Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

नांदेड महापालिकेला एक अब्ज रुपयांचे अनुदान
नांदेड, २९ जुलै/वार्ताहर

 

शहरातील प्रलंबित कामे त्वरित पूर्ण व्हावीत या उद्देशाने महापालिकेला १ अब्ज ५ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याचे मान्य केले आहे. लवकरच हा निधी मिळेल, असे मानले जाते.
दोन दिवसांपूर्वी महापौर प्रकाश मुथा, आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली. सध्या सुरू असलेली कामे व प्रलंबित कामे याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर वेगवेगळ्या अत्यावश्यक कामांसाठी १०५ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान मंजूर करावे, अशी मागणी महापौर व आयुक्तांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला तत्त्वत: मान्यता दिली आहे. नांदेड शहरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने सिद्धेश्वर तसेच जायकवाडी धरणातून पाणी मागवण्यात आले होते. सुमारे साडेतीन कोटी रुपयांची पाणीपट्टी माफ करण्यात यावी, अशी विनंती महापालिकेने केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संबंधित विभागास सूचना दिल्या. महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या इमारतीसाठी पावणेतीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी हा निधी मंजूर केल्याने शहरातल्या वेगवेगळ्या भागातील सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. नांदेड वाघाळा महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेली महसुली गावे तरोडा खु. व तरोडा बु. येथील मूलभूत सुविधांसाठी तात्काळ दीड कोटी रुपये मान्य केले होते. खास बाब म्हणून आणखी साडेतीन कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान मंजूर झाल्याने तरोडा भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.