Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

पाण्याची टाकी ते घरातील नळ.. वीजनिर्मितीचा अनोखा फंडा!
सुनील डिंगणकर

कधी पर्यावरणाच्या प्रश्नामुळे, कधी जमीन संपादन करण्यात येत असलेल्या अडचणींमुळे तर कधी इतर काही तांत्रिक कारणांमुळे वीजनिर्मिती प्रकल्प पूर्णत्वास जात नाहीत. अशी परिस्थिती असतानाच कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील ब्रिजेश पांडे व संकेत इंगळे या विद्यार्थ्यांनी इमारतीतील जलवाहिन्यांमधील पाण्याचा वापर करून वीजनिर्मिती करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. सध्या केवळ महाविद्यालयातील प्रयोगशाळेत सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या पुढील संशोधनासाठी टाटा पॉवर या कंपनीशी बोलणी सुरू असल्याचे ब्रिजेश पांडे याने सांगितले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या उपकरणाचे व्यावसायिक स्तरावर निर्मिती झाली की भारनियमनाचे ओझे काही प्रमाणात हलके होऊ शकेल, असा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

‘ऑर्कुट’मुळे कशेळकर कुटुंबियांची ५५ वर्षानी पुनर्भेट!
समीर परांजपे

एकमेकांची काहीही माहिती नसलेले, परमुलखात स्थायिक झालेले नातेवाईक अनेक वर्षानी काही विशेष घटना घडून परत भेटल्याच्या कथा आपण वाचत असतो. हिंदी सिनेमा तर अशा ‘लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड’ सूत्रावरच उभा आहे. सध्याच्या आयटी युगात ‘ऑर्कुट’ सोशल नेटवर्किंग वेबसाइटच्या माध्यमातून कशेळकर कुटुंबियांची तब्बल ५५ वर्षानंतर पुनर्भेट झाल्याची आगळीवेगळी घटना घडली आहे. या कथानकास प्रश्नरंभ झाला डोंबिवलीत.. या कथेच्या सूत्रधार आहेत उषा कशेळकर.. पुनर्भेट झालेल्या कशेळकर कुटुंबियांनी येत्या दिवाळीत स्नेहसंमेलनाचे आयोजन केले असून, काळाने स्नेहबंधांची विरळ केलेली वीण ते आता पुन्हा नव्याने घट्ट करणार आहेत.

पिवळे रेशनकार्ड: चतकोर भाकरीसाठी खळखळ फार!
सचिन रोहेकर

आजच्या प्रचंड महागाईत महिन्याची दोन टोके जुळविताना मध्यमवर्गीय पगारदारांची प्रचंड दमछाक होते, तेथे अन्य अल्पवेतनधारक श्रमिकांची आणि सध्या बंद-गिरण्या-कारखान्यांतील लाखो बेरोजगार कामगारांची वासलात काय..? या सवालाआड दडलेल्या वास्तवाची जाणीव सरकारला निश्चितच आहे. म्हणूनच दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांसाठी असलेल्या पिवळ्या रंगाच्या रेशनकार्डाच्या योजनेचा लाभ राज्यातील बंद पडलेल्या कापड गिरण्या, सूत गिरण्या आणि साखर कारखान्यातील कामगारांनाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण ठोस राजकीय इच्छाशक्ती व कळकळीविना केल्या गेलेल्या कागदोपत्री योजनेचे जसे होते तसेच या योजनेचे होताना दिसत आहे.

शिक्षणमंत्र्यांनी जारी केला नियमबाह्य आदेश
गैरकारभार करणाऱ्या शिक्षण संस्थेची पाठराखण
प्रतिनिधी
गैरकारभाराचा उच्छाद मांडणाऱ्या एका शाळेचे प्रकरण तब्बल आठ वेळा विधान परिषदेत उपस्थित झाल्याने या संस्थेची मान्यता रद्द करण्याची कारवाई तत्कालिन शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी केली होती. पण विद्यमान शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी डोळेझाक करून ही कारवाई रद्दबातल ठरविली आहे. शिक्षणमंत्र्याच्या सूचनेनुसार कार्यासन अधिकाऱ्यांनी नुकताच (२३ जुलै रोजी) हा वादग्रस्त आदेश जारी केला आहे. खोटी कागदपत्रे तयार करणे, खोटय़ा स्वाक्षरी करणे, शिक्षकांच्या पगाराच्या बँक खातेपुस्तिका स्वत:कडे ठेवणे, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, न्यायालयांच्या आदेशाचा अवमान करणे, शाळेत पायाभूत सुविधा उपलब्ध न करणे असे गैरकारभार चेंबूर येथील सावित्रीबाई फुले विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये आढळून आले होते.

दूषित अन्न-पाण्यामुळे होणारे आजार
मुंबईवासीयांचे जीवन घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे पळत असते. अर्थार्जनासाठी घराबाहेर पडताना शरीराचा, कपडय़ाचा नीटनीटकेपणा सांभाळणारे मुंबईकर आपल्या आहाराबद्दल किती जागरूक असतात? पोळी-भाजीचा डबा सोबत घेऊन जाण्याची संस्कृती आता बदलतच चालली आहे. ऑफिसच्या बाहेर टपरीवर मिळणारे वडापाव, भेळ, बर्गर आणि सँडविचेस आता बहुसंख्य तरुण-तरुणींचे ‘लंच’ होऊ लागलेत.

विद्यानगरीत गुंजणार ‘जागा मराठा आम, जमाना बदलेगा’
प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमी आणि येथील शाहीर अमरशेख अध्यासन यांच्या वतीने १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने ‘अण्णाभाऊ साठे : व्यक्ती आणि वाङ्मय’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले आहे. याचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय खोले यांच्या हस्ते होणार आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरु अरूण सावंत या चर्चासत्रात अध्यक्षस्थान भूषविणार असून यामध्ये कॉ. रोझा देशपांडे, कवी नामदेव ढसाळ, कवयित्री मल्लिाका अमरशेख सहभागी होणार आहेत.

सागरी साहस एक चांगला ‘करिअर ऑप्शन’
प्रशिक्षणार्थी छात्रसैनिकांचे मत

प्रतिनिधी

राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रसैनिकांना स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, फिन स्वीमिंग यासारख्या साहसी सागरी खेळांची प्रत्यक्ष माहिती असावी व त्यांना तसे प्रशिक्षण मिळावे या हेतूने १ महाराष्ट्र नॅव्हल युनिटच्या वतीने वेस्टर्न नेव्हल कमांड स्वीमिंग पूल येथे सध्या प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. १३ जुलैला सुरु झालेले हे शिबिर २ ऑगस्ट पर्यंत सुरु रहाणार आहे. कडक वैद्यकीय चाचणीनंतर महाराष्ट्रातून वीस मुले व दहा मुलींची निवड करण्यात आली आहे.

माधव गुडी, अरविंद पारीख यांची मैफल
प्रतिनिधी
पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. माधव गुडी, प्रसिद्ध सतारवादक पं. अरविंद पारीख यांची मैफल शनिवार, १५ ऑगस्ट रोजी डोंबिवली येथील माऊली हॉलमध्ये संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या मैफलीत अनुपमा अजित मंगळवेढे या वडिल व गुरू पं. माधव गुडी यांच्याकडून गुरू-शिष्य परंपरेप्रमाणे गंडाबंधन करून घेणार आहेत. या मैफलीत रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

नाटय़संगीत गायन स्पर्धा
प्रतिनिधी
नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधीतर्फे नाटय़संगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ७ व ८ सप्टेंबर रोजी नायगाव येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील सुरेंद्र गावस्कर सभागृहात ही स्पर्धा होणार असून, जुने गायक नट अरविंद पिळगावकर व संगीत रंगभूमीच्या अभ्यासक शुभदा दादरकर हे स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. स्पर्धकांच्या संगीतसाथीला धनंजय पुराणिक व अनंत जोशी हे असतील. महाविद्यालयीन व खुला गट अशा दोन गटांत होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना खुल्या गटात गुणानुक्रमे रु. ७५०१ व रु. ५००१, तसेच महाविद्यालयीन गटातील विजेत्यांना अनुक्रमे रु. ५००१ व रु. ३००१ अशी पारितोषिके दिली जातील. अर्जात नाव, पत्ता, जन्मतारीख, दूरध्वनी वा मोबाइल क्र., महाविद्यालयीन गटाकरिता महाविद्यालयाचे नाव व वर्ष नमूद केलेले कॉलेजचे प्रमाणपत्र इत्यादी माहिती देण्यात यावी. सादरीकरणासाठी स्पर्धकाला पाच ते सात मिनिटे देण्यात येतील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व अर्ज पाठविण्याकरिता संपर्क- शीतल करदेकर, १२/६०, खांडके बिल्डिंग, पहिला मजला, ज. कृ. सावंत मार्ग, दादर, मुंबई- २८. मोबाइल क्र. ९८२१२०९८७०; किंवा रवींद्र ढवळे, २ केटायून मॅन्शन, शहाजीराजे मार्ग, कोलडोंगरी, विलेपार्ले पूर्व, मुंबई- ५७. मोबाइल क्र.९३२३७९७०३४.

‘दृष्टिदानाच्या कार्यात खाजगी रुग्णालयांची भूमिका महत्त्वाची’
प्रतिनिधी

भारतात दृष्टिहीन व्यक्तींची संख्या फार मोठी आहे. क्षीण दृष्टी असलेल्या व्यक्तींची संख्या तर त्याहूनही अधिक आहे. सुदैवाने रुग्णांवर वेळीच उपचार व शल्यचिकित्सा केली तर दृष्टी पूर्ववत प्रश्नप्त करता येऊ शकते. म्हणूनच अधिकाधिक लोकांना दृष्टी प्रश्नप्त करून देण्याच्या दृष्टीने अशासकीय संघटना व खाजगी रुग्णालये यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, असे प्रतिपादन राज्यपाल एस. सी. जमीर यांनी राजभवन सोमवारी येथे बोलताना केले. मुंबईतील आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाच्या वतीने राज्यपालांच्या हस्ते गरजूंना चष्मेवाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. डायबेटिक रेटीनोपॅथीच्या रुग्णांची संख्यादेखील वाढत असून त्यादृष्टीने जनजागृती करण्यात येत असल्याचे डॉ. एस. नटराजन यांनी या वेळी सांगितले. नेत्रतज्ज्ञ डॉ.े एन. एस. सुंदरम, मुंबईचे पोलीस आयुक्त डी. शिवानंदन आदी मान्यवर उपस्थित होते.