Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयाला टाळे
रिक्त पदे भरण्यासाठी संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन

प्रतिनिधी / नाशिक
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त असणाऱ्या जागा भरल्या जात नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी चांदवड पंचायत समितीच्या माजी सभापतींच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शहरातील जिल्हा परिषद मुख्यालयात गोंधळ घालून शिक्षणाधिकारी कार्यालयास टाळे ठोकले. यावेळी आंदोलकांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरून शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी केली.

विविध महाविद्यालयांना नव्या अभ्यासक्रमांसाठी परवानगी
प्रतिनिधी / नाशिक

जिल्ह्य़ातील महाविद्यालयांना राज्य शासनाने २००९-१० या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या अभ्यासक्रमात इच्छुक विद्यार्थी लगेच प्रवेश घेऊ शकतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील के. टी. एच. एम. महाविद्यालयात बी.एस्सी. भूगोल (स्पेशल) विषय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. उत्तर महाराष्ट्रात हा अभ्यासक्रम सुरू करणारे हे पहिलेच महाविद्यालय असल्याचे मविप्र शिक्षण संस्थेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

खेळाडूचा काय गुन्हा? : मनोज पालखेडे अन्यायाचा केवळ डांगोरा : रतन कुयटे
प्रतिनिधी / नाशिक

सत्ताधारी व विरोधी असे दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात गुंतल्याने नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणुकीत कमालीची चूरस निर्माण झाली आहे.निवडणुकीत मागणीप्रमाणे माफीपत्र लिहून दिल्यानंतरही नाशिक क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंवरील बंदी उठविण्यात आली नाही, आम्ही असा काय गुन्हा केला, या एकता पॅनलचे उमेदवार मनोज पालखेडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला खेळाडु पॅनलने खेळाडूंवरील अन्यायाचा केवळ डांगोरा पिटला जात आहे, असे प्रत्युत्तर दिले आहे.

जिज्ञासू!
विज्ञान म्हटल्यावर सामान्यपणे विविध रसायने, परीक्षा नळ्या, निरनिराळ्या तऱ्हेची व आकाराची उपकरणे, संमिश्र रसायनांचा गंध भरून राहिलेली प्रयोगशाळा.. असे चित्र नजरेसमोर येते. त्यामुळे साहजिकच विज्ञान म्हणजे त्यातील अवघड संज्ञा, गुंतागुंतीचे प्रयोग आणि एकूणातच क्लिष्टता असा दृष्टीकोन आपल्याकडे सामान्यपणे बनला आहे. पण, प्रभाकर देशपांडे यांनी नाशिकमध्ये उभारलेले विज्ञान संग्रहालय पाहिल्यावर मात्र हे सगळे समज गळून पडतात. कारण, आपल्या चालण्यापासून अगदी प्रत्येक बाबतीतच विज्ञान असल्याची प्रचिती येथे येणाऱ्या प्रत्येकाला हसत-खेळत येते. शिवाय, या संग्रहालयाची खासियत म्हणजे येथे येणाऱ्यांची भूमिका केवळ बघ्याची नसते, तर अनेक बाबी करून बघण्याची, खूप काही अभ्यासण्याची आणि अनुभवण्याचीही असते.

येवला येथे पैठणी विणण्याचे मोफत प्रशिक्षण केंद्र सुरू करा - भुजबळ
नाशिक / प्रतिनिधी

महाराष्ट्रात पारंपरिक वस्त्र म्हणून लोकप्रियता मिळालेली पैठणी विणण्यासंबंधीचे मोफत प्रशिक्षण केंद्र येवला येथे सुरू करावे व येवल्यात पैठणी विणण्यासाठी सामूहिक सुविधा केंद्र उभारण्यासाठी एम. आय. डी. सी.मध्ये जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सह्य़ाद्री अतिथीगृहात नुकत्याच झालेल्या बैठकीत केली. येवला ही पैठणी विणकरांची नगरी असून या ठिकाणच्या विणकरांच्या नव्या पिढीला तसेच पैठणी विणकाम करू इच्छीणाऱ्या अन्य तरुणांना याबाबत प्रशिक्षण मिळणे गरजेच आहे.

आश्वासनांची पूर्ती होईल काय ?
भ्रष्टाचाराचा भस्मासूर लोकशाही आणि विकास योजना गिळंकृत करण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्यातील ६० साखर कारखाने असे आहेत की, ते विकले तरी त्यांचे कर्ज फिटणार नाही. राज्यातील चार ते पाच जिल्हा मध्यवर्ती बँका सोडल्या तर सर्व बँका डबघाईला आल्या आहेत. राज्यातील बहुतांशी सूतगिरण्या बंद पडल्या आहेत. मजूर सोसायटय़ा व गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये सावळा गोंधळ आहे. राज्यात ३३८ हून अधिक पतसंस्था एक कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक असलेल्या आहेत. गैरकारभार व भ्रष्टाचारामुळे ४६२ पतसंस्था डबघाईस येऊन अडचणीत आहेत. या पतसंस्थांमध्ये सामान्य गरीब जनतेच्या सातशे कोटीहून अधिक ठेवी अडकल्या आहेत.

पदव्युत्तर पदवी अभ्यासकेंद्राचे उद्घाटन
नाशिक / प्रतिनिधी
संशोधन ही गांभीर्याने करावयाची प्रक्रिया असून तिची भीती बाळगू नका. आपले संशोधन समाजोपयोगी आहे, याची खात्री असेल तर संशोधन प्रक्रियेचा आनंद घेता येतो. संशोधनाकडे सजग दृष्टीनेच विद्यार्थ्यांनी पहायला हवे, असे मत प्रश्न. डॉ. प्रमोद बियाणी यांनी व्यक्त केले. येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक सेवा विभागाने सुरू केलेल्या पदव्युत्तर पदवी संशोधन शिक्षणक्रमाच्या अभ्यास केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.बियाणी बोलत होते.शैक्षणिक सेवा विभागाने मुक्त विद्यापीठाच्या मुख्यालयात या वर्षापासून पदव्युत्तर पदवी व एम. फिल. संशोधन शिक्षणक्रमाचे अभ्यासकेंद्र सुरू केले आहे. या अभ्यास केंद्राचा उद्घाटन समारंभ विभागाचे संचालक प्रश्न. डॉ. प्रमोद बियाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच झाला. संशोधन हे समाजोपयोगी असेल तर ते चिरतंन टिकते, त्यामुळे संशोधनाची उपयुक्तता हा महत्वाचा भाग आहेच, पण त्या प्रक्रियेतून मिळणारा आनंद विद्यार्थ्यांला घेता आला पाहिजे. म्हणूनच संशोधनाची भीती बाळगू नका, असे मत डॉ. बियाणी यांनी व्यक्त केले. केंद्राच्या परिचयपर कृतिसत्रही यावेळी झाले. अभ्यास केंद्राचे संयोजक डॉ. हेमंत राजगुरू यांनी प्रश्नस्तविक केले. प्रश्न. मनिषा जगताप व प्रश्न. रत्नमाला यादव यांनीही मार्गदर्शन केले. प्रश्न. रामदास भोंग यांनी आभार मानले.

‘फॉरेन्सिक मेडिसीन’ पुस्तकाचे प्रकाशन
नाशिक / प्रतिनिधी
येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गांगुर्डे लिखीत‘फॉरेन्सिक मेडिसीन’ पुस्तकाचे प्रकाशन गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या पुस्तकात पोलीस तपास तसेच कायदेविषयक गुन्ह्य़ांतील वैद्यकीयदृष्टय़ा आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा व त्याच्या परिणामांचा सांगोपांग अभ्यास दिलेला आहे. मरणोत्तर शरीरातील बदल, जखमांचे प्रकार, शवविच्छेदन, विषशास्त्र, लैंगिक गुन्हे, (उदा. बलात्कार, गर्भपात, बालहत्या) व नवीन आधुनिक पोलीस तपासाच्या पध्दती याविषयीही परिपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तक हे रंगीत छायाचित्रांसह असल्यामुळे वाचकांना या विषयांचा योग्यरित्या बोध होतो. डॉ. गांगुर्डे यांना गुन्हेगारी व संबंधित वैद्यकशास्त्र तसेच कायदेविषयक सुमारे १५ वर्षाचा अनुभव असून त्यांनी मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृह, सेंट जॉर्ज रूग्णालय तसेच इतर विविध ठिकाणी विशेष सेवा दिलेली आहे. तपासासाठी सर्व स्तरातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अभियोक्ते यांनाही या पुस्तकाची मदत होणार आहे. याप्रसंगी अकादमीच्या संचालिका श्रीदेवी गोयल, उपसंचालक राजेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक डॉ. निखील गुप्ता, नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाचे प्रश्नचार्य मधुकर वसावे आदी उपस्थित होते.

गळीत हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची चिन्हे
नाशिक / प्रतिनिधी
नाशिक सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम येत्या ऑक्टोबर दरम्यान सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, अशी भूमिका कारखान्याचे अध्यक्ष देविदास पिंगळे यांनी मांडली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत येत्या हंगामाविषयी विविध निर्णय घेण्यात आले. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी सवलतीच्या रजेवर गेलेल्या सर्व कामगारांनी एक ऑगस्टपासून कामावर रूजू व्हावे, असे आवाहन पिंगळे यांनी केले आहे. कारखाना कार्यक्षेत्राच्या तीनही तालुक्यात दीड लाख मेट्रिक टन शेतकऱ्यांच्या जमिनीत ऊस आहे. कारखान्याने प्रतिवर्षी १.७५ मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्टय़े ठरविले आहे. इतर ऊस हा कार्यक्षेत्राबाहेरून आणण्याचा प्रयत्न कारखान्याकडून करण्यात येणार आहे. या उसाला इतर कारखान्याप्रमाणे भाव देण्याचा आपला यावर्षी मानस असून त्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहे, असेही पिंगळे यांनी सांगितले. साखर निर्यातीपोटी १३ कोटी रूपये मिळणार असून साखरेसह इतर अनुदान कारखान्याला मंजूर करून घेण्यसाठी प्रयत्न सुरू आहेत. कारखान्याच्या मशिनरी दुरूस्तीचे काम वेगात सुरू आहे. सवलतीच्या रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी एक ऑगस्टपासून कारखान्यावर नियमितपणे हजर राहावे, असे आवाहन पिंगळे, उपाध्यक्ष जगन आगळे, तुकाराम दिघोळे आदींनी केले आहे.

सपट चहा लवकरच आंध्रप्रदेशात -सोनाली कुलकर्णी
नाशिक / प्रतिनिधी

सपट चहाची ‘म्हणाल झक्कास’ ही नवीन जाहिरात सुरू होत असल्याची माहिती सपट चहाची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. लवकरच हा चहा आंध्रप्रदेशातही जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.याप्रसंगी सपटचे अध्यक्ष जे. आर. जोशी यांनी सपट चहाने चोखंदळ ग्राहकांच्या आवडीचा नेहमी विचार केला आहे, असे सांगितले. व्यवस्थापकीय संचालक डॉ. निखील जोशी यांनी सपट गुलाबी व सपट चॉकलेटी या दोन वेगवेगळ्या उत्पादनांची माहिती दिली. सपट चहाने १०० टक्के नैसर्गिक चहाची चव आणि इतर स्वाद यांचा समतोल सांभाळला आहे, असेही ते म्हणाले. सपट चहा संपूर्ण भारतभर पोहचवयाचा आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी अनिस जोशी व जी. बालसुब्रमण्यम उपस्थित होते.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सायकल दान करण्याचे आवाहन
नाशिक / प्रतिनिधी

आदिवासी भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाणे सूकर व्हावे याकरिता येथील रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊन या संस्थेने त्यांना सायकल उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमात आपला सहभाग देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपल्याकडील सुस्थितीतील सायकल रोटरी संस्थेला दान करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दान केलेली सायकल ही तात्काळ गरजू विद्यार्थ्यांना देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्याबाबतची माहितीही संबंधित नागरिकांना कळविली जाईल, सायकल उपलब्ध झाल्यावर त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला वेग प्रश्नप्त होऊ शकेल., असे संस्थेने म्हटले आहे. रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनचे अध्यक्ष शिरीष भालेराव, रोटरीचे सहाय्यक प्रश्नंतपाल अ‍ॅड. अमरजितसिंह गरेवाल, सचिव देवनाथ पाटील आदींनी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे. ९४२२२-५१९७५, ९८२२०-५७२६२, ९४२२९-४३५९५ या क्रमांकावर संपर्क साधावा.