Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

परळी मतदारसंघासाठी ७० कोटींचा पीक विमा मंजूर
परळी वैजनाथ, २९ जुलै/वार्ताहर

 

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नामुळे परळी विधानसभा मतदारसंघाला यावर्षी ६९ कोटी ३७ लाख ३ हजार ९०२ रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. याचा लाभ १ लाख ९ हजार ७९३ शेतक ऱ्यांना होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय मुंडे यांनी दिली.
तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केंद्रात भा.ज.प. आघाडीचे सरकार असताना गोपीनाथ मुंडे, पंडितअण्णा मुंडे यांच्या मागणीवरून शेतक ऱ्यांसाठी पीक विमा योजना लागू केली होती. यासाठी मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. सातत्याने पाठपुरावा केल्याने परळी मतदारसंघातील शेतक ऱ्यांना गेल्या चार वर्षापासून सातत्याने पीक विमा योजनेचा लाभ मिळत आहे.
३४ कोटींचा विमा मंजूर
या वर्षीही परळी मतदारसंघाला (परळी व अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर, घाटनांदूर महसूल मंडळ) मोठय़ा प्रमाणावर पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. यात परळी तालुक्यातील चार महसूल मंडळाला मिळून ३४ कोटी ८७ लाख २३ हजार ६८३ रुपये पीक विमा मंजूर झाला असून यातील लाभार्थ्यांची संख्या ५८ हजार ७४० आहे.
५१ हजार लाभार्थी
अंबाजोगाई तालुक्यातील परळी मतदारसंघात येणाऱ्या बर्दापूर व घाटनांदूर या दोन महसूल मंडळात येणाऱ्या गावांमध्ये ३४ कोटी ४९ लाख ८० हजार २१९ रुपये मंजूर झाले आहेत. लाभार्थ्यांची संख्या ५१ हजार ५३ इतकी आहे. यात बर्दापूर महसूल मंडळातील गावांना तीळ, सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांसाठी १३ कोटी १७ लाख तर घाटनांदूर महसूल मंडळातील गावांना तीळ, सोयाबीन, उडीद, मूग, तूर व सूर्यफुल या पिकांसाठी २१ कोटी ३२ लाख रुपये पीक विमा मंजूर झाला आहे. बर्दापूरमध्ये लाभार्थ्यांची संख्या १९ हजार ९९० व घाटनांदूरमध्ये ही संख्या सर्वाधिक ३१ हजार ६३ इतकी आहे.
परळी तालुक्यातील धर्मापुरी महसूल मंडळातील १३ हजार २२४ लाभार्थ्यांना १२ कोटी १५ लाख रुपये, नागपूर मंडळातील १५ हजार १५९ लाभार्थ्यांना ७ कोटी ७९ लाख, परळी मंडळातील ७१४९ लाभार्थ्यांना ५ कोटी तर सिरसाळा मंडळातील २३,२०८ लाभार्थ्यांना ९ कोटी ९२ लाख रुपये पीक विमा मंजूर झाला आहे.
तीळ व सोयाबीनसाठी पीकविमा
परळी तालुक्यातील सर्व मंडळांना तीळ व सोयाबीन या पिकांसठी व सिरसाळा मंडळातील लाभार्थ्यांना तीळ, सोयाबीन व कापूस या पिकांसाठी पीक विमा मंजूर झाला आहे. आगामी हंगामासाठीही ३१ जुलै पूर्वी शेतक ऱ्यांनी जास्तीत जास्त पीक विमा भरावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.