Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

महायुतीमधून भाजप गायब!
पनवेल/प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जुळवाजुळव सुरू असताना शेकाप-शिवसेना-भाजप-पीआरपी या महायुतीमधून भाजप गायब झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. शेकापने पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी यापूर्वीच बाळाराम पाटील यांचे नाव घोषित केले आहे. या पाश्र्वभूमीवर शेकापच्या पुढाकाराने बुधवारी पनवेलमध्ये भाजी मार्केटजवळच्या कर्नाळा बँक सर्कलसमोर कार्यकर्त्यांसाठी वज्रनिर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाजपच्या एकाही नेत्याची अथवा कार्यकर्त्यांची उपस्थिती नसल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

महामुंबईत वीजनिर्मिती
एमएमआरडीएबरोबरच्या संयुक्त प्रकल्पातून सिडकोची माघार
विकास महाडिक
‘मुंबई प्रदेश विकास प्रश्नधिकरण’ (एमएमआरडीए) हे वीज निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकण्याचा कितीही विचार करीत असले तरी सिडकोने या क्षेत्रात प्रवेश करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. एमएमआरडीए व सिडको यांनी संयुक्तपणे महामुंबई क्षेत्रात वीज निर्मिती प्रकल्प उभारावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पाच महिन्यापूर्वी व्यक्त केली होती. त्यामुळे एमएमआरडीएने अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची प्रश्नथमिक तरतूददेखील केली. मात्र सिडकोने या संयुक्त प्रकल्पातून काढता पाय घेतल्याने आता एमएमआरडीएला हे शिवधनुष्य स्वबळावर पेलावे लागणार आहे.

उरण खाडीत मृत माशांचा खच
उरण/वार्ताहर

उरणच्या खाडीत हजारो मृत माशांचा खच पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.उरण परिसरातील कोटनाका- काळा धोंडा खाडीत मंगळवारपासून मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसू लागले आहेत. दोन दिवसांपासून छोटे- मोठे विविध प्रकारचे मृत मासे खाडी परिसरात दिसू लागल्याने मच्छिमारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. उरण परिसरात अनेक घातक विषारी रसायन हाताळणाऱ्या कंपन्या आहेत. यामधून सर्रास विषारी घातक सांडपाणी थेट समुद्र व खाडीत सोडले जाते. यामुळे मोठय़ा प्रमाणात सागरी प्रदूषण होत आहे. या सागरी जलप्रदूषणामुळेच खाडी परिसरातील मासे मृत झाल्याचा आरोप मच्छिमारांकडून होत आहे. विशेष म्हणजे परिसरात प्रदूषण फैलाविणाऱ्या विविध कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचेच नियंत्रण नसल्याने परिसरात प्रदूषणात वाढ होत चालली आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. प्रदूषण फैलावणाऱ्या या कंपन्यांवर कारवाईची अपेक्षा होत असतानाच सागरी प्रदूषणामुळे मासे मृत होण्याचे प्रकारे घडू लागले आहेत. उरण परिसरातील विविध खाडय़ाही प्रदूषित झाल्याने स्थानिकांचा मासेमारी व्यवसायही अडचणीत आला आहे.उरण परिसरातील खाडय़ांमध्ये मंगळवारपासून मृत मासे तरंगू लागल्याने स्थानिक मच्छिमार मासेमारी करण्यास तयार नाहीत. यामुळे त्यांना आर्थिक उत्पन्नाला मुकण्याची वेळ आली आहे. खाडीत मासे मृत होण्याचे कारण अद्याप समजले नसले तरी विविध अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत. प्रश्नमुख्याने प्रदूषित रासायनिक सांडपाणी समुद्रात सोडण्यात येत असल्यानेच हे मासे मृत झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

स्मशानभूमी दुरुस्तीसाठी आमदार निधीतून मदत
पनवेलमधील समस्यांचा संजय केळकर यांच्याकडून आढावा

पनवेल/प्रतिनिधी - भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकर यांनी बुधवारी पनवेलला भेट देऊन विविध नागरी समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, नगरसेवक प्रदीप जाधव आदी उपस्थित होते.अमरधाम स्मशानभूमीची दुरवस्था झाली असल्याने केळकर यांनी सर्वप्रथम तिकडे मोर्चा वळविला. या स्मशानभूमीला छप्पर नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. त्यावर उपाय म्हणून छप्पर उभारणीसाठी आपल्या आमदार निधीमधून आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. स्मशानभूमीला भारनियमनाचाही फटका बसत असल्याने तेथे अखंड वीजपुरवठा करण्यात यावा, असे निर्देश वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.केळकर यांनी त्यानंतर प्रसिद्ध श्री धूतपापेश्वर आयुर्वेदिक कारखान्याला भेट दिली. या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो, अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पनवेल शहर अध्यक्ष प्रथमेश सोमण यांनी वारंवार केली होती. जाधव यांनीही याप्रकरणी आवाज उठविला होता. या पाश्र्वभूमीवर केळकर यांनी कारखान्याची पाहाणी केली. धूर सोडणारी चिमणी १०० फूट उंच असल्याने तसेच भट्टीचा विभाग अन्यत्र हलविण्यात येणार असल्याने नागरिकांना त्रास होणार नाही, असे यावेळी व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले.पनवेल ग्रामीण रुग्णालयाची बिकट अवस्था झाल्याने केळकर यांनी तेथेही भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.