेशात स्पष्ट करण्यात आले नाही त्यामुळे संस्थाचालक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रचलित सूत्रानुसार अनुदान देण्यासाठी सरकारने कार्यवाही केली नाही तर कृती समितीच्या वतीने ४ ऑगस्टपासून आंदोलन करण्यात येईल, असा निर्णय मुंबईच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना या संदर्भात निवेदनही देण्यात आल्याची माहिती वाल्मीक सुरासे यांनी दिली.
या आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी ३ ऑगस्टला गारखेडा परिसरातील शिवनेरी कॉलनीतील गजानन बहुउद्देशीय माध्यमिक शाळेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.