Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अकार्यक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
गंगाखेड, २९ जुलै/ वार्ताहर

 

तालुक्यातील ग्रामीण भागात गॅस्ट्रोसह घशाच्या आजाराचे थैमान माजले असताना सहा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेबद्दल बुधवारी ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तांत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. यू. बी. बिराजदार यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देत कार्यक्षेत्रावर पूर्णवेळ हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
तालुक्यात सध्या गॅस्ट्रो व घशाच्या आजाराने थैमान माजविले असताना ग्रामीण भागातील यंत्रणा मात्र गाफील असल्याचे सिद्ध झाले होते. तालुक्यात कोद्री, राणी सावरगाव, पिंपळदरी, धारासूर व महातपुरी तसेच तालुक्यालगत रावराजूर व चाटोरी असे सात प्रश्नथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध असतानाही ग्रामीण भागातील गॅस्ट्रोचे रुग्ण मात्र शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत. गत महिन्याभरात उपजिल्हा रुग्णालयात सुमारे ४५० रुग्णांनी उपचार घेतले आहेत. यावरून आरोग्य केंद्रासह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेसंबंधी तसेच अस्तित्वाविषयी नागरिकांत संताप व्यक्त होऊ लागला व बुधवारी ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तांत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बिराजदार यांनी संबंधित जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस रवाना केल्या आहेत व यासंबंधीचा खुलासा त्वरित मागविला आहे.
या नोटीससोबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्रात पूर्ण वेळ उपस्थित राहण्याची ताकीदही देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करूनच प्यावे व इतर काळजी घ्यावी, असे आवाहन करणारे पत्रक डॉ. बिराजदार यांनी जाहीर केले आहे.