Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पालिकेचे ट्रॅक्टर खासगी कामासाठी, कारवाई नाहीच!
लोहा, २९ जुलै/वार्ताहर

 

नगरपालिका प्रशासन पूर्णत: ढेपाळले आहे. कोणाचा पायपोस कोणाला नाही. पालिकेच्या मालकीचे ट्रॅक्टर रात्रीच्या वेळी चक्क रोजंदारीने खडक टाकण्याचे खासगी काम करीत होते. नगरसेवकांनी ट्रॅक्टर पकडले. पोलीस ठाण्यात आणले; परंतु पालिकेने कोणतीच कारवाई केली नाही. ही घटना नुकतीच घडली.
नगरपालिकेच्या मालकीचे ट्रॅक्टर बेरळी येथे ठेंबरे नावाच्या व्यक्तीकडे रोजंदारीवर खडक टाकीत होते. त्या ट्रॅक्टरवर खासगीच चालक होता. नगरसेवक शरद पवार, युवराज वाघमारे, करिम शेख यांनी ते ट्रॅक्टर पकडले व पोलीस ठाण्यात आणले. रोजंदारीने खडक टाकीत असल्याचे ऐकून पोलीस व नगरसेवक अवाक झाले. कोण हा ठेंबरे? त्याचा पालिकेशी काय संबंध? पालिकेच्या ट्रॅक्टरने खडक कसा काय टाकणार? त्याला कोणी आदेश दिले? मूळ चालकाने चावी कशी दिली? मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई केली का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. यासंदर्भात उपनगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘खेदजनक, दुर्दैवी’, एवढीच प्रतिक्रिया दिली. अधिक बोलणे टाळले. परंतु चौकशी करू, असे सांगितले.