Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘राष्ट्रवादी’च्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसला फटकारले
जालना, २९ जुलै/वार्ताहर

 

लोकसभा निवडणुकीत काही जागा वाढल्यामुळे मित्र पक्ष जर स्वबळावर लढण्याची भाषा करीत असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसही राज्यातील सर्व जागा लढण्यासाठी समर्थ आहे, असे या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी काल येथे सांगितले.
परभणी येथील पक्षाचा कार्यक्रम आटोपून औरंगाबादकडे जाताना श्री. पाटील काही काळ जालना येथील शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. त्या वेळी भेटलेल्या पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मागील लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला १९.३४ टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेसला १९ टक्के मते पडली असून याचा अर्थ मिळालेल्या मतांच्या बाबतीत त्यांच्यात आणि आमच्यात फार अंतर नाही. जातीयवादी पक्ष सत्तेपासून दूर राहावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो असे सांगून त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिक आमदार निवडून आले असतानाही आघाडी टिकावी यासाठी मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे दिले होते याची आठवण करून दिली.
या वेळी आर. आर. पाटील म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात किती जागा लढवाव्यात याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. दोन्ही पक्षांतील चर्चा अद्याप बाकी आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील काही जागांची अदलाबदल करण्याच्या शक्यतेबद्दल प्रश्न उपस्थित केला असता ते म्हणाले की, जे काही बदल करावयाचे असतील ते दोन्ही पक्षाच्या चर्चेनंतरच होतील.
‘आपल्या अखत्यारीत नाही’
एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, रामदास आठवले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटय़ातून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेणे आपल्या अखत्यारीत येत नाही. असा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत दिल्लीत घेतला जातो. रामदास आठवले यांनी आगामी निवडणुका स्वतंत्ररित्या लढविण्याचा इशारा दिला असल्याच्या संदर्भात विचारल्यावर श्री. पाटील म्हणाले की, आठवले यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहावे. आम्ही तशी विनंती त्यांना केली आहे.