Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

नागपूरचा गुप्ता समूह आयकराच्या फेऱ्यात
* देशभरातील २१ कार्यालयांवर छापे
* कोळसा, रिअल इस्टेट व्यवसायात करचोरी
* नागपुरातील ४ निवासस्थानांचीही झडती
* १० कोटी रोख, २० लाखांचे सोने जप्त

नागपूर/चंद्रपूर, २९ जुलै/प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेल्या आयकर विभागाने कोळसा उद्योगात आघाडीवर असलेल्या गुप्ता समूहाच्या देशभरातील २१ कार्यालयांवर आणि नागपुरातील ४ निवासस्थानांवर छापे टाकल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या दोन्ही व्यावसायिक समूहांवर मोठय़ा प्रमाणात कर चुकवल्याचा संशय आहे. बुधवारी टाकलेल्या छाप्यांमध्ये गुप्ता बंधूंकडून १० कोटी रुपये रोख, २० लाखांचे सोने आणि बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.

मराठी, हिंदी शाळेत गणित, विज्ञान इंग्रजीतून
चालू सत्रापासून अंमलबजावणी

नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी

हिंदी आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे दोन विषय आता ऐच्छिक स्वरुपात इंग्रजी भाषेतून शिकविण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात नुकताच शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने आदेश काढला असून या सत्रापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आता शाळांच्याही गुणवत्तेचे मूल्यमापन
राम भाकरे ,नागपूर, २९ जुलै

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करणाऱ्या शाळांचेही आता मूल्यमापन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने शाळेच्या मूल्यमापनासाठी भारतीय मूल्यमापन समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीद्वारे शाळांना मान्यता देण्यात येणार आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत चार-पाच वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर देण्यात येत असून त्यासाठी राज्य सरकारने विविध उपक्रम सुरू केले आहेत.

मॅक्सीकॅब की नागरी सुविधा?
नागपूर, २९ जुलै/ प्रतनिधी

शहरात नागरी सुविधा पुरवण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या महापालिकेने वातानुकूलित ‘मॅक्सीकॅब’ टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महापालिकेने प्रथम नागरी सुविधांवर लक्ष कें द्रित करावे व नंतर इतर सेवांकडे लक्ष द्यावे, असे मत खुद्द काही नगरसेवकांनीच व्यक्त केले तर काहींनी मॅक्सीकॅबची सेवाही गरजेची आहे, असे मंत मांडले. महापालिकेचा २००९-१० या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला.

गावोगावी रस्त्यांचे जाळे
मोहन अटाळकर

तिवसा मतदार संघाचे विधानसभत दुसऱ्यांदा नेतृत्व करीत असलेल्या साहेबराव तट्टे यांनी त्यांच्या या कार्यकाळात गावोगावी रस्त्यांचे जाळे, पाणीपुरवठा योजना आणि सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रश्नधान्य दिले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक कामे मार्गी लागली. महानुभाव पंथीयांची काशी म्हणून ओळख असलेल्या रिध्दपूरला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मोर्शी तालुक्यातील ७० गावांची पाणीपुरवठा योजना त्यांच्या प्रयत्नाने पूर्णत्वास आली. अप्पर वर्धा धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत यावे यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला आणि सुमारे २१२ कोटी रुपयांची गुरूकुंज मोझरी उपसा जलसिंचन योजना मंजूर झाली.

कुटुंब न्यायालयाची आवश्यकता वाढली -डॉ. कुसुमताई वांकर
मीरा खडक्कार यांचा सत्कार
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी
समाजामध्ये एकत्र कुटुंबाची घडी विस्कळीत होत असताना कुटुंब न्यायालयाची आवश्यकता आज जास्तीच वाढल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. कुसुमताई वांकर यांनी केले. हायकोर्ट बार असोसिएशन व विदर्भ लेडी बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मीरा खडक्कार यांचा कुसुमताई वांकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.

शेतकऱ्यांवर केलेल्या खर्चाची सरकारने श्वेतपत्रिका काढावी
भाजप किसान मोर्चाची मागणी
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी
राज्य सरकारवर १ लाख ७० हजार कोटींचे कर्ज असून त्यातील किती निधी शेतकऱ्यांवर खर्च झाला, यासाठी शासनाने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाने केली आहे. यात पॅकेजची अंमलबजावणी, कर्जाचा लाभ आणि शेतकऱ्यांच्या स्थितीचा उल्लेख करावा तसेच, उंट अळीचा प्रश्नदुर्भाव झालेल्या भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणीही प्रदेश कार्यकारिणीत आज करण्यात आली.

घरांच्या सुरक्षेवरही खर्च करा
पोलीस आयुक्तांचा सल्ला
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी
पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांनी नुकतीच सारथी या सामाजिक संस्थेला भेट दिली. या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्यात विविध सामाजिक समस्यांवर चर्चा घडवून आणली जाते व प्रश्नांची उकल करण्यासाठी संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रित केले जाते. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष शंकर जुनघरे यांनी प्रवीण दीक्षित यांचे स्वागत केले. सारथीचे संस्थापक सचिव अमर वझलवार यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

विधानसभा निवडणुकीसाठी आंबेडकरांची पर्यायी आघाडी
कुणाशीही युतीचे दरवाजे खुले
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात पर्यायी आघाडी स्थापन करण्याच्या दिशेने पावले उचलली असून कोणत्याही पक्षासोबत आघाडी किंवा युती करण्याचा पर्याय खुला ठेवून त्यांनी नव्या राजकीय समिकरणाचे संकेत दिले आहेत.

राज्य शासनाकडून महिला आयोगाची उपेक्षा
वाढीव अनुदानाची मागणी दफ्तरदिरंगाईत
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी
महिलांना राजकारणात ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचे विधेयक अद्याप संसदेत संमत होऊ शकले नसल्यामुळे महिलांचे महत्त्व मान्य करण्याबाबत राजकीय नेते कितपत गंभीर आहेत हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. राज्य महिला आयोगाची किती उपेक्षा होत आहे, हे पाहिले तर महिलांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचाच मुद्दा अधोरेखित होतो. आयोगाने अनुदानाची रक्कम वाढवून मागितली असली तरी सरकारने ती अद्याप मंजूर केलेली नाही.

रेल्वे तिकिटांचा काळा बाजार;
दलाल अटकेत

नागपूर, २९ जुलै/ प्रतिनिधी

रेल्वे तिकिटांचा काळा बाजार करणारा एक दलाल नागपूर रेल्वे स्थानकावरील संत्रा मार्केटद्वार परिसरात आज रेल्वे सुरक्षा दलाच्या जाळ्यात अडकला.शहरात रेल्वे तिकिटांचा काळा बाजार करणारे रॅकेट आहे. शहरातील विविध तिकीट आरक्षण केंद्रातून पुणे, मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली, इंदूर या शहरांसाठीची अनेक तिकिटे आधीच खरेदी केली जातात. त्यामुळे या गाडय़ांना सदैव आरक्षण ‘फुल्ल’ असते.

अनैतिक संबंधाच्या संशयावरून सावत्र भावाचा खून
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सावत्र भावाचा निर्घृण खून केल्याची घटना सक्करदरा पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या आनंदनगरात मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली.
सुनील भलमे हे आरोपीचे नाव आहे. सुनील हा त्याची आई, पत्नी व सावत्र भाऊ श्रीकांत ममतेश्वर भलमे याच्यासह आनंदनगरात राहतो. त्याच्या पत्नीशी श्रीकांतचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. मात्र, या संदर्भात तो कुणाशीच काही बोलला नाही. काल मध्यरात्री त्याने धारदार शस्त्राने श्रीकांतचा निर्घृण खून केला. हे दृश्य पाहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांच्या किंचाळण्याने आनंदनगर परिसर जागा झाला. कुणीतरी दिलेल्या माहितीवरून सक्करदरा पोलीस तेथे पोहोचले असता घरात श्रीकांतचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हात, पाय, पोट व मानेवर धारदार शस्त्राचे वार होते. धडापासून मान लोंबकळत होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवला. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी सुनील भलमे फरार झाला होता. सक्करदरा पोलिसांनी सुनीलच्या आईच्या तक्रारीवरून सुनीलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शोध घेऊन सायंकाळी आरोपी सुनीलला अटक केली.

बाजार समितीवर केदार गटाचे वर्चस्व
सावनेर, २९ जुलै / वार्ताहर

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सुनील केदार गटाचे १२ उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्यांच्या गटाचे सात सदस्य यापूर्वीच अविरोध निवडून आले होते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर केदार गटाचे एकछत्री साम्राज्य उभे झाले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २५ जुलैला पार पडलेल्या निवडणुकीत १२ जागांसाठी मतदान झाले. केदार गटाच्या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये अजय केदार, ईश्वर घोडमारे, रवींद्र चिखले, विठोबा पावडे, प्रकाश पांडे, माधव महल्ले, रामू मिरचे, वीरेंद्र चोपडे, प्रकाश खापरे, गुलाब पिंटुरकर, मनोज बन्सोड, श्रावण दुरुगवार यांचा समावेश आहे. विनोद जैन, राजू महाजन, सरस्वती कडू, कल्पना महंत, अशोक बावणे, रामभाऊ भुजाडे, चंद्रभान सुपारे हे संचालक अविरोध निवडून आले होते.निवडणुकीनंतर माजी मंत्री बाबासाहेब केदार व आमदार सुनील केदार यांनी नवनिर्वाचित संचालकांना संबोधित केले. पुढे विधानसभेची निवडणूक असून त्या दृष्टीने आतापासूनच प्रयत्न करा, असे भावपूर्ण आवाहन बाबासाहेब केदार यांनी केले. हा विजय कार्यकत्यार्ंचा असल्याची प्रतिक्रिया सुनील केदार यांनी व्यक्त केली. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुणवंत केदार, विवेक मोवाडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शेषराव रहाटे, अ‍ॅड. जयंत खेडकर, अनिल रॉय, कांताराम भोयर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

५९ वे विदर्भ साहित्य संमेलन चंद्रपुरात
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी
विदर्भ साहित्य संघाचे ५९ वे साहित्य संमेलन डिसेंबरमध्ये चंद्रपुरात होणार आहे. सवरेदय शिक्षण मंडळाच्या वतीने चंद्रपुरातील सरदार पटेल महाविद्यालय परिसरात हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. विदर्भ साहित्य संमेलनासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांनी निमंत्रण दिले असून वि.सा. संघाने त्याला संमती दिली आहे. विशेष म्हणजे वि.सा. संघाचे कार्य अधिक लोकाभिमुख करण्यात बहुमोल योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक, भाषाप्रभू डॉ. राम शेवाळकर यांच्या स्मृतींना हे संमेलन समर्पित करण्यात येणार आहे. यापूर्वीचे मलकापूर येथे झालेले संमेलन डॉ. वि.भि. कोलते यांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आले होते. चंद्रपूर येथे १९५० आणि १९९१ मध्ये विदर्भ साहित्य संमेलन झाले आहे. तसेच १९७९ मध्ये अ.भा. मराठी साहित्य संमेलनही या शहरात झाले आहे. वि.सा. संघाचे ५९ वे संमेलन अविस्मरणीय ठरेल, असा विश्वास शांताराम पोटदुखे यांनी व्यक्त केला आहे. संमेलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी सांगितले.

हडस हायस्कुलमध्ये वनमहोत्सव साजरा
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी
हडस हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज आणि हडस उच्च प्रश्नथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वनमहोत्सवांतर्गत नुकताच वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. िदडीद्वारे विद्यार्थ्यांच्या मनावर वृक्षांविषयीची आत्मियता, वृक्षांची मौलिकता हे संस्कार बिंबवण्यात आले. वृक्षारोपणातून पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी नव्या पिढीने सक्रीय व भरीव कार्य केले पाहिजे हा संस्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव डॉ. ए.पी. जोशी, मुख्याध्यापिका मेंघळ, बेंद्रे, उपमुख्याध्यापिका शेळके, पर्यवेक्षिका पिंपरकर व शिक्षक चांदोरकर उपस्थित होते.

कोतवालांचे शनिवारी नांदेडमध्ये जेलभरो आंदोलन
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी
राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शनिवारी, १ ऑगस्टला नांदेड येथे राज्यभरातील कोतवाल जेलभरो आंदोलन करणार आहेत. कोतवालांना चतुर्थश्रेणी देण्यात यावी, या मागणीसाठी मुंबई व नागपूरमध्ये अनेक आंदोलने करण्यात आली. मुख्यमंत्र्यांसह महसुलमंत्री, संबंधित खात्याचे प्रधान सचिव, अप्पर सचिव आणि उपसचिवांना निवेदने देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी कोतवालांच्या चतुर्थ श्रेणीच्या मागणीची दखल घ्यावी, याकरता मुख्यमंत्र्यांच्या जन्मभूमीतच राज्यातील शेकडो कोतवाल येत्या १ ऑगस्टला नांदेड येथे जेलभरो आंदोलन करणार आहेत. नांदेड येथील आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस उत्तमराव गवई यांनी केले आहे.

‘मदन एक क्रांतियज्ञ’साठी आज कलावंतांची निवड
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी
भारताला स्वातंत्र मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मदनलाल धिंग्रा यांच्या शताब्दीवर्षानिमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर काढण्यात येणाऱ्या ‘मदन एक क्रांतियज्ञ’ या नाटकासाठी उद्या, ३० जुलैला कलावंतांची निवड करण्यात येत आहे. एकलव्य युवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने धिंग्रा यांच्या कार्याचा आढावा घेणारे हे नाटक कृष्णापंडित यांनी लिहिले आहे. राज्यभर या नाटकाचे प्रयोग सादर करण्यात येणार आहे. संत जगनाडे चौकातील केशवनगर शाळेत नाटकातील पात्रांसाठी कलावंतांची निवड केली जाणार आहे. इच्छुकांनी ३० जुलैला सायंकाळी ६ वाजता केशवनगर शाळेत उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी स्वप्नील बोहटे, प्रसाद ढाकूलकर, प्रवीण खापरे, नितीन ठाकरे किंवा भ्रमणध्वनी क्र. ९९७०८०८७८३, ९३७१४६३३९८ येथे संपर्क साधावा.

साईदत्तपीठात विविध धार्मिक कार्यक्रम
नागपूर, २९ जुलै/प्रतिनिधी
सुर्वेनगर जयताळा रोडवरील श्री साईदत्तपिठाला येत्या ३१ जुलैला दोन वष्रे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ३१ जुलैला धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता प्रशांत कवीमंडन यांच्या पौरोहित्याखाली श्रींची प्रश्नणप्रतिष्ठा तसेच, षोड्शोपचार पुजा करण्यात येईल. दुपारी ४ वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत वेदमुर्ती गोविंद आर्वीकर आणि ब्रम्हवंृद यांच्या पौरोहित्याखाली पाद्यपुजा करण्यात येईल. या कार्यक्रमाला साईदत्तपीठाचे पीठाधीश प.पू. साईदत्तनाथ पूर्णवेळ उपस्थित राहील. कार्यक्रमाला सर्व साईभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पीठातर्फे करण्यात आले आहे.

सा.बां. विभाग कर्मचाऱ्यांचा ४ ऑगस्टच्या संपात सहभाग
नागपूर, २९ जुलै/प्रतिनिधी
सरकारी-निमसरकारी कर्मचारी, राजपत्रित अधिकारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार एकूण ३२ मागण्यांसाठी आमदार निवास व सर्व सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी ४ ऑगस्टपासून बेमुदत संपात सहभागी होणार आहेत. केंद्रीय दराने घरभाडे भत्ता, वाहन भत्ता, शैक्षणिक सवलती, निवृत्तीवेतन सुधारणा, उपदान, किमान निवृत्ती वेतन मासिक ३५०० रुपये, दुसरी कालबद्ध पदोन्नती, पाच दिवसांचा आठवडा, अपंग चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नोकरी तसेच खासगीकरण रद्द करणे यासह एकूण ३२ मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. या बेमुदत संपात सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे सरचिटणीस दौलत शास्त्री, अशोक तायडे (आमदार निवास विद्युत शाखा), केशव शास्त्री (आमदार निवास उद्यान शाखा), शिंगेवार (आमदार निवास कार्यालयीन आस्थापना) आणि महेंद्र फुलझेले (आमदार निवास तांत्रिक शाखा) यांनी केले आहे.

नि:शुल्क थॅलेसेमिया तपासणी शिबीर
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी
नवजीवन उज्ज्वल सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे २ ऑगस्टला छाप्रुनगरातील फुलवानी सभागृहात नि:शुल्क थॅलेसेमिया, मधुमेह व रक्त गट तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात डॉ. विंकी रुघवानी, डॉ. अनिल जवाहरानी, डॉ. राजीव चावला, डॉ. अरविंद मालवीय, डॉ. चंद्रकांत मुखी रुग्णांची तपासणी करतील. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेण्याचे आवाहन नवजीवन उज्ज्वल सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रताप मोटवानी यांनी केले आहे.
कुणबी समाजातील गुणवंतांचा सत्कार
तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे सर्व शाखीय कुणबी समाजातील ७५ टक्केच्यावर दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये गुण प्रश्नप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात घेण्यात येईल. ७५ टक्केच्या वर गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी गुणपत्राची झेरॉक्स प्रत त्यावर स्वत:चा पत्ता लिहून पाठवायची आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ९३२५२९९२४४, ९३२५०८५८५६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

‘कोशिश’च्या वतीने चष्मे व नोटबुकचे वाटप
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी
कोशिश फाऊंडेशनच्यावतीने कृष्णनगर सेमिनरी हिल्स येथील प्रियदर्शनी विद्यानिकेतन प्रश्नथमिक शाळेत मोतिबिंदू शस्त्रकिया करण्यात आलेल्या रुग्णांना चष्मे व विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप संस्थेचे अध्यक्ष सलील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कोशिश फाउंडेशनतर्फे नेहमी गरजूंना मदत केली जाते. सर्व समाजातील शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात जे मागे पडत आहेत त्यांना मदतीचा हात देण्यासाठी कोशिश फाऊंडेशन नेहमी अग्रेसर असते, असे देशमुख म्हणाले. यावेळी माजी नगरसेविका रेखा कारोंडे, गब्बर आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक विद्या निकेतन प्रश्नथमिक शाळेचे संचालक मुकेश शर्मा व संचालन शकील यांनी केले. श्व्ोता शाहू यांनी आभार मानले.

सिंदीबनात पोलीस मित्रांची शांतता बैठक
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी
सिंदीबन, ताजाबाग येथे पोलीस मित्रांची शांतता बैठक पार पडली. सामाजिक कार्यकर्ते हाजी सय्यद अमजद व सक्करदरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे प्रश्नमुख्याने उपस्थित होते.या भागात चोरी, दरोडा, महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढणे आदी गुन्हे मोठय़ा प्रमाणात घडत असल्याने परिसरातील नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचे हाजी सय्यद यांनी सांगितले. शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने तरुण मुले वाम मार्गाला लागत आहे. या भागातील महिला, तरुणींना घराबाहेर पडणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे गस्त वाढल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल, असा विश्वासही सय्यद यांनी व्यक्त केला. या भागातील सुशिक्षित तरुणांनी पोलीस मित्र बनण्याचे आवाहन करून परिसरात गस्त वाढवण्यात येईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक इंगळे यांनी याप्रसंगी दिले. या भागातील तरुणांनी पोलिसांना सहकार्य करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. याप्रसंगी अनिस बेग, अस्पाक बेग यांनीही त्यांचे विचार मांडले. बैठकीला सय्यद अहमद अली, सय्यद सलीम, युनुस खान, असीफ खान, अजमत खान, साहिद अहमद उपस्थित होते. नुरुल लतिफ यांनी आभार मानले.

पंचायत समितींच्या सभापतींची उद्या आरक्षण सोडत
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील १३ पंचायत समित्यांच्या सभापतींच्या आरक्षणाची सोडत येत्या शुक्रवारी, ३० जुलैला दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत सभागृहात काढण्यात येणार आहे.राज्य शासनाच्या परिपत्रकान्वये महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नियम १९६२ च्या तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि महिलांकरिता सभापती पदाचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे. हे आरक्षण निश्चित करताना ज्या पंचायत समित्यांमध्ये आधीच्या निवडणुकीमध्ये या प्रवर्गासाठी पदे आधीच आरक्षित ठेवण्यात आलेली असतील अशा पंचायत समित्यांना वगळून उर्वरित पंचायत समित्यांमध्ये आरक्षण फिरते ठेवण्यात येणार आहे.नागपूर जिल्ह्य़ातील १३ पंचायत समित्यांकरिता सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत ३१ जुलैला दुपारी १२ वाजता बचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे होणार आहे. या सभेत खासदार, आमदार, मान्यताप्रश्नप्त राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य सोडतीच्या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेने केले आहे.

विदर्भ परिचारिका संघटना ५ ऑगस्टपासून संपावर
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी
केंद्र व राज्यातील परिचारिकांच्या वेतनातील तफावत दूर करावी आणि बदली कायद्यातून वगळण्यात यावे, या दोन मागण्यांसाठी विदर्भ परिचारिका संघटना येत्या ५ ऑगस्टपासून बेमूदत संपावर जात आहेत. राज्य फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिचारकिांच्या मागणीसाठी शासनाचे मुख्य सचिव, आरोग्यमंत्री, संचालक यांच्याबरोबर अनेकदा चर्चा केली. आरोग्यसेवेतील परिचारिकांना मिळणारे भत्ते ते सुद्धा वैद्यक शिक्षण संशोधन येथे कार्यरत असलेल्या परिचारिकांना देण्यात आलेला नाही, अशी परिचारिकांची ओरड आहे. प्रशासन परिचारिकांच्या मागण्यांबाबत उदासिन आहे. परिचारिकांची कौटुंबिक जबाबदारी, सामाजिक काम, सामाजिक बांधिलकी यामुळे बदलीच्या धोरणातून परिचारिकांना वगळावे, या मागण्यांकरता राज्यातील सर्व स्तरातील परिचारिका येत्या ५ ऑगस्टपासून बेमूदत संपावर जाणार आहेत.

प्रश्नचार्य संजय गुल्हाने यांच्या चित्रांचे आजपासून प्रदर्शन
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी

मुंडले एज्युकेशनल ट्रस्ट संचालित सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्टस् (सिस्फा)तर्फे लक्ष्मीनगरातील सिस्फा की छोटी गॅलरीत सुरू असलेल्या मान्सून बोनांझा या चित्रप्रदर्शन मालिकेत शेवटचे प्रदर्शन खामगावच्या पंधे गुरुजी चित्रशिल्प महाविद्यालयाचे प्रश्नचार्य संजय गुल्हाने यांनी रेखाटलेल्या चित्रांचे ‘रिपलेक्शन्स’ या शिर्षकाखाली आयोजित करण्यात आले आहे. उद्या, गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता प्रहारचे संस्थापक कर्नल सुनिल देशपांडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. १ ऑगस्टपर्यंत दररोज सायंकाळी ४.३० ते ८.३० या वेळेत प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहील. मूळ देखाव्यापेक्षा पाण्यातील प्रतिबिंब रसिकांना आकर्षित करते, कारण पाण्यावर उमटणारी प्रतिमा ही पाण्याच्या सर्व लहरी व तरंगाच्या तरल संवेदनाक्षम जाणिवांनी प्रकट होत असते. संजय गुल्हाने यांनी याच भावनेतून वेगळ्या आशयाची चित्रे रेखाटली आहेत. लॅन्डस्केप, पोट्रेट, स्टील लाईफ या विषयात त्यांचा हातखंडा आहे. या चित्रप्रदर्शनाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकात चन्न्ो यांनी केले.

पाच महिला व चौदा पुरुष कैद्यांना मिळणार मुक्त विद्यापीठाची पदवी
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल पदवी प्रदान करण्यात येणार आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातील पाच महिला आणि चौदा पुरुष कैद्यांना पदवी मिळणार आहे. राज्यातील कारागृहाच्या इतिहासात प्रथमच एकोनविस कैद्यांना पदवी प्रदान करण्यात येत आहे.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी मोफत अभ्यासकेंद्र चालविण्यात येते. २००१ पासून हे केंद्र सुरू असून अनेक कैद्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. आतापर्यंत ३८ पुरुष कैदी पदवीधर झाले असून प्रथमच पाच महिला कैद्यांना पदवी पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. यानुसार मुक्त विद्यापीठाने मे महिन्यात घेतलेल्या बी.ए. तृतीय वर्षाच्या परीक्षेत पाच महिला कैदी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. कैद्यांना मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वा.दि. बुरवाले, उपअधिक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ए.ए. पिल्लेवान, वरिष्ठ तुरुंगाधिकारी जे.बी. मिश्रा आदी अधिकारी कैद्यांना त्यांच्या शिक्षणात मदत करतात. तर कैद्यांना डी.के. सराफ, अंकुश ढेंगळे आणि आर.एम. गवळी यांनी बी.ए शाखेचा अभ्यासक्रमात विविध विषयांची माहिती व इतर सर्वप्रकारचे सहकार्य केले. तर मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक प्रश्न. अरविंद बोंद्रे यांनी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

प्रफुल्ल पोतले याला के.के. हेब्बर पारितोषिक
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी
शासकीय चित्रकला महाविद्यालयातील रंगकलाच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी प्रफुल्ल पोतले याला मान्सून शो २००९ चे के.के. हेब्बर प्रथम पारितोषिक मिळाले आहे. महाराष्ट्रातील कला संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीत दरवर्षी या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. प्रदर्शनात याच महाविद्यालयातील चैतन्य इंगळे व निलेश रहमतकर यांच्यासह पुणे, मुंबई, सांगली, औरंगाबाद, ठाणे, नाशिक, वसईमधील प्रत्येकी तीन ते चार विद्यार्थी सहभागी झाले होते. सलग दुसऱ्या वर्षी हा बहुमान शासकीय चित्रकला महाविद्यालयाला मिळाला आहे. नवोदित कलावंताच्या चित्राचे कौतुक व विक्रमी विक्री या प्रदर्शनातून होत असते. महाविद्यालयातील प्रश्न. प्रभाकर पाटील यांचे या विद्यार्थ्यांना मागदर्शन लाभले आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रश्न. अरुण दारोकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. हे तिन्ही विद्यार्थी विविध प्रदर्शनात सहभागी झाले असून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

हिंदुस्थान पेट्रोलियमचे ११०० सिलेंडर जप्त
कमी गॅस भरल्याचे आढळले
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी

हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि.च्या खापरी येथील एल.पी.जी. बॉटलिंग प्लान्टमध्ये वैधमापन शास्त्र विभागाने अचानक टाकलेल्या छाप्यात सिलेंडरमध्ये कमी गॅस भरल्याचे आढळून आल्याने २० लाख ४५ हजार १०० रुपये किमतीचे १ हजार १०० घरगुती व व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर जप्त केले आहेत.वितरकांकडून देण्यात येत असलेल्या सिलेंडरमध्ये कमी गॅस असल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारींच्या आधारावर वैधमापन शास्त्र विभागाने ही कारवाई केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी खापरी येथील हिंदूस्थान पेट्रोलियमच्या एल.पी.जी. बॉटलिंग प्लान्टमधील वितरणाकरिता उपलब्ध असलेल्या सिलेंडरची तपासणी केली असता घरगुती वापरासाठी असलेल्या १४.२ कि.ग्रॅमच्या सिलेंडरमध्ये ३५ ग्रॅम व व्यावसायिक वापरासाठी असलेल्या १९ कि.ग्रॅ.सिलेंडर मध्ये १९ ग्रॅम कमी गॅस आढळून आला. आवेष्टित वस्तू नियमाच्या नियम २४ व २५ अंतर्गत कारवाई करून घरगुती वापराचे ७००व व्यावसायिक वापराचे ४००, असे एकूण ११०० सिलेंडर्स जप्त करण्यात आले. याची एकूण किंमत २० लाख ४५ हजार १०० रुपये इतकी आहे.या कारवाईत कामठीचे वैद्यमापन शास्त्र निरीक्षक नालमवार, नागपूर वैद्य मापनशास्त्र निरीक्षक गुल्हाने व निरीक्षक गौर, हिंगणा यांनी सहकार्य केले.


मैत्री दिनी हॉटेल प्रश्नईडमध्ये ‘फ्रेंडस् फिएस्टा’ कार्यक्रम
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी

मैत्री दिनाचे औचित्य साधून खास तरुण तरुणींसाठी ‘फ्रेंडस् फिएस्टा’ कार्यक्रम हॉटेल प्रश्नईड येथे २ ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे. दोन सत्रात होणारा हा कार्यक्रम सकाळी ११ ते सायंकाळी ५ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजतापर्यंत होणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्रश्नप्त महिला डिजे रिंक राहणार आहे. यावेळी बॉलीवूडमधील हिट गाण्यांवर बेधुंद होऊन नाचण्याचा आनंद लुटता येणार आहे. तसेच यावेळी ‘फास्ट फॉरवर्ड’ चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या रेहान खान उपस्थित राहणार आहे. याचबरोबर बॉलिवूडमधील नवोदित गायक विजय अमीन रसिकांसमोर गाणी सादर करणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युटीव्हीवर बिंधास्त या कार्यक्रमाचे संचालन करणारी आलिया खान करणार आहे. या कार्यक्रमाला युनिव्‍‌र्हस रिअल इन्फ्रा इंडिया प्रश्नयव्हेट लिमिटेड, हॅमस्टेक, कट्ज, राज विष्णू टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स यांनी प्रश्नयोजित केले आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी (९३७३०१३४८४) क्रमांकावर संपर्क साधावा.

‘अ‍ॅडफॅक्टर्स’ची आयपीओ नर्चर सेवा
कॉर्पोरेट व वित्तीय सेवा क्षेत्रासाठी जनसंपर्क सल्ला सेवा देण्यात देशात अग्रस्थानी असलेल्या अ‍ॅडफॅक्टर्स पीआर कंपनीने आयपीओ नर्चर नावाची एक खास सेवा सुरू केली आहे. या सेवेद्वारे ज्या कंपन्या येत्या काही वर्षात आयपीओ म्हणजे प्रश्नरंभिक खुली समभाग विक्रीच्या माध्यमातून भांडवल उभारू इच्छित आहेत, अशा कंपन्यांसाठी एक अद्वितीय सेवा आहे.
आयपीओ नर्चर हा आयपीओ प्रक्रियेतून अधिकाधिक भांडवल उभारण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला एक बहुव्यापक कार्यक्रम आहे. कंपनीची प्रतिष्ठा आणि प्रतिमा यात वाढ करून वित्तीयसेवा कंपन्यांवर सकारात्मक प्रभाव टाकण्यासाठी कार्यक्रम आखणे हे आयपीओ नर्चर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच कंपनी व्यवस्थापनास आयपीओ प्रक्रियेतील आव्हाने यशस्वीपणे पेलण्याचे कौशल्य प्रदान करण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा आणि ओळख कार्यक्रम आयोजित करणे आदी उपक्रम नर्चरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. आयपीओ नर्चर सेवा खास चमूतर्फे राबविण्यात येणार आहे. या चमुतील तज्ज्ञांची निवड कॉर्पोरेट, वित्तीय सेवा, क्रायसिस कम्युनिकेशन आणि कॉर्पोरेट प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांचा अनुभव असलेल्या व्यक्तींतून करण्यात आली आहे.

बजाजची १०० सीसी डिस्कव्हर बाजारात
बजाज ऑटो लिमिटेडने नवीन १०० सीसी क्षमतेची डिस्कव्हर डीटीएस-एस आय मोटरसायकल डिजीटल- स्वीर्ल इंडक्शन व्हर्जन २.० इंजिनच्या श्रृंखलेसह बाजारात सादर केली आहे. नवीन तंत्रज्ञानयुक्त १०० सीसी डिस्कव्हर डीटीएसएस आय ही इतर कुठल्याही १०० सीसी मोटारसायकलच्या तुलनेत सर्वात जास्त मायलेज देणारी मोटरसायकल ठरणार आहे. रस्त्यांवर केलेल्या व्यापक परिक्षणांनंतर वास्तविक ड्रायव्हिंग परिस्थितीत नवीन डिस्कव्हर मोटारसायकल ८० किलोमीटर प्रति लीटर मायलेज दिले असून ते भारतातील कुठल्याही १०० सीसी मोटरसायकलच्या मायलेजपेक्षा १५ ते १६ किलोमीटरने अधिक आहे. नवीन डिस्कव्हरमध्ये उच्च श्रेणीच्या मोटारसायकलची सर्व वैशिष्टय़े आहेत. यात इलेक्ट्रीक स्टार्ट सुविधा, नायट्रॉक्स सस्पेंशन ज्यामुळे खराब रोडवरही आरामदायक प्रवासाचा आनंद मिळतो. अधिक लांब व्हिलबेस, ५ स्पीड गिअर बॉक्स, चार्ड इंडिकेटरसह मेंटेनन्स विरहीत बॅटरी आदी वैशिष्टय़े आहेत. तसेच यामध्ये डीटीएसएस आय काळ्या रंगाच्या प्रेझेनटेशनसह कोम स्टायलिंग एलिमेंट, आकर्षक एलईडी टेल लॅम्प आणि आणि अलॉयव्हील आदी काही वैशिष्टय़े देखील नवीन मोटरसायकलमध्ये देण्यात आली आहेत. ही नवीन मोटरसायकल पाच नवीन रंगांमध्ये सादर करण्यात येणार असून बाजारात ४० हजार रुपये एक्सशोरुम किंमत राहणार आहे.

इंटेक्स टेक्नॉलॉजीचे नवे मोबाईल फोन
इंटेक्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या आयटी हार्डवेअर, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील झपाटय़ाने वाढणाऱ्या कंपनीने मोबाईल फोनच्या व्यवसायात नव्या उत्पादनांचे सादरीकरण केले आहे. कंपनीने त्यांच्या डय़ुअल जीएसएम सिम फोन इन ४४८८ आणि इन ३०८० हे मोबाईल सादर केले आहेत. कंपनीने ऑक्टोबर २००९ पर्यंत पूर्व विदर्भातल्या हॅन्डसेट मार्केटमध्ये १० टक्के वाटा काबिज करण्याचा निश्चय केला आहे. कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले डय़ुअल सीम तंत्रज्ञान दोन वेगवेगळ्या जीएसएम क्रमांकावरून सिमलेस संभाषणाचा अनुभव मिळवून देणार आहेत. इन ४४८८ हा सध्या बाजारात असलेल्या अशाप्रकारच्या डय़ुअल सीम मोबाईल हॅन्डसेटपैकी एक क्लॅमशेल संच आहे. अनेक सुविधा असलेल्या या मोबाईलमध्ये ब्लुटूथ, कॅमेरा, एफएम रेडियो, ऑडियो प्लेअर, ४ जीबी पर्यंतची विस्तारित मेमरी आणि भरपूर फोनबूक मेमरी तसेच ८०० नावांइतकी साठवणुकीची क्षमता आहे. २.४ टिएफटी सिसिटीएन स््रकीन आणि इंग्रजी तसेच हिंदी अक्षरे असलेल्या किपॅडमुळे याचा वापर अधिक सुलभ झाले आहे. स्टायलीश मोबाईल वापरणाऱ्यांसाठी इन ३०८० संच सादर केला आहे.

केपीआयटी कमिन्सच्या नफ्यात वाढ
केपीआयटी कमिन्स ने ३० जून २००९ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत २२.३७ कोटी रुपये निव्वळ नफा मिळविला आहे. गेल्या वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत हा नफा ७६ टक्के जास्त आहे. तर या आधीच्या (ऑक्टोबर-डिसेंबर) तिमाहीच्या तुलनेत १६ टक्के जास्त आहे. कंपनीच्या प्रति शेअर उत्पन्नात गेल्या वर्षाच्या तुलनेत ७३ टक्के तर गेल्या तिमाहीच्या तुलनेत १६ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल-जून तिमाहीत कंपनीने पाच नवे ग्राहक संपादित केले असून आता कंपनीच्या ग्राहकांची संख्या १३३ झाली आहे. कंपनीच्या २००९-१० मधील पहिल्या तिमाहीतील कामगिरीविषयी अध्यक्ष आणि समूहाचे प्रमुख रवि पंडित म्हणाले, ‘कामातील सर्वोच्च दर्जा राखण्यावर संपूर्ण भर देण्याच्या आमच्या धोरणाला मिळालेले हे यश आहे. हेच धोरण आम्ही पुढेही चालू ठेवू आणि ग्राहकांचा फायदा केंद्रस्थानी ठेवून कंपनीची वेगवान प्रगती घडवून आणू.’ निवडक आणि नेमक्या क्षेत्रात काम करण्याच्या आमच्या धोरणामुळे युरोप आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रात नवे ग्राहक संपादित करण्यात आम्ही आघाडी घेतली आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर पाटील यांनी सांगितले.

सॅमसंगचे ‘लॅव्हेन्डर एलसीडी मॉनिटर्स’
सॅमसंग इंडियाने सॅमसंग लॅव्हेन्डर सिरीज ही एलसीडी मॉनिटर्सची नवीन श्रेणी बाजारात आणली आहे. या श्रेणीत २१.५ इंची व २३ इंची वाईड डिस्प्ले फॉरमॅट एलसीडीचा समावेश आहे. याची किंमत २१.५ इंची एलसीडीसाठी रुपये १२,५०० तर २३ इंची एलसीडीसाठी रुपये १३,५०० अशी आहे.

भारती एअरटेलची ‘स्पेशल फाईव्ह’ सुविधा
भारती एअरटेलने ‘स्पेशल फाईव्ह’ ही विशेष मूल्यवर्धित सुविधा सादर केली आहे. एअरटेलच्या या ‘स्पेशल फाईव्ह’ योजनेमुळे ग्राहकांनी निवडलेल्या पाच जवळच्या व्यक्तींच्या एअरटेल मोबाईलवर त्यांना २० पैसे प्रती मिनिट दराने लोकल कॉल, तर ५० पैसे प्रती मिनिट दराने एसटीडी कॉल करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना किफायतशीर दरात आपल्या प्रिय व्यक्तींच्या संपर्कात राहणे आता अधिक सुलभ होणार आहे. याबद्दल बोलताना भारती एअरटेल लिमिटेडचे मुंबई, महाराष्ट्र आणि गोवा मंडळाचे मोबिलिटी विभागाचे सीईओ मनू तलवार म्हणाले, की ‘स्पेशल फाईव्ह’ योजनेद्वारे लोकल आणि एसटीडी कॉल स्वस्त दरात करता येणार असल्यामुळे ही योजना एअरटेलच्या महाराष्ट्र आणि गोवा येथील प्रीपेड व पोस्टपेड अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना फायदेशीर ठरणार आहे. या आकर्षक योजनेमुळे देशातील आमच्या असंख्य ग्राहकांना स्वस्त दरात आपल्या प्रिय व्यक्तींच्या संपर्कात राहता येणार आहे.

‘मॅग्नम कॉन्ट्रा’ फंडासाठी ५० टक्के लाभांश
एस.बी.आय.म्युच्युअल फंडाने त्यांच्या ‘मॅग्नम कॉन्ट्रा’ फंडासाठी ५० टक्के लाभांशाची घोषणा केली आहे. या लाभांशाची रेकॉर्ड तारीख १७ जुलै २००९ आहे. दहा रुपयांच्या एका युनिटमागे ५ रुपये लाभांश मिळणार असून तो संपूर्णपणे करमुक्त असेल. ज्या गुंतवणूकदारांना करमुक्त उत्पन्नाची आवश्यकता असेल त्यांनी या योजनेमध्ये १७ जुलै २००९ला दुपारी ३ वाजतापर्यंत गुंतवणूक करणे योग्य राहील. १० वर्षापूर्वी एस.बी.आय. म्युच्युअल फंडाने प्रथमच म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये कॉन्ट्रा ह्य़ा कल्पनेची सुरवात केली होती. या योजनेने नुकतीच १४ जुलै २००९ रोजी यशस्वी १० वर्षे पूर्ण केली आहेत. या योजनेत ६ लाखाहून अधिक गुंतवणूकदार असून योजनेची एकूण मालमत्ता २६०० कोटी रुपये आहे. योजना ‘ओपन’ एन्डेड (सतत खुली असणारी) असून गुंतवणूकदारांना कमीत कमी २००० रुपये गुंतवणूक करावी लागेल.