Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

तांत्रिक कामगारांचा अनुशेष काढण्याचे आदेश
औरंगाबाद, २९ जुलै/खास प्रतिनिधी

 

तांत्रिक कामगारांचा अनुशेष भरून काढण्याचे आदेश अनुसूचित जाती विधिमंडळ कल्याण समितीने संबंधितांना दिले आहेत.
राज्य विद्युत कंपन्यांतील अनुशेष भरण्याच्या प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी विधिमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार म. ना. बरोरा यांच्या नेतृत्वाखालील समितीने कंपन्यांतील अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत सदस्य एम. एम. शेख, दिलीप सोनवणे आणि परशुराम उपरकर आदी उपस्थित होते. राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी या सर्व सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
तांत्रिक कामगार हा ६० टक्के प्रत्यक्ष कामावर आणि ४० टक्के निर्मिती व पारेषण उपकेंद्रामध्ये कार्यरत आहे. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत मोडणारा हा वर्ग आहे. या वर्गाची सरळ भरती, बढती आणि अनुकंपा आदी प्रक्रियेसाठी अनुशेष भरून काढण्यासाठी शंभर टक्के न्याय दिला जात नाही. अनुकंपा भरतीच्या वेळी जात प्रमाणपत्र मागितले. त्यासाठी कालावधी जास्त जातो. जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर केल्यानंतरही नियुक्ती दिली जात नाही आणि जागा शिल्लक नसल्याचे कारण पुढे केले जाते. तांत्रिक कामगारांचा अनुशेष भरून काढण्यासाठी या समितीकडे मागणी करण्यात आली. समितीने यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. महावितरणचे मुख्य अभियंता किशोर शिरसीकर, संघटनेचे शिवाजी चव्हाण, प्रभाकर लोखंडे, बी. आर. फरकाडे, आर. पी. थोरात, एम. बी. घोरपडे आदी उपस्थित होते.
दरम्यान या समितीने औरंगाबाद महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊनही माहिती घेतली. विधिमंडळात अहवाल सादर करावयाचा आहे त्यामुळे समितीने पत्रकारांना बैठकीत मज्जाव केला. महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि अन्य शासकीय विभागातील अनुसूचित जमातीच्या अनुशेषाची माहिती ते जाणून घेत आहे.
महापालिकेत अनुसूचित जमातीच्या आतापर्यंत १३० जागा भरण्यात आल्या आहेत आणि केवळ १० जागांचा अनुशेष बाकी आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे समितीला देण्यात आली. समितीचा अहवाल हा गोपनीय आहे आणि हा अहवाल विधिमंडळासमोरच सादर केला जाणार आहे, असे समितीचे अध्यक्ष आमदार म. ना. बरोरा यांनी सांगितले.