Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘घटनेच्या चौकटीतच अल्पसंख्याकांना संरक्षण द्यावे’
लातूर, २९ जुलै/ वार्ताहर

 

घटनेने घालून दिलेल्या चौकटीतच अल्पसंख्याकांना सवलती द्याव्यात, त्यांच्या लांगुलचलनासाठी सवलती देण्यास आपला विरोध असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील सांगितले.
भा.ज.पच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत डॉ. पाटील बोलत होते. ते म्हणाले की, घटनेने मागासवर्गीयांसाठी विशेष सवलती दिलेल्या आहेत. त्या सवलतीनुसार विविध कारणांसाठी सरकार नोकरी, शिक्षण याबाबतीत तरतुदीनुसार आर्थिक मदत करते. ते घटनेला धरून असल्यामुळे त्याला कोणीही विरोध करणार नाही. सच्चर समितीने अल्पसंख्याक समाजाची वस्तुस्थिती समोर मांडली. मुस्लिम समाजाच्या विकासासाठी त्यांना सहाय्य करण्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र ते सहकार्य करत असताना घटनेची चौकट न मोडता सहकार्य केले पाहिजे याचे भान ठेवले गेले पाहिजे. जर असे भान ठेवले गेले नाहीतर आपला त्यास विरोध आहे.

शासकीय कार्यक्रमातील काँग्रेसच्या प्रचाराचा निषेध
लातूर शहरात विविध महामंडळांच्या वतीने लाभार्थीना धनादेशाचे वाटप सरकारच्या वतीने करण्यात आले. लाभार्थीना एकदा नाही तर तोच चेक दोनदा देण्यासही आमची हरकत नाही, मात्र असे चेक मंडळाच्या कार्यालयातून देण्यात यावेत. त्यासाठी सरकारचा पैसा खर्च करून एखाद्या पक्षाचा डांगोरा पिटला जात असेल तर तो निषेधार्ह आहे. सध्या लातूरमध्ये सरकारी खर्चातून काँग्रेसचा जो प्रचार केला जातो आहे, त्याचा निषेध करेल तितका कमी असल्याचे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.