Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

राष्ट्रीय विकास योजनेचा निधी धूळखात पडून
हिंगोली, २९ जुलै/वार्ताहर

 

राष्ट्रीय समविकास योजनेअंतर्गत सांस्कृतिक सभागृह व ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामासाठी लोकसंख्येच्या आधारे ६ ते १० लाख रुपये प्रत्येकी मंजूर करण्यात आलेला लाखो रुपयांचा निधी कामाचे अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यतेच्या अभावामुळे धूळखात पडला आहे. आता आठ दिवसांच्या आत प्रस्ताव सादर न झाल्यास निधी परत जाणार आहे.
जिल्ह्य़ातील आखाडा बाळापूर, जवळा पांचाळ, वाकोडी, हट्टा, बांसवा, गोरेगाव, सेनगाव या ठिकाणी प्रत्येकी सुमारे ८ ते १० लाख रुपये खर्चातून सांस्कृतिक सभागृह तसेच बळेगाव, कोर्टा, मंडी, एकुरखा, कोनाथा, पुयनी (बु.), धानोरा (आरळ), लोहगाव, वरुडगवळी, उमरा, कानडखेडा (बु.), समंगा, इडोळी, बोरखेडी, देऊळगाव, म्हाळसापूर, धनगरवाडी, म्हाळशी, शिंदेफळ, घोरदडी, भानखेडा, जयपूर, उमरा, उंडेगाव रांजाळा, दौडगाव, मेथा, दुधाळा या गावात ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी सहा लाख रुपयांचा निधी राष्ट्रीय समविकास योजनेत मंजूर करण्यात आला.
या सर्व गावच्या सरपंचांना, संबंधित यंत्रणेस या कामाचे अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसह कार्यालयास पाठविण्याचे आवाहन केले. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाने बांधकामाचे अंदाजपत्रक आठ दिवसांच्या आत कार्यालयास पाठवावेत. जागा उपलब्ध नसेल अथवा इतर अडचणी असल्यास तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा अन्यथा काहीही म्हणणे नाही असे समजून ही कामे रद्द करण्यात येतील असे लेखी कळविले आहे.