Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

अंगणवाडय़ांसाठी ५ कोटी २९ लाखांचा निधी
नगर, २९ जुलै/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागास अंगणवाडी बांधकाम व इतर योजनांसाठी ५ कोटी २९ लाखांचा निधी मिळाला. त्याच्या व सेसमधील १ कोटी ४६ लाखांच्या नियोजनास आज समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती सुरेखा मेंगाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडय़ांच्या बांधकामांसाठी ४६ लाख ३३ हजार रुपयांचा स्वतंत्र निधी विभागास मिळाला आहे.

१७२ कोटी २६ लाखांचे अंदाजपत्रक; आज चर्चा
नगर, २९ जुलै/प्रतिनिधी

महापालिका स्थायी समितीचे सभापती संजय गाडे यांनी सन २००९-१० चे १७२ कोटी २६ लाख ४४ हजार ९३१ रुपयांचे अंदाजपत्रक आज सर्वसाधारण सभेत महापौर संग्राम जगताप यांना सादर केले. अंदाजपत्रकाच्या प्रती थेट सर्वसाधारण सभेतच मिळाल्यामुळे त्याचा अभ्यास करण्यासाठी एक दिवसाची मुदत द्यावी, अशी मागणी बाळासाहेब बोराटे यांनी केली. महापौरांनी ती मान्य केली. बोराटे यांना महापौरांनी बोलण्याची संधीच दिली नाही. गाडे यांचे मनोगत संपताच अरिफ शेख यांनी तहकुबीची सूचना मांडली.

जकात ठेकेदाराकडून ८ कोटींची बँक हमी
उद्या मध्यरात्रीपासून वसुली ‘सहकार’कडे
नगर, २९ जुलै/प्रतिनिधी
जकात वसुलीचा ठेका घेतलेल्या सहकार एजन्सीचे भगवती अग्रवाल यांनी ठेक्यापोटी ८ कोटींची बंॅकहमी आज मनपा प्रशासनाकडे दाखल केली. रितसर करार उद्या (गुरुवारी) होऊन ३१ जुलैच्या मध्यरात्री बारापासून जकात वसुली सहकार एजन्सीतर्फे सुरू होईल. दि. १ ऑगस्टपासून पुढे वर्षभर त्यांची मुदत असून या कालावधीसाठी मनपाला ते ४८ कोटी ६ लाख रुपये देतील. तसेच १ कोटी ४० लाख रुपये मनपा इमारतीच्या बांधकामासाठी देण्याचेही त्यांनी मान्य केले आहे.

रेशन दक्षता समितीची ३ वर्षात बैठक नाही!
गणेश जेवरे , कर्जत, २९ जुलै

स्वस्त धान्य वितरणातील गोंधळ, अनेकांना अजून दारिद्र्यरेषेचे कार्ड नाही, असे प्रकार सुरू असतानाच स्वस्त धान्याच्या वितरणावर नियंत्रण ठेवणाऱ्या तालुका दक्षता समितीची बैठक तब्बल ३ वर्षापासून झालीच नाही! ही बैठक प्रत्येक महिन्याच्या २० तारखेपर्यंत घेण्याचे बंधनही आमदार सदाशिव लोखंडे अध्यक्ष व तहसीलदार सचिव असलेल्या समितीने पाळले नाही. परिणामी स्वस्त धान्याच्या वितरणातील गोंधळ वाढतच चालला आहे.

छाप्यातील तीन जिवंत कासवे कुठे गेली?
राहाता, २९ जुलै/वार्ताहर

राहाता पोलिसांनी तालुक्यातील क ोऱ्हाळे येथील दारूअड्डय़ावर छापा टाकला. दारूविक्रेते व ग्राहक पसार झाले. मात्र, तेथे तीन जीवंत कासवे पोलिसांना सापडली. पोलिसांनी कासवांबद्दल काहीही नोंद न घेता ती गायब केली. दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी वन्यप्रेमी नागरिकांनी केली जात आहे.

योजनांबाबत तक्रारींच्या चौकशीसाठी जिल्हा व तालुका पातळीवर समित्या
नगर, २९ जुलै/प्रतिनिधी

जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत योजनांबाबतच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्याचा आदेश राज्य सरकारने नुकताच दिला. तक्रारींच्या शहानिशा करण्यासाठी प्रथमच समित्या नेमण्यात येणार आहेत. समित्यांवर जिल्हा परिषदेचे नियंत्रण राहणार असले, तरी त्यात महसूल व अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

नगरची गौरी झाली पायलट!
एक वर्षाचा अभ्यासक्रम ५ महिन्यात पूर्ण
नगर, २९ जुलै/प्रतिनिधी

अमेरिकेतील फ्लोरिडा फ्लाइंग ट्रेनिंग सेंटरमधील एक वर्षाचा अभ्यासक्रम अवघ्या पाच महिन्यात पूर्ण करण्याचा विक्रम करून नगरच्या युवतीने विमान उड्डाण क्षेत्रात महाराष्ट्राचा मराठमोळा झेंडा सातासमुद्रापार डौलात फडकविला. गौरी पद्माकर पवार असे तिचे नाव आहे. ती शहरातील पहिली पायलट ठरली आहे. गौरीच्या या यशोगाथेची माहिती तिची आई प्रेमा पवार व कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

तीन फूट उंचीचा अभिनेता
आशावादाने झपाटलेला माणूस अपंगत्वावर मात करून यशस्वी होऊ शकतो हेच अवघ्या तीन फूट उंचीच्या प्रमोद पंडितने दाखवून दिले आहे. ठेंगणेपणाला अभिनयाची जोड देत त्याने चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले आहे. राहाता तालुक्यातील पाथरे येथील प्रमोद भाऊसाहेब पंडित या २३ वर्षाच्या तरुणाचे शिक्षण गावातील छत्रपती शिवाजी विद्यालयात १२ वीपर्यंत झाल्यानंतर त्याने प्रथमवर्ष कला शाखेत लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात प्रवेश घेतला. शालेय शिक्षणापासूनच प्रमोदला अभिनयाचेही वेड होते. काहीतरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द होती. प्रमोदच्या अभिनयाची सुरुवात शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी साकार होत असलेल्या ‘एक गाव एक गणपती’ या सांस्कृतिक महोत्सवातून झाली. या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. या दरम्यान लोकसभेची निवडणूक होती.

दुधात भेसळ करणाऱ्याला रंगेहाथ पकडले
नगर, २९ जुलै/प्रतिनिधी
लॅक्टोज पावडर व सोयाबीन तेल वापरून तयार केलेल्या कृत्रिम दुधाची चांगल्या दुधात भेसळ करीत असताना पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील सूर्यकांत करंजुले याला अन्न औषध प्रशासनाने आज रंगेहाथ पकडले. अन्न औषधाचे सहायक उपायुक्त गिरीश वखारिया यांच्या नेतृत्वाखाली अन्न निरीक्षक अस्मिता रोळपे, मिलिंद शाह, मनीषा सानप, यमुना सहायक, मंगेश भावसार, महादेव दहिफळे यांच्या पथकाने करंजुलेच्या दूध संकलन केंद्रावर आज सकाळी ७ वाजता छापा टाकला.या वेळी ६५० लिटर म्हशीच्या दुधात भेसळ करण्यासाठी करंजुले लॅक्टोज पावडर, सोयाबीन तेल यांचा वापर करून तयार केलेले ४० लिटर कृत्रिम दूध आढळून आले. भेसळ करताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. कृत्रिम दुधाचे व भेसळयुक्त म्हशीच्या दुधाचे दोन नमुने घेऊन उर्वरित साठा (सुमारे ११ हजार ७०० रुपयांचा) पथकाने नष्ट केला.
करंजुले विरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोमवंशी तपास करीत आहेत.या महिन्यात भेसळीचे दूध पकडण्याची प्रशासनाची ही दुसरी कारवाई असून त्यामुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

वीजनिर्मितीसाठीचे पाणी भंडारदऱ्यातून बंद
पावसाची विश्रांती
अकोले, २९ जुलै/वार्ताहर
भंडारदरा धरण क्षेत्रात आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावल्यामुळे धरणातून वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येत असलेले पाणी आज बंद करण्यात आले. निळवंडे धरणाचा विसर्ग आज निम्म्याने कमी झाला. भंडारदरा धरणातील पाणीसाठा आता ७० टक्क्य़ांच्या आसपास पोहोचला आहे. सुमारे १५ दिवसांच्या चांगल्या पावसानंतर दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला. परिसरासह तालुक्याच्या बहुतांश भागात आज दिवसभर पाऊस पडला नाही. धरणात पाण्याची आवक कमी झाल्यामुळे भंडारदरा जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मितीसाठी सोडले जात असणारे पाणी आज दुपारी दीड वाजता बंद करण्यात आले. दिवसभरात धरणातील पाणी साठय़ात फक्त ३६ दशलक्ष घनफुटांनी वाढ झाली. सायंकाळी धरणातील पाणीसाठा ७ हजार ५८३ दशलक्ष घनफूट झाला होता. वाकीचा विसर्गही १ हजार २२ क्युसेक्सपर्यंत कमी झाला. निळवंडे धरणात होणारी पाण्याची आवकही कमी झाली. सायंकाळी निळवंडे धरणाच्या भिंतीवरून २ हजार १०३ क्यूसेक्स पाणी प्रवरा नदीपात्रात पडत होते. भंडारदऱ्याचा विसर्ग बंद करण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून उद्या (गुरुवारी) निळवंडचा ओव्हरफ्लो कमी होईल.

‘लोकसत्ता’चे कैलास ढोले यांना तंटामुक्तीचा द्वितीय पुरस्कार
नगर, २९ जुलै/प्रतिनिधी

तंटामुक्त गाव अभियान अंतर्गत वार्ताकनासाठी असलेला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सकाळचे बाळ बोढे यांना तर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार दै. ‘लोकसत्ता’चे वार्ताहर कैलास ढोले यांना जाहीर झाला. ‘पुढारी’चे वार्ताहर गोरक्षनाथ बांदल यांना तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान वार्ताकन स्पर्धेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा पुरस्कार समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी बी.आय. केंद्रे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, पत्रकार नंदकिशोर पाटील, महिला प्रतिनिधी अलका मुंदडा, सचिव उल्हास रहाणे बैठकीस उपस्थित होते.

‘मुळा’चे आवर्तन त्वरित द्यावे - लंघे
नेवासे, २९ जुलै/वार्ताहर
ऐन पावसाळ्यात तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याने मुळा धरणाच्या पाण्याचे एक आवर्तन त्वरित सोडावे, अशी मागणी करून या साठी आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे नेते विठ्ठल लंघे यांनी दिला आहे. पावसाळ्यातील महिन्यात दोन महत्त्वाची नक्षत्रे कोरडी गेली. तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने अनेक गावांमध्ये पेरणी झाली नाही. झालेली पेरही वाया जात आहे. नदीकाठच्या गावांमध्ये जनावराच्या, तसेच लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावण्यास सुरूवात झाली आहे. उभी पिके सुकली आहेत. विहिरींमधील पाणीपातळी कमी झाल्याने पाटपाण्याची गरज आहे. धरणक्षेत्रात पावसामुळे मुळा धरण निम्मे भरले. सध्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज असल्याने एक आवर्तन द्यावे, अशी मागणी लंघे यांनी पाटबंधारे खात्याकडे केली आहे.

काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक मेस्त्री उद्या नगरमध्ये
नगर, २९ जुलै/प्रतिनिधी
जिल्हय़ातील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची व सद्य राजकीय परिस्थितीची माहिती घेण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीने महाराष्ट्रासाठी नियुक्त केलेले निरीक्षक मधुसूदन मेस्त्री शुक्रवारी (दि.३१) नगरच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी साडेनऊ वाजता सरकारी विश्रामगृहावर आमदार, माजी खासदार, ज्येष्ठ नेते व प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांची चर्चा होईल. या वेळी मंत्री बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे, माजी खासदार बाळासाहेब विखे आदी उपस्थित राहणार आहेत. इच्छुकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघातील माहिती व राजकीय परिस्थितीचा अहवाल पाच प्रतींत आणावा, असे आवाहन जिल्हा भास्करराव डिक्कर व भानुदास केतकर यांनी केले.

खंडणीप्रकरणातील अझरला पोलीस कोठडी
नगर, २९ जुलै/प्रतिनिधी
अशोक अपहरण व खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी अझर शेख यास आज न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. खंडणीची घेतलेली रक्कम व गुन्ह्य़ात वापरलेल्या रिव्हॉल्व्हरचा तपास, अन्य आरोपींचा शोध यासाठी अझरला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांतर्फे करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार अझरने केल्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) के. के. गौर यांच्यापुढे अझरला हजर करण्यात आले होते. पुढील तपास उपनिरीक्षक गोंदकर करीत आहेत.

वाळकीचा तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखलं
नगर, २९ जुलै/प्रतिनिधी

विविध विकासकामांमध्ये ७ लाख ५२ हजार रुपयांचा अपहार करण्याच्या आरोपाखाली वाळकीचे तत्कालीन सरपंच जगन्नाथ आढाव, ग्रामसेवक संजय वाघमारे यांच्यासह पाचजणांविरुद्ध आज तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.विस्तार अधिकारी शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे. आरोपींत आढाव, वाघमारे यांच्यासह चंदाबाई विलास मंडिलक, शेख बाबा चांद, शिवाजी लोखंडे यांचा समावेश आहे. बाराव्या वित्त आयोगातील निधीच्या कामात अंगणवाडी, दलित वस्ती सुधारणा योजनेतील कामात नियमबाह्य़ खर्च, गैरव्यवहार केल्याबद्दल विभागीय आयुक्तांकडून या प्रकरणी तक्रार दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. आजच्या ‘लोकसत्ता’त या संदर्भातले वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

अट्टल दुचाकीचोरास उस्मानाबाद येथे अटक
कर्जत, २९ जुलै/वार्ताङर
राज्यात विविध ठिकाणी मोटारसायकली चोरून विकणाऱ्या तात्या कुलकर्णी या अट्टल चोरास कर्जत पोलिसांनी उस्मानाबाद येथे अटक केली.येथील खराडे टेलर व श्रीगोंदे येथील खेतमाळीस यांच्याकडे चोरलेल्या दोन मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेऊन येथे आणल्या आहेत.या शिवाय जामखेड येथील चोरीच्या मोटारसायकलीची ओळख पटली. ती उद्या (गुरुवारी) येथे आणण्यात येईल. पोलीस निरीक्षक गुलाबराव घोरपडे, उपनिरीक्षक एन. एम. कासार यांनी ही माहिती दिली.कर्जतसह तालुक्यातून अनेक मोटारसायकली चोरीस गेल्या. त्यांचा शोध घेत असताना उस्मानाबाद पोलिसांनी अट्टल दुचाकीचोर तात्या कुलकर्णी (कुंभेफळ, तालुका परांडा, जि. उस्मानाबाद) यास पकडल्याची माहिती मिळाली. कर्जतचे हवालदार पवार व चव्हाण यांनी आरोपीस अटक करून दुचाक्यांसह त्याला येथे आणले.

अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांस ९ लाखांची भरपाई
नगर, २९ जुलै/प्रतिनिधी
अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांस नऊ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीला दिला.श्रीरामपूर येथील मोटार अपघात न्यायाधिकरणाचे न्यायाधीश एम. डी. केसकर यांनी हा निकाल दिला. फिर्यादी संतोष अशोक विखे (१९ वर्षे, रा. लोणी बुद्रूक, ता. राहाता) यांच्यातर्फे वकील सुरेश लगड व बी. बी. काळे यांनी काम पाहिले. त्यांना गणेश लगड, राजेंद्र लगड यांनी सहकार्य केले.दि. २० एप्रिल २००१ रोजी संतोष विखे हा लोणीच्या आयटीआयचा विद्यार्थी मोटारसायकलवरून घरी जात असताना जीपची धडक बसून गंभीर जखमी झाला. मोटारसायकल चालविणारा मित्र इजाज तांबोळी हाही जखमी झाला.अपघातात अधू झालेल्या संतोषने जीपमालक जालिंदर मुरादे व न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीविरुद्ध दावा दाखल केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने ५ लाख रुपये नुकसान भरपाई व अपघात झाल्याच्या दिवसापासून ९ टक्के दराने व्याज असे ९ लाख रुपये संतोषला देण्याचा आदेश दिला.

महाराष्ट्रातील साधकांसाठी पतंजली योगपीठात शिबिर
नगर, २९ जुलै/प्रतिनिधी

महाराष्ट्रातील पतंजली योगपीठाच्या साधकांसाठी स्वामी रामदेव यांनी ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान हरिद्वार येथे पतंजली योगपीठात प्रश्नणायाम व योग शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा पतंजली योग समितीतर्फे देण्यात आली.या शिबिराचे नियोजन करण्यासाठी मार्केट यार्डमधील हमाल पंचायतमध्ये बैठक घेण्यात आली. माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले, प्रश्न. बाळासाहेब निमसे, विश्वासराव लंके या वेळी उपस्थित होते. शिबिराला जाऊ इच्छिणाऱ्या साधकांनी समितीचे अध्यक्ष प्रकाश लासुरे (मोबाईल ९७३००६९७१८), सचिव प्रश्न. बाळासाहेब निमसे (९४२१५६०९१५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. बैठकीस समितीचे सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, योगशिक्षक उपस्थित होते.

परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्याला अटक
नगर, २९ जुलै/प्रतिनिधी
वैद्यकीय व्यवसाय करण्याचा कुठलाही अधिकृत परवाना, शिक्षण नसताना रुग्णांची फसवणूक करणाऱ्या एमआयडीसीतील बोगस डॉक्टरला पोलिसांनी आज सकाळी अटक केली.
पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी प्रसाद हरिश्चंद्र इटकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. रतन गोपाळ घोष (वय ३९, गजानन कॉलनी, एमआयडीसी) अनधिकृतपणे दवाखाना चालवत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. आज सकाळी १०च्या सुमारास पथकाने घोष याच्या दवाखान्यावर छापा टाकला. त्याच्याकडे इंडियन मेडिकल कौन्सिलसह कुठल्याही संस्थेचे व्यवसाय करण्याचे अधिकृत प्रमाणपत्र नव्हते. घोषविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक मोहकर तपास करीत आहेत.

राज्यसभेस नकार दिल्याने आठवले यांचे अभिनंदन
नेवासे, २९ जुलै/वार्ताहर

राष्ट्रवादी व इंदिरा काँग्रेसतर्फे राज्यसभेची उमेदवारी नाकारणाऱ्या माजी खासदार रामदास आठवले यांचे रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले.जिल्हा सरचिठणीस शामराव सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आठवलेंच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाबरोबर राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. लोकसभेतील पराभवानंतर दलित समाज नाराज आहे. आठवलेंनी स्वाभिमान दाखविला. विधानसभा निवडणुकांत त्यांनी सांगितले तर उमेदवार िरगणात उतरवू. तालुक्याचा आमदार दलित व आंबेडकरी चळवळीतील गावोगावचे कार्यकर्ते ठरवतील. त्यांच्या मतांना लढतीत महत्त्व आहे. दि. ३ ऑगस्टला नवी दिल्लीत दलित व आदिवासी समाजाचा देशव्यापी मोर्चा आठवलेंच्या नेतृत्वाखाली निघणार आहे. मोर्चास तालुक्यातून ५०० कार्यकर्ते जाणार आहेत. कार्यकर्त्यांनी मोर्चासाठी नावनोंदणी केली असल्याचे सादिक शिलेदार यांनी सांगितले. अभिनंदनाचा ठराव बाजार समितीचे संचालक प्रवीण वंजारे यांनी मांडला. बैठकीस सुरेश गायकवाड, भाऊसाहेब गोर्डे, रमेश हिवाळे, बाबा आल्हाट, राजेंद्र साठे उपस्थित होते.

‘फिरता दवाखाना ८ दिवसात सुरू
न केल्यास मनपा कार्यालयाला टाळे’माजी महापौर कोतकर यांचा इशारा
नगर, २९ जुलै/प्रतिनिधी

महापालिकेचा फिरता दवाखाना येत्या ८ दिवसात सुरू झाला नाही तर मनपा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा माजी महापौर संदीप कोतकर यांनी दिला.एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह परिचारिका व ४ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला हा फिरता दवाखाना मनपाने ८ लाख रुपये खर्च करून प्रश्नमुख्याने झोपडपट्टीतील रहिवाशांच्या आरोग्य सुविधेसाठी सुरू केला. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तो बंद पडला अशी टीका कोतकर यांनी केली.कोतकर यांचा काँग्रेस पक्ष सत्ताधारी राष्ट्रवादी आघाडीत आहे, पण सत्तेतील कोणतेही पद त्यांना मिळालेले नाही. मात्र कोतकर यांच्या टीकेचा रोख राष्ट्रवादी किंवा अन्य पदाधिकाऱ्यांकडे नसून, प्रशासनाकडे असला तरीही हा सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर असल्याची चर्चा आहे.शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळत असताना या फिरत्या दवाखान्याची नितांत आवश्यकता आहे. तरीही प्रशासन सुस्त असल्याचा आरोप करीत कोतकर यांनी झोपडपट्टीतील रहिवाशांचा अंत न पाहता हा फिरता दवाखाना तत्काळ सुरू करावा, अशी मागणी आयुक्तांकडे केली. येत्या आठ दिवसात दवाखाना सुरू न झाल्यास मनपा कार्यालयाला टाळे ठोका आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

ओव्हरफ्लोचे पाणी खरीप पिकांना द्या - थोरात
श्रीरामपूर, २९ जुलै/प्रतिनिधी
धरणांच्या ओव्हरफ्लोचे पाणी ऊस आणि शेतातील भुसार व खरिपाच्या पिकांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अशोक साखर कारखान्याचे अध्यक्ष रावसाहेब थोरात यांनी केली. ओझर बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने हे पाणी कालव्यातून साठवण बंधाऱ्यांत सोडण्यात आले आहे. आधी पिके वाचवावी व नंतर तलावांत पाणी सोडा, असे त्यांनी म्हटले आहे.धरणांच्या लाभक्षेत्रात पावसाने ओढ दिली असून, ऊस व भुसाराच्या पिकांना पाण्याची गरज आहे. सध्या ओव्हरफ्लोचे पाणी प्रवरा डाव्या कालव्यात सोडण्यात आले आहे. सध्या हे पाणी साठवण तलावांत सोडण्यात येत आहे. ऊस व खरीप पिकांना ओलवणीसाठी पाण्याची मोठी आवश्यकता असतानाही ओव्हरफ्लोचे पाणी पाटबंधारे खात्याने शेतातील उभ्या पिकांना द्यावे, तसेच ओझर येथून नदीपात्रात सोडलेले पाणी जोपर्यंत शेवटपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत वरच्या भागातील नदीपात्रातील कुठल्याही बंधाऱ्यांत पाणी साठवू नये. वरच्या भागातील नदीपात्रातील कुठल्याही बंधाऱ्याच्या फळ्या टाकण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी थोरात यांनी केली.
.
श्रीरामपूर पालिकेवर आज रोजंदारी कामगारांचा मोर्चा
श्रीरामपूर, २९ जुलै/प्रतिनिधी
रोजंदारी व कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांकरिता उद्या (गुरुवारी) पालिकेवर मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती जीवन सुरूडे यांनी दिली.पालिकेत गेल्या अनेक वर्षापासून आरोग्य, पाणीपुरवठा विभागात कंत्राटी व रोजंदारी पद्धतीने कामगार घेण्यात आले आहेत. त्यांना सेवेत कायम करावे, अनुकंपा तत्त्वावर मृत कामगारांच्या वारसांना सेवेत घ्यावे, सफाई कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्यावे, कामगारांचे पगार दर महिन्याला दहा तारखेच्या आत करावेत आदी मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन विजय शेळके, बाबासाहेब मोरगे, जीवन सुरूडे, शिवाजी रासकर, रामलाल चाबूकस्वार, राजू खंडाळे, संजय मगर, पुंजाहारी केदारे, भास्कर सांगळे, उत्तम शिंदे, अशोक वाणी यांनी केले आहे.

कर्जत-जामखेडसाठी शिवसेनेचा ठराव
कर्जत, २९ जुलै/वार्ताहर
कर्जत-जामखेडच्या विधानसभेच्या जागेसाठी शिवसेनेला उमेदवारी देण्याचा ठराव आज झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत मांडण्यात आला. हा ठराव वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहे.
पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने कर्जत व राहुरी या दोन जागा शिवसेनेला मिळाव्यात अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे. यावेळी कर्जत - जामखेड मधून बळीराम यादव यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्याचा ठराव बैठकीत मांडण्यात आला. दीपक राहाणे, नारायण दळवी, अंगद उपनर, बिभीषण गायकवाड, अमृत लिंगडे, अतुल कानडे, राजेंद्र घालमे व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कर्जत व जामखेड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर वर्चस्व आहे.

प्रवरा सेवकांच्या पतसंस्थेची सभा
राहाता, २८ जुलै/वार्ताहर
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २६) माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी विखे यांनी सध्या पतसंस्थांची स्थिती, अडचणी, जागतिक मंदीमुळे अर्थव्यवस्थेवर होत असलेले परिणाम, तसेच सहकारामुळे टिकून राहिलेली ग्रामीण अर्थव्यवस्था, सहकारापेक्षा खासगीकरणाकडे वाढलेला कल, सेझ, प्रश्नमुख्याने मजूर, कष्टकरी सामान्यांच्या उन्नतीसाठी प्रश्नमाणिक प्रयत्नांची गरज विशद केली. विखे यांनी पद्मश्रींचे सामान्य राहणीमान, मर्यादित गरजा ठेवून कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीच्या दिलेल्या कानमंत्राचा आवर्जून उल्लेख केला.
या प्रसंगी विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष कारभारी ताठे, संचालक प्रश्न. बाळासाहेब दिघे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. एच. आर. आहेर, अप्पासाहेब दिघे उपस्थित होते. प्रश्नरंभी संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव दिघे, उपाध्यक्ष शिवाजीराव कुरकुटे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. प्रश्न. आंधळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रश्न. काळे यांनी आभार मानले.

रिपब्लिकनतर्फे मोर्चा
कोपरगाव, २९ जुलै/वार्ताहर
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष संपतराव भारूड यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा निघाला. तालुका उपाध्यक्ष त्रिभुवन, शहर सचिव निलेश मुंदडा, खजीनदार सुरेश धुमाळ, संघटक सुनील जगताप, छबुराव शिंगाडे, प्रभाकर नाईक, गोविंदराव नन्नवरे, वैशाली नन्नवरे, अशोक शिंदे मोर्चात सहभागी झाले होते. भाववाढ थांबवावी, साठेबाजांवर कारवाई करावी, सुशिक्षित बेरोजगार व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, शासकीय घरकुल योजनेत दलित, आदिवासी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार सोनवणे यांना देण्यात आले.

यूथ रिपब्लिकनच्या ३१ शाखांचे उद्घाटन
कोपरगाव, २८ जुलै/वार्ताहर
तालुक्यात व शहरातील विविध प्रभागांतून यूथ रिपब्लिकनच्या ३१ शाखांचे उद्घाटन संघटनाप्रमुख मनोज संसारे यांच्या हस्ते करण्यात आले. तरुणांनी व्यसनापासून दूर राहून समाजहिताच्या कार्यास वाहून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. नेत्यांमुळे समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार चालत नाही. त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र आज तरुणांमध्ये रुजावा. दिशाहिन समाजाला यूथ रिपब्लिकन पक्षामार्फत विचाराने पुढे न्यावे.यावेळी तालुकाध्यक्ष शेखर केदारे, उपतालुकाप्रमुख अशोक जमाधडे, माजी नगराध्यक्ष बबनराव वाजे, शहराध्यक्ष नितीन शिंदे, उपशहराध्यक्ष रवींद्र जगताप, कार्याध्यक्ष संजय क ोपरे, बापूसाहेब जगधने, सागर डुबे उपस्थित होते.

लायन्स पदाधिकाऱ्यांचे लोणीत आज पदग्रहण
राहाता, २९ जुलै/वार्ताहर
लोणी येथील लायन्स क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ उद्या (गुरुवारी) सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे, अशी माहिती सचिव मनोज राठी यांनी दिली. पदग्रहण समारंभाबरोबरच शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांना मेल्वीन जॉन्स पुरस्कार प्रदान सोहळा, लोणी परिसरातील इयत्ता दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. उपप्रश्नंतपाल मुघल, डॉ. विक्रांत जाधव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे आदी उपस्थित राहणार आहेत.

स्टेट बँकेच्या अद्ययावत केंद्राचे आज उद्घाटन
राहुरी, २९ जुलै/वार्ताहर

भारतीय स्टेट बँकेच्या ग्रामीण भागातील पहिल्या अद्ययावत व्यवसाय केंद्राचे (ई लॉबी) उदघाटन उद्या (गुरुवार) दुपारी ३ वाजता बँकेचे मुंबई मंडलचे मुख्य महाप्रबंधक शामल आचार्य यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राहुरी शाखा व्यवस्थापक सुभाष चोपडे यांनी दिली.नगर-मनमाड राजमार्गावरील शिर्डी-शिंगणापूरला ये-जा करणाऱ्या भाविकांची सोय, तालुक्यातील बँकेचे ग्राहक, व्यापारी, नोकरदारांच्या मागणीनुसार एटीएम सेंटर सुरू करण्यात येत आहे.