Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

पुष्परचनांसाठी उधळपट्टी!
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी आणि त्यांची ‘मॉडेल’ पत्नी कार्ला ब्रूनी-सारकोझी ही जोडगोळी अधूनमधून चर्चेत असतेच. त्या दोघांबाबतच्या बातम्या वृत्तपत्रांमधून झळकत असतात. अगदी अलीकडे ‘जॉगिंग’ करताना सारकोझी यांना मूर्छा आली आणि त्याची बातमी सर्वत्र झळकली. असो, तर निकोलस सारकोझी आणि कार्ला यांच्या बातम्या पाश्चात्त्य वृत्तपत्रांमधून ठळकपणे प्रसिद्ध होत असतात. मॉडेल राहिलेल्या कार्ला ब्रूनी यांना फुलांचे अत्यंत आकर्षण. पॅरिसमधील इलीसी राजप्रासादात आकर्षक पुष्परचना करून त्यांची राजप्रासादात सुबक मांडणी करण्याची कार्ला ब्रूनी यांना आवड.

‘दंशाचा’ प्रत्यय
‘थांबताच येत नाही’ हा हेमंत दिवटेंचा कवितासंग्रह मराठीच्या अत्याधुनिक कवितेला काही नवी ऊर्जा पुरविणारा कवितासंग्रह होय. दिवटेंची मूळ प्रकृती ही कुणी पाडून ठेवलेल्या जुन्या वाटा चोखाळणारी नाही, हे या कवीचे व्यवच्छेदक लक्षण तर आहेच; शिवाय दिवटेंच्या कवितेचे करू म्हटले तरी अनुकरणसुद्धा कुणाला करता यावयाचे नाही. ही लोकविलक्षण अशी ख्याती या कवीची आहे. ‘थांबताच येत नाही’ या अर्थाने या दशकालाच नवे काही देण्याची पूर्ण क्षमता दिवटेंच्या या संग्रहात सामावलेली आहे. कुठली नवी ऊर्जा या संग्रहात आढळते?

पवारांचा फॉम्र्युला आपसूकच लागू
विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत सोलापूर जिल्हय़ातील दोन मतदारसंघ लुप्त झाले असून, त्याचा फटका राष्ट्रवादी आणि शिवसेनेला बसला आहे. तर आणखी राष्ट्रवादीचे दोन मतदारसंघ राखीव झाल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ६०:४० हा फॉम्र्युला येथे आपोआपच लागू झाल्याचे दिसून येते. त्यातच उरलेल्या मतदारसंघांतील प्रस्थापितांना पवार आता दूर ठेवणार का, हा प्रश्न आहे. २००४ मध्ये झालेल्या जुन्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ५, शिवसेनेने ४, काँग्रेस, भाजप, माकप, शेकाप या पक्षांनी प्रत्येकी १ जागा मिळविल्या होत्या.

‘जॅको’चे नाक बनावट?
मायकल जॅक्सनचा मृत्यू होऊन बरेच दिवस लोटले असले तरी त्याचा मृत्यू कशामुळे झाला याचे गूढ अजून उलगडलेले नाही. या संदर्भात पोलीस तपास चालू आहे. विविध ठिकाणी पोलिसांकडून छापे घातले जात आहेत. तो तपास होईल तेव्हा होवो; पण मायकल जॅक्सन ऊर्फ ‘जॅको’बद्दल नवनवीन माहिती पुढे येत आहे. मायकल जॅक्सनच्या मृत्यूनंतर त्याचे पार्थिव पाहिलेल्या एकाला त्याचे नाक गायब झाल्याचे आढळले. नाकावर शस्त्रक्रिया केल्यानंतर मायकेल खोटे नाक वापरत असे. अशा सहा-सात नाकांचा मायकेलकडे साठा होता. ते बनावट नाक लावून तो वावरत असे. वडिलांनी खूप छळल्यामुळे मायकलचा वडिलांवर खूप राग होता. त्याचा चेहरा काहीसा वडिलांसारखा असल्याने तो बदलण्यासाठी त्याने चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केल्याचे सांगण्यात येते. लहानपणी त्याचे नाक मोठे होते. त्याची मित्रमंडळी ‘बिग नोज’ म्हणून त्याचा उल्लेख करीत असत; पण पुढे पुढे मायकल जॅक्सनच्या नाकाचा आकार लहान लहान होत गेला. मृत्यूनंतर तर त्याच्या नाकाच्या केवळ छिद्र असल्याचे आढळून आले! प्रकाशझोतात असलेल्यांकडून काय काय केले जाऊ शकते, ते मायकेलसारख्या ‘सेलिब्रेटी’कडे पाहिले, की लक्षात येते. एवढेच आपणास म्हणता येईल.

चीन ‘एक मूल धोरण’ सोडून देणार?
जगात लोकसंख्येच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या चीनने गेल्या ३० वर्षांपासून राबविण्यात येत असलेले ‘एक मूल धोरण’ सोडून द्यायचे ठरविले असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शांघाय हे चीनमधील एक मोठे शहर, या शहरातील प्रशासनाकडून आता ‘दोन मुले हवीत’ या धोरणाचा पाठपुरावा करण्यास प्रारंभ झाला आहे. ‘एक मूल धोरण’ अगदी सक्तीने राबविणाऱ्या चीनने, या धोरणाचा अवलंब करताना ज्यांना एक मूल आहे, अशा स्त्रिया दुसऱ्या वेळी गरोदर राहिल्यानंतर त्यांचा गर्भपात करण्यापर्यंत मजल मारली होती. त्याच चीनने ३० वर्षांपूर्वीपासून चालत आलेले धोरण बदलण्याच्या दिशेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे, असे म्हणायचे! कुटुंबामागे दोन मुले असली तरी ते चीनमधील शांघाय शहरात आता चालणार आहे. हा निर्णय घ्यायला कारणही तसेच सबळ आहे. शांघायसह चीनच्या विविध शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. एकटय़ा शांघाय शहरात साठीच्या पुढचे ३० लाख लोक आहेत. त्या शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण २१.६ टक्के आहे. २०२० पर्यंत हे प्रमाण ३४ टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालल्याचे पाहून आपल्या लोकसंख्याविषयक धोरणात बदल करण्याचे चीनने ठरविल्याचे दिसते. जगातील श्रीमंत देशांमध्ये चीनचा वरचा क्रमांक लागण्याऐवजी जगातील ‘पहिला म्हातारा देश’ अशी चीनची जगाला ओळख होऊ नये, म्हणून धोरणात बदल करण्याचा निर्णय चीनने घेतला असावा.

स्मितरेषेसाठी..
नोकरी करताना आपल्या चेहऱ्यावर आठय़ांच्या ऐवजी स्मितरेषा असायलाच हवी, ती नसेल तर कामानिमित्त विचारणा करण्यास येणाऱ्यांना दिलासा मिळत नाही. समोरच्या व्यक्तीने हसतमुखाने स्वागत केले किंवा चेहरा हसरा ठेवून काम जाणून घेतले तर तक्रार, काम घेऊन आलेल्याला बराच दिलासा मिळतो. हे लक्षात घेऊन जपानमधील टोकियो या शहरातील शिनागावा स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना कामावर गेल्यानंतर ‘स्माईल टेस्ट’ द्यावी लागणार आहे. उत्तम, व्यवस्थित राहणी ठेवून त्या कर्मचाऱ्यांचे भागणार नाही. त्यांना आपला चेहरा हसरा ठेवावाच लागणार आहे. कॅमेऱ्यापुढे बसून चेहऱ्यावरील स्मितरेषा किती टक्क्यांपर्यंत असायला हवी हे त्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले जाणार आहे. शिनागावा स्टेशनवरील जनतेला सामोरे जाण्यापूर्वी ‘हास्य चाचणी’ला सामोरे जाऊन मग कामास प्रारंभ करावा लागणार आहे. सध्या ही ‘हास्य चाचणी’ ऐच्छिक ठेवली असली तरी पुढे-मागे ती सक्तीचीही होऊ शकते. जपानमधील हा उपक्रम कितपत यशस्वी होतो ते भविष्यात दिसून येईलच. कर्मचारीवर्ग हसतमुख असायला हवा, हे तात्विकदृष्टय़ा योग्य; पण शेवटी तोही मनुष्यच आहे. त्यालाही भावभावना, राग, उदासीनता आदी गुण-दोषांना सामोरे जावे लागतेच. ‘हास्य चाचणी’ची कल्पना ठीक आहे. पण सदा सर्व काळ कर्मचारी हसतमुख असायला हवा, ही आदर्श स्थिती प्रत्यक्षात अवतरणे कठीणच!