Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

मखमली हिरवा शालू ओढलाय तोरणमाळने
दत्ता वाघ / शहादा

जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने काहीशा निराश झालेल्या पर्यटकांना सध्या तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण विलक्षण मोहात पाडत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून संततधार पाऊस होत असल्याने तोरणमाळचे स्वरुपच पालटले आहे. स्वर्गलोकातून जणू काही या भूतलावर हिरव्या-पोपटी रंगाची मुक्त हस्ते उधळण होत असल्याचा भास निर्माण होत आहे. निसर्गाने जणू काही विविध रंगांचे कलश भरभरून ओतले आहेत आणि त्यामुळे सातपुडा पर्वतातील दरी-खोरी आणि डोंगर मखमली हिरवाकंच शालू पांघरून नटून थटून सजले असल्याचाच प्रत्यय येत आहे.

अक्कलपाडा प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन लवकरच -आ. पाटील
१९९९ कायद्यातील तरतुदीही लागू करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न
धुळे / वार्ताहर

अक्कलपाडा प्रकल्पबाधितांची पुनर्वसनाची कामे १९८६ अधिनियमाप्रमाणे सुरू असून कायद्यात बदल झाल्यामुळे या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन १९९९ प्रमाणे करण्याबाबत प्रयत्न केले जातील, अशी माहिती आ. रोहिदास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पबाधितांशी चर्चा करताना दिली.

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा
वार्ताहर / नांदगाव

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विनाअट सामावून घ्यावे अशी मागणी वारंवार करूनही दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ तीन ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता मुंबई येथे कर्मचारी संघटनेच्यावतीने सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा नांदगाव तालुका अध्यक्ष विनोद बोरकर यांनी दिला आहे.पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विमा अट सामावून घेण्यासाठी शासनाने आजपर्यंत आश्वासने दिली, पण कार्यवाही झाली नाही. शासनाच्या दिरंगाईमुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या वयोमर्यादा संपल्या, काहीजणांचे संस्कार उद्वस्त झाले, असे संघटनेची तक्रार आहे. राज्यात अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या ४५ हजार इतकी असूनही शासन निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत आहे. विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच उर्वरित अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी बोरकर यांनी केली. दोन ऑगस्टपूर्वी याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा तीन ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मनमाड-येवला राज्यमार्गावरील पथदीप सुरू होणार
मनमाड / वार्ताहर

मनमाड-येवला राज्यमार्गावरील अनेक दिवसांपासून बंद असलेले पथदीप सुरू करण्यासाठी मनमाड नगरपालिकेने पुढाकार घेतला असून १५ ऑगस्ट पर्यंत हा राज्यमार्ग दिव्यांनी उजळून निघेल, अशी माहिती नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी दिली. मालेगाव-मनमाड-येवला या राज्यमार्गाच्या शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर पथदीप उभारण्यात आले. मात्र अद्याप ते सुरू झालेले नाहीत. या पथदीपांचे वीज देयक कोण भरणार यावरून काम रखडले आहे. परिणामी या मार्गावर रात्री अंधाराचे साम्राज्य पसरून वाहन चालकांची गैरसोय होत होती. पथदीप बंद राहणे चुकीचे असल्याने नगरपालिका याची पूर्तता करणार आहे. या पथदीपांच्या सर्व खांबावर लाईट बसवून उर्वरित काम १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी संबंधित विभागास दिले असून हे काम पूर्ण होताच राज्य मार्गावरील पथदीप सुरू होतील, अशी माहिती धात्रक यांनी दिली.

राजकीय जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्वाची - खा. सोनवणे
शिंदखेडा / वार्ताहर
पदवीधर मतदारसंघाचा आमदार असताना शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे लोकसभा निवडणुकीत आपला विजय झाला. आपल्या राजकीय जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्वाची ठरली, त्यामुळे ज्या गुरूजनांकडून चांगले शिकायला मिळते, त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो, असे प्रतिपादन खा. प्रतापदादा सोनवणे यांनी केले.
येथील एम. एच. एस. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात संगणक कक्षाचे उद्घाटन सोनवणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित शिक्षण संकुलातर्फे सोनवणे यांचा सत्कार प्रश्नचार्य पी. एस. सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ. जयकुमार रावल, जि. प. अध्यक्ष सुधीर जाधव, जि. प. सदस्य वामन देसले, सभापती जिजाबराव सोनवणे आदी उपस्थित होते. शिंदखेडा तालुक्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सिंचन प्रकल्पातील पाणी शेतापर्यंत पोहचविण्यासाठी ८० टक्के खासदार निधी हा शेती व पाणीसाठी वापरला जाईल असेही ते म्हणाले. शिंदखेडा तालुक्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत शिंदखेडा-विखरण, शिंदखेडा-वरवाडा, अमळथे या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन खा. सोनवणे यांच्या हस्ते झाले. प्रश्नस्तविक व सूत्रसंचालन प्रश्न. प्रदीप दीक्षित यांनी केले. आभार प्रश्न. जी. पी. शास्त्री यांनी मानले.

शिक्षण संस्थेची फसवणूक ; १४ जणांविरुद्ध गुन्हा
धुळे / वार्ताहर
वेगवेगळी दोन पगारपत्रके तयार करून त्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांची मंजुरी मिळवत खापर येथील १४ जणांनी तब्बल एक कोटी २७ लाखाचा गैरव्यवहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. दोंडाईचा येथील संत जगनाडे महाराज शिक्षण संस्थेची फसवणूक आणि विश्वासघात केल्याच्या आरोपाखाली या सर्वाविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी परबत छगन चौधरी रा. दोंडाईचा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुरेश जगन्नाथ सूर्यवंशी यांनी पूर्वनियोजनानुसार दस्तावेज तयार करून दोनवेळा पगार पत्रके तयार केली. नोव्हेंबर २००२ पासून ३ ऑगस्ट २००६ या कालावधीत त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची मंजुरी घेत तब्बल एक कोटी २७ लाख सात हजार ४४५ रुपये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या दोंडाईचा येथील शाखेत स्वत:च्या वैयक्तिक खात्यावर जमा केले व स्वत:च्या फायद्यासाठी नंतर ते काढूनही घेतले. शिक्षण संस्थेच्या फसवणूक प्रकरणात रवींद्र अरूण चव्हाण, जाईबाई बारकू वानखेडे, विलास पांडुरंग देवरे, आशा आनंदा सूर्यवंशी, दामोदर बन्सीलाल पवार, हेमंतकुमार उदयसिंग गिरासे, सनेर त्र्यंबक चौधरी, रमेश गबू वसावे, नंदकिशोर काशिनाथ भदाणे, अमोल अशोकलाल गुजराथी, बाळू गोवर्धन वाल्हे, सुरेश जगन्नाथ सूर्यवंशी, गिरीश पुंडलिक पाठक, दिनेश पुंजू गिते अशा १४ जणांचा समावेश आहे.

नांदगाव तालुक्यात ६० टक्के पेरण्या
नांदगाव / वार्ताहर

नांदगाव तालुक्यात खरीपाच्या हंगामासाठी ५७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर विविध पीक पेरणीचा लक्षांक तालुका कृषी विभागाने ठेवला असून त्यापैकी ३४ हजार ४३९ क्षेत्रावर म्हणजे ६० टक्के पेरणी पूर्णत्वास गेल्याची माहिती गटविकास अधिकारी महेंद्र कोर व तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे यांनी दिली. त्यामध्ये बाजरी पिकाची पेरणी सर्वाधिक असून उसाच्या लक्षांकामध्ये वाढ झाली आहे. २४ हजार ४९४ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्याची पेरणी पूर्ण झाली आहे. कडधान्याच्या पेरणीत वाढ व्हावी म्हणून शासनाने सवलतीच्या दरात कडधान्य बियाणे पंचायत समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. सहा हजार ९०० लक्षांक्षापैकी केवळ दोन हजार ४५० हेक्टरवर पेरणी झाली तर इतर तेलबिया पिक पेरणीतही घट झाली आहे. अलिकडेच लोकप्रिय झालेल्या कापसाच्या लागवडीत यंदा घट झाली आहे. १६ हजार हेक्टरचा लक्षांक असताना केवळ सहा हजार २४७ हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याची माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांचे अपहरण केल्याची तक्रार
धुळे / वार्ताहर
शहरातील स्वामी नारायण छात्रालयाच्या विद्यार्थ्यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रभाकर बाबुराव देसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २७ जुलै रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत अज्ञात व्यक्तिंनी नितीन अरविंद देसले (२२) याचे शहरातील एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालयाजवळून बळजबरीने अपहरण करण्यात आले.