Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

नवनीत

प्रथम र्तीथकर ऋषभदेवांनी आपल्या भरत, बाहुबली या पुत्रांसह शंभर पुत्रांना चौसष्ट कलांचं शिक्षण दिलं. गायन, नृत्य, शिल्प, नाटय़, वाद्यं वाजवणं, सैन्याचं संचलन, व्यूहरचना, नगररचना, गृहरचना, वजनं, मापं आदी बहात्तर कला ज्येष्ठ पुत्र भरताला शिकवल्या आणि बाहुबलीला या कनिष्ठ पुत्राला स्त्री-पुरुष भेद, पशुपक्षी, त्यांचे गुण, उपयोग, शुभ-अशुभ वेळा, गणित आणि ग्रहांच्या

 

कक्षा, ज्योतिषविद्या वगैरेमध्ये पारंगत केलं. ब्राह्मी या कन्येसाठी लिपी शोधून काढली. म्हणूनच भाषेचा उद्गम असलेल्या लिपीला ब्राह्मी म्हणतात. त्याहून अठरा भाषा निर्माण झाल्या. दुसरी कन्या सुंदरी हिला अंकलिपी-आकडेशास्त्र शिकवलं आणि स्त्रियांच्या चौसष्ट कलाही शिकवल्या.
ते राज्य करीत असताना एकदा त्यांच्या दरबारात नीलांजना नावाच्या नर्तकीचं उत्कृष्ट नृत्य चाललं होतं. अप्रतिम रूप आणि नृत्याचे आविष्कार पाहून सारा दरबार मंत्रमुग्ध झाला होता. अचानक नीलांजना खाली कोसळली आणि तिच्या मृत्यू झाला. अरे! जीवन इतकं क्षणभंगुर असतं? मग आत्मसाधना, आत्मकल्याण केव्हा करणार? त्यांना वैराग्य आलं. राज्य, सारे सुखोपभोग सोडून ते दीक्षा घेऊन कैलास पर्वतावर गेले. ध्यान, तपश्चर्या, साधना यात रमून गेले. त्यांच्यानंतर ज्येष्ठ पुत्र भरत राज्य चालवू लागला. कधी कधी काही अडचणी आल्या, समस्या उभ्या राहिल्या की भरत चक्रवर्ती ऋषभदेवांकडे येत, उपाय विचारत. कधी कधी धर्मचर्चाही चाले. एकदा भरतानं विचारलं, ‘भगवान, स्वकल्याण श्रेष्ठ की परकल्याण?’ ते म्हणाले, ‘आदहिदं कादव्वं’ आधी स्वत:चं हित हे कर्तव्य आहे. तुमच्याजवळ धर्म, नीति, मूल्य असतील तर तुम्ही जगाला आदर्श ठराल आणि ‘आदहिदं कादव्वं, जदि सक्कइपरहिदंच कादव्व’- आत्महित करा आणि शक्य असेल तर परहित करणंही कर्तव्य आहे. तुम्ही सम्यकचारित्र्य पाळाल तर लोक तुमचा उपदेश ऐकतील आणि त्या मार्गानं स्वकल्याण करून घेतील.’’ गांधीजी आपल्या आत्मचरित्रात म्हणतात, ‘मी माझ्या जीवनात ज्या गोष्टींचं पालन करतो, त्याच गोष्टी करायला, पाळायला मी लोकांना सांगतो.’
लीला शहा

खुजे ग्रह म्हणजे काय? आतापर्यंत कोणते खुजे ग्रह शोधले गेले आहेत?
२४ ऑगस्ट २००६ या दिवशी वैज्ञानिकांच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘खुजा ग्रह’ अशी नवीन संज्ञा तयार करण्यात आली आणि प्लूटोला यापुढे ‘ग्रह’ न म्हणता ‘खुजा ग्रह’ संबोधण्यात यावं असं जाहीर करण्यात आलं. एखाद्या खगोलीय वस्तूला ‘खुजा ग्रह’ ठरवण्यासाठी कोणते निकष वापरावेत, हेही या परिषदेत निश्चित करण्यात आलं. हे निकष पूर्ण करणाऱ्या (प्लूटोशिवाय) चार वस्तू आपल्या सौरमालेत आतापावेतो निश्चित करण्यात आल्या आहेत. इरिस हा खुजा ग्रह प्लूटोपलीकडच्या कुइपर पट्टय़ात आहे. तो २००५ मध्ये शोधला गेला तेव्हा त्याला नाव ठेवण्यात आलं होतं झेना. पण आता मात्र तो इरिस नावानं ओळखला जातो. त्याचा व्यास ३००० कि.मी. म्हणजे प्लूटोच्या व्यासापेक्षा ८०० कि.मी. जास्त आहे. इरिस हा खुज्या ग्रहात सर्वात मोठा आहे. मंगळ आणि गुरू यांच्या दरम्यान असलेल्या लघुग्रहांच्या पट्टय़ात सेरेस हा खुजा ग्रह आढळला आहे. त्याचा व्यास ९५० कि.मी. असून तो (पूर्वी) सर्वात मोठा लघुग्रह मानला जात असे. लघुग्रहांच्या संपूर्ण पट्टय़ापैकी एकतृतीयांश वस्तुमान एकटय़ा सेरेसचं आहे. सेरेसचा शोध फार जुना म्हणजे १८०१ सालचा आहे. मेकमेक नावाचा खुजा ग्रह २००५ साली शोधण्यात आला. त्याचा व्यास प्लूटोच्या व्यासाच्या एकतृतीयांश आहे. त्याचंही स्थान आहे कुइपर पट्टा. याच पट्टय़ात असलेल्या ‘हाऊमिया’चं वर्गीकरणही खुजा ग्रह असं करण्यात आलं आहे. कुइपर पट्टय़ातल्या तेजस्वी वस्तूंमध्ये त्याचं स्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मोठय़ा दुर्बिणीतून तो दिसू शकतो. सूर्यापासूनचं त्याचं अंतर आहे सुमारे साडेसात अब्ज कि.मी. सूर्य व पृथ्वी या दरम्यानच्या अंतराच्या ५० पट!
गिरीश पिंपळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

१८व्या शतकात आपल्या कवितांनी इंग्लंडच्या जनतेला भुरळ पाडणाऱ्या टॉमस ग्रे या भावकवीचा जन्म लंडनमध्ये २६ डिसेंबर १७१६ रोजी एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांना बारा भावंडे होती. पण ती सर्व वारली. ते एकटेच जगले. त्यातच त्यांची आई सतत आजारी असे. वडिलांचा स्वभाव तापट. परिणामी, श्रीमंत असूनही ते समाधानी नव्हते. शिक्षणासाठी वयाच्या आठव्या वर्षी ते इटनला आले. तिथे त्यांची मैत्री इंग्लंडच्या पंतप्रधानांचा पुत्र होरॅस वॉलपोल, पुढे कवी म्हणून नावारूपाला आलेल्या रिचर्ड वेस्ट आणि टॉमस अ‍ॅस्टन यांच्याशी जमली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ग्रे केंब्रिजच्या पीटर हाऊस कॉलेजमध्ये दाखल झाले. येथे त्यांनी लॅटिनमधून काही कविता लिहिल्या. पण कॉलेजातून पदवी मात्र घेतली नाही. कॉलेज सोडल्यावर काही काळ वॉलपोलबरोबर युरोपच्या दौऱ्यावर गेले. दरम्यानच्या काळात त्यांचा मित्र रिचर्ड वेस्ट वारल्याने त्यांच्या जीवनावर परिणाम झाला. या सुमारास ते केंब्रिज येथे स्थायिक झाले होते. मित्राच्या मृत्यूमुळे काही कविता त्यांच्याकडून लिहून झाल्या. ‘ओड ऑन द स्प्रिंग’, ‘द फेटल सिस्टर्स’, ‘टाइम टू अ‍ॅडव्हर्सिटी’ या कविता लिहिल्या. तथापि ‘अ‍ॅन एलेजी रिटन इन ए कंट्री चर्च यार्ड’ ही कविता प्रसिद्ध झाल्यावर साहित्यजगतात त्यांना कवी म्हणून मान्यता मिळाली. गरीब आणि श्रीमंत या दोघांच्या नशिबी शेवटी एकच गोष्ट समान आढळली ती म्हणजे मृत्यू. कारण शेवटी दोघेही थडग्यात जातात, हा या कवितेचा आशय होता. स्वभावाने ते थोडे हळवे होते. चेष्टा, मस्करी त्यांना सहन होत नसे. विद्यार्थ्यांनी चेष्टा केली म्हणून ते संतप्त झाले आणि कॉलेज सोडले. कवितेवर टीकाही त्यांना सहन होत नव्हती. टीका झाल्याने त्यांनी काव्यलेखनही थांबवले. इंग्लंडने देऊ केलेले राजकविपदही त्यांनी नाकारले. शेवटी शेवटी त्यांचा स्वभाव एकांतप्रिय झाला. अखेर त्यांच्या ५५व्या वर्षी ३० जुलै १७७१ रोजी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

फार पूर्वी सगळे प्राणी शेती करायचे. त्या काळातली ही कथा आहे. पावसाळा जवळ आला होता. कोळी सोडून गावातले सगळे लोक नांगरणी, पेरणी करीत होते. कोळी फार आळशी होता. सूर्य डोक्यावर आला की भरदुपारी तो उठायचा. जेवण करायचा आणि झाडाच्या सावलीला निवांत झोपायचा. बायको म्हणायची, ‘अहो, सगळेजण पेरणीच्या कामाला लागले. तुम्ही कधी जाणार शेतावर.’ ‘खूप वेळ आहे अजून पावसाला.’ कोळी उत्तर द्यायचा. दिवस भराभर चालले होते. गावातले लोक विचारायचे, ‘काय राव? कधी पेरा करणार?’ आळशी कोळी जरा कामाला लागला. त्यानं बाजारातून भुईमुगाच्या शेंगा आणल्या. बायकोला म्हणाला, ‘या सोलून खारवलेले शेंगदाणे कर म्हणजे पेरतो शेतात.’ बायको आश्चर्यानं म्हणाली, ‘अहो, भाजल्यावर दाणे उगवणार कसे? कोंब कसे येतील.’ ‘गप गं. खारवलेले दाणे पेरले की रोपांना खारवलेल्या शेंगा लागतील. मग भाजायची, खारवायची कटकट उरणार नाही.’ भाबडी बायको खारवण्यासाठी शेंगा सोलू लागली. खारवलेले शेंगदाणे घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी वेगळी भाकरी-भाजी बांधून बायकोचा निरोप घेऊन पेरणीसाठी शेतावर निघाला. पायवाटेनं चालत गाव, शेतं मागे टाकून तो दूर आला. त्यानं सगळे खारे दाणे खाल्ले. पाणी प्यायला अन् झाडाच्या सावलीला संध्याकाळपर्यंत निवांत झोपला. रोज तो सकाळी शेतावर जायला बाहेर पडायचा. पण शेतात इतरांप्रमाणे खुरपणी, तण काढणं, खतं घालणं करण्याऐवजी लपवून ठेवलेल्या पोत्यातले शेंगदाणे खाऊन दिवसभर झोपा काढायचा. संध्याकाळी घरी जाऊन म्हणायचा, ‘वाढ लवकर. दिवसभर मरेतोवर कष्ट करतो मी शेतात. सगळं अंग दुखतंय.’ एके दिवशी बायको म्हणाली, ‘अहो, गावकऱ्यांनी कापणी करून धान्य घरी आणलं. चला मी येते आज शेंगा उकरायला.’ कोळी डाफरला, ‘मला तू गरीब माणसाच्या बायकोसारखं शेतात काम केलेलं मुळीच आवडणार नाही. मी आज शेंगा आणतो.’ गावच्या प्रमुखाचं भलंथोरलं शेत होतं. कोळय़ानं गुपचूप शेंगा काढल्या. बायको जेवण तयार करून नवऱ्याची वाट पाहात होती. तिला नेऊन दिल्या. कौतुकानं एक शेंग फोडून तिनं दाणे तोंडात टाकले. ‘काय हो, कुठे खारे दाणे आहेत? नेहमीच्याच शेंगा आहेत. तुम्ही म्हणाला होतात की खारे दाणेच पिकतील.’ ‘मी असं कधीच म्हटलं नव्हतं. मला आठवत नाही.’ कोळी डाफरला. रोज कोळी शेंगा आणत राहिला. गावच्या प्रमुखाच्या शेतगडय़ानं पाळत ठेवली. त्यानं रबराच्या झाडाला चिरा पाडून खाली भांडी ठेवली आणि रबराचा चिक गोळा करून त्याचा माणूस करून शेतात उभा केला. चोरी करायला आलेला कोळी त्याला चिकटला आणि पकडला गेला. त्यानंतर कोळय़ाला गावात तोंड दाखवायला फार लाज वाटायला लागली. त्या दिवसापासून त्याचे वंशज कायम कोपऱ्यात लपून राहतात.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com