Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

प्रादेशिक

पंपिंगची आवश्यकता
पण अंमलबजावणी नाही!
अभिजित घोरपडे, मुंबई, २९ जुलै

मुंबईची वाढती लोकसंख्या व इतर कारणांमुळे पावसाळी गटारांवरील वाढलेला बोजा, भरतीच्या वेळी पावसाचे पाणी वाहून जाण्यातील अडथळे आणि मुळातच भराव टाकून जास्तीत जास्त जमीन निर्माण केल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचणे नित्याचे बनले आहे. त्यावरील उपाय म्हणून पावसाळ्यात भरतीच्या वेळी पंपिंग करून पाणी समुद्रात टाकण्याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. याबाबत २६ जुलैच्या पुरानंतर प्रशासन सकारात्मक बनले असले, तरी त्याची गांभीर्याने अंमलबजावणी झालेली नाही.
मुंबईची भौगोलिक रचना वैशिष्टय़पूर्ण आहे.

आठवले यांच्या नकाराने आदिकांना राज्यसभेची लॉटरी!
विलासरावांनी केले अशोकरावांकडे चहापान
मुंबई, २९ जुलै / खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसने रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना राज्यसभेची जागा देऊ केली होती. मात्र पक्षातील कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आठवले यांनी नकार देताच काँग्रेस सोडून राष्ट्रवादीवासी झालेल्या गोिवदराव आदिक यांना राज्यसभेची आज लॉटरी लागली. राज्यसभेच्या तीन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता काँग्रेसच्या वतीने केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी तर राष्ट्रवादीकडून आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोविंदराव आदिक यांनी आज अर्ज दाखल केले.

कसाबनेच ‘त्या’ तीन अधिकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला!
मारुती फड यांची साक्ष
मुंबई, २९ जुलै / प्रतिनिधी

गोळ्या लागल्यामुळे दोन्ही हात जखमी झाल्याने आपण हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर या तीन अधिकाऱ्यांवर गोळीबारच केला नाही, असा दावा पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने गुन्ह्याची कबुली देताना केला असला तरी आपल्यासमोरच ‘त्या’ तीन अधिकाऱ्यांवर गोळीबार करताना आपण कसाबला पाहिले असल्याची साक्ष मारूती फड या आणखी एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्यासमोर दिली. कसाब आणि अबू इस्माईलने आपल्या गाडीवरही अंदाधुंद गोळीबार केल्याचे आणि त्यात आपल्याला एक बोट गमवावे लागल्याचे सांगत फड यांनी कसाबला ओळखले.

बेकायदा झोपडय़ांना आतापर्यंत पाच वेळा संरक्षण!
संतोष प्रधान, मुंबई, २९ जुलै

निवडणुका जवळ आल्यावर व्होट बॅकेच्या राजकारणासाठी अनधिकृत झोपडय़ांना संरक्षण देण्याची सरकार दरबारी प्रथाच पडली आहे. कारण १९७६ पासून राज्य सरकारने आतापर्यंत पाच वेळा अनधिकृत झोपडय़ा किंवा बांधकामांना संरक्षण दिले आहे. अनधिकृत झोपडय़ांमुळे मुंबई, ठाणे, पुणे आदी महानगरे बकाल झाली. अनधिकृत बांधकामांची गय केली जाणार नाही, असे राज्यकर्त्यांकडून वांरवार सांगितले जाते.

आठ वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिल्यावरही विलासरावांकडे गाडी नाही..
पाच वर्षांत मालमत्ता तीन कोटींनी वाढली!
मुंबई, २९ जुलै / खास प्रतिनिधी

शरद पवार आणि विलासराव देशमुख या दोन केंद्रीय मंत्र्यांमध्ये पराकोटीचे राजकीय मतभेद असले तरी दोघांमध्ये एका बाबतीत मात्र साम्य आहे. ते म्हणजे दोघांकडेही साधी गाडीही नाही. आठ वर्षे मुख्यमंत्रीपद तर दहा-बारा वर्षे मंत्री राहिलेल्या विलासराव आणि त्यांच्या पत्नीच्या नावे सुमारे सहा कोटींची मालमत्ता आहे. गेल्या पाच वर्षांंमध्ये कागदोपत्री विलासरावांच्या मालमत्तेत तीन कोटींनी वाढ झाली आहे.२००४ मध्ये लातूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विलासरावांनी सुमारे तीन कोटींची मालमत्ता दाखविली होती.

१०० कोटींच्या कामांसाठी १५७ कोटींचा खर्च!
मुंबई, २९ जुलै / प्रतिनिधी

भाजप सदस्यांचे ‘गूढ’ घुमजाव
नवीन रस्त्यांचा निधी ‘दुरुस्ती’वरच खर्च होणार?
अवघ्या वर्षभरात दीडपट जास्त रक्कम
शहरातील काही रस्त्यांचे डांबरीकरण आणि दुरुस्ती करण्याच्या वाढीव रक्कमेचे प्रस्ताव स्थायी समितीने याअगोदर नाकारले होते. या प्रस्तावांना तीव्र विरोध करण्यात भाजपचे सदस्य आघाडीवर होते. मात्र आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजप सदस्यांनी घुमजाव करीत या प्रस्तावांना चक्क पाठिंबा दिला. त्यामुळे सुमारे शंभर कोटीच्या प्रस्तावावर पालिकेच्या तिजोरीतील १५७ कोटी रुपये ठेकेदारांच्या आता खिशात जाणार आहेत.

चार लाख झोपडय़ा अधिकृत झाल्यावर पालिकेचे उत्पन्न वाढणार चार कोटींनी
समर खडस, मुंबई, २९ जुलै

राज्य सरकारने २००० सालापर्यंतच्या झोपडय़ा अधिकृत करण्याचा निर्णय खरेतर यापूर्वीच घ्यायला हवा होता, कारण लोकशाही आघाडीच्या २००४ सालच्या जाहीरनाम्यात लोकशाही आघाडी सरकारने हे आश्वासन दिले होते. मुंबईतील ६० टक्के मतदार हा झोपडपट्टीमध्ये राहतो त्यामुळे संसदीय लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करणे आणि बहुजनांचे कल्याण करणे हाच प्रमुख हेतू असायला हवा, अशी प्रतिक्रिया सरकारच्या निर्णयाबाबत तमाम झोपडीवासीय करीत आहेत.

विर्क यांना मुदतवाढ
मुंबई, २९ जुलै / खास प्रतिनिधी

राज्याचे पोलीस महासंचालक एस. एस. विर्क यांना केंद्राने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनामी रॉय हे पोलीस महासंचालक असावेत, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता. मात्र मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्यापाठोपाठ पोलीस महासंचालकांनाही मुदतवाढ मिळावी या भूमिकेवर मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे ठाम राहिल्याने राष्ट्रवादीचे काही चालले नाही.
विर्क यांच्या निवृत्तीनंतर रॉय हे पुन्हा पोलीस महासंचालक होऊ शकतात, असे सूचक उद्गार गृहमंत्री जयंत पाटील यांनी काढले होते. मात्र विर्क यांना मुदतवाढ मिळाली पाहिजे, अशी भूमिका चव्हाण यांनी घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीवर एकप्रकारे मात केली आहे.

‘न्यू एरा’ शाळेच्या स्थलांतरास मनाई
मुंबई, २९ जुलै / प्रतिनिधी

न्यू एरा शाळा कफ परेडहून फोर्ट येथे स्थलांतरित करण्यास मनाई करणारा आदेश शिक्षण संचालक भालचंद्र देसले यांनी आज जारी केला. सध्या संस्थेची इमारत शाळा सुरू करण्याइतपत सुरक्षित आहे. त्यामुळे शाळा तात्काळ सुरू करावी. शाळेची दुरूस्ती करायची असल्यास सध्याच्या इमारतीपासून चार किलोमीटरच्या आत स्थलांतर करणे बंधनकारक असून तेवढय़ा अंतरात बांधकाम पूर्ण होईपर्यंत स्थलांतरास तात्पुरती परवानगी मिळेल, असेही देसले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संस्थेच्या व्यवस्थापनाने या आदेशानुसार ३ ऑगस्टपासून शाळा सुरू करू मात्र कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल, असे एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

संप मोडण्यासाठी एसटीमध्ये ‘इस्मा’
मुंबई, २९ जुलै / प्रतिनिधी

वेतन करारासाठी एसटी कर्मचारी संघटनांनी येत्या ४ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांचा संप मोडून काढण्यासाठी राज्य शासनाने एसटीमध्ये अत्यावश्यक सेवा कायदा (इस्मा) लागू केला आहे. पुढील सहा महिने हा इस्मा लागू राहील, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी दिली. याखेरीज प्रशासनाने औद्योगिक न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले आहेत. आम्ही कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त वेतनवाढ देण्याचा प्रयत्न केला आहे. ७१ टक्क्यांऐवजी ८६ टक्के महागाई भत्ता दिला. राज्य शासनाने ४५ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली. तरीही त्यांचे समाधान होत नसेल, तर आणखी काय करायचे, असा सवाल त्यांनी केला.