Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

दोन हजार टन युरिया ४ ऑगस्टपर्यंत उपलब्ध होणार
हिंगोली जिल्ह्य़ात खत टंचाई
हिंगोली, २९ जुलै/वार्ताहर

 

जिल्ह्य़ाला पुरेशा प्रमाणात युरिया खताचा पुरवठा झालेला नाही. यामुळे शेतकरी रोज कृषी विभागाकडे खताची मागणी करीत आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या प्रयत्नामुळे आता ४ ऑगस्टपर्यंत दोन हजार टन युरिया खत मिळणार असल्याची माहिती बी. एस. कच्छवे यांनी पत्रकारांना दिली.
जिल्ह्य़ात युरिया खताच्या मागणीवरून दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी कुरुंदा येथे अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. सोमवारी हिंगोलीतील व्यापाऱ्याच्या गोदामावर धाडी घालून उपलब्ध खत विकण्यास भाग पाडले. जिल्हाभर युरिया खतासाठी शेतकरी हैराण झाला आहे.
शेतकऱ्याचा संताप व जिल्ह्य़ाला मिळालेल्या खताविषयी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी बी. एस. कच्छवे यांच्याशी स्थानिक पत्रकारांन संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, जिल्ह्य़ाला सुमारे १६ हजार मे. टन युरिया खताची मागणी आहे. आज तारखेपर्यंत जिल्ह्य़ात सात हजार ८०० टन युरिया खताचा पुरवठा झाला असल्याने शेतकऱ्याची गैरसोय होत आहे. शेतकऱ्याच्या तीव्र भावना लक्षात घेऊन वरिष्ठाकडे युरियाची मागणी केली असता कृषीमंत्र्यांनी हिंगोली जिल्ह्य़ाला ३ व ४ ऑगस्ट या दोन दिवसांत एकूण दोन हजार टन युरिया खत उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे सांगितले.
युरिया खताच्या वापराविषयी माहिती देताना कच्छवे म्हणाले, सोयाबीनसाठी युरिया खताचा वापर करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी युरियाचा वापर करू नये, असे आवाहन केले आहे.
या वर्षी पाऊस उशिरा आला. नद्या, नाले, ओढे भरून गेले नसल्याने पाण्याची पातळी वाढली नाही. परंतु झालेल्या पावसावर पिके समाधानकारक आहेत. त्यात सोयाबीन पिकावर चक्री भुंग्याचा प्रश्नदुर्भाव वाढला. त्यात युरिया खताची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यासह कृषी विभाग अडचणीत सापडला आहे.